Get it on Google Play
Download on the App Store

०७ वचनपूर्ती १-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)   

*स्वप्नील* 

प्रिया आणि मी एकाच शाळेत एकाच वर्गात लहानपणापासून शिकत होतो .बाबा मालकांकडे व्यवस्थापक  म्हणून काम करीत होते .मालकांचे शेती, फळबागा ,साखरकारखाना,फूड प्रोसेसिंग युनिट,इत्यादी अनेक उद्योग होते . मालकानी आम्हाला  त्यांच्या वाड्याजवळ घर बांधून दिले होते.दौलतराव प्रियाचे वडील हे आमचे मालक, मोठी श्रीमंत असामी.त्यांची मुलगी प्रिया, ती मोठी आम्ही छोटे असे आम्हाला कधीच जाणवले नाही.लहानपणापासून बरोबरीच्या नात्याने आम्ही दोघे एकाच आवारात खेळत होतो.मोठे होत होतो .बरोबरच शाळेत जात होतो.प्रियाच्या वागण्यात कधी तोरा श्रीमंती दिसली नाही .

दहावी चांगल्या श्रेणीत आम्ही दोघेही पास झालो .पुढे शिकण्यात प्रियाला विशेष रस नव्हता.मला शिकावे असे वाटत होते .आमच्या गावात किंवा जवळपास उच्च शिक्षणाची व्यवस्था नव्हती.दूर शहरात जाऊन  शिक्षण घेणे मला  आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हते.सुभानरावांचा साखरेचा कारखाना होता.त्यामध्ये मला त्यांच्यामुळेच नोकरी लागली .मी ड्रायव्हिंग शिकलो होतो.ट्रकवर मी चालक म्हणून  काम करू लागलो.थोड्याच दिवसांत माझी नेमणूक सुभानरावांच्या  मोटारीवर चालक म्हणून झाली.आज ना उद्या काकांच्या व्यवसायात मला मानाचे स्थान मिळेल अशी माझी कल्पना होती. 

मोटारीवर चालक म्हणून काम करायला सुरुवात केल्यावर माझी व प्रियाची दृष्टी भेट किंवा प्रत्यक्ष भेट वारंवार होऊ लागली .  सुभानराव व आम्ही यांची जात एकच असली तरी आर्थिक दरी फार मोठी होती .प्रिया मला जरी कितीही प्रिय असली तरी तिच्याशी लग्न करण्याची कल्पना  माझ्या मनात कधीही आली नाही .प्रियाच्या नजरेत मात्र आम्ही दहावीला असल्यापासूनच फरक पडला होता.

सुभानरावांचा कडक स्वभाव मला पहिल्यापासूनच माहीत होता.प्रियाशी लग्न म्हणजे बाबांची नोकरी गेली असती .आमची त्यांच्या आवारात असलेली जागा सोडावी लागली असती.माझी नोकरी गेली असती.आमचे लग्न होऊ नये  म्हणून मालक कोणत्याही थराला

गेले असते.

प्रिया मला आवडत असूनही, तिची इच्छा तिच्या डोळ्यात दिसत असूनही, मी तिच्यापासून चार पावले दूरच रहायचे ठरविले होते.  

*प्रिया*

स्वप्नील आणि मी अगदी लहानपणापासून एकाच आवारात वाढलो.दादा माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी मोठा असल्यामुळे त्याच्याबरोबर खेळणे कधी झालेच नाही .उलट दरवेळी तो माझ्यावर दादागिरी गाजवीत असे. दौलतकाकांची झोपडी आमच्या बंगल्याच्या जवळच होती .दौलत काका बाबांचे पीए असल्यासारखेच होते .बाबांच्या प्रत्येक कामांमध्ये  त्यांची  मदत असे.शेतावर, कारखान्यात, किंवा बाबांच्या इतर व्यवसायांमध्ये, ते सर्वत्र असत . दौलत काकांच्या  शब्दाला बाबांच्या खालोखाल मान होता .

मी व स्वप्नील  दोघे बरोबरच शाळेत जात येत होतो. स्वप्नीलचा शांत, प्रेमळ, दुसऱ्याला मदत करण्याचा, दुसऱ्याला समजून घेण्याचा स्वभाव, कुणालाही प्रेमात पाडील असा होता.दहावीत असताना,बरोबरच अभ्यास करीत असताना, मी त्याच्या प्रेमात केव्हा पडले ते माझे मलाच कळले नाही.दहावीनंतर मला जरी पुढे शिक्षण घ्यावे असे वाटत नसले तरी स्वप्नीलने दादासारखे शहरात जावून शिक्षण घ्यावे असे मला वाटत होते .

तो उच्च शिक्षण घेईल. मोठा माणूस होईल. गांवापासून  दूर  उच्च पदावर नोकरी करील.नंतर मी त्याच्याशी माझे प्रेम बोलून दाखवीन.तो तर नाही म्हणणार नाहीच.आमच्यातील आर्थिक दरी जरी मोठी असली तरी स्वप्नील मोठा माणूस झाल्यावर बाबाही संमती देतील,अशी स्वप्ने मी पाहत होते.पैशाअभावी तो शहरात शिक्षण घेण्यासाठी जावू शकला नाही .तो किंवा त्याचे वडील बाबांकडे त्याच्या उच्च शिक्षणासाठी मदत मागतील बाबा ती आनंदाने देतील असा माझा कयास होता.यातील कांहीच प्रत्यक्षात उतरले नाही. बहुधा त्यानी  स्वप्नीलच्या पुढील शिक्षणासाठी बाबांकडे मदत मागितली नसावी. 

दौलतकाकांचे स्थान जरी बाबांच्या खालोखाल  सर्व व्यवहारांमध्ये असले तरी आर्थिक दृष्ट्या ते फार  संपन्न नव्हते.स्वप्नीलच्या शिक्षणासाठी पैसे पुरवणे त्यांना शक्य नसावे .कारण काहीही असो स्वप्नील शहरात उच्च शिक्षणासाठी गेला नाही एवढे मात्र खरे .तो इथेच बाबांचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागला .त्याचा माझा सहवास जरी वाढला तरी आम्ही विवाहबंधनात एकत्र  येण्याची शक्यता मात्र चांगलीच दुरावली .बाबा माझा विवाह एका साध्या मोटार चालकाजवळ करायला तयार होणे शक्यच नव्हते.

*लक्ष्मीबाई*   

प्रिया दिवसेंदिवस मोठी होत होती.लहानपणापासून ती स्वप्नीलबरोबर मोठी होत होती.दोघेही बरोबरच शाळेत जात असत .बरोबरच खेळत.अभ्यास करीत . स्वप्नील कित्येक  वेळा आमच्याकडेच जेवत असे .मी त्याला नोकराचा मुलगा म्हणून कधीही वागवले नाही.प्रियाचा भाऊ आनंद तिच्याहून बराच मोठा आहे.तो शिक्षणासाठी शहरात राहतो. प्रियाला बरोबरीचा एक भाऊ मिळाला याचे मला समाधान होते.

प्रिया जरा लवकरच मोठी झाली .तिची स्वप्नीलकडे बघण्याची नजर निराळी झाली .ही गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नाही .स्वप्नील चांगला मुलगा आहे .जावई म्हणून त्याच्यात काहीही कमी नाही.मलाही तो आवडतो .आमच्यामधील आर्थिक दरी यांच्या मनात आले तर सहज भरून काढता येईल .यांच्या अनेक उद्योगात त्याला जर सामावून घेतला ,हळूहळू त्याच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या ,तर तो आमचा धंदा समर्थपणे नक्की सांभाळू शकेल.आनंदा डॉक्टरी शिकत आहे.तो शहरात किंवा इथे हॉस्पिटल काढील.यांच्या धंद्यात व्यवसायात तो लक्ष घालील असे मुळीच वाटत नाही.   

यांनी स्वप्नीलला ड्रायव्हर म्हणून ठेवला आहे. तोही आनंदाने ती नोकरी करीत आहे .एका ड्रायव्हरला आपली मुलगी देण्याला हे कधीही मान्यता देणार नाहीत.यानी वेळीच स्वप्नीलला योग्य स्थान दिले पाहिजे.

यांना समजून सांगितले पाहिजे .यांच्याजवळ एकदा शब्द काढला पाहिजे.मला सरळ सरळ ज्या गोष्टी दिसतात त्या यांना दिसत नाहीत का ?

*सुभानराव उर्फ काकासाहेब*   

आनंदाला शिक्षणाची खूप आवड आहे .आनंदाने इथेच माझा धंदा सांभाळावा अशी माझी इच्छा होती . परंतु त्याला पुढे शिकायचे होते .त्याच्या इच्छेपुढे मला मान तुकवावी लागली.त्याने शहरात जाऊन शिक्षण घ्यावे परंतु परत इथे येऊन आपला व्यवसाय सांभाळावा अशी माझी इच्छा होती.त्याने एमकॉम एमबीए करावे अशी माझी इच्छा होती .ती इच्छा सफल झाली  नाही .तो डॉक्टरी शिक्षणात रमला. बहुधा तो शहरातच स्थायिक होईल .इथे आला आणि तो यावा असे मला वाटते तरी तो हॉस्पिटल सुरू करील आणि त्यात काही गैर नाही .माझा धंदा कोण सांभाळणार याची मला चिंता आहे .

प्रियाचे लग्न  एखाद्या होतकरू व्यावसायिकाजवळ करावे.त्याला घरजावई करावा.  आणि आपला धंदा व्यवसाय त्याच्याकडे सोपवून स्वस्थ राहावे असा माझा विचार आहे .त्या दृष्टीने मी माझ्या काही मित्रांजवळ बोलून ठेविले आहे .एखाद्या मित्राचा मुलगा किंवा जवळचा नातेवाईक प्रियाला पसंत पडेल आणि माझेही काम होईल अशी मला आशा होती.परंतु या माझ्या आशेवर पाणी फिरले आहे असे दिसत आहे .

दौलतीचा मुलगा स्वप्नील लहानपणापासून आमच्या घरी येतो जातो .दौलती आवारातच राहात अाहे.प्रिया व तो समवयस्क अाहेत.दोघांची दाट दोस्ती आहे. दोघेही बरोबर खेळत होते, शाळेत जात होते, हे सर्व स्वाभाविक होते .प्रिया  त्याच्याकडे अशा नजरेने पाहू लागेल असे मला कधीच वाटले नाही .आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपले आर्थिक स्थान, लक्षात घेऊन ती वागेल असे वाटले होते .परंतु प्रत्यक्षात निराळेच घडत आहे .प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे.माझी ती फार लाडकी आहे.तिला दुःखी करणे मला शक्य होणार नाही .स्वप्नील तसा मुलगा चांगला आहे .प्रेमळ मनमिळावू आज्ञाधारक आहे.परंतु आपली आर्थिक प्रगती व्हावी, आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढावी, अशी इच्छा अशी ईर्षा त्याच्यामध्ये दिसत नाही.

स्वप्नीलमध्ये जर ईर्षा असती तर मला तो जावई म्हणून कदाचित पसंत पडला असता.तो शहरात शिक्षण घेण्यासाठी जातो असे म्हणाला असता तरी मी त्याला पैसा पुरविला असता.परंतु  यातील काहीच घडले नाही. माझ्या जावयात जो स्पार्क, जो स्फुलिंग, असावा असे मला वाटते तो त्याच्यात दिसत नाही .इथे मी त्याला नोकरी दिली .ड्रायव्हर म्हणून तो काम करीत आहे .तो प्रामाणिक आहे .त्याच्याजवळ सचोटी आहे.परंतु मला अपेक्षित असलेले गूण त्याच्यामध्ये नाहीत.

(क्रमशः)

७/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com