Get it on Google Play
Download on the App Store

०८ जरा २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

शारीरिक शक्ती क्षीण झाल्यामुळे निरनिराळ्याअडचणी येण्याअगोदरच दुसरी एक अडचण निर्माण झाली.

हल्ली सीताकाकू अनेक गोष्टी विसरू लागल्या होत्या.

सुरुवातीला त्या एखादी साधी गोष्ट विसरत असत.उदाहरणार्थ टॉवेल कुठे ठेवला आहे.कपडे कुठे ठेवले आहेत.हे त्यांना आठवत नसे.

वॉशिंग मशीन, डिश वॉशर, सुरू केला की नाही?

त्या वॉशिंग मशीन, डिशवॉशर, सुरू करण्यासाठी जात तर तो अगोदरच त्यांनी चालू केलेला असे.

दिवसेंदिवस त्यांचा स्मृतिभ्रंश वाढतच गेला.त्याची परिणिती शेवटी भयानक झाली.             

स्वयंपाकीण काकू सकाळी स्वयंपाक करून जात असत.कधी कधी त्यांना प्रकृतीच्या किंवा घरच्या इतर अडचणीमुळे कामावर येता येत नसे.सीताकाकू अशावेळी स्वतः स्वयंपाक करीत असत.कधी त्यांच्या हातून पदार्थात दोनदा मीठ घातले जाई.तर कधी त्या मीठ घालण्याचे विसरत असत.पदार्थ शिजवताना मीठ मसाला फोडणी इत्यादी केले की नाही त्यांच्या लक्षात राहत असे.कधी डबल तर कधी मुळीच नाही अशी परिस्थिती ओढवे.कुकर लावला की नाही?गॅस चालू केला की नाही?गॅस बंद केला की नाही?कुणीतरी आल्यानंतर बाहेरचा दरवाजा बंद केला की नाही?असे किंवा अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत असत.त्यावर त्या मी आता म्हातारी होवू लागले असे किंचित विनोदाने, किंचित खेदाने, म्हणत असत.आपण बऱ्याच गोष्टी विसरतो हे त्यांच्या लक्षात येत असे.        

विसरभोळेपणा जसा स्वयंपाक करताना होत असे त्याचप्रमाणे इतरही गोष्टीत हळूहळू होवू लागला होता.त्यांचा स्मृतिभ्रंश दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता.आपण विसरतो ही गोष्टही त्या विसरु लागल्या होत्या.उदाहरणार्थ केव्हां केव्हां त्या आंघोळ करून आल्यावर थोड्यावेळाने पुन्हा आंघोळ करण्यासाठी जात असत.रामभाऊनी तू हे काय करतेस असं विचारल्यावर त्या मी स्नान केले नाही त्यासाठी जात आहे असे सांगत.स्नान केले की नाही? जेवण केले की नाही? नाष्टा केला की नाही? दरवाजाला कडी घातली की नाही?दूध तापवले की नाही?प्रत्येक गोष्टीत त्यांना संभ्रम पडत असे.त्यांची प्रकृती डॉक्टरांना दाखवण्यात आली.डॉक्टरांनी ही स्मृतिभ्रंशाची (डिम्नेशियाची) सुरुवात आहे असे सांगितले.कांही औषधे दिली.स्पेशालिस्टाकडे पाठविले.त्याचबरोबर हे म्हातारपणचे कांहीजणांना होणारे दुखणे आहे. यावर कांही उपाय नाही असे सांगितले.यांना बाहेर एकटय़ा पाठवत जाऊ नका.बरोबर कुणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी माणूस पाहिजे.असे कटाक्षाने सांगितले.त्याचबरोबर या केव्हांही घरातून निघून जातील. बाहेर गेल्यावर त्यांना आपण कोण?कुठे राहात होतो? याचे स्मरण राहणार नाही.त्या अक्षरशः हरवतील.तरी काळजी घ्या म्हणून सांगितले.  

रामभाऊ दुपारी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे वामकुक्षीसाठी आडवे झाले होते. त्यांचा जरा कुठे डोळा लागत होता.  सीताकाकूंनी ही काय झोपण्याची वेळ आहे? तुम्ही जेवला नाहीत. अगोदर जेवायला चला आणि नंतर झोपा म्हणून त्यांना उठवले. 

आणि जेवणासाठी चला म्हणून सांगितले.जेवण झाल्याचे त्या विसरून गेल्या होत्या.आपण जेवलो आहोत हे त्यांना कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नव्हते.  हळूहळू त्यांचे विसरण्याचे प्रमाण वाढू लागले.रोज येणार्‍या  दूधवाल्याला, स्वयंपाकीणकाकूंना,नोकराला, शेजारपाजाऱ्यांना, त्या विसरू लागल्या.सुरुवातीला त्या नाव विसरत. त्यांना वस्तूचे, लोकांचे, नाव आठवत नसे.त्या वस्तूचे, त्या व्यक्तीचे,त्या वर्णन करून सांगत असत. त्यावरून वस्तू, व्यक्ती, लक्षात यत असे.पुढे त्या लोकांनाच विसरू लागल्या. विसरभोळेपणामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा चळिष्टपणा आला होता.दिवसातील कोणत्याही प्रहरी,सकाळ समजून पुन्हा पुन्हा तोंड धुणे, दात घासणे,स्नान करणे,चहा हवा म्हणून सांगणे किंवा स्वतःच चहा करणे,अशा गोष्टी त्या करू लागल्या होत्या.बाहेर जाऊन आलो असे समजून पुन्हा पुन्हा हात पाय धुणे असे प्रकार सुरू झाले.  

स्वतःचे नाव तर त्या विसरल्याच. आपण कोण आहो तेही त्या विसरल्या.त्यांचा मुलगा ,सून,नातू, अमेरिकेतून आली होती.त्यांनी कुणालाही ओळखले नाही. जी गोष्ट मुलाची तीच मुलीची   व जावयाची झाली.हळूहळू त्या आपले राहते घर  विसरल्या.रामभाऊ कोण आहेत तेही त्या विसरल्या!

एकच गोष्ट विसरल्यामुळे पुन्हा पुन्हा करणे किंवा मुळीच न करणे अशा गोष्टी तर सामान्य होत्या.जेवण केले तरी मी जेवले नाही, मला जेवायचे आहे म्हणून पुन्हा जेवायला बसणे.पुन्हा पुन्हा चहा पिणे, पुन्हा पुन्हा हात पाय धुणे, पुन्हा पुन्हा स्नान करणे,इत्यादी गोष्टी तर सामान्यच  होत्या.

त्यांची प्रकृती चांगली होती.त्या दिवसाच्या कोणत्याही प्रहरी बाहेर जाण्यासाठी निघत.बाहेर पडल्यावर आपण कोण? कुठे आहोत? कुठे जात आहोत? कुठे राहतो? सर्वांचा त्यांना विसर पडत असे.रामभाऊना बाहेरच्या दरवाजाला कडी कुलूप करून घ्यावे लागले.त्या रामभाऊंना कळल्याशिवाय बाहेर पडू शकणार नाही अशी व्यवस्था करावी लागली.रामभाऊ त्यांच्याबरोबर संध्याकाळी फिरायला जात असत.सीताकाकूंवर त्यांना सतत लक्ष ठेवावे लागे.

प्रत्येकवेळी बाहेरच्या दरवाजाला कुलुप लावणे शक्य नव्हते.पेपरवाला, दूधवाला, शेजारीपाजारी स्वयंपाकीण काकू कामाला येणारा नोकर, आलेल्या पाहुण्यांसाठी, दरवाजा उघडावा लागे. त्याचे कुलूप काढावे लागे. दरवेळी कुलुप लावणे शक्य नव्हते.दरवाजा उघडा मिळताच, संधी मिळताच, त्या घरातून बाहेर पडत असत.त्यांना बाहेर जाऊ न देणे,ही एक मोठी समस्या झाली होती.     

सीताकाकूना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळावे लागे.लहान मुलापेक्षाही त्यांना सांभाळणे कठीण होऊ लागले होते. त्यांचा सकाळचा चहा नाष्टा जेवण दुपारचा चहा रात्रीचे जेवण सर्व गोष्टी रामभाऊंना पाहाव्या लागत.कधी कधी तर त्यांना सीताकाकूंना भरवावेही लागे.    

सीताकाकू थकत होत्या. रामभाऊ त्यांच्याहून मोठे होते. तेही हळूहळू थकत होते.सीताकाकूंचे सर्व कांही करणे, त्यांच्यावर सतत  लक्ष ठेवणे,रामभाऊंना कठीण पडत होते.त्यांना एखाद्या नर्सिंग होममध्ये ठेवा असे अनेक जणांनी सुचवून पाहिले.विलासने त्यांच्या मुलाने व कमलने त्यांच्या मुलीने त्यांना फोनवर पुन्हा पुन्हा तसे सांगितले.  अशा परिस्थितीत रामभाऊ घरी एकटेच राहिले असते.त्यांना एकटेपण खायला आले असते.सीता काकूंचे सर्व कांही नीट होत असेल की नाही या शंकेने त्यांचे मन सतत त्यांना कुरतडत राहिले असते. सीताकाकूंमुळे सबंध दिवस रामभाऊ एंगेज्ड असत.सीताकाकूना नर्सिंग होममध्ये ठेवल्यानंतर रामभाऊंच्या जीवनात पोकळी निर्माण झाली असती.

रामभाऊंना त्यांच्या मुलीने पुन्हा पुन्हा सुचवून पाहिले.त्यांच्या मुलीने आग्रह धरून पाहिला.रामभाऊ सीताकाकूंना नर्सिंग होममध्ये ठेवायला तयार नव्हते.

रामभाऊंच्या हट्टापुढे सर्वांनी हात टेकले.रामभाऊ मुलाचे, मुलीचे,नातेवाईकांचे, मित्रांचे, कुणाचेच ऐकायला तयार नव्हते.सीताकाकूंचे एक टोक तर रामभाऊंचे दुसरे टोक अशी स्थिती झाली होती.

रामभाऊंना एकच चिंता काळजी सतत खात असे.रात्री झोपेत सुध्धा ते दचकून उठत असत.चिंता काळजी व्यथा एकच होती.

"माझ्या अगोदर सीता गेली तर कांही प्रश्नच नाही.पण जर मी सीतेच्या अगोदर गेलो तर सीताचे कसे होईल?" 

नातेवाईक त्यांची भरती सरळ नर्सिंग होममध्ये करतील.मुलगा मुलगी परदेशातून येतील.तिला परदेशात कुणीही नेणार नाही.तिथे नेऊन तिथल्या नर्सिंग होममध्ये ठेवले असते तर गोष्ट वेगळी.परंतु तिला इथल्याच नर्सिंग होममध्ये ठेवतील.नर्सिंग होमला भरपूर पैसा देतील.पैशात कांही कमी नाही. आपणही भरपूर पैसा तिच्यासाठी ठेवला आहे.पण तिचे नर्सिंग होममध्ये हाल होतील.आपण ज्या प्रेमाने, आपुलकीने करतो, तसे कोण करणार?शेवटी "मोले घातले रडाया नाही आसू आणि माया"हेच खरे .      

हल्ली ही चिंता रामभाऊंना नीट झोपूही देत नव्हती.झोपेतून दचकून ते जागे होत.नंतर कित्येक वेळ त्यांना झोप लागत नसे.यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होवू लागला होता.  एकच प्रश्न,

"माझ्यामागे सीतेचे काय होईल?" 

शेवटी खूप विचार करून ते एका निर्णयाप्रत आले.

"आतापर्यंत आपण जीवनात खूप बरे वाईट उपभोगले. केव्हां ना केव्हां या देहाचा शेवट होणारच आहे.आपल्याला आता जीवन जगण्यासाठी,आनंदमय राहण्यासाठी,कांही प्रेरणाच नाही.दोघांनाही प्रवास, सिनेमा, नाटक, खूप आवडते.जीवनाचा आनंद सर्व बाजूनी पुरेपूर घेण्यासाठी हवे ते बळ आता आपल्याजवळ नाही.आतापर्यंत आपण या सर्वांचा पूर्ण उपभोग घेतला.आता दोघे एकत्र कांहीही आनंद अनुभवू शकत नाही.आता जगणे म्हणजे केवळ श्वास घेणे.त्यातही आपण परमेश्वरावर हवाला ठेवून स्वस्थ बसलो असतो.जेव्हां ज्याला न्यायचे असेल तेव्हां तो त्याला घेऊन जाईल.मुलगा मुलगी येथे कुणीही नाही.दोघेही परदेशात आहेत.त्यातील एक जरी इथे असते तरी त्याने नर्सिंग होममध्ये आईला ठेवल्यावर तिची कांही ना कांही  काळजी घेतली असती.विचारपूस केली असती."

"ही अगोदरच जाईल आणि मी नंतर जाईन अशी कांही गॅरंटी नाही.ही अशी परावलंबी.आपल्या मागे हिचे हाल हाल होतील.आपणच आपल्या जीवनाचा एकत्रित अंत करूया."

रामभाऊ खूप दिवस या गोष्टींवर विचार करीत होते.शेवटी सर्व बाजूंनी विचार करून त्यांचा निर्णय पक्का झाला.एका रात्री त्यांनी सीता काकूंना झोपेचा ओव्हरडोस दिला.नंतर शांत चित्ताने स्वतःही ओव्हरडोस घेतला.आपण शुद्धीवर येणार नाही आपण अपंग होणार नाही याची खात्री त्यांनी करून घेतली होती.

सीताकाकूंना तर काय होणार आहे त्याची कांहीच कल्पना नव्हती.स्मृतीभ्रंश झाल्यामुळे त्या आनंदमय? स्थितीत होत्याच.त्यांना कोणताच विचार, कोणतीच कल्पना,त्रास देऊ शकत नव्हती.मनाच्या तुरुंगाच्या पलीकडे त्या गेल्या होत्या.

*हात जोडून, ईश्वराची क्षमा मागून,परमेश्वराचे चिंतन करीत रामभाऊंनी डोळे मिटले ते कायमचेच.*

*दुसऱ्या दिवशी काम करणारा नोकर, दूधवाला, स्वयंपाकीणकाकू,आल्या.*

*बेल वाजवली, दरवाजा ठोठावला,कुणीही दरवाजा उघडत नव्हते.*

*पोलिसांना बोलावण्यात आले.*

*दरवाजा फोडण्यात आला.रामभाऊ व सीता काकू चिरनिद्रेत होते.*

(समाप्त)

७/११/२०२१©प्रभाकर  पटवर्धन