होल्ड अप प्रकरण २८
होल्ड अप प्रकरण २८
“ तुम्हाला काही विचारायचं आहे? ” न्यायाधीशांनी काणेकर ना विचारलं.तेवढयात कोर्टाच्या मागे पुन्हा गलका झाला आणि पाणिनी ला दिसलं की एका तरुणीला घेऊन लेडी कॉंन्स्टेबल आत शिरत होती.
“ मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आरोपी इनामदार चा संबंध आम्ही अजून खुनाशी लावलेला नाही.त्यामुळे त्या गाडीत कोण बसले होते या बद्दल सुखात्मे काय म्हणते याच्याशी मला काही घेणे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पटवर्धन ना हवी असलेली सिया माथूर इथे अत्ता हजर झाली आहे.” काणेकर म्हणाला.
पाणिनी म्हणाला, “मी पिसेच्या साक्षीचे वेळी पिसे ला जे पॅड हातात धरायला दिले होते त्यावरचे ठसे आईना हॉटेल मधे तो उतरलेल्या रूम मधे मिळतील तसेच ज्या कार मधे गौतम पिसे बसला होता असे ज्योतिर्मयी सुखात्मे सांगते त्याच्या ड्रायव्हिंग व्हील वर तसेच रीयर मिरर, यावर कुठेतरी त्याचे ठसे मिळतील. म्हणजे त्या कार वर जरी आरोपीचे ठसे असले तरी गौतम चे ही असतील विशेषतः डिकी उघडायच्या मुठेवर. पोलीसना फक्त आरोपीच्या ठशात रस होता, पण आरोपी व्यतिरिक्त अन्य ठसे कोणाचे होते याचा त्यांनी विचार केला नव्हता. आता मी पिसे चे ठसे त्याच्या नकळत पॅड वर मिळवले असल्याने पोलीस तेच ठसे गुम्ह्यात वापरलेल्या कार वर आहेत का हे सांगू शकतील. ”
न्यायाधिशांच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले.
“ मी आता सिया माथूर यांना साक्षीसाठी पुढे बोलावू इच्छितो.” पाणिनी म्हणाला हळू असतांना, “ माझी आणखी एक विनंती आहे, सिया ची साक्ष चालू असतांना मरुशिका आणि कामोद यांना कोर्टाच्या बाहेर म्हणजे साक्षीदारांच्या खोलीत बसवले जावे.”
“ तसा आदेश देण्यात येत आहे.”—एरंडे म्हणाले आणि कोर्टात बसलेल्या मरुशिका, कामोद दोघांचे चेहेरे घाबरे झाले.काणेकर ने त्या दोघांना बाहेर जायला सांगितले.ते बाहेर गेल्यावर पाणिनी ने सिया माथूर ची साक्ष सुरु केली.
“ सिया माथूर, तुला काहीही तणाव घेण्याचं कारण नाही. तुझी पूर्ण ओळख करून दे कोर्टाला, तू कुठून आलीस, इथे का आणि कशी आलीस ते सर्व सांग. ” पाणिनी म्हणाला
“ मी विलासपूर ची आहे. मला आई वडील नाहीत.माझं लग्न अजून व्हायचंय. माझी आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही.एक दिवस मी ऐश्वर्या मॉडेलिंग एजन्सी ची जाहिरात पेपरात वाचली. ते ट्रेनिंग ही देणार होते आणि त्यानंतर नोकरी ही देणार होते. त्यांच्या निकषात मी बसत होते, जाहिरातीत लिहिल्या प्रमाणे मला प्रवासाची ही आवड होती. मला त्यांच्याकडून कॉल आला. मी त्यांना जाऊन भेटले.त्यांनी मला वैयक्तिक माहिती विचारली.माझी शारीरिक मापे घेतली, फोटो घेतले. नंतर तुला आम्ही काय ते कळवू, जेव्हा एखाद्या ठिकाणी जागा असेल तेव्हा निरोप देऊ असे सांगून जायला सांगितले. त्यानंतर महिनाभर मी वाट पाहिली पण काहीच कळवलं गेलं नाही.मग त्यांनी अचानक मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की दुबईच्या युनायटेड अरब एमिरेट्स कंपनीत नोकर भरती चालू आहे.तुम्हाला तिकडे जावे लागेल.मी तयार झाले. जायच्या दिवशी त्यांनी मला प्रवासात घालण्याचा पोषाख. प्रवासात लागणारे साहित्य, हँड बॅग, पर्स असे सर्व दिले.”
“ एक मिनिट सिया, मधेच तुला थांबवतो.” पाणिनी म्हणाला “ तू अत्ता म्हणालीस की तुम्हाला साहित्य दिले. म्हणजे तुझ्या बरोबर इतरही मुली होत्या?”
“ होय.आम्ही दहा जणी होतो. पण कोणीच कोणाला ओळखत नव्हतो.”- सिया म्हणाली.
“ ठीक सांग पुढे.” पाणिनी म्हणाला
“ त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सर्व सामान म्हणजे आमच्या ऐश्वर्या एजन्सी चे सामान आहे. आल्यावर तुम्हाला ते परत करायचे आहे. आम्ही दुबईत पोचलो.तिथे विमान तळावर आमचे फोटो सेशन झाले. विमानातून उतरताना, पुन्हा चढताना , विमानात चालताना असे फोटो घेतले गेले.आमची सोय एका उत्तम हॉटेलात केली गेली. तिथेच आम्हाला प्रवास भत्ता म्हणून पैसे दिले गेले आणि उद्या वेगळे कपडे घालून नवीन लोकेशन वर शुटींग आहे असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही नवीन कपडे घालून शुटिंग केलं. त्यानंतर आम्हाला परतीच्या प्रवासाची तिकीट दिली गेली. येताना घातलेले कपडे, परत घालून आणि पर्स, हँड बॅग घेऊन आम्ही परत आलो. आल्यावर आम्हाला दिलेल्या सर्व वस्तू आम्ही परत केल्या. त्या नंतर दर पंधरा दिवसा नंतर आम्हाला अशाच प्रकारे कतार, कुवेत,ओमान, अशा ठिकाणी जायला सांगण्यात आलं.”
“ या सर्व प्रकारात खटकण्यासारखं काय होतं? ” पाणिनी ने विचारलं
“ खूपच.म्हणजे आम्हाला नोकरी नेमकी कुठे मिळणार आहे हे समजत नव्हतं. आम्हाला पैसे मिळत होते ते विमान कंपन्या देत होत्या की आम्हाला विमान तळावर उतरल्यावर भेटणारी आणि हॉटेलात उतरवणारी आणि शुटिंग करणारी माणसे ? हे काहीच कळत नव्हतं. हॉटेलात उतरल्यावर दुसऱ्या दिवशी शुटिंग ला नेताना आम्हाला वेगळे कपडे दिले जात पण आम्हाला दिलेली पर्स बरोबर न्यायला परवानगी नसे. ”
“ दुसरी पर्स दिली जायची?” पाणिनी ने विचारलं
“ नाही.”
“ मग परतीच्या प्रवासात पुन्हा तीच पर्स बरोबर घेता यायची?”
“ हो.”
“ आणखी काय ?”
“शुटिंग वरून परतल्यावर आमच्या खोलीत कोणीतरी येऊन गेल्याचे जाणवत असे. म्हणजे आपण हॉटेलात राहतो तेव्हा आपण बाहेर गेल्यावर हॉटेल चे लोक खोली स्वच्छ करायला येतात तेव्हा ते लोक आपल्या सामानाला हात लावत नाहीत , फक्त बेडशीट लावून ठेवणे, चहा ची किटली, पावडर साखर याचे नवीन पाऊच ठेवणे टॉवेल नवीन ठेवणे एवढाच बदल जाणवतो आपल्याला पण इथे त्या व्यतिरिक्त आमच्या सामानाची झडती घेतल्याचे जाणवत असे, विशेषतः पर्स ची.पण त्यातले पैसे वगैरे चोरले जात नसत हे नक्की.”
“ परतीच्या प्रवासासाठी कपडे वेगळे दिले जात असत ? ”
“ हो. परत आल्यावर हे सर्व कपडे आणि सामान, पर्स वगैरे मरुशिका व्हिला मधे परत करायचे असत.”
“ म्हणजे? ऐश्वर्या च्या ऑफिसातून कपडे आणि प्रवासी वस्तू, पर्स दिल्या जायच्या आणि परत करताना मात्र मरुशिका क्लब मध्ये परत करायच्या?” पाणिनी ने विचारलं
“ हो तसंच ”
“ मग हे तुला खटकलं? ” पाणिनी ने विचारलं
“ नक्कीच सर. मला या सर्वात काहीतरी गडबड आहे अस वाटलं.हे वाटायचं आणखी एक कारण म्हणजे आमचा प्रवास संपला की आमची नोकरी संपुष्टात यायची. म्हणजे नोकरी अशी नव्हतीच ती खर तर, पण आम्हाला त्या कामाचे लगेचच पैसे देऊन मोकळे केले जायचे पण त्याच्या बरोबरीने त्यांनी आम्हाला मरुशिका क्लब मधे नोकरी करायची संधी देऊ केली होती.म्हणजे ज्यावेळी आम्हाला अरब देशात जायचे नसायचे मोडेलिंग करायला तेव्हा आम्ही बारबाला म्हणून मरुशिका क्लब मधे नोकरी करायचो.मोडेलिंग चे काम आले की क्लब च्या नोकरीतून तिकडे जायचो.एकंदर मरुशिका क्लब आणि ऐश्वर्या मोडेलिंग चे काहीतरी साटेलोटे होते असा संशय मला आला होता. ”
“ तू मोडेलिंग साठी अरब देशात जायचीस तेव्हा मरुशिका क्लब मधे तुझे काम कोण करायचे?” पाणिनी ने विचारलं
“ माझ्या सारखीच दिसणारी एक मुलगी माझ्या नावाने म्हणजे सिया माथूर नावाने तिथे काम करायची.मी आले की ती जायची. तिचे खरे नाव मिष्टी होतं पण कोणी माझ्या नावाची मागणी केली तर मिष्टी त्या ग्राहकाला अटेंड करायची.”
“ तुला जसा संशय आला तसा आणखी कोणाला नाही आला?” पाणिनी ने विचारलं
“ हिमानी दुनाखे नावाची एक मुलगी माझ्या बरोबर मोडेलिंग ला अरब देशात यायची. तिला ही काहीतरी गडबड असल्याचा संशय होता.”
“ तिला नेमकं काय वाटत होतं?” पाणिनी ने विचारलं
“ ऑब्जेक्शन ! ” काणेकर ओरडला. “ हा साक्षीदाराचा अंदाज आहे.”
“ सस्टेंड ” एरंडे म्हणाले.
“ मोडेलिंग च्या नावाखाली ड्रग्ज ची विक्री होते आहे असं ती तुला म्हणाली होती का?”
“ हो.”
“ या रॅकेट मधे मरुशिका आणि कामोद सहभागी असल्याचा थेट उल्लेख तिने तुझ्याजवळ केला होता का?”
“ ऑब्जेक्शन ! ” काणेकर ओरडला. “ हा साक्षीदाराचा अंदाज आहे.”
“ मी साक्षीदाराचे मत विचारलेले नाही.साक्षीदाराला हिमानी काय बोलली हे मी विचारलय.” पाणिनी म्हणाला
“ ओव्हररुल्ड.” एरंडे म्हणाले.
“ होल्ड अप झाला त्या सायंकाळी त्या ठिकाणी तुला घेऊन मरुशिका गेली होती? ” पाणिनी ने विचारलं
“ हो.”—सिया
“ नंतर काय झालं?”
“ गाडीत हिमानी दुनाखे बसली होती.मला मरुशिका मॅडम ने तिला घेऊन व्हिला वर जायला सांगितलं.” सिया म्हणाली.
“ तुला या खटल्याच्या पहिल्या दिवशी साक्षीसाठी बोलावले होते?” पाणिनी ने विचारलं
“ हो.तुमचाच एक माणूस मला भेटला आणि तुमच्या ऑफिसात मला बसवून गेला. जाताना त्याने सांगितलं की मला कोर्टात जायची गरज भासेल तेव्हा निरोप देईन.” सिया माथूर म्हणाली.
“ तो माझा मित्र कनक ओजस होता.पण तुम्ही कोर्टात हजर का नाही झालात?” पाणिनी ने विचारलं
“ ओजस गेल्यानंतर जरा वेळाने एक माणूस आला. त्याने विचारले की मी सिया माथूर आहे का,पाणिनी पटवर्धन यांनी मला बोलावलं आहे.कोर्टात साक्ष देण्यापूर्वीची तयारी म्हणून एक अॅफिडेव्हिट करायचे आहे त्यासाठी नोटरी च्या ऑफिसात जायचंय.त्यांची गाडी खाली तयार होती.त्यांनी मला गाडीत बसवलं.तिथे आणखी एक स्त्री होती.गाडी सुरु झाल्यावर तिने माझ्याशी गप्प मारायला सुरुवात केली आणि त्याच वेळी मला बोलवायला आलेल्या माणसाने माझ्या मानेत काहीतरी टोचलं मला शेवटची आठवण आहे ती, मी एका अपार्टमेंट मधे कोंडून ठेवलेल्या अवस्थेत जागी झाले.”
“दॅट्स ऑल ” पाणिनी म्हणाला
( प्रकरण २८ समाप्त)