सावध प्रकरण 14
सावध प्रकरण १४
दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसच्या इमारतीत शिरला तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. बाहेरच्या पानाच्या टपरीवर कनक ओजसचा एक माणूस पाणिनीला दिसला.पाणिनीच्या मागोमाग तो आत आला आणि लिफ्ट मधे शिरला.लिफ्ट मधे ते दोघेच होते ते पाहून त्याने पाणिनीच्या कोटाच्या खिशात एक कार्ड सरकवले.आणि पाणिनी चा मजला येण्यापूर्वीच तो खाली उतरला.सौम्या च्या अक्षरात कार्डावर निरोप खरडला होता, ‘ ऑफिसात बरेच पाहुणे आलेत.सावध.’
पाणिनीने लायटर पेटवून कार्ड जाळून टाकले.ऑफिसचे दार उघडले.आत गर्दीच झाली होती.इन्स्पे.तारकर त्याला सामोरा आला.
“ तुझ्याच ऑफिसात तुझे स्वागत आहे पाणिनी.”
“ अरे तू कसा काय इथे अचानक?” आश्चर्य दाखवत पाणिनी म्हणाला
“ माझ्या बरोबर आलेली मंडळी तुझ्या परिचयाची नाहीत असा अभिनय करू नकोस पाणिनी. मायरा कपाडिया, आदित्य कोळवणकर यांना तू ओळखतोस, आणि इतर जण आहेत ते माझे साध्या वेषातले सहकारी आहेत. बस निवांत.बोलायचंय तुझ्याशी.आणि त्याला बराच वेळ लागणार आहे, आणि तुला ते सर्व आवडणारं नाहीये.आधीच कल्पना देऊन ठेवतो तुला.” तारकर म्हणाला.
“ कशी आहेस मायरा?” तारकरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पाणिनी म्हणाला “ मी आजच्या पेपरात वाचलं सगळं, तुला मोठाच धक्का बसला असेल.”
पाणिनीच्या नजरेला नजर न देता मायरा म्हणाली, “ खूपच.”
“ तुम्ही काय म्हणताय आदित्य कोळवणकर?” पाणिनी ने विचारलं.
“ ठीक.” खाली कार्पेट कडे बघत आदित्य म्हणाला.
“ काळ संध्याकाळी सहा च्या सुमाराला कुठे होतास तू पाणिनी?” तारकरने विचारलं.
“ मला एकदम असं नाही सांगता येणार.” पाणिनी हसून म्हणाला.
“ ठीक आहे विचार कर.”
“ किती वेळ करत राहू विचार?”
“ तुला उत्तर सुचे पर्यंत.” तारकर म्हणाला.
पुढची तब्बल दोन मिनिटं पाणिनी गप्पच बसून राहिला.
“ मग?” तारकर म्हणाला.
“ अजून विचार नाही केला ” पाणिनी म्हणाला
“ हे बघ पाणिनी, ही खुनाची केस आहे आणि नेहेमी तू खुनाच्या प्रकरणात ज्या भूमिकेत असतोस त्यापेक्षा अत्ता वेगळ्या अवस्थेत आहेस. मी तुला दुसऱ्यांदा तोच प्रश्न विचारतोय, काल संध्याकाळी सहा वाजता तू कुठे होतास?” तारकर म्हणाला.
“ मी सांगू शकत नाही तुला तारकर.”
“ आठवून बघ पुन्हा.”
“ मला माहित्ये मी कुठे होतो पण तुला सांगू शकत नाही.” पाणिनी म्हणाला
“ का?”
“ व्यावसायिक गोपनीयतेचा भंग होईल या कारणास्तव. तुला माहित्ये तारकर, वकील आणि अशील यांचेमधील चर्चा......”
“ ते मला पाठ आहे सर्व.” तारकर ओरडला. “ कुठल्या अशीलाची गोपनीयता?”
“ अशीलाचे नाव सुध्दा वकिलाने गोपनीय ठेवायचे असते.” पाणिनी म्हणाला
“ तुला एका रिव्हॉल्व्हरमध्ये इंटरेस्ट होता पाणिनी. स्मिथ कंपनीच्या ”
“ खरंच की काय?” पाणिनी ने विचारलं.
“ तू तुझा एक माणूस उदक प्रपातच्या हसमुख नावाच्या मालकाकडे पाठवलास.आम्ही त्याला गाठण्यापूर्वी अर्धा तास आधी तुझा माणूस त्याला भेटून गेला होता.” तारकर म्हणाला.
“ गंमतच आहे.” पाणिनी म्हणाला
“ तुला त्या रिव्हॉल्व्हरत एवढा का रस होता?” तारकर ने विचारलं.
“ ते कोणी खरेदी केल होती ते मला हवं होतं.”
“ का?”
“ बरीच कारण होती त्याला.” पाणिनी म्हणाला
“ हे बघ पाणिनी, एका खुनात ते रिव्हॉल्व्हर गुंतलं आहे.काल संध्याकाळी सहाच्या सुमाराला खून झालाय.पण साडे दहा पर्यंत जर प्रेतच सापडलं नव्हतं तर नऊ वाजताच तुला कसं समजलं की ही रिव्हॉल्व्हर खुनातली रिव्हॉल्व्हर आहे म्हणून?”
“ मला अजिबातच नव्हत माहिती.” पाणिनी आश्चर्य दाखवत म्हणाला.
“ कदाचित नऊ पूर्वीसुद्धा तुला बातमी लागली होती.”
“ मला त्या रिव्हॉल्व्हरत रस होता हे मान्यच करत नाहीये मी, पण समजा अगदी घटकाभर मान्य केलं मी, की मला त्या बद्दल माहिती होती, तरी एका दिवाणी प्रकरणात मला त्या रिव्हॉल्व्हरची माहिती हवी होती. मला पुसटशी सुध्दा कल्पना नव्हती की ते रिव्हॉल्व्हर खुनात गुंतलं असेल म्हणून.”
“ तू मला कितीही गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न केलास तरी माझ्या हातात या क्षणी हुकमी एक्का आहे पाणिनी.मी फक्त अजून तो टेबलावर टाकला नाहीये.” तारकर म्हणाला. “ तुला वाटतंय त्यापेक्षा हे प्रकरण गंभीर आहे पाणिनी.अत्ताच खर काय ते सांगून स्वतःला सोडवून घे.”
“ मला शक्य आहे त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन.” पाणिनी म्हणाला
“ मायरा कपाडिया आणि तुझी पाहिली ओळख कधी झाली?”-तारकर
“ काल ” पाणिनीने लगबगीने उत्तर दिले.
“ प्रथम संपर्क तू तिला केलास की तिने तुला?”
“ आता कसं, मला उत्तर देण्याजोगे प्रश्न विचारायला लागलास तू. बर वाटलं.” पाणिनी म्हणाला “ सौम्या, आपली जाहिरात ज्या पेपरात आल्ये तो पेपर आण जरा.”
सौम्या उठली, सावकाश तिने कपाटातून पेपर काढून पाणिनी ला दिला.पाणिनीने तारकरला दाखवला.
“ मी तुला विचारलेल्या प्रश्नाचा आणि या जाहिरातीचा काय संबंध आहे?” –तारकर
“ सौम्या, त्याला कनक ला आलेले पत्र, आणि त्यातून आलेली किल्ली दाखव.” पाणिनी म्हणाला
“ किल्ली ! ” तारकर उद्गारला.
“ किल्ली ! ” मायरा ओरडली.
“ हो.ज्याने आपण कुलूप किंवा दरवाजा उघडतो ती किल्ली.” पाणिनी म्हणाला
तारकरने किल्ली हातात घेतली, पत्र वाचलं, त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“ आपण मायरा कपाडिया ला पण दाखवूया.तिनेच लिहिलंय ते.” पाणिनी म्हणाला
“ भयानकच प्रकार आहे हा सर्व.” तारकर म्हणाला. त्याने ते पत्र मायरा ला दिले.मायरा ने वाचलं आणि आदित्य ला दिले.
“ पत्र आल्यावर काय केलंस पाणिनी? पत्रात लिहिल्यानुसार मायरा बाहेर पडे पर्यंत थांबलास आणि नंतर....? ”
“ वेडेपणा करू नको तारकर. तुला काय वाटलं तिच्या परवानगी शिवाय मी तिच्या घरात किल्लीचा वापर करून गेलो असेन? ” पाणिनी ने विचारलं.
तारकर गप्प राहिला. पाणिनी पुढे म्हणाला, “ मी तिच्या घरी ती असतानाच जायचं ठरवलं. मी बेल वाजवली दाराची, माझ्या लक्षात आलं की ती अवघडलेल्या स्थितीत असतांना मी तिला गाठलंय.पण तिने मला आत बोलावलं, आदरपूर्वक बसायला सांगितलं, आणि ती पटकन कपडे करून आली.मग आमची सविस्तर चर्चा झाली.” शेवटचं वाक्य पाणिनीने सहेतुक पणे मायरा कडे बघून उच्चारलं.
“ त्याच वेळी वकील आणि अशील या संबंधाना सुरुवात झाली की काय?” उपरोधाने तारकर म्हणाला.
“ तिने मला एका विषयाशी संबंधित तिचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली.” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे तू मिसेस कपाडिया चा वकील आहेस तर ! ” तारकर म्हणाला.
“ तिची इच्छा आहे की तिला मिसेस नाही तर मिस कपाडिया म्हणून ओळखलं जावं.”
“ ती फालतू गोष्ट आहे. तू काय करतोयस तिच्यासाठी?” तारकर ने विचारलं.
“ पुन्हा तू असे प्रश्नविचारायला लागलायस की मला उत्तर देता येणार नाही.”
“ तुझ्या काल रात्रीचा हालचाली संशयास्पद होत्या पाणिनी.” तारकर म्हणाला. “तू कीर्तीकर ला भेटलास.त्याच्यावर अपघाताचा आरोप केलास.हो ही नाही? ”
“ त्यापेक्षा असं म्हण की तुझी गाडी अपघातात गुंतली असायची शक्यता आहे असं मी त्याला सुचवलं.” पाणिनी म्हणाला
“ आणि तिथे तुझी परब शी भेट झाली?”—तारकर.
“ म्हणजे कीर्तीकर चा स्वयंपाकी आणि ड्रायव्हर असं म्हणायचंय का तुला?” पाणिनी ने विचारलं.
“ हं ”
“ आता असं सांग की स्मिथ कंपनीचं ते रिव्हॉल्व्हर तू प्रथम कधी बघितलंस?आणि त्याचा शोध घेण्यात तुला एवढा का रस निर्माण झाला? ”—तारकर
पाणिनी गप्प राहिला.
“ एखाद्या चांगल्या कानशीने घासून तिच्यावरचा नंबर नष्ट करण्यात आलाय. पण पाणिनी,तू त्या रिव्हॉल्व्हरचा मागोवा घ्यायला माणूस पाठवलास तेव्हा त्यासाठी नंबर आवश्यक होता, आणि तो जर घासून नष्ट केला गेला होता तर तुला तो मिळाला कसा? याचा एकच खुलासा असू शकतो की तूच तो नंबर घासलास.” –तारकर
पाणिनी ने हात पाय ताणून आळस दिला.
“ ठीक आहे मी तुला पाहणारा साक्षीदार हजर करतो.” तारकर म्हणाला, तो पर्यंत साध्या कपड्यातल्या पोलिसाने एका माणसाला आतून बाहेर आणले.
“ हाच होता? ” तारकर ने विचारलं
“ याला उभं रहायला सांगा. मी बघितलं तेव्हा तो उभा होता.खरं म्हणजे मी त्याचा चेहेरा नीट बघितला नव्हता.” साक्षीदार म्हणाला.
पाणिनी हसला. “ मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन. तुमचं नाव काय?”
“ मी रुद्रांश गडकरी जिथे खून झाला त्याच्या शेजारीच राहतो ”
“ तू पाहिलेला माणूस हाच होता ना?” तारकर ने विचारलं
“ याला उठून जरा चालायला सांगा , मी पाहिलं तेव्हा तो उभा होता आणि चालत होता.” रुद्रांश गडकरी म्हणाला.
“ उठ रे पाणिनी.”
पाणिनी जागचा हलला सुध्दा नाही.
“ ओळख पटवायचा हा अत्यंत चुकीचा आणि बेकायदा प्रकार आहे. त्याला चौकीत बोलाव आणि माझ्यासारखे चारजण तिथे उभे कर आणि त्यातून त्याला ओळखू दे.”
“ तुला मी अटक करत नाही तोवर तुला मी चौकीत नेऊ नाही शकत. ऊठ पाणिनी, तू निर्दोष असशील तर घाबरतोस कशाला?” तारकर ने विचारलं
पाणिनी आपल्या आवडत्या सरकत्या खुर्चीत हसत बसून राहिला.
“रुद्रांश गडकरी, मला सांग, याने कोणता ड्रेस घातला होता?” तारकर ने विचारलं
“ कोट होता एकदम फेंट रंगाचा.”
तारकर ने आपल्या पोलिसाला सांगितलं. “ पाणिनी पटवर्धन च्या कपाटात तसा कोट असणार.उघड कपाट”
“ थांब. असलं मी काहीही करू देणार नाही.” पाणिनी ओरडला.
“ त्याच्याकडे लक्ष देऊ नको.कपाट उघड. तुला अडवायला पाणिनी उठला तर रुद्रांश गडकरी लगेच ओळखेल.”
पोलिसाने कपाटातून एक गडद जांभळा कोट काढला. पाणिनी ने सुध्दा तो बघितला नव्हता त्यापूर्वी.
“ हा नाही फेंट रंगाचा काढ.” *
“ सॉरी, पण तसा कोट नाहीये.इथे हा एकच आहे.” अधिकारी म्हणाला.
पाणिनी ने सौम्या कडे हळूच कटाक्ष टाकला.तिच्या डोळ्यात मिस्कील भाव होते.
“ हा जांभळा कोट नव्हता त्या माणसाच्या अंगात.” रुद्रांश गडकरी उद्गारला.
“ हा जांभळा कोट कुठून आणलास तू?” तारकर पाणिनीवर खेकसला.
“ मी नाही तूच त्या कपाटातून आणलास.”
“ कीर्तीकर पर्यंत तू पोचलास कसा? म्हणजे त्यांची गाडी अपघातात सापडली हे तुला कसं कळल मुळात?” तारकर ने विचारलं
“ मुळात कीर्तीकर ची गाडी अपघातात नव्हतीच अडकली.” पाणिनी मिस्कील पणाने म्हणाला.
“ अरे मला वाटल की तू...” तारकर मधेच थांबला.
“ मला वाटत होत तसं.” पाणिनी म्हणाला “ काय असतं तारकर तुला वाटत असतं की तुझ्याकडे पुरावा आहे आणि त्या भरोश्यावर तू आरोप करत सुटतोस.आरडा ओरडा करतोस, मग अचानक तुला जाणवत .....”
“ समजलं , समजलं....”
“मला हे जाणून घ्यायचय की तुला माहिती कुठून मिळाली? तू मुळात कीर्तीकर कडे जाऊन त्याला सांगितलंस कसं की तुझी गाडी अपघातात सापडल्ये म्हणून?तुला ते समजलंच कसं?” तारकर ने विचारलं
“वस्तुस्थिती अशी आहे तारकर, जो माणूस अपघातात सापडला होता त्याचं नाव आहे तोंडवळकर. मी त्याला काल संध्याकाळी शोधून काढलं. आणि मला खात्री आहे की तोंडवळकरच्या चुकीमुळे तो अपघात झाला होता. जेव्हा तोंडवळकरला कळलं की माझा अशील अपघातात जखमी झालाय, तेव्हा त्याने त्यासाठी लागणार सगळं सहकार्य आनंदानं केलं.” पाणिनी म्हणाला
“सहकार्य म्हणजे तुला काय म्हणायचय? त्यांने पैसे दिले?” तारकर ने विचारलं
“काल थोडे दिले आणि आज सकाळी काही दिले” पाणिनी म्हणाला
“वेडच करतोयस तू मला पाणिनी.”
“हे बघ असं आहे तारकर, या प्रकरणात तुला रस आहे म्हटल्यावर मी पाहिजे ती सर्व मदत तुला करायला तयार आहे. पाहिजे ती सर्व माहिती द्यायला तयार आहे. मला समजलय की परब याने मायरा कपाडियाच्या गॅरेजमध्ये आत्महत्या केली म्हणून”
“आत्महत्या नाही खून झालाय त्याचा. आणि त्याचा खून झाला तेव्हा तू तुझ्या ऑफिसमध्ये नव्हतास संध्याकाळी पाच ते सहा च्या सुमाराला. नंतर सौम्या सोहोनी आली. टॅक्सीने. त्यावेळेला कीर्तीकर तुझी वाट बघत इथे थांबला होता. आणि त्याचा ड्रायव्हर खाली गाडीत थांबला होता. संध्याकाळी पाच नंतर कीर्तीकर खाली गेला आणि त्यांनी त्याच्या ड्रायव्हरला सांगितलं की थांबायची गरज नाही. तू गेलास तरी चालेल. मग कीर्तीकर परत तुझ्या ऑफिस मध्ये येऊन सहा वाजेपर्यंत तुझी वाट बघत थांबला. नंतर त्याने विमा कंपनीला फोन केला आणि कंपनीच्या प्रतिनिधीशी अपॉइंटमेंट ठरवली. इमारतीच्या समोरच त्यांची भेट ठरली. कीर्तीकर त्याच्या प्रत्येक हालचालीच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब देऊ शकतो. आणि त्याला हेही माहिती आहे की तू तुझ्या ऑफिसमध्ये त्या वेळेला नव्हतास. संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत.” तारकर म्हणाला
“पाच वाजल्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये फार क्वचितच असतो. अर्थात कधी काम असलं तर मी रात्री उशिरापर्यंत बसतो पण सर्वसाधारणपणे मला संध्याकाळी पाच नंतर कुठल्याच अशीलाला भेटायला आवडत नाही.” पाणिनी म्हणाला
तारकर ने पाणिनीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिले नाही आणि तो पुढे बोलायला लागला
“आता तू तुझ्या ऑफिसमध्ये नव्हतास याचं कारण असं आहे पाणिनी, तू त्यावेळेला मायरा कपाडिया बरोबर होतास . जेव्हा परब गॅरेज मध्ये आला, तेव्हा तू तिथे होतास किंवा तो आल्यानंतर तू लगेच आलास. आता माझ्याकडे असलेला पुरावा असं दाखवतोय की त्या ठिकाणी परब काही चांगल्या हेतूने आलेला नव्हता. त्याने तुझ्यावर किंवा मायरा वर हल्ला केला असावा त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून तुमच्या दोघांपैकी कोणीतरी रिव्हॉल्व्हरचा चाप ओढला असावा. आणि त्यात परब गेला असावा परब हा काही सुसंस्कृत नागरिक नव्हता तो ब्लॅकमेलर म्हणूनच ओळखला जात होता. म्हणजेच शक्यता ही आहे की तो मायरा कपाडिया ब्लॅकमेल करत असावा आणि ती तुझी अशील आहे. त्यामुळे तुमच्या दोघांपैकीच कोणीतरी त्याला मारलं असावं. आता विषय असा आहे की तुम्ही केलेली हत्या ही स्वसंरक्षणार्थ केली असेल तर त्याचा फायदा मी तुला द्यायला तयार आहे पण ते तुम्हाला स्पष्टपणे आणि ताबडतोब सांगितलं पाहिजे. मायरा कपाडिया कबूल करते की ती आणि तू एकत्रच होतात.” *
" ती तसं म्हणत्ये?" पाणिनी ने विचारलं.
“पहिल्यांदा तिने सांगितलं की ती त्वरिता जामकर बरोबर होती आणि त्वरिता जामकर अशी कबुली देणार होती की संपूर्ण संध्याकाळ ती तिच्याबरोबरच होती पण जेव्हा आम्ही याबद्दल तिला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा ती एकदम लटपटली आणि तिने खरं काय ते सांगून टाकलं” तारकर म्हणाला
मायरा पटकन म्हणाली "मी अजिबात म्हणाले नाहीये की मी आणि पाणिनी पटवर्धन सहा वाजता एकत्र होतो म्हणून. पहिल्यांदा मी म्हणाले की त्वरिता आणि माझी भेट होण्यापूर्वी मी पटवर्धनांच्या बरोबर होते...."
“कपाडिया मॅडम तुम्ही गप्प बसा. मी बोलतोय ना?” तारकर म्हणाला
“तू बोलावस असं त्याला वाटत नाहीये मायरा.” पाणिनी म्हणाला. “वकील म्हणून मी तुला सल्ला देतो की तू काहीही उत्तर देऊ नकोस.”
“त्याने काहीही सल्ला दिला तरी मला फरक पडत नाहीये, मी तुझ्याशी बोलतोय मायरा” --तारकर
“आणि मी माझ्या अशीलाशी बोलतोय तारकर” पाणिनी म्हणाला
“काल तू मायरा कपाडियाबरोबर सकाळी किती वाजता होतास?”
“सांगितलं ना तुला तर मी तिला सकाळी केव्हातरी बघितलं.”
“त्यानंतर तू तिला कधी बघितलंस?”-तारकर
“वेळेबद्दल मी तुला काही खात्री देऊ शकणार नाही तारकर” –पाणिनी
“पण तू बघितलंस तिला ते सकाळ नंतर हे नक्की?”
“हो नक्की”
“ठीक आहे आता मी तुला उगाच गोल गोल फिरवत प्रश्न विचारत नाही थेट मुद्द्यावरच येतो मला तुझ्या हाताचे ठसे हवेत पाणिनी” तारकर म्हणाला.
प्रकरण १४ समाप्त