Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १

१.

काळी डीचकी कंगोर्‍याची, आंत भाजी लिंबोर्‍याची, ईन मोठी ठकोर्‍याची,कुंकू लेती बारदानी , बारदानीचा आरसा, आरसा मागं परसा, परसांत होती केळं, केळीला आल्या तीन कळ्या, तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस, तुळशीची करतें सेवा
x x x रावांचा न् माजा जोडा जन्माला जावा

२.

संबूच्या शिखरावरी पाऊस पडतो झीरीमिरी, परका झाल्या बरोबरी, सुटली नानापरी,कोकणची भोरडी खडी काढण्या केल्या इलायावरी,गोळा केलं नदीवरी,खळं केलं सुर्यातळं, मोडाया सांगितल्या कोकणच्य़ा नारी , हात्तीवर हौदा, उंटावर झारी,कळस घ्यायला निघाली
x x x रावांची स्वारी, तर पाहतात मिळून नगराच्या नारी.

३.

रुणूझुणू येत होती, खिडकी वाटं पहात होती,खिडकीला तीन तारा, अडकित्त्याला घुंगरं बारा , पानं खाती तेरा तेरा
x x x राव बसले पलंगावर मी घालतें वारा.

४.

नांव घ्या म्हणता, जीव माझा नेणतां, नेणत्याची कोवळी बुध्दि, ताक म्हणून वाढलं दूध, दुधावरली साय, तूप लावूनी केली चपाती मऊ, चपाती वरला भजा, आनंदान जेवला राजा, निरीचा बघा थाट, ब्रह्मदेवाची गांठ, गांठ सोडावी राहुनी उभा, कपाळी शोभा कुंकवाची बघा, बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी, हळदीचा पिवळा रंग, कंबरपट्ट्याची कडी, गरसुळी गाती , आयना डाव्या हाती, मुख न्याहाळीत होती, हातांत सुवर्णाचा चुरा
x x x रावांच्या मंदीलाला सोन्याचा तुरा.

५.

बाबुळ्गांव शहर, तिथ भरती बाजार, वाघाची पिल्ली खरेदी केली, हाजाराचा खिरज कमरेच्या शिरी, स्वामी उतरले परवरी, घेतला वर्‍हाडाचा छंद, तिथ घेतल्या पंचरंगी गाद्या, गाद्या लावल्या घरां, आपण मोठ्या शहरां, कळवातिणी घालतात वारा, सराफाच्या माड्या उघड्या, तिथ घेतल्या बुगड्या, बुगड्या टाकल्या खिशांत, आपण करांडे देशांत. तिथं बोलविली ऊदी रंगाची पैठणी , पैठणीचा रंग फिक्का, फिक्क्या रंगाची घेऊ नका ,तिथ बोलविली वाकडी नथ, वाकडया नथीचा दुहेरी फासा, हाजाराचे मोती दोन आशी लेणार कोण
x x x ची सून