अध्याय सातवा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय किशोरचंद्रशेखरा ॥ उर्वीघरेंद्रनंदिनीवरा ॥ भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा ॥ लीला विचित्रा तुझिया ॥१॥
भानुकोटितेज अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ रमाधवप्रिया भूताधिपते अनंता ॥ अमूर्तमूर्ता विश्वपते ॥२॥
परमानंदा पंचवक्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ परमपावना पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥३॥
मंदस्मितवदन दयाळा ॥ षष्ठाध्यायी अतिनिर्मळा ॥ सीमंतिनीआख्यानलीळा ॥ स्नेहाळा तू वदलासी ॥४॥
श्रीधरमुख निमित्त करून ॥ तूचि वदलासी आपुले गुण ॥ व्यासरूपे सूतास स्थापून ॥ रसिक पुराण सांगविसी ॥५॥
ऐसे ऐकता दयाळ ॥ वदता झाला श्रीगोपाळ ॥ विदर्भनगरी एक सुशीळ ॥ वेदमित्र नामे द्विज होता ॥६॥
तो वेदशास्त्र संपन्न ॥ त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण ॥ वेदमित्रास पुत्र सगुण ॥ सुमेधा नामे जाहला ॥७॥
सारस्वतसुत सोमवंत ॥ उभयतांचे मित्रत्व अत्यंत ॥ दशग्रंथी ज्ञान बहुत ॥ मुखोद्गत पुराणे ॥८॥
संहिता पद क्रम अरण ब्राह्मण ॥ छंद निघंट शिक्षा जाण ॥ ज्योतिष कल्प व्याकरण ॥ निरुक्त पूर्ण दशग्रंथी ॥९॥
ऐसा विद्याभ्यास करिता ॥ षोडश वर्षै झाली तत्त्वता ॥ दोघांचे पिते म्हणती आता ॥ भेटा नृपनाथ वैदर्भासी ॥१०॥
विद्या दावूनि अद्भुत ॥ मेळवावे द्रव्य बहुत ॥ मग वधू पाहूनि यथार्थ ॥ लग्ने करू तुमची ॥११॥
यावरी ते ऋषिपुत्र ॥ विदर्भरायासी भेटले सत्वर ॥ विद्याधनाचे भांडार ॥ उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥१२॥
विद्या पाहता तोषला राव ॥ परी विनोद मांडिला अभिनव ॥ म्हणे मी एक सांगेन भाव ॥ धरा तुम्ही दोघेही ॥१३॥
नैषधपुरीचा नृपनाथ ॥ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ॥ मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ ॥ दंपत्यपूजा करी बहू ॥१४॥
तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी ॥ होवोनि जावे ये क्षणी ॥ दिव्य अलंकार बहुत धनी ॥ पूजील तुम्हाकारणे ॥१५॥
तेथोनि यावे परतोन ॥ मग मीही देईन यथेष्ट धन ॥ मातापितागुरुनृपवचन ॥ कदा अमान्य करू नये ॥१६॥
तव बोलती दोघे किशोर ॥ हे अनुचित कर्म निंद्य फार ॥ पुरुषास स्त्री देखता साचार ॥ सचैल स्नान करावे ॥१७॥
पुरुषासी नारीवेष देखता ॥ पाहणार जाती अधःपाता ॥ वेष घेणारही तत्त्वता ॥ जन्मोजन्मी स्त्री होय ॥१८॥
हेही परत्री कर्म अनुचित ॥ तैसेचि शास्त्र बोलत ॥ त्याहीवरी आम्ही विद्यावंत ॥ धम अमित मेळवू ॥१९॥
आमुची विद्यालक्ष्मी सतेज ॥ तोषवू अवनीचे भूभुज ॥ आमुचे नमूनि चरणांबुज ॥ धन देती प्रार्थूनिया ॥२०॥
पंडितांची विद्या माय सद्गुणी ॥ विद्या अकाळी फळदायिनी ॥ विद्या कामधेनु सांडुनी ॥ निंद्य कर्म न करू कदा ॥२१॥
मातापित्यांहूनि विद्या आगळी ॥ संकटी प्रवासी प्रतिपाळी ॥ पृथ्वीचे प्रभु सकळी ॥ देखोन्या जोडिती कर ॥२२॥
विद्याहीन तो पाषाण देख ॥ जिताची मृत तो शतमूर्ख ॥ त्याचे न पाहावे मुख ॥ जननी व्यर्थ श्रमविली ॥२३॥
राव म्हणे दोघांलागुनी ॥ माझे मान्य करावे एवढे वचन ॥ परम संकट पडले म्हणून ॥ अवश्य म्हणती तेधवा ॥२४॥
राये वस्त्र अलंकार आणून ॥ एकासी स्त्रीवेष देऊन ॥ सोमवारी यामिनीमाजी जाण ॥ पूजासमयी पातले ॥२५॥
जे सकळ प्रमदांची ईश्वरी ॥ जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी ॥ जीस देखोनि नृत्य करी ॥ पंचशर प्रितीने ॥२६॥
रंभा उर्वशी चातुर्यखाणी ॥ परी लज्जा पावती जीस देखोनी ॥ रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी ॥ उपमा शोभे जियेसी ॥२७॥
तिणे हे दंपत्य देखोनी ॥ कृतिम पाहूनि हासे मनी ॥ परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी ॥ हरभवानी म्हणोनि पूजित ॥२८॥
अलंकार वस्त्रे यथेष्ट धन ॥ षड्रस अन्ने देत भोजन ॥ शिवगौरी म्हणोन ॥ नमस्कार करूनि बोळवी ॥२९॥
जाता ग्रामपंथ लक्षूनी ॥ पुढे भ्रतार मागे कामिनी ॥ नाना विकार चेष्टा भाषणी ॥ बहुत बोले तयासी ॥३०॥
म्हणे आहे हे एकांतवन ॥ वृक्ष लागले निबिड सघन ॥ मी कामानळेकरून ॥ गेले आहाळून प्राणपति ॥३१॥
तू वर्षोनि सुरतमेघ ॥ शीतळ करी ममांग ॥ मी नितंबिनी झाले अभंग ॥ जवळी पाहे येऊनिया ॥३२॥
तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष ॥ फेडी वस्त्र होय पुरुष ॥ विनोद करिसी आसमास ॥ हासती लोक मार्गीचे ॥३३॥
तव ते कामे होवोनि मूर्च्छित ॥ मेदिनीवरी अंग टाकीत ॥ म्हणे प्राणनाथा धाव त्वरित ॥ करी शांत कामज्वराते ॥३४॥
तव तो परतोनि आला सवेग ॥ म्हणे हे नसते काय मांडिले सोंग ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू निःसंग ॥ ब्रह्मचारी विद्यार्थी ॥३५॥
येरी म्हणे बोलसी काये ॥ माझे अवयव चाचपोनि पाहे ॥ गेले पुरुषत्व लवलाहे ॥ भोगी येथे मज आता ॥३६॥
हाती धरूनि तयासी ॥ आडमार्गे नेले एकांतासी ॥ वृक्ष गेले गगनासी ॥ पल्लव भूमीसी पसरले ॥३७॥
साल तमाल देवदार ॥ आम्र कदंबादि तरुवर ॥ त्या वनी नेऊनि सत्वर ॥ म्हणे शंका सांडी सर्वही ॥३८॥
मी स्त्री तू भ्रतार निर्धार ॥ नाही येथे दुसरा विचार ॥ येरु म्हणे हे न घडे साचार ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू ॥३९॥
शास्त्र पढलासी सकळ ॥ त्याचे काय हेचि फळ ॥ परत्रसाधन सुकृत ॥ निर्मळ विचार करूनि पाहे पा ॥४०॥
आधीच स्त्री वरी तारुण्य ॥ परम निर्लज्ज एकांतवन ॥ मिठी घाली गळा धावून ॥ देत चुंबन बळेचि ॥४१॥
घेऊनिया त्याचा हात ॥ म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत ॥ तव तो झिडकारूनि मागे सारीत ॥ नसता अनर्थ करू नको ॥४२॥
धन्य धन्य ते पुरुष जनी ॥ परयोषिता एकांतवनी ॥ सभाग्य सधन तरुणी ॥ प्रार्थिता मन चळेना ॥४३॥
वृत्तीस नव्हे विकार ॥ तरी तो नर केवळ शंकर ॥ त्यापासी तीर्थै समग्र ॥ येवोनि राहती सेवेसी ॥४४॥
जनरहित घोर वनी ॥ द्रव्यघट देखिला नयनी ॥ देखता जाय वोसंडोनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४५॥
सत्यवचनी सत्कर्मी रत ॥ निगमागमविद्या मुखोद्गत ॥ इतुके आसोनि गर्वरहित ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४६॥
आपणा देखता वर्म काढूनी ॥ निंदक विंधिती वाग्बाणी ॥ परी खेदरहित आनंद मनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४७॥
दुसरियाचे कूटदोष गुण ॥ देखे ऐके जरी अनुदित ॥ परी ते मुखास नाणी गेलिया प्राण ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४८॥
न दिसे स्त्रीपुरुषभान ॥ गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण ॥ न सांगे आपुले सुकृत तप दान ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४९॥
पैल मूर्ख हा पंडित ॥ निवडू नेणे समान पाहत ॥ कीर्ति वाढवावी नावडे मनात ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५०॥
अभ्यासिले न मिरवी लोकात ॥ शिष्य करावे हा नाहीच हेत ॥ कोणाचा संग नावडे आवडे एकांत ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५१॥
विरोनि गेल्या चित्तवृत्ती ॥ समाधी अखंड गेली भ्रांती ॥ अर्थ बुडालिया नाही खंती ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५२॥
श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ॥ ते ब्रह्मानंद परमहंस ॥ त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष ॥ होऊनि राहावे सर्वदा ॥५३॥
वेदमित्रपुत्र साधु परम ॥ धैर्यशस्त्रे निवटोनि काम ॥ म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम ॥ विचार करू या गोष्टीचा ॥५४॥
ऐसे बोलोनि सारस्वतपुत्र ॥ स्त्रीरूपे सदना आणिला सत्वर ॥ श्रुत केला समाचार ॥ गतकतार्थ वर्तला जो ॥५५॥
सारस्वते मांडिला अनर्थ ॥ रायाजवळी आला वृक्षःस्थळ बडवीत ॥ म्हणे दुर्जना तुवा केला घात ॥ हत्या करीन तुजवरी ॥५६॥
वेदशास्त्रसंपन्न ॥ येवढाचि पुत्र मजलागुन ॥ अरे तुवा निर्वंश केला पूर्ण ॥ काळे वदन झाले तुझे ॥५७॥
विदर्भ अधोगतमुख पाहात ॥ म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य ॥ शिवमाया परम अद्भुत ॥ अघटित कर्तृत्व तियेचे ॥५८॥
राये मिळवूनि सर्व ब्राह्मण ॥ म्हणे सतेज करा अनुष्ठान ॥ द्यावे यासि पुरुषत्व आणून ॥ तरीच धन्य होईन मी ॥५९॥
विप्र म्हणती हे ईश्वरी कळा ॥ आमुचेनि न पालटे भूपाळा ॥ तेव्हा विदर्भराव तये वेळा ॥ आराधिता झाला देवीते ॥६०॥
हवन मांडिले दुर्धर ॥ राव सप्तदिन निराहार ॥ देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर ॥ मग बोले विदर्भ तो ॥६१॥
म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष ॥ यासी पुनः करी पुरुष ॥ देवी म्हणे ही गोष्ट निःशेष ॥ न घडे सहसा कालत्रयी ॥६२॥
निःसीम पतिव्रता सीमंतिनी ॥ परम भक्त सद्गुणखाणी ॥ तिचे कर्तृत्व माझेनी ॥ न मोडवे सहसाही ॥६३॥
या सारस्वतासी दिव्य नंदन ॥ होईल सत्य वेदपरायण ॥ ईस सुमेधा वर जाण ॥ लग्न करूनि देईजे ॥६४॥
देवीच्या आज्ञेवरून ॥ त्यासीच दिधले लग्न करून ॥ अंबिकेचे वचने जाण ॥ पुत्र जाहला ॥ सारस्वता ॥६५॥
धन्य सीमंतिनीची शिवभक्ती ॥ उपमा नाही त्रिजगती ॥ जिचे कर्तृत्व हैमवंती ॥ मोडू न शके सर्वथा ॥६६॥
सूत म्हणे ऐका सावधान ॥ अवंतीनगरी एक ब्राह्मण ॥ अत्यंत विषयी नाम मदन ॥ श्रृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥६७॥
पिंगलानामे वेश्या विख्यात ॥ तिसी झाला सदा रत ॥ सांडूनि ब्रह्मकर्म समस्त ॥ मातापिता त्यागिली ॥६८॥
धर्मपत्नी टाकूनि दुराचारी ॥ तिच्याच घरी वास करी ॥ मद्यमांसरत अहोरात्री ॥ कामकर्दमी लोळत ॥६९॥
करावया जगदुद्धार ॥ आपणचि अवतरला शंकर ॥ ऋषभनामे योगीश्वर ॥ होवोनि विचरत महीवरी ॥७०॥
आपुले जे जे निर्वाणभक्त ॥ त्यांची दुःखे संकटे निवारीत ॥ पिंगलेच्या सदना अकस्मात ॥ पूर्वपुण्यास्तव पातला ॥७१॥
तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन ॥ दोघेहि धावती धरिती चरण ॥ षोडशोपचारेकरून ॥ सप्रेम होऊन पूजिती ॥७२॥
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध ॥ चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद ॥ भोजन देऊनि बहुविध ॥ अलंकार वस्त्रे दीधली ॥७३॥
करूनिया दिव्य शेज ॥ निजविला तो शिवयोगीराज ॥ तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज ॥ सुपर्णाग्रजउदय होय तो ॥७४॥
एक निशी क्रमोनि जाण ॥ शिवयोगी पावला अंतर्धान ॥ दोघे म्हणती उमारमण ॥ देऊनि दर्शन गेला आम्हा ॥७५॥
मग पिंगला आणि मदन ॥ कालांतरी पावली मरण ॥ परी गाठीस होते पूर्वपुण्य ॥ शिवयोगीपूजनाचे ॥७६॥
दाशार्हदेशीचा नृपती ॥ वज्रबाहूनामे विशेषकीर्ती ॥ त्याची पट्टराणी नामे सुमती ॥ जेवी दमयंती नळाची ॥७७॥
तो मदननामे ब्राह्मण ॥ तिच्या गर्भी राहिला जाऊन ॥ सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न ॥ पिंगला वेश्या जन्मली ॥७८॥
कीर्तिमालिनी तिचे नाव ॥ पुढे कथा ऐका अभिनव ॥ इकडे सुमतीचे पोटी भूदेव ॥ असता विचित्र वर्तले ॥७९॥
तिच्या सवती होत्या अपार ॥ ही पट्टराणी ईस होईल पुत्र ॥ त्याही तीस विष दुर्धर ॥ गर्भिणी असता घातले ॥८०॥
तीस तत्काळ व्हावा मृत्यु ॥ परी लोग लागला झाली प्रसूत ॥ विष अंगावरी फुटले बहुत ॥ बाळकासहित जननीच्या ॥८१॥
क्षते पडली झाले व्रण ॥ रक्त पू गळे रात्रंदिन ॥ राये बहुत वैद्य आणून ॥ औषधे देता बरे नोहे ॥८२॥
रात्रंदिवस रडे बाळ ॥ सुमती राणी शोके विव्हळ ॥ मृत्युही नोहे व्यथा सबळ ॥ बरी नव्हेचि सर्वथा ॥८३॥
लेकरू सदा करी रुदन ॥ रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ॥ कंटाळला मग रथावरी घालून ॥ घोर काननी सोडिली ॥८४॥
जेथे मनुष्याचे नाही दर्शन ॥ वसती व्याघ्र सर्प दारुण ॥ सुमता बाळक कडे घेऊन ॥ सव्यअपसव्य हिंडतसे ॥८५॥
कंटक पाषाण रुतती चरणी ॥ मूर्च्छा येऊनि पडे धरणी ॥ आक्रंदे रडे परी न मिळे पाणी ॥ व्रणेकरूनि अंग तिडके ॥८६॥
म्हणे जगदात्म्या कैलासपती ॥ जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ती ॥ भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती ॥ सदा गाती निगमागम ॥८७॥
जय जय त्रिदोषशमना त्रिनेत्रा ॥ जगदंकुरकंदा पंचवक्त्रा ॥ अज अजिता पयःफेनगात्रा ॥ जन्मयात्रा चुकवी का ॥८८॥
अनादिसिद्धा अपरिमिता ॥ मायाचक्रचालका सद्गुणभरिता ॥ विश्वव्यापका गुणातीता ॥ धाव आता जगद्गुरो ॥८९॥
ऐसा धावा करिता सुमती ॥ तव वनी सिंह व्याघ्र गर्जती ॥ परम भयभीत होऊनि चित्ती ॥ बाळासहित क्षिती पडे ॥९०॥
श्रावणारितनये नेऊन ॥ वनी सांडिले उर्वीगर्भरत्न ॥ की वीरसेनस्नुषा घोर कानन ॥ पतिवियोगे सेवी जैसे ॥९१॥
सुमताची करुणा ऐकून ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ धरणी पडता मूर्च्छा येऊन ॥ वृक्ष पक्षी छाया करिताती ॥९२॥
चंचू भरूनिया जळ ॥ बाळावरी शिंपितो वेळोवेळ ॥ एकी मधुर रस आणोनि स्नेहाळ ॥ मुखी घालोनि तोषविती ॥९३॥
वनगाई स्वपुच्छेकरूनि ॥ वारा घालितो रक्षिती रजनी ॥ असो यावरी जे राजपत्नी ॥ हिंडता अपूर्व वर्तले ॥९४॥
तो वृषभभार वणिक घेवोनी ॥ पंथे जाता देख नयनी ॥ त्याचिया संगेकरूनी ॥ वैश्यनगरा पातली ॥९५॥
तेथील अधिपति वैश्य साचार ॥ त्याचे नाव पद्माकर ॥ परम सभाग्य उदार ॥ रक्षक नाना वस्तूंचा ॥९६॥
तेणे सुमतीस वर्तमान ॥ पुसिले तू कोठील कोण ॥ तिणे जे वर्तले मुळीहून ॥ श्रुत केले तयाते ॥९७॥
ते ऐकूनि पद्माकर ॥ त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ॥ श्वासोच्छ्वास टाकूनि घोर ॥ म्हणे गतो थोर कर्माची ॥९८॥
वज्रबाहूची पट्टराणी ॥ पतिव्रता अवनीची स्वामिणी ॥ अनाथापरी हिंडे वनी ॥ दीनवदन आली येथे ॥९९॥
मग पद्माकर म्हणे सुमती ॥ तू माझी धर्मकन्या निश्चिती ॥ शेजारी घर देऊनि अहोराती ॥ परामर्श करी तियेचा ॥१००॥
बहुत वैद्य आणून ॥ देता झाला रसायन ॥ केले बहुत प्रयत्न ॥ परी व्याधी न राहेचि ॥१॥
सुमती म्हणे ताता ॥ श्रीशंकर वैद्य न होता ॥ कवणासही हे व्यथा ॥ बरी न होय कल्पांती ॥२॥
असो पुढे व्यथा होता कठीण ॥ गेला राजपुत्राचा प्राण ॥ सुमती शोक करी दीनवदन ॥ म्हणे रत्न गेले माझे ॥३॥
पद्माकर शांतवी बहुता रीती ॥ नगरजन मिळाले सभोवती ॥ तो निशांती उगवला गभस्ती ॥ तेवी शिवयोगी आला तेथे ॥४॥
जैसे दुर्बळाचे सदन शोधीत ॥ चिंतामणि ये अकस्मात ॥ की क्षुधेने प्राण जात ॥ तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ॥५॥
पद्माकरे धरिले चरण ॥ पूजिला दिव्यासनी बैसवून ॥ त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण ॥ शिवयोगी सांगता झाला ॥६॥
म्हणे वत्से सुमती ऐक ॥ का हो रडसी करिसी शोक ॥ तुझे पूर्वजन्मीचे पति पुत्र जनक ॥ कोठे आहेत सांग पा ॥७॥
आलीस चौर्यायशी लक्ष योनी फिरत ॥ तेथींचे स्वजन सोयरे आप्त ॥ आले कोठून गेले कोठे त्वरित ॥ सांग मजपाशी वृत्तांत हा ॥८॥
तू नाना योनी फिरसी ॥ पुढेही किती फेरे घेसी ॥ कोणाचे पुत्र तू का रडसी ॥ पाहे मानसी विचारूनी ॥९॥
शरीर धरावे ज्या ज्या वर्णी ॥ त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी ॥ परी आपण उत्पन्न कोठूनी ॥ ते विचारूनी न पाहती ॥११०॥
त्वा पुत्र आणिला कोठून ॥ कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ॥ तू आणि हे अवघे जन ॥ जातील कोठे कवण्या देहा ॥११॥
आत्मा शिव शाश्वत ॥ शरीर क्षणभंगुर नाशवंत ॥ तरी तू शोक करिसी व्यर्थ ॥ विचारूनि मनी पाहे पा ॥१२॥
आत्मा अविनाशी शाश्वत ॥ तो नव्हे कोणाचा बंधु सुत ॥ शरीरकारणे शोक करिसी व्यर्थ ॥ तरी पडले प्रेत तुजपुढे ॥१३॥
जळी उठती तरंग अपार ॥ सवेचु फुटती क्षणभंगुर ॥ मृगजळचि मिथ्या समग्र ॥ तरी बुडबुडेसत्य कैसेनी ॥१४॥
चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण ॥ चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन ॥ तेथे गंगा लिहिली सहितमीन ॥ कोण वाहोनि गेला तेथे ॥१५॥
वंध्यासुते द्रव्य आणून ॥ भीष्मकन्या मारुतीस देऊन ॥ गंधर्व नगरीचे वर्हाडी आणून ॥ लग्न कोणे लाविले ॥१६॥
वार्याचा मंडप शिवून ॥ सिकतादोरे बांधिला आवळून ॥ शुक्तिकारजताचे पात्र करून ॥ खपुष्पे कोणी भरियेले ॥१७॥
कासवीचे घालून घृत ॥ मृगजळीचे मीन पाजळती पोत ॥ ते चरणी नूपुरे बांधोनि नाचत ॥ जन्मांध पाहत बैसले ॥१८॥
अहिकर्णींची कुंडले हिरोनी ॥ चित्रींचे चोर आले घेवोनी ॥ हा प्रपंच लटिका मुळीहूनी ॥ तो साच कैसा जाणावा ॥१९॥
मुळीच लटके अशाश्वत ॥ त्याचा शोक करणे व्यर्थ ॥ केशतरूचे उद्यान समस्त ॥ शरीर हे उद्भवले ॥१२०॥
सकळ रोगाचे भांडार ॥ कृमिकीटकांचे माहेर ॥ की पापाचा समुद्र ॥ की अंबर भ्रांतीचे ॥२१॥
मूत्र श्लेष्म मांस रक्त ॥ अस्थींची मोळी चर्मवेष्टित ॥ मातेचा विटाळ पितृरेत ॥ अपवित्र असत्य मुळीच हे ॥२२॥
ऐसे हे शरीर अपवित्र ॥ ते पशुमूत्रे झाले पवित्र ॥ क्षुरे मूर्धज छेदिले समग्र ॥ इतुकेनि पावन केवी होय ॥२३॥
शरण न जाती देशिकाप्रति ॥ तरी कैसेनि प्राणी तरती ॥ कल्पकोटी फेरे घेती ॥ मुक्त होती कधी हे ॥२४॥
सुमती तू सांगे सत्वर ॥ तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार ॥ अवघा हा मायापूर ॥ सावध सत्वर होई का ॥२५॥
जयाचे हे सकळ लेणे ॥ मागता देता लाजिरवाणे ॥ तनुघर बांधिले त्रिगुणे ॥ पाच वासे आणोनिया ॥२६॥
याचा भरवसा नाही जाण ॥ केधवा लागेल न कळे अग्न ॥ की हे झाले वस्त्र जीर्ण ॥ ऋणानुबंध तव तगे ॥२७॥
मिथ्या जैसे मृगजळ ॥ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ ॥ अहा प्राणी पापी सकळ ॥ धन धान्य पुत्र इच्छिती ॥२८॥
गंगेमाजी काष्ठे मिळती ॥ एकवट होती मागुती बिघडती ॥ तैसी स्त्रीपुरुषे बोलिजेती ॥ खेळ मुळीच असत्य हा ॥२९॥
वृक्षापरी पक्षी येती ॥ कितीएक बैसती कितीएक जाती ॥ आणिक्या तरूवरी बैसती ॥ अपत्ये तैसी जाण पा ॥१३०॥
पथिक वृक्षातळी बैसत ॥ उष्ण सरलिया उठूनि जात ॥ सोयरे बंधू आप्त ॥ तैसेचि जाण निर्धारे ॥३१॥
मायामय प्रपंचवृक्षी ॥ जीव शिव बैसले दोन पक्षी ॥ शिव समाधान सर्वसाक्षी ॥ जीव भक्षी विषयफळे ॥३२॥
ती भक्षिताचि भुलोनि गेला ॥ आपण आपणासी विसरला ॥ ऐसा अपरिमित जीव भ्रमला ॥ जन्ममरण भोगीतसे ॥३३॥
त्यामाजी एखादा पुण्यवंत ॥ सद्गुरूसी शरण रिघत ॥ मग तो शिव होवोनि भजत ॥ शिवालागी अत्यादरे ॥३४॥
ऐसे ऐकता दिव्य निरूपण ॥ पद्माकर सुमती उठोन ॥ अष्टभावे दाटोन ॥ वंदिती चरण तयाचे ॥३५॥
म्हणती एवढे तुझे ज्ञान ॥ काय न करिसी इच्छेकरुन ॥ तू साक्षात उमारमण ॥ भक्तरक्षणा धावलासी ॥३६॥
मग मृत्युंजयमंत्र राजयोगी ॥ सुमतीस सांगे शिवयोगी ॥ मंत्रून भस्म लाविता अंगी ॥ व्यथारहित जाहली ते ॥३७॥
रंभा उर्वशीहून वहिले ॥ दिव्य शरीर तिचे झाले ॥ मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिले ॥ बाळ उठिले तत्काळ ॥३८॥
व्रणव्यथा जावोनि सकळ ॥ बत्तीसलक्षणी झाला बाळ ॥ मग शिवध्यान उपासना निर्मळ ॥ सुमतीबाळ उपदेशिले ॥३९॥
परिस झगडता पूर्ण ॥ लोह तत्काळ होय सुवर्ण ॥ तैसी दोघे दिव्यरूप जाण ॥ होती झाली ते काळी ॥१४०॥
आश्चर्य करी पद्माकर ॥ म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र ॥ काळ मृत्युभय अपार ॥ त्यापासूनि रक्षी गुरुनाथ ॥४१॥
गुरुचरणी रत होती सदा ॥ त्यासी कैची भवभयआपदा ॥ धनधान्यांसी नाही मर्यादा ॥ भेद खेदा वारिले ॥४२॥
बाळ चरणावरी घालोनी ॥ सुमती लागे सप्रेम चरणी ॥ म्हणे सद्गुरु तुजवरूनी ॥ शरीर सांडणे हे माझे ॥४३॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझिया दिव्यचरणी लेववीन ॥ तरी मी नव्हे उत्तीर्ण ॥ उपकार तुझे गुरुमूर्ती ॥४४॥
मग शिवयोगी बोलत ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत ॥ तुझिया पुत्रासी होईल प्राप्त ॥ राज्य पृथ्वीचे करील हा ॥४५॥
त्रिभुवनभरी होईल कीर्ति ॥ निजराज्य पावेल पुढती ॥ भद्रायु नाम निश्चिती ॥ याचे ठेविले मी जाण ॥४६॥
थोर होय भद्रायु बाळ ॥ तववरी क्रमी येथेचि काळ ॥ मृत्युंजयमंत्रजप त्रिकाळ ॥ निष्ठा धरूनि करीत जा ॥४७॥
हा राजपुत्र निश्चित ॥ लोकांशी प्रगटो नेदी मात ॥ हा होईल विद्यावंत ॥ चतुःपष्टिकळाप्रवीण ॥४८॥
ऐसे शिवयोगी बोलोन ॥ पावला तेथेचि अंतर्धान ॥ गुरुपदांबुज आठवून ॥ सुमती सद्गद क्षणक्षणा ॥४९॥
पद्माकरासी सुख अत्यंत ॥ सुनय पुत्राहूनि बहुत ॥ भद्रायु त्यासी आवडत ॥ सदा पुरवीत लाड त्याचा ॥१५०॥
पद्माकरे आपुली संपत्ति वेचून ॥ दोघांचे केले मेखलाबंधन ॥ दोघांसी भूषणे समान ॥ केले संपन्न वेदशास्त्री ॥५१॥
द्वादश वर्षांचा झाला बाळ ॥ धीर गंभीर परम सुशीळ ॥ मातेच्या सेवेसी सदाकाळ ॥ जवळी तिष्ठत सादर ॥५२॥
पदरी पूर्वसुकृताचे पर्वत ॥ शिवयोगी प्रगटला अकस्मात ॥ सुमती भद्रायु धावत ॥ पाय झाडीत मुक्तकेशी ॥५३॥
नयनोदके चरणक्षालन ॥ केशवसने पुसिले पूर्ण ॥ जे सुगंधभरित जाण ॥ स्नेह तेचि लाविले ॥५४॥
वारंवार करिती प्रदक्षिणा ॥ दाटती अष्टभावेकरून ॥ षोडशोपचारी पूजन ॥ सोहळा करिती अपार ॥५५॥
स्तवन करीतसे तेव्हा सुमती ॥ प्रसादेकरून मी पुत्रवंती ॥ यावरी भद्रायूसी नीति ॥ शिवयोगी शिकवीतसे ॥५६॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त पाही ॥ धर्मनीती वर्तत जाई ॥ मातापितागुरुपायी ॥ निष्ठा असो दे सर्वदा ॥५७॥
गोभूदेवप्रजापाळण ॥ सर्वाभूती पहावा उमारमण ॥ वर्णाश्रमस्वधर्माचरण ॥ सहसाहि न सांडावे ॥५८॥
विचार केल्यावाचूनिया ॥ सहसा न करावी आनक्रिया ॥ मागे पुढे पाहोनिया ॥ शब्द बोलावा कुशलत्वे ॥५९॥
काळ कोण मित्र किती ॥ कोण द्वेषी शत्रू किती ॥ आय काय खर्च किती ॥ पाहावे चित्ती विचारूनिया ॥१६०॥
माझे बळ किती काय शक्ती ॥ आपुले सेवक कैसे वर्तती ॥ यश की अपयश देती ॥ पहावे चित्ती विचारूनी ॥६१॥
अतिथी देव मित्र ॥ स्वामी वेद अग्निहोत्र ॥ पशु कृषि धन विद्या सर्वत्र ॥ घ्यावा समाचार क्षणाक्षणा ॥६२॥
लेकरू भार्या अरि दास ॥ सदन गृहवार्ता रोगविशेष ॥ येथे उपेक्षा करिता निःशेष ॥ हानि क्षणात होत पै ॥६३॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन ॥ आपण जावे तोचि पंथ लक्षून ॥ मातापितायतिनिंदा जाण ॥ प्राणांतीही न करावी ॥६४॥
वैश्वदेवसमयी अतिथी ॥ आलिया त्यासी न पुसावी याती ॥ अन्नवस्त्र सर्वाभूती ॥ द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया ॥६५॥
परोपकार करावा पूर्ण ॥ परपीडा न करावी जाण ॥ करावे गोब्राह्मणरक्षण ॥ सत्य सुजाण म्हणती तया ॥६६॥
निंदा वाद टाकोन ॥ सर्वदा कीजे शिवस्मरण ॥ तेचि म्हणावे मौन ॥ शिवसेवन तप थोर ॥६७॥
परदारा आणि परधन ॥ हे न पहावे जेवी वमन ॥ करावे शास्त्रश्रवण ॥ शिवपूजन यथाविधि ॥६८॥
स्नान होम जपाध्ययन ॥ पंचयज्ञ गोविप्रसेवन ॥ श्रवण मनन निजध्यास पूर्ण ॥ अनालस्ये करावी ॥६९॥
सुरत निद्रा भोजन ॥ येथे असावे प्रमाण ॥ दान सत्कर्म अभ्यास श्रवण ॥ आळस येथे न करावा ॥१७०॥
काम पूर्ण धर्मपत्नीसी ॥ निषिद्ध जाण परियोषितेसी ॥ क्रोधे दंडावे शत्रूसी ॥ साधुविप्रांसी नमिजे सदा ॥७१॥
द्वेषियांसी धरावा मद ॥ संतभक्तांसी नम्रता अभेद ॥ संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध ॥ असावे निर्मत्सर सर्वाभूती ॥७२॥
दुर्जनासी दंभ दाविजे ॥ भल्याचे पदरज वंदिजे ॥ अहंकारे पृथ्वी जिंकिजे ॥ निरहंकार द्विजांसी ॥७३॥
वाचा सावध शिवस्मरणी ॥ पाणीसार्थक दानेकरूनी ॥ पाद पावन देवालययात्रागमनी ॥ नित्य शिवध्यानी बैसावे ॥७४॥
पुराणश्रवणी श्रोत्र सादर ॥ त्वचा संत आलिंगनी पवित्र ॥ सार्थक शिवध्यानी नेत्र ॥ जिव्हेने स्तोत्र वर्णावे ॥७५॥
शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणी ॥ ये रीती इंद्रिये लावावी भजनी ॥ दीन अनाथ अज्ञान देखोनी ॥ तयावरी कृपा कीजे ॥७६॥
ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री ॥ देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी ॥ युक्तनिद्रा युक्ताहारी ॥ मृगया करी परम नीतीने ॥७७॥
अतिविद्या अतिमैत्री ॥ अतिपुण्य अतिस्मृती ॥ उत्साह धैर्य दान धृती ॥ वर्धमान असावी ॥७८॥
आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र ॥ मैथुन औषध सुकृत मंत्र ॥ दान मान अपमान ही सर्वत्र ॥ गुप्त असावी जाणिजे ॥७९॥
नष्ट पाखंडी शठ धूर्त ॥ पिशुन तस्कर जार पतित ॥ चंचळ कपटी नास्तिक अनृत ॥ ग्राम्य सभेसी नसावे ॥१८०॥
निंदक शिवभक्तउच्छेदक ॥ मद्यपानी गुरुतल्पक ॥ मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक ॥ त्यांचे दर्शन न व्हावे ॥८१॥
दारा धन आणि पुत्र ॥ यांसी आसक्त नसावे अणुमात्र ॥ अलिप्तपणे संसार ॥ करोनि आसक्त असावे ॥८२॥
बंधु सोयरे श्वशुर स्वजन ॥ यांसी स्नेह असावा साधारण ॥ भलता विषय देखोन ॥ आसक्ति तेथे न करावी ॥८३॥
करावे रुद्राक्षधारण ॥ मस्तकी कंठी दंडी करभूषण ॥ गेलिया प्राण शिवपूजन ॥ सर्वथाही न सांडावे ॥८४॥
शिवकवच सर्वांगी ॥ लेऊ शिकवी शिवयोगी ॥ भस्म चर्चिता रणरंगी ॥ शस्त्रास्त्रबाधा न होय ॥८५॥
काळमृत्युभयापासून ॥ रक्षी मृत्युंजयऔपासन ॥ आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न ॥ यांसी जीवे मारावे ॥८६॥
सोमवारव्रत शिवरात्र प्रदोष ॥ विधियुक्त आचरावे विशेष ॥ शिवहरिकीर्तन निर्दोष ॥ सर्व सांडूनि ऐकावे ॥८७॥
महापर्व कुयोग श्राद्धदिनी ॥ व्यतीपत वैघृति संक्रमणी ॥ न प्रवर्तावे मैथुनी ॥ ग्रहणी भोजन न करावे ॥८८॥
सत्पात्री देता दान ॥ होय ऐश्वर्य वर्धमान ॥ अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण ॥ शास्त्रप्रमाण जाणिजे ॥८९॥
वेद शास्त्र पुराण कीर्तन ॥ गुरुब्राह्मणमुखे करावे श्रवण ॥ दान दिधल्याचे पाळण ॥ करिता पुण्य त्रिगुण होय ॥१९०॥
अपूज्याचे पूजन ॥ पूज्य त्याचा अपमान ॥ तेथे भय दुर्भिक्ष मरण ॥ होते जाण विचारे ॥९१॥
महाडोही उडी घालणे ॥ महापुरुषासी विग्रह करणे ॥ बळवंतासी स्पर्धा बांधणे ॥ ही द्वारे अनर्थाची ॥९२॥
दाने शोभे सदा हस्त ॥ कंकणमुद्रिका भार समस्त ॥ श्रवणी कुंडले काय व्यर्थ ॥ श्रवणसार्थक श्रवणेचि ॥९३॥
ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती ॥ औदार्य गुण संपत्ती ॥ सफल जीवित्व तयाचे ॥९४॥
देईन अथवा नाही सत्य ॥ हे वाचेसि असावे व्रत ॥ विद्यापात्रे येती अमित ॥ सद्य; दान त्या दीजे ॥९५॥
विपत्तिकाळी धैर्य धरी ॥ वादी जयवंत वैखरी ॥ युद्धमाजी पराक्रम करी ॥ याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥९६॥
ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत ॥ तेचि भोजन उत्तम यथार्थ ॥ गजतुरंगासहित पंथ ॥ चालणे तेचि श्रेष्ठ होय ॥९७॥
ज्या लिंगाचे नाही पूजन ॥ तेथे सांक्षेपे पूजा करावी जाऊन ॥ अनाथप्रेतसंस्कार जाण ॥ करणे त्या पुण्यासी पार नाही ॥९८॥
ब्रह्मद्वेषाएवढे विशेष ॥ मारक नाही कदा विष ॥ सत्यमागम रात्रंदिवस ॥ तुच्छ सुधारस त्यापुढे ॥९९॥
प्रतापे न व्हावे संतप्त ॥ परसौख्ये हर्षभरित ॥ सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत ॥ तोचि भक्त शिवाचा ॥२००॥
पाषाण नाम रत्ने व्यर्थ ॥ चार रत्ने आहेत पृथ्वीत ॥ अन्न उदक सुभाषित ॥ औदार्य रत्न चौथे पै ॥१॥
वर्म कोणाचे न बोलावे ॥ सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे ॥ भाग्याभाग्य येत स्वभावे ॥ स्वधर्म ध्रुव न ढळावा ॥२॥
पूर्वविरोधी विशेष ॥ त्याचा न धरावा विश्वास ॥ गर्भिणी पाळी गर्भास ॥ तेवी प्रजा पाळी का ॥३॥
गुरु आणि सदाशिव ॥ यासी न करावा भेदभाव ॥ भाग्यविद्या गर्व सर्व ॥ सोडोनि द्यावा जाण पा ॥४॥
नराची शोभा स्वरूप पूर्ण ॥ स्वरूपाचे सद्गुण आभरण ॥ गुणाचे अलंकार ज्ञान ॥ ज्ञानाचे भूषण क्षमा शांती ॥५॥
कुलशील विद्याधन ॥ राज्य तप रूप यौवन ॥ या अष्टमदेकरून ॥ मन भुलो न द्यावे ॥६॥
ऐसा नानापरी शिवयोगी ॥ बोधिता झाला भद्रायूलागी ॥ हे नीति ऐकता जगी ॥ साकडे न पडे सर्वथा ॥७॥
सातवा अध्याय गिरीकैलास ॥ यावरी वास्तव्य करी उमाविलास ॥ पारायणप्रदक्षिना करिती विशेष ॥ निर्दोष यश जोडे तया ॥८॥
की हा अध्याय हिमाचळ ॥ भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ॥ तीसी वरोनि पयःफेनधवल ॥ श्वशुरगृही राहिला ॥९॥
पुढील अध्यायी कथा सुरस ॥ शिवयोगी दया करील भद्रायूस ॥ ब्रह्मानंदे निशिदिवस ॥ श्रवण करोत विद्वज्जन ॥२१०॥
भवगजविदारक मृगेंद्र ॥ श्रीधरवरद आनंअसमुद्र ॥ तो शिव ब्रह्मानंद यतींद्र ॥ जो सद्गुरु जगदात्मा ॥११॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ सप्तमाऽध्याय गोड हा ॥२१२॥
इति सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥