Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४

१६.

ताग तागाची, मिशी वाघाची, झाड झुंबराच, लाकूड उंबराच कळी चाफ्याची लेक बापाची, सून सासर्‍याची, राणी भरताराची, भरतार भरतार म्हनले काय, नावासाठी झुंजला गेले, झुंजेचे बैल झुंजत ठेवले, गेले सोनार्‍याची समोरच्या खोली, नेसले पैठण घडी, पैठण घडीच्या पोटात होती फणी, अशी सावित्री राणी शाणी x x x रावांच्या रागाच केल पाणी.

१७.

देवळात होता खांब, त्याला आला घाम, उठाउठा x x x राव बैल गेला लांब पाऊस पडतो झिरीमीरी, पाभरी चालल्या नानापरी, शेताला जाते हरकत, राशीला माझ्या बरकत, अधोली माप x x x राव म्हणतात x x x माझी सखी न् कोल्ह्यांनी टाकली हुकी.

१८.

खळ्यातली ज्वारी झाली पक्की न् x x x राव उभ्यानी गोण्या झोकी.

१९.

पाडला पाटा, वाटला हिंग x x x राव जसे आरशातले भिंग.

२०.

अष्ट गाव शार ? चारी भवतानी येशी, चारमोत्या पवळ्यांनी भरला बाजार, नथीला रुपये दिले हजार, टिक्‍केला गोंड चार, बाजूबंदाला रवा अनिवार, हाताची पाटली, गळ्याची टीक, मासुळ्याची बोट बारीक, मासुळ्याची बोट उघडी, मागल्या कानाच्या बुगडीचा जुबा x x x रावांना राणी x x x देते शोभा.

२१.

मी होते सव्वाष्णीच्या मेळ्यात, नवरत्‍नांचा हार सासुबाईंच्या गळ्यात, आतीबाईच्या पोटी जन्मला हिरा, मामांजीच्या मंदीली मोत्यांचा तुरा, मी पुजली तुळस, मला सापडला कळस, असा कळस शोभेचा, वाडा बांधला ताडमाड, वर रामफळाच झाड x x x x रावांच नाव घेते येऊ नका आड.

२२.

आत्याबाई मायाळू, मामंजी प्रेमळ, जाऊबाई सुगारीण, तात्यासाब हौशी, x x x x रावांच नाव घेते x x x दिवशी.

२३.

पाडाचा अंबा दिला दारीच्या पोपटाला x x x नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला.

२४.

श्रावण महिन्यात दर सोमवारी येतो सण x x x रावांना सुखी करीन असा मी केला आहे पण.

२५.

मी आपली साधी, नेसते खादी, x x x रावांच नाव घेते सर्वांच्या आधी.

२६.

हिरवी चोळी पातळ मानाच x x x x रावाच्या जीवावर लावते हळदी कुंकू मानाच.

२७.

पाडला पाटा फोडला हिंग दिली फोडणी, कडाडली ताकावर

x x x x रावांच नाव घेते सर्वांच्या नाकावर.

२८.

तुन तुन तारा पैशाला बारा x x x राव बसले खुर्चीवर मी घालते वारा.

२९.

जडवाच डोरल, सोनारान घडविल

x x x रावांच्या नावाला दिवाणसाहेबांनी अडीवल.

३०.

पायात साखळ्या चालू कशी, गळ्यात ठुशी लवू कशी x x x राव बसले

लोडापाशी तर मी मोठयान बोलू कशी ?