होल्ड अप प्रकरण सहा
प्रकरण ६
त्याच रात्री पावणे दहा च्या सुमारास पाणिनी, कनक च्या ऑफिसात गेला.
“ कनक आहे आत?” त्याने रिसेप्शनिस्ट ला विचारलं.
“ हो, आहेत सर आत. ते तुम्हालाच संपर्क करायच्या प्रयत्नात होते.”
“ मी त्याला म्हणालो होतो की मीच येऊन जाईन इथे म्हणून.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर आहे पण त्यांना वाटत होत की तुम्ही येण्यापूर्वीच तुम्हाला काही माहिती दयावी.” रिसेप्शनिस्ट म्हणाली.
“ मी येतो त्याला भेटून.” पाणिनी तिला म्हणाला आणि आत जायला निघाला.
“ पाणिनी पटवर्धन आत यायला निघालेत तुमच्याकडे.” रिसेप्शनिस्ट ने कनक ला फोन वरून घाई घाईत सांगितलं.
कनक रिसेप्शनिस्ट चा फोन खाली ठेवे पर्यंत,पाणिनी त्याच्या केबिन मधे पोचला होता.
“ अरे तू कधी भेटतोयस असं झालं होत मला.”—कनक
“ का? काय झालं?” पाणिनी नं विचारलं.
“ अरे सिया माथूर सापडली ! ”
“ अरे काय सांगतोस काय?” पाणिनी ओरडला. “ काय झालं होत तिला? निघून का गेली होती ती?”
“ बस जरा खाली शांत पणे.” कनक म्हणाला. “ फार चांगल्या घटना घडलेल्या नाहीत.”
“ म्हणजे? नक्की काय?”
“ ती विकली गेली आहे.”-कनक
“ माय गॉड , तसं असेल तर आपण फार काही करू शकत नाही.”
“ तिचं मन वळवण्याचा एक प्रयत्न करून बघू.” कनक
“ सापडली कुठे ती तुला? व्हिला नंबर २ ?” पाणिनी नं विचारलं.
“ तीन नंबर ला.”
“ अत्ता तिथेच आहे? काय करत्ये?” पाणिनी नं विचारलं.
“ तिची ड्यूटी करत्ये मॅनेजर म्हणून.”
“ सापडली कशी ती,तुम्हाला?”
“ रुटीन वर्क. आम्हाला अशा प्रकारच्या क्लब मधे काम करणाऱ्या बायका कशा असतात ते माहीत असतं.त्यांचे कोणाशी संबंध असतात ते माहीत असतं. तिचे फोटो आणि वर्णन मी माझ्या माणसाना पाठवलं. त्याने आधी मरुशिका व्हिला च्या तिन्ही युनिट्स पासून सुरुवात केली त्यातल्याच तीन नंबर ला ती सापडली. ”
“ तुझ्या माणसाला खात्री आहे?” पाणिनी नं विचारलं.
“ नक्कीच , त्याने बघितलाय तिला आणि फोटो वरून ओळखलंय. अर्थात अशी कामं करणाऱ्या बायका आपली नाव काहीही लावतात. तिने आपलं नाव मिष्टी असं घेतलंय.इथे त्यांना साधारण पहिल्या नावानेच ओळखलं जात.पण तो म्हणतो की ही सिया माथूरच आहे.वर्णन आणि फोटो बरोब्बर जुळतंय. अर्ध्या तासा पूर्वीच त्याने फोन केला होता.तेव्हा पासून मी वाटच बघतोय तुझी.”—कनक
“ मी सौम्या ला घेऊन जेवायला गेलो होतो.”
“ अरे कधीतरी तुझ्या ऑफिस च्या खर्चाने मला नेत जा की ! ”
“ जेवण खूप छान होतं कनक.” पाणिनी त्याला आणखी खिजवत म्हणाला. “ मला वाटतंय मी व्हिला नंबर ३ ला जाऊन त्या मुलीला भेटून येतो. मरुशिका कुठे आहे? ”
“ व्हिला १ किंवा २ ला असेल व्हिला ३ ला नाही हे नक्की.म्हणजे माझ्या माणसाने मला फोन केला तेव्हा तरी ती नव्हती.”-कनक
“ तुझ्याकडे सिया चा एखादा जादा फोटो आहे? असला तर मला दे, म्हणजे मी तिथे गेल्यावर मला लगेच ओळखता येईल तिला.”
“ माझा माणूस अजून तिथे व्हिला ३ ला आहे.त्याच्याकडे आहे फोटो. तो तुला देईल.”
“ मी पोचे पर्यंत त्याला थांबायला सांग. कोण आहे? माझ्या ओळखीतला आहे?” पाणिनी नं विचारलं.
“ मला नाही वाटत , तू ओळखत असशील.तो नवा आहे. पण मला जेव्हा आयत्यावेळी बरीच माणसं कामावर ठेवायला लागतात तेव्हा ती सगळी माझ्या नेहेमीच्या टीम मधली नसतात, मला बाहेरून घ्यायला लागतात, त्या मुळे अशावेळी मी त्या सगळ्यांना एखादी विशिष्ट खूण अंगावर घालायला लावतो. यावेळी मी लाल रंगाचे कपलिंग घालायला सांगितले आहेत.त्यामुळे ते सुध्दा एकमेकांना ओळखू शकतात.”
“ छान आहे कल्पना. मी काढतो शोधून त्याला.मी तिकडे निघालोय आता.त्याला सांगून ठेव.दरम्यान जर सिया माथूर तिथून बाहेर पडली तर तिच्यावर नजर ठेवायला सांग त्याला.” पाणिनी म्हणाला.
“ एक जण नाही पुरणार, ती बाहेर पडली तर नजर ठेवायला. दोन लागतील.” –कनक
“ तीन ठेव.खर्चाची काळजी नको करू.” पाणिनी म्हणाला.
“ तुला पैसे जास्तच झालेत. त्याशिवाय का सौम्या ला सारखं सारखं नेतोस जेवायला ! ”
“ त्या सिया माथूर ला मी कोण आहे माहिती आहे?”
“ तुझं नाव तिने ऐकलंय अर्थातच. आणि तुझे फोटो तिने पाहिले असणार पेपरात.”—कनक
“ पण तिने मला कोर्टात पाहिलं नाही ना कधी?” पाणिनी नं विचारलं.
“ नाही.मी तिला बाहेर गावाहून आणल्यावर थेट तुझ्या लायब्ररीत बसवलं. नंतर तू सांगितल्यावरच कोर्टात आणणार होतो पाणिनी. तिने तुला यापूर्वी दुसऱ्या कोणत्या प्रकरणातही कोर्टात पाहिलेलं नाही.तिने स्पष्टपणे सांगितलंय मला.” –कनक
“ मी निघतोय जायला कनक.”
“ तिचा पाठलाग करताना तिला कळलं तर चालणार आहे का तुला? ”—कनक
“ बिलकुल नाही चालणार.गुप्त पणे झाला पाहिजे.”
“ असा पाठलाग खर्चिक असतो पाणिनी, एक माणूस मागून.....”—कनक
“ तुला करायचाय तो खर्च कर आणि वापरायच्ये ती पद्धत वापर.”-- पाणिनी म्हणाला.
“ तू तिला भेटल्यावर काय पद्धतीने तिला हाताळणार आहेस,पाणिनी ? ”
“ मी त्या व्हिला मधे पैसे उधळायला आलेला आणि भरपूर वेळ घालवायला आलेला एक श्रीमंत म्हणून जाणार आहे.पहिल्यांदा मस्त पैकी ज्यूस किंवा मॉकटेल, नंतर जेवण मागवणार, ”
“ पाणिनी, तुझी आणि तिची भेट झाल्यावर तिच्यावर नजर ठेवायची का ?”
“ अत्ता नाही सांगत ते मी. त्यावेळेच्या परिस्थितीवर ठरवेन. तुझ्या माणसाला मी त्याला जायला सांगे पर्यंत तिथेच राहू दे,आमच्यावर नजर ठेवत. आम्ही एकत्र बाहेर पडलो तर दोघांवर नजर ठेऊ दे त्याला.” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.
शहरातल्या रहदारीतून कौशल्याने मार्ग काढत मरुशिका व्हिला नंबर ३ च्या गेट जवळ त्याने आपली गाडी आणली.दारावरच्या वॉचमन ने त्याला सलाम केला.पाणिनी खाली उतरला आणि आपली गाडीची किल्ली त्याच्या ताब्यात दिली.खिशात हात घालून पन्नास रुपयाची नोट त्याला दिली.त्याने पुन्हा सलाम केला.आता तो अत्यंत काळजीपूर्वक त्याची गाडी चांगल्या सुरक्षित जागी लावणार होता.
पाणिनी पायऱ्या चढून आत आला.दारात हेड वेटर उभा होता. त्याला पाणिनी ने पुन्हा पन्नास ची नोट सरकवून चांगलं टेबल राखून ठेवायला सांगितलं,तोवर घड्याळात १०.२१ झाले होते.
“ एकटेच आहात तुम्ही?” त्या हेड वेटर ने विचारलं.
“ दुर्दैवाने.” पाणिनी म्हणाला.
“ यावर उपाय आहे.” सूचक पणे वेटर म्हणाला.
“ मला काही लागलं तर तुला सांगेन मी.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही आज्ञा करा फक्त.” वेटर म्हणाला आणि त्याने पाणिनी ला डान्स फ्लोअर जवळचं एक टेबल मिळवून दिलं.
पाणिनी नं सभोवार नजर टाकली. मरुशिका ने अत्यंत कलात्मक पद्धतीनं सगळ वातावरण निर्माण केलं होतं.म्हणजे कागदावर त्या मालमत्तेची जेवढी किंमत होती त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रत्यक्षात होती.एखाद्या नाईट क्लब मधे उंची फर्निचर,पडदे,असतील, जाहिरातीवर मोठा खर्च केलं जात असेल तरी असं वातावरण नसेल तर ग्राहक पाठ फिरवतात.या उलट कमी खर्चात सजवलेल्या पण असं वातावरण असलेल्या क्लबात ग्राहक आकृष्ट होतात.
मरुशिका ने आपल्या तीनही व्हिला मधे असं वातावरण ठेवलं होतं.पहिला व्हिला सर्व साधारण लोकांसाठी होता.दुसरा सिनेमातल्या शोकीनांसाठी तर तिसरा कलाकार आणि चित्रकारांसाठी.त्यापैकी जे आजीवन सभासद होते, त्या क्लब चे, त्यांच्यासाठी टेबल्स कायमची राखून ठेवलेली असत. ते कितीही वेळ तिथे बसू शकत असत.
आपल्या तिन्ही व्हीलातील बार गर्ल ची निवड मरुशिका ने अत्यंत काळजी पूर्वक केली होती.तिचं म्हणणं होतं की बार गर्ल कडे तीन गुण असले पाहिजेत, निष्पाप चेहेरा,मृदू पण आकर्षक बोलणं आणि ‘वळणदार’ शरीर.आपल्या तीनही व्हीलांची निवड करताना मरुशिका ने जागा पण अत्यंत काळजीपूर्वक निवडल्या होत्या.
पाणिनी खुर्चीत बसून डायनिंग रूम मधे बसलेल्या लोकांकडे बघत होता.दोन माणसे जेवणाच्या टेबल वर जेवत होती.स्टेज वर वादक वाद्य वाजवायला लागल्यावर ती दोन माणसे स्टेज वर चढली.त्यांच्या बरोबर दोन आकर्षक तरुणी त्यांना जाऊन मिळाल्या. त्या सगळ्यांनी एकत्र डान्स केला.डान्स झाल्यावर त्या दोन तरुणी त्यांच्या बरोबर पुन्हा टेबल वर बसल्या.त्या दोघी आकर्षक होत्याच, त्याच बरोबर सावध पण वाटत होत्या. त्या बर मधे असलेल्या इतर तरुणींपेक्षा त्या वेगळ्या वाटत नव्हत्या पण तरीही उठून दिसत होत्या.
पाणिनी ने हेड वेटर चे लक्ष आपल्याकडे वेधले.
“ मिष्टी नाही दिसत इथे आज? ” सहज विचाराव तसं पाणिनी नं विचारलं.
“ तुम्हाला मिष्टी माहित्ये?” हेड वेटर ला आश्चर्य वाटलं.
“ मिष्टी ला ओळखणाऱ्या एका व्यक्तीला मी ओळखतो.” पाणिनी म्हणाला.
“ ती इथे नाहीये जवळपास, पण मी शोधून काढू शकेन तिला.”
“ ती येणार असेल तर मी तिच्यासाठी एक मोकटेल मागवतो.” पाणिनी म्हणाला आणि त्याने आणखी एक नोट हेड वेटर ला दिली.
“मिष्टी ला आणण्यासाठी.” तो म्हणाला.
हेड वेटर आज्ञा धारक पणे मिष्टी ला शोधायला पळाला.
पाणिनी ने तो पर्यंत जेवणाची ऑर्डर दिली आणि आरामात बसून जेवायला सुरुवात केली.
त्याच्या जवळ कोणीतरी सडपातळ आणि झुळझुळीत कपड्यातील टंच म्हणता येईल अशी आकृती उभी राहून त्याच्याकडे बघत होती याचे त्याला भान नव्हते.ती समोर आली तेव्हा दचकून पाणिनी ने विचारलं, “ मिष्टी?” ती हसली. “ आपण भेटलोय या आधी? ”
“ आज मी स्वतःला फार एकटं फील करत होतो. तू यायला हो म्हणालीस बरं वाटलं.अशा वातावरणात एकट्याला जेवायची वेळ येणं या सारखं दुर्दैव नाही.”
“ आता तुम्ही एकटे नाही.” ती म्हणाली. आणि वेटर ला हात करून ज्यूस ची ऑर्डर दिली.
( प्रकरण ६ समाप्त)