Get it on Google Play
Download on the App Store

०४ भास कि सत्य २-४

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

पत्राखाली सही होती. ~जादूगार भीमसेन. ~

माझा अंदाज अचूक ठरला होता.

या जादूगार  भीमसेननेच मला येथे आणून ठेवले होते.

आता बाहेर जाण्याचा मार्ग मला शोधायचा होता.

त्याचे बक्षीस दुहेरी होते.मला कलिका मिळणार होती.माझे प्राणही मला परत मिळणार होते.अन्यथा इथे अन्नाअभावी माझा मृत्यू झाला असता.

घाईगर्दीने कांहीही करून चालणार नव्हते.सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करणे आवश्यक होते.बाहेर जाण्याचा मार्ग जसा बाहेरच्या किंवा अंतर्गत भिंतीतून असणे शक्य होते तसेच तो छपरातून असणे शक्य होते.

जशी खिडकी दिसत होती परंतु प्रत्यक्षात खिडकी नव्हती ते चित्र होते.तसेच भिंतही चित्र असू शकत होते.त्यातच कुठेतरी दरवाजा असणे अशक्य नव्हते.संपूर्ण बंगल्याचा प्रत्येक भाग लक्ष देऊन तपासणे आवश्यक होते.तसेच छप्परही व्यवस्थित पाहणे गरजेचे होते.त्यातच कुठेतरी बाहेर जायची वाट असणे शक्य होते. किंबहुना गुप्त वाट होतीच.जादूगार भीमसेनने मला तसे आव्हानच दिले होते.मी माझी सुटका करून दाखवावी आणि कलिका मिळवावी.गुप्त मार्ग नसताना तो तसे खोटे आव्हान देणे शक्य नव्हते.जमिनीवरील फरशा कुठेतरी मोकळ्या असतील.त्या सरकवल्यावर चोरदरवाजा सापडेल त्यातून तळघर आणि तळघरातून बाहेर बागेत जाता येणे शक्य होते.

पळणाऱ्याला हजारो वाटा शोधणार्‍याला एकच वाट या म्हणीप्रमाणे कुठे पाहावे आणि कुठे पाहू नये हे ठरवणे गरजेचे होते.त्यापेक्षा असे म्हणता येईल की प्रथम कुठे पाहावे आणि नंतर कुठे पाहावे ते ठरवणे गरजेचे होते.कारण माझ्याजवळ अनेक दिवस नव्हते.अन्न पाणी फार फार तर चार दिवस पुरले असते.नळाच्या पाण्याचा कांही भरवसा नव्हता. ते बंद झाल्यावर,म्हणजे जादूगार भीमसेनने बंद केल्यावर कांहीच करता येणे शक्य नव्हते.स्वच्छता राखता आली नसती.सर्वत्र अस्वच्छता झाली असती.ती एक वेगळीच समस्या निर्माण झाली असती.अन्नपाणी याप्रमाणेच मलमूत्र स्वच्छता हीही एक आवश्यक गोष्ट आहे.  

उगीचच घायकुतीला येवून धावाधाव करीत बसण्यापेक्षा, कांहीतरी करीत बसण्यापेक्षा, शांतपणे निश्चित योजना आखणे आवश्यक होते.जादूगार भीमसेनेचा कदाचित तोच उद्देश असावा.मी घाबरून अशी कांहीतरी हालचाल करीन कि मी जास्त जास्त गोत्यात सापडत जाईन.बाहेर जायचा रस्ता माझ्यापासून दूर दूर जाईल.

मी शांतपणे बसून निर्णय घेण्याचे ठरविले. 

दिवाणखाना ,दोन शयनगृहे,स्वयंपाकघर,तीन  बाथरूम्स यामध्ये प्रथम कुठून सुरुवात करावी असा मला प्रश्न पडला होता.कुठून सुरुवात करावी याचा क्रम ठरविता येणे अशक्य होते.शेवटी जिथे मी प्रथम स्वप्नातून   जागृती आल्यानंतर होतो म्हणजेच दिवाणखाना तिथून सुरुवात करावी असे ठरविले.प्रथम चारी भिंती, मग गालिच्या पसरलेली फरशी, नंतर छत याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी निरीक्षण करीत जावे असे शेवटी मी ठरविले.सर्वात शेवटी बाथरूम्स पहाव्यात असा निर्णय घेतला.

प्रथम लांबीच्या भिंतीपासून सुरवात केली.हातातील काठीने आणि मुठीने ठोकून मी पाहत होतो.जर भिंतीत दरवाजा असेल एखादी खिडकी असेल तर ती उघडली असती.निदान आवाज  निराळा आला असता.भिंत ठोकल्यावर येणारा आवाज आणि एखादा दरवाजा किंवा खिडकी ठोकल्यावर येणारा आवाज हे निराळे असणारच.चारी भिंती पाहून झाल्या कुठेही कांहीही सापडले नाही.आता मी खिडक्या पाहायचे ठरवले.भिंतीवर खिडकीचे चित्र काढलेले होते हे मी आपल्याला अगोदरच सांगितले आहे.पडदा, पडदा अडकवलेली दांडी, खिडकीची दोन झडपे, त्याला असलेले बोल्ट, सर्व कांही हुबेहूब चित्रित केलेले होते.प्रत्येक खिडकीला दोन बोल्ट होते. अशी शक्यता होती की त्यांतील एखादा बोल्ट खरा बोल्ट असेल आणि चित्रित केलेली भिंत मध्येच उघडेल.प्रत्येक खिडकीच्या प्रत्येक बोल्टला हात लावून चित्रच आहे ना याची खात्री मी करून घेतली.आणखी एक दूरची शक्यता होती.खिडकीच्या काचेवर कसले तरी डाग पडले होते.या डागांमध्ये कळ असण्याचा संभव होता.प्रत्येक डाग मी चेपून पाहत होतो.कुठेही कळ नव्हती भिंतीची, खिडकीची, झडपे उघडली नाहीत.त्याचप्रमाणे मी सर्व भिंतींचे नीट निरीक्षण केले.कुठे डाग,रेघ,खांच,खड्डा,आहे का ते पाहिले.जिथे जिथे भिंतीचा पृष्ठभाग सपाट नव्हता तिथे हाताने चेपून काठीने ठोकून पाहिले.उद्देश स्पष्ट होता एखादी बेमालूम कळ की ज्यामुळे दरवाजा खिडकी उघडून माझी सुटका होऊ शकेल.       

आता मी माझा मोर्चा जमिनीकडे वळविला.गालिचा गुंडाळून एका कोपऱ्यात उभा करून ठेवला.काठीने व पायातील  बुटाने प्रत्येक फरशी ठोकून पाहत होतो.कुठेही निराळा आवाज आला नाही.फरशीमध्ये चोरवाट नव्हती याची मी खात्री करून घेतली.

फरशा तपासताना, टेबल खुर्च्या सोफा प्रत्येक गोष्ट दूर करून फरशी ठोकून मी पाहिली होती.सोफा,टेबल,खुर्ची याच्याखालीच तळघरात उतरण्याचा मार्ग नसेलच असे सांगता येत नव्हते.अर्थात जमीन ठोकल्यावर कुठेही पोकळ डब डब आवाज आला नव्हता.तिथे तळघर निश्चित नव्हते.तरीही  एखादी गुप्त वाट बाहेर जात असणे अशक्य नव्हते.जादूगार भीमसेनने मला फसविण्यासाठी कोणता खेळ खेळला असेल ते सांगता येणे मोठे कठीण होते.मी अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीची चाचपणी करीत होतो.  

आता छत पाहणे तेवढे शिल्लक होते.छतापर्यंत पोचण्यासाठी रंग देण्यासाठी वापरतात अशा प्रकारच्या घोडीची (दोन शिड्या एकत्र जोडलेल्या असतात त्यामुळे स्थिर पायावर त्या शिड्या तिरक्या उभ्या राहू शकतात. त्यावर एक सपाट प्लॅटफॉर्म असतो.त्यावर उभे राहून न डुगडुगता काम करता येते.शिडी कशाला तरी टेकण्याची गरज राहत नाही.)एका विशिष्ट प्रकारच्या स्टँडची,गरज होती.फ्लॅटमध्ये कुठेही अशा प्रकारची घोडी नव्हती.निदान बाहेर तरी दिसली नव्हती.एखाद्या गुप्त जागी असण्याची शक्यता नव्हतीच असे नाही.संशोधनामध्ये ती योगायोगाने सापडली असती.

टेबलावर खुर्ची ठेवून त्यावर उभे राहून काठीने छतापर्यंत पोचणे शक्य होते.दरवेळी टेबल सरकवावे लागले असते प्रत्येक वेळी मला चढउतार करावा लागला असता. चढउतार करताना मी पडलो असतो, मला दुखापत झाली असती, तर सर्व संशोधनच अशक्य झाले असते.मला स्वत:ला तंदुरुस्त राहणे, फिट अँड फाइन असणे, आवश्यक होते.छततपासणीचा  दुसरा कुठला उपाय दिसत नव्हता.छताची तपासणी शेवटी ठेवावी असा एक विचार मनात येऊन गेला.परंतु मला प्रत्येक खोलीची शास्त्रशुध्द सर्वांगीण तपासणी करायची होती.त्यानंतरच मी दुसऱ्या खोलीत जाणार होतो.चढउतार करताना, काठीने छत ठोकून पाहताना, मी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो.सर्व छताची तपासणी करून झाली.कुठेही छतामध्ये निसटण्यासाठी चोरमार्ग सापडला नाही.

हे सर्व करण्यामध्ये जवळजवळ पांच सहा तास निघून गेले होते.टेबल खुर्चीवर चढ उतार करून मी थकून गेलो होतो.एका सोफ्यात मी आडवा झालो.तिथेच थकल्यामुळे ग्लानी आल्यासारखे होऊन मला झोप लागली.मी जागा झालो तेव्हां हातावरील घडय़ाळात पाहिले.संध्याकाळचे सात वाजले होते. त्या दिवशी झोपताना सुदैवाने  मी घड्याळ काढून ठेवले नव्हते.त्यामुळे किती वाजले ते पाहण्याची सोय होती.घड्याळावर तारीख वारही असल्यामुळे मला येथे येऊन किती दिवस झाले तेही समजणार होते.माझा फोन अर्थातच माझ्या फ्लॅटमध्ये गादीवर डोक्याजवळ राहिला होता. बाह्य जगाशी संपर्क ठेवण्याचे कोणतेही साधन माझ्याजवळ नव्हते.

फ्रीज उघडून प्रथम मी थोडे खावून घेतले.मी संशोधनासाठी मला चार दिवस दिले होते.तेवढय़ा काळात, किंवा त्याच्या अगोदरच मी बाहेर जायचा रस्ता शोधून काढीन अशी मला खात्री होती.

फ्रिजमध्येअसलेले ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ याचे मी पाच भाग केले होते.प्रत्येक दिवशी मी त्यातील एकच भाग संपवणार होतो.चार दिवसांत मला बाहेर जायचा रस्ता सापडला नाही तर पाचवा दिवस आरक्षित म्हणून जादा ठेवला होता.पहिल्या दिवसाच्या श्रमाने मी खूप दमलो होतो.  शयनगृहात जाऊन मी ताणून दिली.

खूप दमल्यामुळे व संध्याकाळी तीन चार तास झोप झाल्यामुळे मला झोप लागत नव्हती.माझ्या तपासाला,माझा शोध घेण्याला, कोण सुरूवात करील आणि केव्हां सुरुवात करील याचा मी नकळत विचार करीत होतो.

कलिका मला फोन करीत असेल.तिला उत्तर मिळत नसेल.ती माझ्या घरी येऊन गेली असेल.दरवाजावरील बेलला प्रतिसाद मिळाला नसेल.दरवाजाला  बाहेरून कडी कुलूप नव्हते.आंत कुणी आहे की नाही ते समजण्याचा मार्ग त्यामुळे कुंठीत होता.बहुधा मी घरात नाही असा समज झाला असेल.मी दुधाच्या पिशव्या बाहेरून आणित असल्यामुळे दरवाजाजवळ साचून राहण्याची शक्यता नव्हती.पेपर दरवाजाला असलेल्या खांचीतून स्लॉटमधूनन आंत टाकण्याची व्यवस्था होती. दरवाजाजवळ साचलेले पेपर, भरलेल्या दूध पिशव्या,बाहेरील दरवाजा न उघडल्याचे चिन्ह असू शकते.येथे तशी कांहीही शक्यता नव्हती.फ्लॅटची झाडझूड, साफसफाई, करण्यासाठी एक बाई येत असे.आठ दिवसांसाठी ती गावाला गेलेली होती. त्यामुळे मी घरात आहे की नाही याची चौकशी कलिकेशिवाय दुसरा कोणीही करणे शक्य नव्हते.सोमवारी माझे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान बंद असे.रविवारी रात्रीच माझे भीमसेनने हरण केले होते.सोमवारी माझी कुणीही चौकशी करण्याची शक्यता नव्हती.

मंगळवारी मी दुकानात गेलो नाही तर माझ्या नोकरांनी फोन केला असता. तास दोन तास ते बाहेर पायरीवर बसून राहिले असते.  फोनला उत्तर देत नाही असे म्हटल्यावर ते आपापल्या घरी निघून गेले असते.बुधवारी मात्र नोकरानी माझ्या चौकशीला सुरुवात केली असती.कलिकेने दुकानात जाऊन मी आहे का ते मंगळवारीच पाहिले असते.दुकान बंद आहे असे पाहिल्यावर ती थोडीबहुत चक्रावली असती.मी कुणालाही फोनवर उत्तर देत नाही, खुद्द सापडत नाही,असे म्हटल्यावर माझ्या चौकशीला जोरात सुरुवात झाली असती.हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यात आली असती.अपघात होऊन मी हॉस्पीटलमध्ये नाही ना हे पाहण्यात आले असते.शहर मोठे असल्यामुळे अर्थातच ही माहिती चटकन पोलिसांशिवाय कुणी गोळा करू शकले नसते.कलिकेने मला शोधण्यासाठी तिच्या पातळीवर आकाश पाताळ एक केले असते.  

कुणीही चौकशी केली, पोलिस कम्प्लेंट दिली,तरीसुद्धा मी कुठे आहे ते कुणालाही समजणे अशक्य होते.पोलिसांनी जंगजंग पछाडले असते तरी त्यांना या बंगल्याचा पत्ता लागणे शक्य नव्हते.जादूगार भीमसेनने आकाशमार्गे माझे अपहरण केले होते.माझ्या फ्लॅटमधून बाहेर पडल्याच्या कोणत्याच खुणा राहिल्या नव्हत्या. रात्री फ्लॅटचा दरवाजा बंद करताना मी लॅच लॉक करीत असे.तसेच आंतील कडी लावीत असे.

*मी दरवाजा उघडत नाही. मी बहुधा आंत आहे. कदाचित माझे बरे वाईट झाले असेल. अशा कल्पनेने पोलिसांनी दरवाजा तोडल्यास दरवाजा आंतून बंद होता हे अर्थातच लक्षात आले असते.*

*दरवाजा आंतून बंद आणि मी मात्र फ्लॅटमध्ये नाही हे पाहून सर्व जण चक्रावले असते.* 

*मी घरात नाही.मी घरातून दरवाजा उघडल्याशिवाय  नाहीसा झालो आहे.*

*मी सापडत नाही असे झाल्यावर काय काय होईल याचा विचार करीत असतानाच मला झोप लागली.* 

(क्रमशः)

२७/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com