Get it on Google Play
Download on the App Store

सिंहासन बत्तिशी - आरंभ

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माळव्यांत राजा भोज राज्य करीत होता. त्याची राजधानी 'धारा' येथें होती. राजा रसिक, विद्वान व शूर असल्यानें त्याचे पदरी अनेक विद्वान लोक होते. कलावंत होते. प्रजेच्या हितासाठी राजा खूप पैसा खर्च करीत असे. न्यायदानाच्या बाबतीत तर त्याचें कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कुणावर थोडाही अन्याय होऊ नये यासाठी तो जागरुक राही.

एक दिवस काय झाले? दरबारांत एक फिर्याद दाखल झाली. वारा नगरीत एक श्रीमंत सावकार मरण पावला होता. त्याला दोन मुलगे होते. मृत्युपत्रांत सावकारानें एक विचित्र अट घातली होती, त्याच्या मुलांचे दोन सुंदर घोडे होते, त्या घोड्यांवर दोघांचेहि प्राणापलीकडे प्रेम होते. घोडेही मालकाच्या आज्ञेंत वागत असत.

मृत्युपत्रांत अशी अट होती की, 'या दोन घोड्यांची शर्यत लावावी. जो घोडा मागे राहील त्याच्या मालकाला संपत्‍तीतला सर्वात मोठा अमूल्य असणारा नीलकंठ हिरा मिळावा. उरलेल्या संपत्‍तीचे सारखे तीन भाग करावेत. दोन दोन्ही भावांनी घ्यावेत व तिसरा धर्मकार्यासाठी खर्च व्हावा.'

भोजराजाने दोन्ही घोड्यांची शर्यत लावण्याचा हुकुम दिला, पण काय आश्चर्य ! घोडे जागचे हालेचनात. बरं एखादे पाऊल टाकलं तरी तें अगदी बरोबर ! आतां काय करावं ! नीलकंठ हिरा सरकारी खजिन्यात जमा करावा असाहि सल्‍ला कांहींनी दिला. पण राजाला तो पटला नाही. संपत्‍तीची वाटणी करणें सोपे होते. हिरा राजाच्याच ताब्यांत होता.

एक दिवस राजा शिकारीला बाहेर पडला. मनांतले विचार नाहींसे व्हावेत म्हणून तो एकटाच खूप दूर निघून आला. अवंती नगरीजवळच्या रानांत आल्यानंतर त्यानें आपला घोडा चरायला सोडून दिला व आपण एका विशाल वटवृक्षाखाली आरामांत बसला.

थोडा वेळ गेला. शेजारीच त्याला गडबड ऎकूं आली म्हणुन त्यानें सहज मागे वळून पाहिले. कांबळी पांघरलेली, हातांत काठ्या घेतलेल्या गुराख्यांची पोरे एका झाडाखाली खेळ खेळत होती, त्याचा न्यायदानाचा खेळ चालला होता. शेजारच्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली एक छोटासा मुलगा बसला होता.

आतां राजा उत्सुकतेनें त्यांच खेळ बघूं लागला. कांही सटरफटर तक्रारी विचारल्या गेल्या. न्यायदान करणारा मुलगा मात्र गंभीरपणें व अस्खलीत भाषेंत बोलत होता. शेवटी एका मुलानें विचारले, 'राजा भोज यांच्या दरबारी खटला चालू आहे. त्याचा निकाल कसा काय लावावा हे अजून कोणाला समजले नाही तरी तो नीलकंठ हीरा कुणाला द्यावा ते आपण सांगावे

आपल्या राजधानीत चाललेला खटला या पोरासोरापर्यंत आलेला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. पण तो मुलगा काय सांगतो याची उत्सुकता असल्याने तो स्तब्ध सबून पुढें ऎंकु लागला. तो मुलगा असे म्हणाला की, 'एवढी सोपी गोष्ट राजाच्या लक्षांत येऊं नये याचं आश्चर्य वाटतं ! अरे, धाकट्या भावाचा घोडा मोठ्या भावाला द्यावा व मोठ्या भावाचा घोडा धाकट्याला ! आणि मग शर्यंत लावावी. अर्थात जो पुढे जाईल तो जिंकेल.'

'अहो, पण-मृत्युपत्रांत ---' तो मुलगा मध्येंच म्हणाला.

'मला ते ठाऊक आहे. मृत्युपत्रांप्रमाणे वाटणी होणार हें निश्चित ! जो पुढें आला असेल-त्याच्या घोड्यावर बसलेला भाऊ (म्हणजे त्याचा घोडा) मागें रहाणार नाहीं का ?'

हा निर्णय ऎकून राजा एकदम खूष झाला. त्यानें पुढें होऊन त्या मुलाला अणखी कांही गहन प्रश्न विचारले. त्याचीही त्यानें अगदीं योग्य, स्पष्ट उत्‍तरें दिलीं. हा मुलगा कुणी तरी मागेपुढे विद्वान होणार आहे अशी त्याची खात्री झाली.

पण काय झाली मजा ! त्या झाडाखालून दूर होतांच तो मुलगा आपल्या इतर मित्रांसारखाच बोलूं लागला. हंसू लागला. साध्या प्रश्नानाही त्याला उत्‍तरें देतां येईनात. मग राजाने दुसऱ्या मुलाला त्या छायेखाली बसवले. आतां तो मुलगा उत्‍तम उत्‍तरे देऊ लागला.

ते बालगोपाळ म्हणाले, आम्ही रोज हाच खेळ खेळतो. राजाच्या लक्षांत आले कीं, या जागेचाच कांहितरी गुण दिसतो. आपण तेथें बसून पाहू या ! असा विचार करून तो त्या जागेवर जाण्यासाठीं चालू लागला, पण त्या जागेजवळ येतांच त्याच्या पायाला चटके बसूं लागले. तो घाबरून मागे सरकला. पण आतां त्याचें मन स्वस्थ बसेना. ती जागा कुणाच्या मालकीची आहे याचा त्यानें तपास काढला व त्या जागेची जी किंमत त्यानें सांगितली -- त्याच्या पाचपट पैसे देऊन त्यानें ती जागा खरेदी केली.

नंतर त्या छायेखाली मजुरांना बोलावून खणायचा हुकूम सोडला. खोल खणल्यावर आंतून रत्‍न्जडित चंद्रकांत मण्यांचें सुंदर सिंहासन निघाले. सिंहासन अतिशय सुंदर होते. सिंहासनाभोवती बत्‍तीस पऱ्या आपले सोन्याचे पंख पसरवून आनंदाने हसत होत्या. रत्‍नें चमचम करीत होती.

राजानें सिंहासन उचलले व धारानगरीला एका खास महालांत ठेवले, त्या सिंहासनाकडे बघत राहण्याचा राजाला छंदच लागला.

एक दिवस त्याला वाटले, त्या सोन्याच्या परीचे डोळे आपल्यापाशी कांही तरी बोलत आहेत.

एका शुभमुहूर्तावर त्यानें त्या सिंहासनावर बसायचे असे ठरवले. झाले ! मुहूर्त ठरला. देशांतून पवित्र नद्यांचे पाणी आणण्यांत आले, सुवर्णाच्या पात्रांतून पूजेची सिद्धता करण्यांत आली. नगर शुंगारले. अन्नछत्रे चालूं झाली. रात्री भोजराजा सहज सिंहासन पहायला म्हणून महालांत शिरला. तेवढ्यात त्याला स्वर्गीय आवाज ऎकु\य़ं आला. पैंजणाचा झंकार करीत नाजुक आवाजात कुणीतरी म्हणत होते --

'हे भोजराजा, ज्याचे औदार्य अलौकिक आहे, त्यानेंच या सिंहासनावर बसण्याचें धाडस करावें.'

भोजराजा म्हणाला, 'माझे औदार्य तिन्ही लोकांत गाजतें आहे. मी रोज पाण्यासारखा पैसा दानधर्मात खर्च करतो. हजारोंना अन्नदान करतो, भूमिदान करतो. कुणाचेहि श्रम फुकट घेत नाहीं, माझ्या दारांतून कोणताही याचक विन्मुख परत जात नाही.'

'ह्या: ह्या: ह्या:' बासरीतून मंजुळ स्वर निघावेत तसा हंसण्याचा आवाज ऐकु आला.

'ऑ ? कोण हंसतंय ?'

'मी' सिंहासनाजवळुन आवाज आला.

'मी म्हणजे कोण ? तूं पुतळी' सिंहासनावरील एका पुतळीला राजानें स्पर्श करून विचारले.

'होय ! मीच. माझें नांव जया ! मीच बोलते आहे. राजा, अरे आपल्याच तोंडानें तूं दान दिल्याचा उल्लेख केलास ! दान उजव्या हातानें करावें पण ते डाव्या हातालाही कळूं नये अशा गुप्ततेनें करावें असा नियम आहे आणि तूं तर आत्मस्तुति केलीस; त्यामुळें तुझें दान, सर्व पुण्य फुकट गेले. तुला माहीत नाहीं का ?'

'क्षमा करावी देवी ! मी अज्ञानी आहे.'

'अरे, एखाद्या माणसाच्या सामान्य गुणाचे जर दुसऱ्यांनी प्रशंसा केली तर तो थोर समजला जातो आणि प्रत्यक्ष इंद्र - स्वर्गाचा राजा इंद्र - जर आत्मस्तुति करूण लागला तर तो सामान्य समजला जातो--'

परै: प्रोक्‍ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत ।
इंद्रोऽपि लघुता याति स्वयं प्रख्यपितैगुणै: ॥

'देवी, मी चुकत होतो. मला आपण सन्मार्ग दाखवलांत ! आता आपले आभार मानायच्या अगोदर एक शंका विचारायची परवानगी द्यावी' --

'विचार ! राजा, खुशाल विचार.' ती जया पुतळी म्हणाली.

हें सुंदर सिंहासन कोणाचें आहे ? यावर बसणारा राजा असामान्य असणार हे नक्‍कीच. त्याच्या औदार्याची गोष्ट मला आपण सांगावी अशी इच्छा आहे --'

 

 

सिंहासन बत्तिशी

संकलित
Chapters
गुराखी सिंहासन बत्तिशी - आरंभ कथा पहिली कथा दुसरी चित्रलेखा श्लोक १९ वा सिंहासन बत्तिशीची कथा क्र.3 (चंद्रकला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.4 (कामकंदला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 5 (लीलावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 6 (रविभामा) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.7 (कौमुदी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 8 (पुष्पवती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 9 (मधुमालती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 10 (प्रभावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 11 सिंहासन बत्तिशीची कथा क्र.12 (मोहिनी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 13 सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14. सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 15 (घोडे व उडणारा रथ) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.16 (पाताल नगरी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.17 (तथास्तु) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.18 (विश्वासघात) सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.19 (मन श्रेष्ठ की ज्ञान?)