संग्रह २
पलंगाला दिला पलंग, लावला घरां, आपण गेलं शहरां, कळवंतीणी घालतात वारां, शहराच्या पेठं, तिथ घेतला चंद्र्हार, चंद्र्हाराचं सोनं मोठं नाजूक फार, चंद्रहाराची घडण मोठी नक्षीदार, गांठवायला लागले तीनचार, तिथं घेतली बोरमाळ, तिथ होत्या सराफाच्या माडया उघडया , तिथ घेतल्या हजाराच्या बुगडया, टाकल्या खिशांत , गेले कानडी देशांत, तिथं मागविली पैठणी , पैठणीचा रंग उदी फीका, कागदावर लिहून धाडते फिक्क्या रंगाची घेऊं नका, वाकडी नथ , दुहेरी फासा , गेले बंगाली देशां , तिथ घेतले तोडे, तिथं घेतल्या विरोदी कोयर्या, जोडण्याची घडण मोठी नक्षीदार, तिथं घेतल्या गोठ पाटल्या,हाती मनगटी दाडल्या, तिथुन परत लेणं झालं, हैदराबादला, तिथ घेतल जडीताचं मंगळसूत्र , तिथ घेतली टीका पानाडी , तिथ घेतले हजाराचे मोती, नथीला बसीवली टीक, कुडकाला बसवले मोती, अशी लेणारीन कोणे होती, जाधवाची सून नेणती. सासु सासर्याच नांव घेतलं पुसून, सराफानं घेतली खूण, तिथून परत येणं झालं, वसलशाच्या पोटीं उतरलं समुद्राच्या काठीं , मोत्या पोळ्याला केली शालुची ओटी, तिथून परत येणं झालं , पहिला मुक्काम कुठं ? कानगांवच्या पठं,
दुकानामधीं ऊभे कुडयाला बसवले झुबे, तिथून परत येणे झालं, दुसरा मुक्काम कुठं तर तासगांवच्या पेठं. तिथ घेतली मोहनमुदी , तिथून परत येण झालं . तिसरा मुक्काम कुठं? सातार्याच्या पेठं तिथ घेतली मोहनमाळ , तिथून परत येणं झालं. चौथा मुक्काम कुठं ? पंढरपूरच्या पेठं तिथं घेतला खळणीचा शालू, तिथं घेतला मलमलीचा सदरा,तिथ घेतला जरीचा मंदील, तिथ आली सर्व शृंगाराला शोभा. तिथून येणं झालं, पांचवा मुक्काम कुठं माढ्याच्या पेठं, तिथ घेतली तांदळ्याची लिंबोळी, तांदळ्याची लिंबोळी, पांचपदरी शेजारी, मोत्याची गजरी,तिथून परत येणं झालं, सहावा मुक्काम कुठं ! पुण्याच्या पेठं तिथं घेतला कुलपाचा कारदोरा, तिथून परत येणं झालं,सातवा मुक्काम कुठं ! बारशीच्या पेठं , तिथं घेतली कुडलं,तिथून परत येणं झालं, आठवा मुक्काम कुठं ? मुबईच्या पेठं तिथ घेतली सरपळी, तिथून येणं झालं. नववा मुक्काम कुठं ? सांगलीच्या पेठं तिथं घेतली घोसाची, वजरटीक, तिथून परत येणं झालं. दहावा मुक्काम कुठं ? दहाव्या मुक्कामाला काढंलं आगीनगाडीचं तिकीट. आगिनगाडी सुटली वार्याच्या पळीं उतरले मोहळ्च्या स्टेशनावरी. तिथं घेतली घुंगराची गरसोळी, स्वामी आले, आनंद झाला. आकरावा मुक्काम कुठं ? सोलापूरच्या पेठं. तिथं केला सर्व बाजार, रुपये झाले हजार, त्याची गणती कोणी केली ? सोलपूरच्या सराफानें, तिथून परत येणं झालं. बाराव्या मुक्कामाला आले आपल्या घरीं, जडीताचं मंगळसूत्र गाठविलं तुळजापुरीं. स्वामी आलें आपल्या घरीं. श्रृंगार ठेवला, मंदीरीं जाऊनी बसलें, मैदानीं ऊन ऊन पाणी विसणलं घंगाळांत, जलदी अंगोळ करा, ताट काढून तयारी गेलें मंदीरीं सर्व शृंगार घातला अंगावरी, शंभर गांवच्या सोनाराची पारख केली. आपल्या जीवाची कसोशी केली पण
x x x राव माझ्या जडीताच्या मंगळसूत्राची घडण नाहीं बरोबर झाली.