पुणे
पुणे उच्चार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.
शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.
पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केल्यापासून हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.
इतिहास
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.
भूगोल
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.
पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.
बगीचे आणि पोहण्याचे तलाव
पुणे शहरात ८९ बगीचे आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
इंद्रप्रस्थ उद्यान, येरवडा
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, पुणे कँप
एरंडवणा उद्यान
ओकायामा मैत्री उद्यान (पु̮. देशपांडे उद्यान), सिंहगड रोड
कमला नेहरू पार्क
कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज
खडकी बोटॅनिकल गार्डन
गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर
गलांडे उद्यान, कल्याणीनगर
घोरपडे उद्यान, घोरपडे पेठ
जयंतराव टिळक गुलाबपुष्प उद्यान, सहकारनगर
जिजामाता उद्यान, कसबा पेठ
प्रदीप ताथवडे उद्यान, कर्वेनगर
तुकाराम उद्यान, निगडी
तात्यासाहेब थोरात उद्यान
धोंडीबा सुतार बालोद्यान, कोथरूड
नवसह्याद्री उद्यान
पानकुंवरजी फिरोदिया उद्यान
पु̮.ल. देशपांडे उद्यान (ओकायामा मैत्री उद्यान), सिंहगड रोड
फुलपाखरू उद्यान
बंड गार्डन (महात्मा गांधी उद्यान)* hv
वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर
मॉडेल कॉलनी तळे उद्यान, मॉडेल कॉलनी
यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर
रमाबाई आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ
राजा मंत्री उद्यान, एरंडवणा
राजीव गांधी प्राणी संग्रहालय (कात्रज सर्पोद्यान), कात्रज
विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर
शाहू उद्यान, सोमवार पेठ
श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कोथरूड
संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता
सोमेश्वर उद्यान, निगडी
हजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान
ज्ञानेश्वर उद्यान, निगडी
पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा
ओशो झेन बाग
कबीर बाग
चिमण बाग
ढमढेरे बाग
तुळशीबाग
नातूबाग
पटवर्धन बाग
पेरूचा बाग
पेशवे बाग
बेलबाग
भिडेबाग
माणिकबाग
मोतीबाग
रमणबाग
रामबाग
वसंतबाग
सारसबाग
सिताफळबाग
सुपारीबाग
सोपानबाग
हिराबाग
पुण्यात वरच्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते.हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
पेठा
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून-नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ- ठेवली गेली आहेत.१६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली.रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गंज पेठ (महात्मा फुले पेठ), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट).
गल्ल्या, बोळ, आळ्या
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:
रविवार पेठ
कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
गाय आळी
गूळ आळी
गौरी आळी
चांभार आळी
चोळखण आळी
जुनी तपकीर गल्ली
जोगेश्वरीचा बोळ
तांबट आळी
तुळशीबागेचा बोळ
दाणे आळी
नेने घाट
पंतसचिवाची पिछाडी
फणी आळी
बुरूड आळी
बोहरी आळी
भाऊ महाराजांचा बोळ
मुंजाबाचा बोळ
मुजुमदारांचा बोळ
मेहुणपुरा
लोणार आळी
लोणीविके दामले आळी
शालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)
शिंदे आळी
शिंपी आळी
उपनगरे
पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
अप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कँप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा, कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, [दापोडी]], धनकवडी, धायरी, [[[पद्मावती]], पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहेगाव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर
हवामान
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.