Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय आठवा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती ॥ वेदवंद्य तू भोळाचक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती प्रगटविली ॥१॥

तुझिया बळे विश्वव्यापका ॥ सूत सांगे शौनकादिका ॥ भद्रायूसी शिवकवच देखा ॥ श्रीगुरूने शिकविले ॥२॥

मृत्युंजयमंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म ॥ रुद्राक्षधारण सप्रेम ॥ करी भद्रायु बाळ तो ॥३॥

एक शंख उत्तम देत ॥ ज्याच्या नादे शत्रु होती मूर्च्छित ॥ खङ्ग दिधले अद्भुत ॥ त्रिभुवनात ऐसे नाही की ॥४॥

ते शस्त्र शत्रूते दाविता नग्न ॥ जाती एकदाच भस्म होऊन ॥ द्वादश सहस्त्रइभबळ गहन ॥ तत्काळ दिधले कृपेने ॥५॥

देणे शिवाचे अद्भुत ॥ म्हणे होई ऐश्वर्यवंत ॥ आयुरारोग्य विख्यात ॥ सर्व रायात श्रेष्ठ तू ॥६॥

चिरकाल विजयी होऊनी ॥ संतोषरूपे पाळी मेदिनी ॥ निष्कामदानेकरूनी ॥ माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष ॥७॥

भाग्यलक्ष्मी असो तव सदनी ॥ भूतकारुण्यलक्ष्मी ह्रदयभवनी ॥ दानलक्ष्मी येवोनी ॥ करकमळी राहो सदा ॥८॥

सर्वांगी असो लक्ष्मीसौम्य ॥ दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम ॥ दिगंतरी किर्ति परम ॥ सर्वदाही वसो तुझी ॥९॥

शत्रुलक्ष्मी खङ्गाग्री वसो ॥ साम्राज्यलक्ष्मी सदा असो ॥ विद्यालक्ष्मी विलसो ॥ सर्वदाही तुजपाशी ॥१०॥

ऐसे शिवयोगी बोलोन ॥ तेथेचि पावला अंतर्धान ॥ भद्रायु सुमती गुरुचरण ॥ सर्वदाही न विसंबती ॥११॥

इकडे भद्रायूचा पिता निरुती ॥ दशार्णदेशींचा नृपती ॥ वज्रबहु महामती ॥ शत्रू त्यावरी पातले ॥१२॥

मगधदेशाधिपति हेमरथ ॥ तेणे देश नागविला समस्त ॥ धनधान्य हरूनि नेत ॥ सर्व करीत गोहरण ॥१३॥

स्त्रिया पुरुष धरोनि समस्त ॥ बळे नेऊनि बंदी घालित ॥ मुख्य राजग्राम वेष्टित ॥ बाहेर निघत वज्रबाहू ॥१४॥

युद्ध झाले दशदिनपर्यंत ॥ हा एकला शत्रू बहुत ॥ त्यासी धरोनिया जित ॥ रथी बांधिती आकर्षोनी ॥१५॥

वज्रबाहूचे अमात्य धरोन ॥ तेही चालविले बांधोन ॥ सर्व ग्राम प्रजा लुटून ॥ राजस्त्रिया धरियेल्या ॥१६॥

ऐसे हरोनि समस्त ॥ घेवोनि चालिला हेमरथ ॥ वज्रबाहू सचिवासहित ॥ मागे पुढे पाहतसे ॥१७॥

पुत्र ना बंधु आम्हास ॥ कोण कैवारी या समयास ॥ आम्ही पहावी कवणाची आस ॥ सोडवील कोण दुःखार्णवी ॥१८॥

तो समाचार कळला भद्रायूसी ॥ की शत्रु नेती पितयासी ॥ गुरुस्मरण करूनि मानसी ॥ अंगी कनच लेईले ॥१९॥

मृत्युंजयमंत्र परम ॥ सर्वांगी चर्चिले भस्म ॥ शंख खङ्ग घेऊनी उत्तम ॥ मातेलागी नमस्कारी ॥२०॥

म्हणे माते शत्रू बहुत ॥ ग्राम हरूनि पितयास नेत ॥ तरी मी गुरुदास तुझा सुत ॥ संहारीन समस्ताते ॥२१॥

माते तुझ्या सुकृतेकरून ॥ कृतांत समरी करीन चूर्ण ॥ पृथ्वीचे राजे जितचि धरून ॥ आणीन तुझिया दर्शना ॥२२॥

निर्दोष यशाचा ध्वज ॥ उभवीन आज तेजःपुंज ॥ शरत्काळींचा द्विजराज ॥ सोज्वळ जैसा शोभत ॥२३॥

पद्माकरपुत्र सुनय वीर ॥ सवे घेतला सत्वर ॥ सर्पाचा मग काढी विनतापुत्र ॥ तैसे दोघे धावती ॥२४॥

इभ आहे कोणते कांतारी ॥ शोधीत धावती दोघे केसरी ॥ क जनकजेचे कैवारी ॥ लहु कुश पुत्र जैसे ॥२५॥

पायी क्रमिती भूमी सत्वर ॥ शोभती धाकुटे वय किशोर ॥ जवळी देखोनि शत्रूंचे भार ॥ सिंहनादे गर्जिन्नले ॥२६॥

म्हणति उभे रहा रे तस्कर समस्त ॥ वज्रबाहुऐसी दिव्य वस्त ॥ चोरोनि नेता त्वरित ॥ शिक्षा लावू तुम्हाते ॥२७॥

तस्करांसी हेचि शिक्षा जाण ॥ छेदावे कर्ण नासिक कर चरण ॥ एवढा अन्याय करून ॥ कैसे वाचून जाल तुम्ही ॥२८॥

अवघे माघारी जव पाहती ॥ तव दोघे किशोर धावती ॥ म्हणती एक रमापती एक उमापती ॥ येती निजभक्तकैवारे ॥२९॥

एक मृगांक एक मित्र ॥ वसिष्ठ एक विश्वामित्र ॥ एक वासुकी एक भोगींद्र ॥ तेवी दोघे भासती ॥३०॥

असंख्यत सोडिती बाण ॥ जैशा धारा वर्षे धन ॥ वीर खिळिले संपूर्ण ॥ मयूराऐसे दीसति ॥३१॥

परतले शत्रूंचे भार ॥ वर्षती शस्त्रास्त्रे समग्र ॥ वाद्ये वाजती भयंकर ॥ तेणे दिशा व्यापिल्या ॥३२॥

तो जलज वाजविला अद्भुत ॥ धाके उर्वी डळमळित ॥ पाताळी फणिनाथ ॥ सावरीत कुंभिनीते ॥३३॥

दिशा कोंदल्या समस्त ॥ दिग्गज थरथरा कापत ॥ शत्रु पडिले मूर्च्छित ॥ रिते रथ धावती ॥३४॥

त्यातील दिव्य रथ घेवोनि दोनी ॥ दोघे आरूढले तेचि क्षणी ॥ चापी बाण लावूनी ॥ सोडिती प्रलयविद्युद्वत ॥३५॥

वज्रबाहूचे वीर बहुत ॥ भारासमवेत गजरथ ॥ भद्रायुभोवते मिळत ॥ कैवारी आपला म्हणवूनी ॥३६॥

वाद्ये वाजवूनिया दळ ॥ भद्रायूभोवते मिळाले सकळ ॥ म्हणती हा कैवारी या वेळ ॥ आला न कळे कोठोनी ॥३७॥

पाठिराखा देखोनि समर्थ ॥ वीरांस बळ चढले अद्भुत ॥ हेमरथाची सेना बहुत ॥ संहारिली ते काळी ॥३८॥

वज्रबाहूसहित प्रधान ॥ रथी बांधिले पाहती दुरून ॥ म्हणती त्रिपुरारि मुरारि दोघे जण ॥ किशोरवेषे पातले ॥३९॥

एका गुरुने शिकविले पूर्ण ॥ दिसे दोघांची विद्या समान ॥ त्यात मुख्य राजनंदन ॥ देखोनि स्नेह वाटतो ॥४०॥

कोण आहेत न कळे सत्य ॥ मज वाटती परम आप्त ॥ ह्रदयी धरूनि यथार्थ ॥ द्यावे चुंबन आवाडीने ॥४१॥

मांडिले घोरांदर रण ॥ रक्तपूर चालिले जाण ॥ वज्रबाहु दुरून ॥ प्रधानासहित पाहतसे ॥४२॥

अनिवार भद्रायूचा मार ॥ शत्रु केले तेव्हा जर्जर ॥ समरभूमी माजली थोर ॥ बाणे अंबर कोंदले ॥४३॥

ऐसे देखोनि हेमरथ ॥ लोटला तेव्हा कृतांतवत ॥ दोघांसी युद्ध अद्भुत ॥ चार घटिका जाहले ॥४४॥

शत्रू थरथरा कापत ॥ म्हणती भीम की हनुमंत ॥ किंवा आला रेवतीनाथ ॥ मुसळ नांगर घेऊनी ॥४५॥

शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत ॥ भद्रायूने शिवयोगिदत्त ॥ खङ्ग काढिले तेज अद्भुत ॥ सहस्त्रमार्तंडासमान ॥४६॥

काळाग्नीची जिव्हा कराळ ॥ की प्रळयविजांचा मेळ ॥ की काळसर्पाची गरळ ॥ तेवी खङ्ग झळकतसे ॥४७॥

ते शस्त्र झळकता तेजाळ ॥ मागधदळ भस्म झाले सकळ ॥ मागे होता हेमरथ तत्काळ ॥ समाचार श्रुत जाहला ॥४८॥

की काळशस्त्र घेता हाती ॥ देखतांचि दळ संहारिती ॥ मग पळू लागला पवनगती ॥ उरल्या दळासमवेत ॥४९॥

प्रधानांसह वज्रबाहूसी टाकून ॥ पळती शत्रु घेतले रान ॥ ते भद्रायूने देखोन ॥ धरिला धावून हेमरथ ॥५०॥

धरिल तो दृढ केशी ॥ ओढूनि पाडिला भूमीसी ॥ लत्ताप्रहार देता ह्रदयदेशी ॥ अशुद्ध ओकीत भडभडा ॥५१॥

रथी बांधिला आकर्षून ॥ मंत्रिप्रधानांसहित जाण ॥ खुरमुखशर घेऊन ॥ पाच पाट काढिले ॥५२॥

अर्धखाड अर्धमिशी भादरून ॥ माघारे चालवी संपूर्ण ॥ राजस्त्रिया अपार कोश धन ॥ घेत हिरोन तेधवा ॥५३॥

देश नागविला होता सकळ ॥ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ॥ गोमार परतविला सकळ ॥ जेथींचा तेथे स्थापिला ॥५४॥

अमात्यासमवेत पिता ॥ सोडवूनि पायी ठेविला माथा ॥ वज्रबाहु होय बोलता ॥ त्याजकडे पाहूनी ॥५५॥

नयनी लोटल्या अश्रुधारा ॥ तू कोण आहेस सांग कुमारा ॥ मज अपयशसमुद्रातूनि त्वरा ॥ काढिले उडी घालूनी ॥५६॥

जळत शत्रुद्रावाग्नीत ॥ वर्षलासी जलद अद्भुत ॥ मज वाटे तू कैलासनाथ ॥ बाळवेषे आलासी ॥५७॥

की वाटे वैकुंठनायके ॥ रूपे धरिली बाळकांची कौतुके ॥ की सहस्त्राक्षे येण एके ॥ केले धावणे वाटतसे ॥५८॥

सकळ राजस्त्रिया धावोन ॥ उतरिती मुखावरूनि निंबलोण ॥ म्हणती बाळा तुजवरून ॥ जाऊ ओवाळून सर्वही ॥५९॥

भद्रायु म्हणे नगरात ॥ चला शत्रु घेवोनि समस्त ॥ बंदी घालूनि रक्षा बहुत ॥ परम यत्‍ने करोनिया ॥६०॥

नगरात पिता नेऊनी ॥ बैसविला दिव्य सिंहासनी ॥ जयवाद्यांचा ध्वनी ॥ अपार वाजो लागला ॥६१॥

नगर श्रृंगारिले एकसरा ॥ रथी भरूनि वाटती शर्करा ॥ नगरजन धावती त्वरा ॥ वज्रबाहूसी भेटावया ॥६२॥

वज्रबाहु म्हणे सद्गद होऊन ॥ जेणे मज सोडविले धावून ॥ त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा ॥६३॥

भद्रायु म्हणे पितयालागून ॥ शत्रूस करा बहुत जतन ॥ तीन दिवसां मी येईन ॥ परतोनि जाणा तुम्हापासी ॥६४॥

मी आहे कोणाचा कोण ॥ कळेल सकळ वर्तमान ॥ ऐसे बोलोनि दोघेजण ॥ रथारूढ पै झाले ॥६५॥

मनोवेगेकरून ॥ येऊन वंदिले मातेचे चरण ॥ मग तिणे करूनि निंबलोण ॥ सुखावे पूर्ण पद्माकर ॥६६॥

असो यावरी शिवयोगी दयाघन ॥ चित्रांगदसीमंतिनीसी भेटोन ॥ जन्मादारभ्य वर्तमान ॥ त्यासी सांगे भद्रायूचे ॥६७॥

पिता सोडवूनि पुरुषार्थ ॥ केला तो ऐकिली की समस्त ॥ तरी तो तुम्ही करावा जामात ॥ कीर्तिमालिनी देऊनिया ॥६८॥

ऐकता ऐसा मधुर शब्द ॥ सीमंतिनी आणि चित्रांगद ॥ दृढ धरिती चरणारविंद ॥ पूजिती मग षोडशोपचारे ॥६९॥

म्हणती तुझे वचन प्रमाण ॥ वर आणावा आताचि आहे लग्न ॥ मग दळभार वाहने पाठवून ॥ दिधली वैश्यनगराप्रती ॥७०॥

सुनयपुत्रासहित समग्र ॥ नाना संपत्ति घेऊन अपार ॥ लग्नासी चालिला पद्माकर ॥ वाद्ये अपार वाजिती ॥७१॥

भद्रायु बैसला सुखासनी ॥ तैसीच माता शिबिकायानी ॥ चित्रांगद सामोरा येवोनी ॥ घेवोनि गेला मिरवीत ॥७२॥

वर पाहूनि जन तटस्थ ॥ म्हणती कायसा यापुढे रतिनाथ ॥ पृथ्वीचे राजे समस्त ॥ आणविले लग्नासी ॥७३॥

त्यात वज्रबाहु सहपरिवारे ॥ लग्नालागी पातला त्वरे ॥ वराकडे पाहे सादरे ॥ तव तो कैवारी ओळखिला ॥७४॥

पाय त्याचे धरावया धाविन्नला ॥ भद्रायुने वरच्यावरी धरिला ॥ आलिंगन देता वेळोवेळा ॥ कंठ दाटले उभयतांचे ॥७५॥

नयनी चालिल्या विमलांबुधारा ॥ अभिषेक करिती येरयेरा ॥ मग वज्रबाहु पुसे वरा ॥ देश तुझा कवण सांग ॥७६॥

फेडी संशय तत्त्वता ॥ सांग कवण माता पिता ॥ गोत्र ग्राम गुरु आता ॥ सर्व सांग मजप्रती ॥७७॥

चित्रांगदे एकांती नेउन ॥ सांगितले साद्यंत वर्तमान ॥ हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण ॥ उपासना शिवाची ॥७८॥

अनंत पुण्य कोट्यनुकोटी ॥ तै शिवयोगियाची होय भेटी ॥ तो साक्षात धूर्जटी त्याचे चरित्र जाण हे ॥७९॥

मग ते सुमती पट्टराणी ॥ भेटविली एकांती नेऊनी ॥ वज्रबाहु खालते पाहूनी ॥ रुदन करी तेधवा ॥८०॥

म्हणे ऐसीनिधाने वरिष्ठे ॥ म्या घोर वनी टाकिली नष्टे ॥ मजएवढ अन्यायी कोठे ॥ पृथ्वी शोधिता नसेल ॥८१॥

सुमती मागील दुःख अद्भुत ॥ आठवूनि रडे सद्गदित ॥ म्हणे शिवयोगी गुरुनाथ ॥ तेणे कृतार्थ केले आम्हा ॥८२॥

मग सीमंतिनी चित्रांगद ॥ उभयतांचा करूनि ऐक्यवाद ॥ वज्रबाहु बोले सद्गद ॥ धन्य सुमती राणी तू ॥८३॥

बिंदूचा सिंधु करून ॥ मज त्वा दाविला आणोन ॥ सर्षप कनकाद्रीहून ॥ श्रेष्ठ केला गुणसरिते ॥८४॥

त्वा माझा केला उद्गार मज अभाग्यासी कैचा पुत्र ॥ हे राज्य तुझेचि समग्र ॥ सुतासहित त्वा दीधले ॥८५॥

ऐसे बोलोनि त्वरित ॥ वज्रबाहु बाहेर येत ॥ भद्रायु धावोनि सद्गदित ॥ साष्टांगे नमित पितयाते ॥८६॥

वज्रबाहु देत आलिंगन ॥ जेवी भेटती शिव आणि षडानन ॥ की वाचस्पति आणि कचनिधान ॥ संजीवनी साधिता आलिंगी ॥८७॥

मस्तक अवघ्राणूनि झडकरी ॥ सप्रेम बैसव्ला अंकावरी ॥ कार्तिमालिनी स्नुषा सुंदरी ॥ दक्षिणांकी बैसविली ॥८८॥

तव राजे समस्त आश्चर्य करिती ॥ धन्य वज्रबाहु नृपती ॥ मग पद्माकर सुनय याप्रती ॥ भद्रायु भेटवी पितयाते ॥८९॥

गगनी न समाये ब्रह्मानंद ॥ ऐसा झाला सकळा मोद ॥ मग चारी दिवस सानंद ॥ यथासांग लग्न झाले ॥९०॥

आंदण दिधले अपार ॥ दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ॥ दास दासी भांडार ॥ भरूनि द्रव्य दिधले ॥९१॥

सवे घेऊनि कीर्तिमालिनी ॥ पद्माकरासहित जनकजननी ॥ निजनगर तेचि क्षणी ॥ जाते झाले तेधवा ॥९२॥

गगनगर्भी न समाये हरिख ॥ ऐसे मातापितयांसी झाले सुख ॥ पट्टराणी सुमती देख ॥ केले आधीन सर्व तिच्या ॥९३॥

मग सकळ शत्रु सोडोन ॥ प्रतिवर्षी करभार नेमून ॥ करूनि आपणाआधीन ॥ जीवदान दीधले तया ॥९४॥

भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त ॥ होय असल्या पुण्य बहुत ॥ तरी जन्मोजन्मी हिमनगजामात ॥ पूजिला असेल प्रेमभरे ॥९५॥

स्त्री पतिव्रता चतुर सुंदर ॥ पुत्र पंडित सभाग्य पवित्र ॥ गुरु सर्वज्ञ उदार थोर ॥ पूर्वदत्ते प्राप्त होय ॥९६॥

मग त्या भद्रायूवरी छत्र ॥ वज्रबाहु उभवूनि सत्वर ॥ स्त्री सुमतीसहित तप अपार ॥ हिमकेदारी करिता झाला ॥९७॥

करिता शिवआराधन ॥ त्रिकाळज्योतिर्लिंगाचे पूजन ॥ मागे भद्रायु बहुत दिन ॥ राज्य करीत पृथ्वीचे ॥९८॥

शिवकवच भस्मधारण ॥ रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण ॥ धन्य गुरु शिवयोगी सुजाण ॥ शिष्य भद्रायु धन्य तो ॥९९॥

असो भद्रायु नृपनाथ ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ चालिला वनविहारार्थ ॥ अवलोकीत वनश्रियेते ॥१००॥

छाया सघन शीतळ ॥ पाट वाहती जळ निर्मळ ॥ तेथे बैसता सूर्यमंडळ ॥ वरी कदापि दिसेना ॥१॥

नारळी केळी पोफळी रातांजन ॥ मलयागर सुवास चंदन ॥ अशोकवृक्ष खर्जूरी सघन ॥ आंबे जांभळी खिरणिया ॥२॥

वट पिंपळ कडवे निंब ॥ डाळिंब सेवरी मंदार कदंब ॥ अंजीर औदुंबर पारिभद्र नभ ॥ भेदीत गेले गगनमार्गे ॥३॥

चंपक मोगरे जाई जुई ॥ मालती शेवंती बकुळ ठायी ठायी ॥ शतपत्र जपा अगस्तिवृक्ष पाही ॥ वेष्टोनि वरी चालिले ॥४॥

कनकवेली नागवेली परिकर ॥ पोवळवेली नाना लता सुवासकर ॥ द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर ॥ जायफळी डोलती फळभारे ॥५॥

बदके चातक मयूर ॥ कस्तूरीमृग जवादी मार्जार ॥ चक्रवाक नकुळ मराळ परिकर ॥ सरोवरतीरी क्रीडती ॥६॥

असो तया वनात ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ क्रीडत असता अकस्मात ॥ एक अपूर्व वर्तले ॥७॥

दूरवरी भद्रायु विलोकीत ॥ तो स्त्री पुरुष येती धावत ॥ ऊर्ध्व करोनिया हस्त ॥ दीर्घस्वरे बोभाती ॥८॥

पाठी लागला महाव्याघ्र ॥ आक्रोशे बोभात विप्र ॥ म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर ॥ मागे सुकुमार राहिली ॥९॥

गजबजोनि धाविन्नला नृप ॥ शर लावूनि ओढिले चाप ॥ तव तो व्याघ्र काळरूप ॥ स्त्रियेसी नेत धरूनिया ॥११०॥

राये शर सोडिले बहुत ॥ परी तो न गणी तैसाचि जात ॥ विजूऐसे शर अद्भुत ॥ अंगी भेदले तयाच्या ॥११॥

गिरिकंदरे ओलांडून ॥ व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन ॥ विप्र रायापुढे येऊन ॥ शोक करी आक्रोशे ॥१२॥

अहा ललने तुजविण ॥ गृह वाटते महा अरण्य ॥ रायास म्हणे ब्राह्मण ॥ धिक् क्षत्रियपण धिक् जिणे ॥१३॥

तुज देखता सत्य ॥ माझ्या स्त्रीने केला आकांत ॥ अहा कांत पडले व्याघ्रमुखांत ॥ सोडवी मज यापासूनी ॥१४॥

तुजही हाका फोडिल्या बहुत ॥ धाव धाव हे जगतीनाथ ॥ धिक् तुझी शस्त्रे समस्त ॥ खङ्ग व्यर्थ गुरूने दीधले ॥१५॥

द्वादशसहस्त्र नागांचे बळ ॥ धिक् मंत्र अस्त्रजाळ ॥ क्षतापासोनि सोडवी तत्काळ ॥ शरणागता रक्षी तोचि पार्थिव ॥१६॥

धिक् आश्रम धिक् ग्राम ॥ जेथे नाही सत्समागम ॥ धिक् श्रोता धिक् वक्ता ॥ सप्रेम नाही किर्तन शिवाचे ॥१७॥

धिक् संपत्ति धिक् संतती ॥ द्विज न रक्षी न भेजे उमापती ॥ ते धिक् नारी पापमती ॥ पतिव्रता जे नव्हे ॥१८॥

मातापितयांसी शिणवीत ॥ धिक् पुत्र वाचला व्यर्थ ॥ धिक् शिष्य जो गुरुभक्त ॥ नव्हेचि मतवादी पै ॥१९॥

गुरूची झाकोनि पदवी ॥ आपुला महिमा विशेश मिरवी ॥ धिक् पार्थिव जो न सोडवी ॥ संकटी प्राण गेलिया ॥१२०॥

भद्रायु बोले उद्विग्न ॥ मी तु इछिले देईन । करी पुढती उत्तम लग्न ॥ अथवा राज्य दान घे माझे ॥२१॥

विप्र म्हणे कासया लग्न ॥ स्त्रीहीनास कासया धन ॥ जन्मांधासी दर्पण ॥ व्यर्थ काय दाऊनी ॥२२॥

मूढासी कासया उत्तम ग्रंथ ॥ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित ॥ जरेने कवळिला अत्यंत ॥ त्याचे लग्न व्यर्थ जैसे ॥२३॥

तृषाक्रांतासी पाजिले धृत ॥ क्षुधातुरासी माळा गंधाक्षत ॥ चिंतातुरापुढे व्यर्थ ॥ गायन नृत्य कासया ॥२४॥

यालागी नलगे तुझे राज्य धन ॥ दे माझी स्त्री आणोन ॥ राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन ॥ दिधली म्या तुजप्रती ॥२५॥

रायाचे सत्त्व पाहे ब्राह्मण ॥ म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ॥ माझे तप मेरुपर्वताहून ॥ उंच असे न सरे कधी ॥२६॥

मी पापासी भीत नाही जाण ॥ अंगिकारिले तुझे स्त्रीरत्‍न ॥ सागरी ढेकुळ पडले येऊन ॥ तरी सागर काय डहुळेल ॥२७॥

धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष ॥ राव म्हणे हे अपयश ॥ थोर आले मजवरी ॥२८॥

माझे बळ गेले तेज क्षणा ॥ व्याघ्रे नेली विप्रललना ॥ आता स्त्री देवोनि ब्राह्मणा ॥ अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥२९॥

विप्रापुढे संकल्प करूनी ॥ दान दिधली कीर्तिमालिनी ॥ विप्र गुप्त झाला तेचि क्षणी ॥ राये अग्नि चेतविला ॥१३०॥

ज्वाळा चालिल्या आकाशपंथे ॥ मग स्नान केले नृपनाथे ॥ भस्म चर्चिले सर्वांगाते ॥ रुद्राक्षधारण पै केले ॥३१॥

आठवूनि गुरुचरण ॥ शिवमंत्र शिवध्यान ॥ प्रदक्षिणा करूनि तीन ॥ अग्निकुंडाभोवत्या ॥३२॥

जय जय शंकर उमारंगा ॥ मदनांतका भक्तभवभंगा ॥ विश्वव्यापका आराध्यलिंगा ॥ नेई वेगे तुजपाशी ॥३३॥

उडी टाको जाता ते वेळी ॥ असंभाव्य चेतला ज्वाळामाळी ॥ तव त्यामधून कपालमौली ॥ अपर्णेसहित प्रकटला ॥३४॥

दशभुज पंचवदन ॥ कर्पूरगौर पंचदशनयन ॥ पंचविंशतितत्त्वाहून ॥ पंचभूतावेगळा जो ॥३५॥

भद्रायूस ह्रदयी धरूनि सत्वर ॥ म्हणे सखया इच्छित माग वर ॥ तुझी भक्ति निर्वाण थोर ॥ देखोनि प्रकट झालो मी ॥३६॥

भद्रायु बोले सद्गदित ॥ म्हणे विप्रस्त्री आणून दे त्वरित ॥ ते ऐकोनि हासिन्नला गजमुखतात ॥ विप्र तो मीच झालो होतो ॥३७॥

व्याघ्रही मीच होऊन ॥ गेलो भवानीस घेऊन ॥ तुझी भक्ति पहावया निर्वाण ॥ दोघेही आम्ही प्रगटलो ॥३८॥

तुझी हे घे कीर्तिमालिनी ॥ म्हणोनि उभी केली तेचि क्षणी ॥ देव सुमने वर्षती गगनी ॥ राव चरणी लागतसे ॥३९॥

शिव म्हणे रे गुणवंता ॥ अपेक्षित वर मागे आता ॥ येरू म्हणे वज्रबाहु पिता ॥ सुमती माता महासती ॥१४०॥

पद्माकर गुणवंत ॥ कैलासी न्यावा स्त्रीसमवेत ॥ इतुक्यांसी ठाव यथार्थ ॥ तुजसमीप देईजे ॥४१॥

तुझिया पार्श्वभागी सकळ ॥ असोत स्वमी अक्षयी अढळ ॥ यावरी बोले पयःफेनधवल ॥ कीर्तिमालिनी तू माग आता ॥४२॥

ती म्हणे माता सीमंतिनी ॥ पिता चित्रांगद पुण्यखाणी ॥ तुजसमीप राहोत अनुदिनी ॥ शूळपाणी तथास्तु म्हणे ॥४३॥

तुम्ही उभयतानी मागितले ॥ ते म्या सर्व दिधले ॥ माझे चित्त गुंतले ॥ तुम्हापासी सर्वदा ॥४४॥

मग कीर्तिमालिनीसमवेत ॥ दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ॥ भद्रायु राजा राज्य करीत ॥ हरिश्चंद्रासारिखे ॥४५॥

मग त्यावरी सकळी ॥ दिव्यदेह अवघी झाली ॥ दिव्य विमानी कपालमौली ॥ नेता झाला संनिध ॥४६॥

चित्रांगद सीमंतिनी ॥ वज्रबाहु सुमती राणी ॥ अवघी विमानारूढ होवोनी ॥ पावली शिवपद शाश्वत ॥४७॥

स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर ॥ भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार ॥ त्यासी विमान धाडूनि श्रीशंकर ॥ आपुल्या स्वरूपी मेळविले ॥४८॥

हे भद्रायुआख्यान ॥ परम यशदायक आयुष्यवर्धन ॥ ऐकता लिहिता जाण ॥ विजय कल्याण सर्वदा ॥४९॥

हे आख्यान जे म्हणत ॥ ते सर्वदा वादी अयवंत ॥ विजय धैर्य अत्यंत ॥ कीर्तिवंत सर्वांठायी ॥१५०॥

भद्रायुआख्यान पुण्य आगळे ॥ पद रचना ही बिल्वदळे ॥ उमावल्लभा वाहती भावबळे ॥ ते तरती संसारी ॥५१॥

भद्रायुआख्यान कैलासगिरी ॥ जो का पारायण प्रदक्षिणा करी ॥ त्याचा बंद तोडोनि मदनारी ॥ निष्पाप करी सर्वदा ॥५२॥

ब्रह्मानंदा सुखदायका ॥ श्रीधरवरदा कैलासनायका ॥ भक्तकामकल्पद्रुम गजांतका ॥ न येसी तर्का निगमागमा ॥५३॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत श्रोते अखंड ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥१५४॥

॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥