रत्नागिरी
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.
इतिहास
रत्नागिरीचा किल्ला विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची डागडुजी करून तो वापरात आणला. इ.स. १७३१मध्ये साताऱ्याच्या छत्रपतींनी हा किल्ला जिंकला व इ.स. १८१८मध्ये पेशव्यानी तो इंग्रजांच्या स्वाधीन केला.
पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
ओळख
हे शहर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते भारताच्या पश्चिम किनार्यावरील एक बंदर आहे. रत्नागिरी शहर पूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसलेले आहे.
ब्रम्हदेशचा राजा थिबा ह्याला इंग्रजांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याचे निवासस्थान थिबा पॅलेस.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.
शहराची लोकसंख्या ७०,३३५(सन २००१) इतकी असून सरासरी साक्षरता ८०% आहे.
प्रमुख व्यवसाय
मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट,भारती शिपियार्ड, गद्रे मरिन प्रोडक्ट्स्, आणि जे.के. फाईल्स हे रत्नागिरीमधील मुख्य उद्योग आहेत.
रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.
शिक्षणसंस्था
गोगटे महाविद्यालयशासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, ह्यामुळे रत्नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे.
वाहतुकीची साधने
रत्नागिरी शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.)ची शहर वाहतूक आहे. रत्नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. कोकण रेल्वेवरील ते एक महत्त्वाचे स्थानक आहे. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्नागिरी शहरतूनच पार पडला होता.