Get it on Google Play
Download on the App Store

११ विरह २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

दोघांनीही परस्परांना पाहताच एकमेकांना पसंत केले होते.लग्नगाठी कुठेतरी कुणीतरी निश्चित केलेल्या असतात असा एक अनुभव आहे.त्याची ती किंवा तिचा तो एकमेकांना भेटले की कुठेतरी ठिणगी पडते. आपलेपणाची जाणीव निर्माण होते.पुढे गोष्टी नेहमीच्या वळणाने जातात.अपवाद वगळता सर्वसाधारण असा अनुभव आहे.इथेही तेच झाले हाेते.    

शक्यतो रोज,कामाची गर्दी असेल तर कमी वेळ कां होईना परंतु दोघेही एकमेकांना भेटल्याशिवाय रहात नसत.

सुटी असेल त्या दिवशी मनमोकळेपणाने जास्त वेळ गप्पा मारीत.अर्थात ही भेट, या गप्पा, सर्व ऑनलाइन होत्या हे सांगायला नकोच.  

अशावेळी दोघे काय गप्पा मारतात असा प्रश्न अनेक जणांना पडतो.परंतु गप्पा मारणार्‍यांना तो प्रश्न पडत नाही!काय बोलतो यापेक्षा एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या सहवासात आहोत, हीच मोठी आनंददायी गोष्ट असते.  

थोडक्यात दोघांनीही आपल्या घरच्यांना ग्रीन सिग्नल दिला.

एकदा दोघांकडूनही होकार मिळाल्यावर पुढच्या गोष्टी घडायला विशेष वेळ लागला नाही.अण्णा माई व भाऊ ताई चौघे एकत्र बसले. गुरुजींच्या साहाय्याने विवाहाचे संभाव्य दोन तीन मुहूर्त निश्चित केले.सागर रजा मिळून येणे, कांचनला रजा मिळणे,मंगल कार्यालय उपलब्ध होणे,यांतील अनिश्चिततेमुळे दोनतीन मुहूर्त काढले होते. त्यावेळी अर्थातच कांचन होतीच.सागरला मुहूर्त कळविण्यात आले.सागरने एक महिन्याची रजा काढली.एक मुहूर्त निश्चित करण्यात आला.लग्न झाल्यावर साधारण येथे तीन आठवडे राहता येईल अशी योजना त्याने आखली होती.कांचनला बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा विचार होता. कांचनने आहे ही चांगली नोकरी सोडू नये.नोकरीतून दीर्घ रजा काढावी. बिनपगारी मिळाली तरी चालेल.फार वर्षें नोकरी झालेली नसल्यामुळे बिनपगारीच मिळेल.परत आल्यावर नोकरीवर हक्क राहिला तरी पुष्कळ झाले. सागर बरोबर हार्वर्डला जावे.त्या निमित्ताने तिचे अमेरिका दर्शन होईल. जेवढा प्रवास होईल तेवढा होईल.तिला सारखे घरात बसून करमणार नाही.एखाद्या वर्षाचा शॉर्ट कोर्स तिने करावा.त्यामुळे तिच्या क्वालिफिकेशन्समध्ये भर पडेल.    वर्षभरात सागरचे काम संपले तर दोघांनीही बरोबरच परत यावे.नाहीतर कांचन परत येईल आणि पाठोपाठ सागर भारतात येईल अशी योजना होती.लग्न झाल्यावर लगेच ताटातूट होऊ नये असाही हेतू त्यामागे होता.नाहीतर लग्न होउनही तू तिथे अन् मी इथे असे झाले असते.  

ठरल्याप्रमाणे सागर येथे आला.आठ दिवसांत ठरलेल्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला.दोघांचेही मित्र मैत्रिणी लग्नाला जमले होते.दोन्ही घरची   नातेवाईक मंडळी तर होतीच. सागरचा शाळेतला जिवलग मित्र राघव हल्ली गोव्याला होता.तो व त्याची पत्नी रश्मी या दोघांनी त्यांना गोव्याला येण्याचा आग्रह केला.तेथील एखाद्या हॉटेलमध्ये सी साइडला समुद्रकिनारी मधुचंद्र साजरा करा अशी सूचना त्यांनी केली होती.पुन्हा केव्हां तरी आम्ही तुझ्याकडे नक्की येऊ.आम्ही अगोदरपासून हिमाचलमध्ये जाण्याची योजना आखली आहे तेव्हां तिकडेच मधुचंद्रासाठी जातो असे त्याना सांगून त्यांची त्यांनी समजूत काढली. दोघेही पंधरा दिवस हिमाचलमध्ये (हनीमूनला) मधुचंद्राला जाऊन आली.पासपोर्ट व्हिसासाठी अगोदरच अर्ज केलेला होता.कुठेही कांहीही अडचण दिसत नव्हती. वर्षभराच्या रजेसाठी कांचनने अर्ज दिला.सहा महिन्याची रजा तिला मंजूर झाली.पासपोर्ट व्हिसा वेळेत मिळेल असे वाटत होते.विमानाची दोन तिकिटेही अगोदरच काढण्यात आली होती.

कुठेतरी माशी शिंकली.पासपोर्ट मिळाला व्हिसा मिळाला नाही.त्यासाठी आठ दिवस लागणार होते.शेवटी सागरने ठरल्याप्रमाणे पुढे निघून जावे.पासपोर्ट मिळताच कांचनने जसे तिकीट मिळेल त्याप्रमाणे मागून जावे असे ठरविण्यात आले.सागर पुढे निघून गेला.

आता करोना शिंकला.इटली वगैरे कांही देशांत करोना पसरत होता.तो एवढा गंभीर आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.हल्ली जग इतके जवळ आले आहे की जगात कुठेही खुट्ट झाले कि त्याचा आवाज सर्वत्र ऐकू येतो.आवाजापेक्षा प्रतिध्वनी मोठा असतो.बघता बघता करोना झपाट्याने पसरला.त्याचा विळखा सर्व जगाला बसला.भारतात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला.आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ठप्प झाली.व्हिसा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.कांचन अमेरिकेला जाऊ शकली नाही. रजेचा अर्ज परत घेऊन ती पुन्हा नोकरीवर रुजू झाली.पुन्हा दोघांची ऑनलाईन भेट व गप्पाटप्पा विवाहाअगोदर चालू होत्या त्याप्रमाणेच चालू झाल्या.थोडक्यात "मधु इथे आणि चंद्र तिथे"अशी दोघांची अवस्था झाली.  

लग्न झाले मधुचंद्र झाला आणि पुढे विरह काल, विरह व्यथा, सुरू झाली.जगड्व्याळ करोना संकटापुढे यांचा प्रश्न क्षुद्र  होता.परंतु त्या दोघांच्या दृष्टीने मात्र समस्या गंभीर क्लेशदायक होती.पुन्हा तिकडे सागर आणि इकडे कांचन यांना करोना आपल्याला व आपल्या कुटुंबियांना  ग्रासित नाही ना अशी काळजी वाटतच होती.

जवळजवळ वर्षभराचा काळ तणावाखाली गेला.अधूनमधून काही फ्लाइट्स येत जात होत्या.विवाह झाला आहे.लगेच ताटातूट झाली.आता अमेरिकेत जायला कांचनला परवानगी मिळावी.अशी खटपट करण्यात अाली.परंतु दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.करोनावर व्हॅक्सिनेशन आले.तिकडे अमेरिकेत सागरने व इकडे भारतात कांचनने,लसीचा पहिला डोस घेतला.विरह काल चालूच होता.दोघांचेही आणखी एकेक डोस झाले.विरह व्यथा जवळजवळ सव्वा वर्ष चालू होती.हळूहळू आंतरराष्ट्रीय  दळणवळण सुरू झाले होते. 

भारतात कायमचे  परत यावे.या दृष्टीने सागरने सर्व व्यवस्था केली.त्याचे मार्गदर्शक,पीएचडी गाइड म्हणून हातात घेतलेले काम पूर्ण झाले होते.नवीन काम त्याने स्वीकारले नाही.नोकरीचा राजीनामा दिला.परतीचे तिकीटही मिळविले.त्याला कांचनला आश्चर्यचकीत करायचे होते.तिची आश्चर्यचकीत व आनंदित मुद्रा कायमची हृदयात साठवून ठेवायची होती.त्यामुळे त्याने तो परत येत आहे.तो कायमचा परत येत आहे. त्याने राजीनामा दिला.त्याने आपले तेथील वास्तव्य गुंडाळले आहे.  याबद्दल कांहीही वासवारा त्याचे आईवडील किंवा कांचन यांना येऊ दिला नाही.

सागरचा मित्र राघव गोव्यात राहात होता.तो सागरचा जिवलग मित्र आहे हे कांचनला माहीत होतेच. तो त्यांच्या लग्नालाही आला होता.लग्न झाल्यावर त्याने दोघांना गोव्याला बोलाविले होते.मधुचंद्र गोव्यात साजरा करा असेही त्याने सुचविले होते.

मधुचंद्रासाठी गोव्यासारखे दुसरे कुठचे ठिकाण नाही असे त्याचे मत होते.त्यावेळी दोघे गोव्याला जाऊ शकली नव्हती.राघवला सागरने तो भारतात कायमचा परत येत आहे वगैरे सर्व माहिती सविस्तर दिली.

सागरने त्या मित्राला त्याच्या मनातील गुप्त योजनेत सामील करून घेतले. गोव्यात काहीतरी कार्यक्रम,महत्त्वाचा समारंभ काढ आणि त्यासाठी कांचनला बोलाव असे सांगितले.त्याचवेळी त्याच्या वडिलांचा षष्टय़ब्दिपूर्ती समारंभ होता.घरच्या घरी साधेपणाने साठी समारंभ साजरा करणार होते.करोनामुळे मोठ्या प्रमाणात समारंभ करणे शक्यही नव्हते.

त्याच्या वडिलांच्या साठीच्या समारंभासाठी तू कांचनला आग्रहाने बोलाव.तेथे एखाद्या समुद्र किनाऱ्याच्या उत्कृष्ट हॉटेलमध्ये आठ दहा दिवसांसाठी बुकिंग करून ठेव.कांचन आल्यानंतर तिला गोवा दाखवण्याच्या मिषाने घेऊन रश्मी  बाहेर पडेल.तिला घेऊन त्या हॉटेलमध्ये ती येईल. तिथे मी असेन.मला पाहून तिला आश्चर्याचा गोड धक्का बसेल.अशी योजना ठरवण्यात आली.   

कळंगुट बीचवर एक उत्कृष्ट रिसॉर्टही दहा दिवसांसाठी राघवने बुक केले.त्या हॉटेलच्या सर्व खोल्या सी फेसिंग होत्या.राघवने त्याच्या वडिलांची षष्टय़ब्दीपूर्ती आहे. त्यानिमित्त मोठा समारंभ होणार आहे.सागर येऊ शकत नाही.निदान तू तरी ये असा कांचनला आग्रह केला.

पंधरा दिवसांची रजा काढून ये असेही तिला राघवच्या पत्नीने रश्मीने सुचविले.तुला हवापालट होईल.मी तुझ्याबरोबर गोवा फिरेन.माझेही फिरणे होईल. तुलाही गोवा दाखवणे होईल. गोवा पाहण्यासारखा आहे हे वेगळे नमूद करण्याची गरजच नाही.अवश्य ये असा आग्रह केला.अमेरिकेतून सागरनेही मी कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. तू तरी जा. तो माझा लहानपणापासूनचा जीवश्चकंठश्च मित्र आहे वगैरे गोष्टी तिला सांगितल्या.सागरच्या मित्राच्या पत्नीचा आग्रह,सागरने तू स्वतः माझ्या ऐवजी माझी प्रतिनिधी म्हणून तिथे जा असा केलेला आग्रह याचा परिणाम होऊन कांचन गोव्यात पोहोचली.

दोन दिवस साठीचा कार्यक्रम जोशात पार पडला.अर्थात सोशल डिस्टन्सिंग,मास्क, वगैरे प्रतिबंधात्मक  गोष्टी होत्याच.कार्यक्रम संपला.सागरच्या मित्राची बायको रश्मी कांचनला घेऊन गोवा फिरण्यासाठी बाहेर पडली. 

कार घेऊन कांचनसह ती कळंगुट बीचवर आली.नंतर रश्मी तिला घेऊन त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गेली.तिथे तिला एक फोन आला.फोन राघवचा होता. ही गोष्ट ती सहज कांचनजवळ बोलली.    कॉफी झाल्यावर यांचा(राघवचा) एक मित्र येथे उतरला आहे.तो साठीला येऊ शकला नव्हता.त्याला आमच्या घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण द्यायचे आहे.तो इथे आहे ही गोष्ट मला आत्ताच राघवकडून  कळली.राघवनेच मला त्याला भेटायला व निरोप द्यायला सांगितले आहे.असे सांगून ती कांचनला सागर उतरलेल्या खोलीमध्ये घेऊन आली.

सागर दरवाजा उघडा ठेवून पाठमोरा खिडकीतून समुद्राकडे पाहात उभा होता.दरवाजातून आंत शिरल्यावर,त्याला पाठमोरा पाहून, हा सागरच आहे असा तिला भास झाला.सागर तर अमेरिकेत आहे इथे कसा असेल म्हणून मनातील ती कल्पना तिने झटकून टाकली.मनी वसे ते प्रत्यक्षात भासे असा हा प्रकार असावा.असा विचार तिच्या मनात आला.

*रश्मीने जरा मोठ्याने  तुम्हाला एक निरोप द्यायचा होता असे सांगितले.*

*सागरने तिच्याकडे तोंड वळविले.समोर रश्मी व कांचन उभ्या होत्या.*

*हा तुमचा निरोप तुमच्याकडे पोचवण्यासाठी आले आहे असे म्हणत तिने कांचनला त्याच्याकडे ढकलले.*

*त्या दोघांत आपण असणे बरोबर नाही म्हणून ती लगेच खोलीतून बाहेर पडली आणि आपल्या मागे रश्मीने दरवाजा  हळूच बंद करून घेतला.*   

(समाप्त)

११/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com