सावध 5
प्रकरण ५
आपल्या केबिन मधे जाण्यापूर्वी पाणिनी कनक ओजस च्या ऑफिसात आला.त्याचं ऑफिस ही त्याच मजल्यावर होतं.सौम्या,पाणिनी, तारकर, आणि कनक हे वर्गमित्र होते.अगदी खास,घट्ट मित्र.पुढे तारकर पोलिसात भरती झाला, आपल्या हुशारीने मोठया पदावर पोचला.कनक ओजस ने स्वतःची गुप्तहेर संस्था काढली.पाणिनी ने प्रथम पासून वकीली करायची असेच ठरवले होते त्याप्रमाणे तो शहरातला एक नावाजलेला वकील झाला. दोघांनी एकाच इमारतीत आणि एकाच मजल्यावर ऑफिस घेतलं.सौम्या ला पाणिनी ने आपल्याच व्यवसायात स्वतः ची सेक्रेटरी म्हणून सामावून घेतलं. पाणिनी आपली तपास काढायची कामे कनक ला द्यायचा. हे चौघेही घनिष्ट मित्र असूनही मैत्री आणि कर्तव्य यात वितुष्ट येऊ देत नसत.
“ तुला मोठाच जॅकपॉट लागला पाणिनी.” कनक म्हणाला.
“ होय.पण आता एक काम करावं लागेल तुला. मला स्तवन कीर्तीकर या माणसाची या महिन्याच्या तीन तारखेची दुपार कुठे व्यतीत झाली याची माहिती हव्ये. बृहन क्लब ला तो होता असं त्याचं म्हणणं आहे.तो तिथे कितपत प्याला होता? तिथे किती वेळ होता, आणि त्या वेळेत त्याला सतत कोणी बघितलं की मधेच तो निघून पुन्हा आला होता हे सर्व मला हवंय.मला वाटतं की ही माहिती तुला तिथल्या वॉचमन कडून मिळू शकेल.त्याला जरा पैसे देऊन तू मिळवू शकशील.त्यात एक शक्यता आहे की आधीच कीर्तीकर ने त्याला पैसे देऊन आपल्या बाजूने केलं असेल. पण अशी माणसं जास्त पैसे देऊन पुन्हा आपल्याकडे वळवणं अवघड नाही.अजून मला कीर्तीकर च्या गाडीच्या चोरीचं सर्व रेकोर्ड हवंय. चोरी कधी झाली,तक्रार कधी केली गेली, मिळाली कधी गाडी वगैरे. ”
कनक ने मान हलवून संमती दिली.
“ कनक, याशिवाय मला असं हवंय की कीर्तीकर हा बृहन क्लब ला सायंकाळी पाच ते सहाच्या सुमाराला टॅक्सी ने गेला नाही ना.त्या क्लबात येणाऱ्या मेंबर्सना विचारून तुला ही माहिती मिळवता येईल.” पाणिनी म्हणाला
“ किती माणसं कामाला लावू पाणिनी? ” –कनक
“ किती पाहिजेत तेवढी लाव. मला ही सर्व माहिती मात्र लगेच पाहिजे. जे काय बिल होईल तुझं ते आपण कीर्तीकर कडून वसूल करणार आहोत.”
“ बरा आहे माणूस तो? ” –कनक
“ बघूया.शेवटी त्याचीच गाडी अडकल्ये त्यात आणि तो ही. मला वाटतंय कनक, त्याला बायको नसावी.किंवा हयात असेल तर सोडून गेलेली असावी.”
“ कुणी भरवली ही कल्पना तुझ्या मनात पाणिनी?”
“ अरे त्याच्या घरात एक महाकाय ड्रायव्हर वजा स्वयंपाकी आहे.तो सतत कीर्तीकर ला चिकटूनच असतो.घरात बाई माणूस असेल तर अशा माणसाला घरात स्थान मिळणे शक्यच नाही.”
“ ठीक आहे लागतो मी कामाला.पाणिनी तुला अजून एक बातमी द्यायची आहे.मायराने कुंडलिनी गुप्ता नावाच्या एका छोकरीला माझ्याकडे पाठवलंय, बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी.मी तिला सांगितलं की सौम्या ला भेट, ती पुढंच सगळ करेल.मी तिला खोडून विचारलं की तुला मायरा कपाडिया माहित्ये का म्हणून, ती म्हणाली की मी हे नाव पण कधी ऐकलं नाही.मी तुम्हाला गाडी नंबर देते मला बक्षीस द्या ”.-कनक
“ मी तिला देतो बक्षीस.तू त्या कीर्तीकर च्या मागे लाग.” पाणिनी म्हणाला
“ पाणिनी,त्या माणसाचा राजकारण्याशी संबंध असू शकतो.त्यांच्या मदतीने तो तुझ्यावर दबाव टाकू शकतो.”
“ ठीक आहे सावध केल्याबद्दल धन्यवाद.मी आता निघतो कनक.मला उत्सुकता आहे ती कुंडलिनी गुप्ता नामक सुंदरी मायरा चा डाव उधळून न लावता आपल्याकडून दहा हजाराचं बक्षीस मिळवायचा कसा प्रयत्न करेल ” पाणिनी म्हणाला आणि शीळ घालत बाहेर पडला.आपल्या ऑफिसात आल्यावर सौम्या ला म्हणाला, “ मला समजलंय की मायरा ने तिची एक पंटर पाठवल्ये, बक्षिसाची रक्कम घ्यायला.”
“ मला वाटतं सर,की तुम्ही तिची संपूर्ण हकीगत ऐकून घ्यावी आधी.”—सौम्या
“ मला वेळ नाहीये एवढा सौम्या, काय आहे हकीगत? तू ऐकल्येस ना?”
“ मला सगळं ऐकायला झालं नाही अजून परंतू तुम्ही ते ऐकलं तर धक्याने खालीच पडाल.”
“ कशी वाटते ही मुलगी?” पाणिनी ने विचारलं.
“ एकदम तरुण आहे.अत्यंत चतुर आहे.पैशाच्या मागे असणारी,मितभाषी. ती मला टाळून तुम्हालाच भेटायला बघत्ये. ती म्हणत्ये, मी पटवर्धन ना भेटणार,त्यांना माहिती देणार आणि बक्षिसाचे पैसे घेऊन परत जाणार.त्यासाठी पुन्हा येणार नाही.”—सौम्या म्हणाली.
“ मी भेटतो तिला.मला वाटतंय की ती मायरा ची रूम पार्टनर असावी. ”
“ एकदम अशा निष्कर्षावर येऊ नका सर.तिची जी हकीगत मी थोडीफार ऐकली आहे त्यावरून मला वाटतंय की तिला संपूर्णपणे वेगळंच काहीतरी सांगायचंय.”—सौम्या म्हणाली आणि तिने रिसेप्शनिस्ट गती हिला, फोन करून कुंडलिनी गुप्ता ला आत पाठवायला सांगितलं. लगेचच गती तिला घेऊन आत आली.
“ये, बस.” पाणिनी म्हणाला “ तर मिस कुंडलिनी, तू आमच्याकडून बक्षिसाची रक्कम घ्यायला आल्येस तर ! ”
“ होय.”
“ पण मला सांग, गाडीचा नंबर कुठे लिहून ठेवला होता हे तुला कसं कळलं?” पाणिनी ने विचारलं.
“ याचं कारण मीच लिहिला तो. ” कुंडलिनी म्हणाली.
“ अच्छा! आणि तो टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवलास?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही, माझ्या पर्समध्ये. पटवर्धन सर, मला बक्षिसाची रक्कम द्यायचं कसं ठरवायचं? अर्थात इथे येऊन तुम्हाला नंबर देणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही दहा हजार देत बसणार नाही , मला माहित्ये हे ”
“ तू महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिलास कुंडलिनी.” सौम्याकडे बघत पाणिनी म्हणाला.
कुंडलिनी ने आपल्या पर्समध्ये हात घालून कागद बाहेर काढत असतांनाच मधेच थांबून विचारलं. “ मला काय खात्री देणार तुम्ही की तुम्ही मला डबल क्रॉस करणार नाही?”
“ गेली काही वर्षं मी या धंद्यात आहे.आणि तुझी हकीगत पूर्णपणे ऐकून खात्री पटल्याशिवाय तुला पैसे देणारच नाहीये.”
“ ठीक आहे सर,” ती नाईलाजाने म्हणाली आणि आपल्या पर्स मधून तिने एक चिट्ठी काढून पाणिनी कडे दिली.
पाणिनी ने ती चिट्ठी नजरे खालून घातली त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या त्याने तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली
“मी तुला आधीच सांगतोय हा चुकीचा नंबर दिला आहेस तू ”
“कशावरून म्हणता तुम्ही ” कुंडलिनी ने विचारलं.
“कारण मला हवा असलेल्या गाडीचा नंबर मला आधीच मिळाला आहे. गाडीची सगळी माहिती पण मिळाली आहे एवढेच नाही तर मी स्वतः त्या गाडीची तपासणी केली आहे, त्याच्या मालकाशी बोललो आहे त्यामुळे मला खात्री आहे की हा चुकीचा नंबर आहे ”
“ मिस्टर पटवर्धन हा चुकीचा नंबर नाहीये ” ती ठामपणे म्हणाली. “तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला असं सहजासहजी बक्षीसाची रक्कम देण्यात टाळाटाळ करू शकाल? लक्षात ठेवा ते तेवढं सोपं नाहीये तुम्हाला ”
पाणिनी च्या कपाळाला पुन्हा आठ्या पडल्या.
“ हे बघा पटवर्धन मी माझ्या मित्राबरोबर होते. एका हॉटेलमध्ये जाऊन आम्ही गाडीने घरी जात होतो. मध्येच आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला मी गाडीच्या खाली उतरले आणि त्याला टायर बदलायला मदत करत होते तसेच रस्त्यावरून जाणार येणाऱ्यांची काही मदत मिळते का बघत होते. त्याने टायर बदलण्याचं काम पूर्ण केलं आणि आम्ही पुन्हा गाडीत बसतच होतो तेवढ्यात त्या चौकात वाहनाची धडक बसल्याचा मोठा आवाज झाला. एक बाई आणि एक मुलगा त्या गाडीत, फॉक्स व्हॅगन मधे होते. तो मुलगा दाराच्या मध्ये सापडला होता जी बाई गाडी चालवत होती तिचं डोकं आपटलं होतं. मी अगदी मोकळेपणाने सांगते पटवर्धन सर, त्या अपघातात सापडलेल्यांना मदत करण्यापेक्षा मला असं वाटलं की तिथे मला पैसे मिळवण्याची संधी आहे कारण त्या दोन गाड्यातली एक गाडी, सिटी होंडा, धडक दिल्यानंतर तिथे न थांबता निघून गेली होती. मी पटकन माझी वही बाहेर काढली आणि त्या पळून गेलेल्या गाडीचा नंबर टिपून ठेवला. ठीक आहे माझी ही चूक झाली की मी ते पोलिसांना कळवलं नाही कारण पोलिसांकडे गेले असते तर मला बक्षीस काहीच मिळालं नसतं, आणि नसतं लटांबर मागे लागलं असतं. मला माहिती होतं की कोणीतरी या अपघाताची चौकशी करण्यासाठी बक्षीस जाहीर करेल तेव्हापासून मी रोज वर्तमानपत्रातल्या जाहिराती बघत होते.”
पाणिनीने कपाळाला आठ्या घालून पुन्हा तिच्याकडे चिडून बघितलं.
“मी ह्याच्यात पैशाची संधी शोधायला गेले तर माझं काय चुकलंय मिस्टर पटवर्धन ? तुम्हालाही या प्रकरणात बरेच पैसे मिळणार असतील ना? तुम्ही काही हे प्रकरण फुकटात स्वीकारलेलं नसेल मग मी तरी का संधी सोडू? तुम्हाला जेवढी पैशाची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मला आवश्यकता आहे ” कुंडलिनी म्हणाली.
“ कनक ओजस ला फोन लाव ” सौम्याकडे बघून पाणिनी पटवर्धनने सांगितलं. थोड्याच वेळात कनक ओजस फोनवर आला
“ बोल पाणिनी, काय हवंय? ”
“आणखीन एक गाडी नंबर घे ” पाणिनी म्हणाला आणि कुंडलिनी ने दिलेला नंबर त्याने कनक ला दिला
“काय करायचं याचं?” कनक ने विचारलं
“गाडीचा मालक कोण आहे आणि पत्ता काय ते शोधून काढ ”
पाणिनीने त्याला सूचना दिली आणि फोन ठेवून दिला. “ कुंडलिनी, ही अचानक एक नवीनच बातमी आम्हाला आली. अन अपेक्षित अशी बातमी. आम्हाला वाटत होतं की आम्हाला हव्या असलेल्या गाडीचा नंबर आम्हाला आधीच मिळाला आहे.” पाणिनी म्हणाला
“ मिस्टर पटवर्धन, मी हे समजू शकते की तुम्ही दिली तशा प्रकारची जाहिरात पेपरात आल्यानंतर माझ्यासारखे बरेच जण मी सांगितली तशी हकीगत पुढे आणून तुम्हाला गाड्यांचे नंबर देतील आणि बक्षीसाची रक्कम मागतील तुम्ही अर्थात खात्री करून घ्यालंच पण मी तुम्हाला सांगते की मी दिलेली माहिती आणि वाहनाचा नंबर अगदी बरोबर आहे प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला तो हवा आहे की नको. पटवर्धन, तुम्हाला माझी खात्री पटवण्यासाठी आणखीन एक सांगते धडक देणारा जो माणूस गाडी चालवत होता तो सध्या चांगलाच अडचणीत आलाय माझ्याकडला वाहनाचा नंबर कोणाचा आहे हे शोधून काढून मी त्या माणसापर्यंत सहज पोचू शकले असते आणि त्याला चक्क ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तुमच्या बक्षीसांपेक्षा सुद्धा जास्त रक्कम कमावू शकले असते.”
“ मग तसं का केलं नाहीस तू?” पाणिनी ने विचारलं.
“कारण ब्लॅकमेल करण्यात मोठा धोका आहे मी काही तुमच्यासारखे हुशार वकील नाही तुम्ही ते सहज करू शकता मी नाही.”
“ बर, मग तुला नेमकं काय हवंय?”
“हे बघा पटवर्धन सर, मी माझी सगळी कार्ड तुमच्यासमोर उघडे केली आहेत, तुम्ही त्या नंबर वरून गाडी शोधून काढा आणि तुम्हाला हवी असलेली तीच गाडी आहे याची खात्री पटली की मला माझी दहा हजार रक्कम द्या.”
“ठीक आहे तुझा पत्ता काय ? मी तुझ्याशी संपर्क कसा करू मला माहिती मिळाल्यानंतर?”
“ नाही, नाही तुम्ही संपर्क नका करू मला. मी तुमच्याशी संपर्क करीन आणि अर्थात मला माझ्या नावाचा उल्लेख कुठेही व्हायला नकोय माझ्या ज्या मित्राबरोबर मी होते तो विवाहित मुलगा आहे मी इथे तुमच्याकडे आले हे त्याला कळलं तर त्याला चक्करच येईल पण शेवटी मला माझ्या खर्चाची काळजी आहे त्यासाठी पैसे मिळवायला हवेतच ना? ” कुंडलिनी म्हणाली.
“ठीक आहे तर तू माझ्याशी कधी संपर्कात राहशील?” पाणिनी ने विचारलं.
“उद्या दुपारपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या माणसाकडून हवी ती माहिती मिळेलच.” ती म्हणाली आणि अत्यंत ठामपणे आणि आत्मविश्वासाने पाणिनीच्या ऑफिसचं दार उघडून बाहेर पडली.
“ परिस्थिती चिघळली.” पाणिनी म्हणाला
“ कुठल्यातरी लबाड माणसाने तुम्हाला जाणून बुजून दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न केलं असावा असं नाही वाटत तुम्हाला?” –सौम्या
पाणिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात कनक चा फोन आला. “ तू मला आणखी एक गाडीचा नंबर दिलं होतास शोधायला, पाणिनी, त्याचा मालक आहे धीरेंद्र तोंडवळकर आणि पत्ता आहे, ७१०१ पावन तलाव मार्ग. काय करायचंय या माणसाचं पाणिनी? ”
“ तू कीर्तीकर च्या मागे तुझी माणस लावली आहेस ना कनक?”
“ चार माणस आधीच नेमली आहेत आणि आणखी दोन निघाली आहेत. पण एक सांगतो तुला आम्ही त्याच्या पाळतीवर आहोत हे कीर्तीकर ला कळणारच.ते त्याला कळू न देता त्याच्या क्लब मधील उपस्थितीची माहिती काढणे शक्य नाही होणार. ” –कनक
“ मला तसचं व्हायला हवंय कनक, तुझं काम चालू राहू दे. मी या नव्या पंचीला म्हणजे धीरेंद्र तोंडवळकर ला भेटून येतो.” पाणिनी म्हणाला आणि बोलता बोलताच त्याने सौम्याला आपल्या बरोबर येण्याची खूण केली.
( प्रकरण ५ समाप्त.)