Get it on Google Play
Download on the App Store

०६ अस्सल सुवर्ण २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

अश्लील बोलणे, सहज धक्का लागला असे दाखवून मुद्दाम धक्का मारणे,आमचे बोलणे ऐकले नाहीस तर परिणाम चांगला होणार नाही म्हणून धमकावणे ,या सर्व गोष्टींचा अतिरेक होत होता.

शीतल तशी धीट मुलगी होती . ती घाबरट नव्हती. तिने एकदा राकेश व प्रकाश यांना तुम्ही मला त्रास देऊ नका.मी त्यातील मुलगी नाही.परिणाम चांगला होणार नाही. असे सभ्यपणे सांगून पाहिले होते. तिचा नाद सोडण्याऐवजी ते दोघे आणखीच चेकाळले होते.दोन दिवसांपूर्वी तिने अनिकेतजवळ बोलल्याप्रमाणे,त्या दोघांना भर रस्त्यात सर्वांदेखत चपलेने मारले होते.अर्थात राकेशने तिचा हात पकडला होता.ती फार हात चालवू शकली नव्हती.परंतू दोघांचीही चार चौघांसमोर चांगलीच शोभा  झाली होती.शीतलने केले ते बरे केले नाही.जे झाले ते चांगले झाले नाही.ते दोघे याचा डूक ठेवतील. असे कालच तो शीतलजवळ बोलला होता.आणि आज त्या दोघांनी सूड घेतला होता .शीतल शुद्धीवर आल्यावर पोलीस जबाब घेणार होते.सर्व काही शीतलच्या जबाबावर अवलंबून होते .त्यांना अटक व  शिक्षाही झाली असती.राजकीय प्रभाव व पैसा यांचा वापर करून त्या दोघांच्या वडिलांनी सर्व प्रकरण कदाचीत मिटविले असते .  

शीतलचे शरीर उद्धवस्त झाले होते.शरीरा बरोबर तिचे मनही उद्ध्वस्त होणार होते .अशा बिकट प्रसंगी संजयने येथे थांबणे आवश्यक होते.तिच्या काळजीपोटी त्याने येथे थांबणे गरजेचे होते. शुद्धीवर आल्यावर त्याच्या दर्शनाने तिला मानसिक समाधान व हुरूप  वाटला असता. संजय निघून गेला होता.याचा अर्थ  त्याला तिची काळजी वाटत नव्हती.त्याचे प्रेम बेगडी होते . कदाचित कधीच तो परत येणार नव्हता.असेच जाऊन राकेश व प्रकाश यांना धडा शिकवावा असे अनिकेतला वाटत होते.अनिकेतला तेवढे शारीरिक सामर्थ्य नव्हते .त्याचे  मित्र वर्तुळही लहान होते.त्याचा तो स्वभावही नव्हता.

विचारांच्या आवर्तात सकाळ केव्हा झाली ते अनिकेतला कळले नाही.अजून शीतल शुद्धीवर आली नव्हती.सकाळीच उठून शीतलचे आई बाबा हॉस्पिटलवर आले होते.  त्यांचे तारवटलेले डोळे पाहून, त्यांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे पाहून,त्यांना रात्री झोप लागली नाही. ते घरी गेले खरे परंतु मनाने येथेच होते,रात्रभर ते काळजी करीत होते, ही गोष्ट सहज लक्षात येत होती.त्याचे आई वडीलही थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये आले .त्यांना पाहून शीतलच्या आई वडिलांना जास्त धीर आला .संकट प्रसंगी आपल्या बरोबर कुणीतरी आहे हे समाधान फार मोठे असते.आपण एकाकी नाही ही भावना मनाला सुखावते .      

पोलिसांनी राकेश व प्रकाश यांना अटक केली नव्हती. शीतलच्या  मैत्रिणी बरोबर असूनही त्यातील एकीनेही आपण घटना पाहिल्याचा जबाब भीतीपोटी दिला नव्हता.शीतल शुद्धीवर आल्याशिवाय, डॉक्टरनी परवानगी दिल्याशिवाय, पोलीस तिचा जबाब घेऊ शकणार नव्हते.ठोस जबाब व पुरावा असल्याशिवाय पोलीस त्यांना अटक करू शकणार नव्हते.

शीतल मृत्यूशी झगडत होती.घटनेच्या दोन दिवसांनंतर ती शुद्धीवर आली .आणखी एक दिवसानंतर तिचा जबाब घेण्यास डॉक्टरनी परवानगी दिली .तिने न बिचकता, न घाबरता, स्पष्ट जबाब दिला,सर्व घटना पोलिसांना व्यवस्थित सांगितली .घटने अगोदर  पंधरा दिवस दोघेही तिला कसा त्रास देत होते, तेही विस्ताराने सांगितले.त्या दिवशी राकेश व प्रकाश यांनी तिला तू आमच्या बरोबर येणार आहेस की नाही असे निर्वाणीचे विचारले होते .तिने नाही असे म्हणताच याचा परिणाम ठीक होणार नाही अशी धमकी दिली होती.मी तुमच्या धमकीला घाबरत नाही असे तिने सांगताच राकेशने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले.प्रकाशने पेटती काडी टाकली.दोघेही सोक्षमोक्ष लावण्याच्या तयारीने आले होते .काहीही आकस्मिक  नव्हते.सर्व पूर्वनियोजित होते .  राकेश व प्रकाश दोघांनाही अटक झाली . 

शीतल शुद्धीवर आल्यावर तिच्या दृष्टीस प्रथम अनिकेत पडला .त्याच्याकडे बघून ती क्षीण हसली.तिची नजर भिरभिर फिरत होती.ती कोणाला तरी शोधत होती .ती संजयला शोधीत आहे हे अनिकेतच्या लक्षात आले.अनिकेतने संजयला मुद्दाम फोन केला.त्याला शीतल तुझी वाट पाहात आहे असा निरोप दिला.अपेक्षित प्रतिसाद त्याने दिला नाही . शीतलला प्रथम त्याची प्रकृती बरी नसेल असे वाटत होते .कितीतरी दिवस झाले तरीही जेव्हा तो फिरकला नाही तेव्हां तो शीतलवर नव्हे तर शीतलच्या शरीरावर प्रेम करीत होता हे शीतलच्या लक्षात आले.

अपघाताच्या दिवशी तिला पाहिल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलकडे फिरकला नाही .जवळजवळ दोन महिन्यानी शीतलला डिस्चार्ज मिळाला. या सर्व कालखंडात अनिकेत तिच्यासोबत होता.नंतर वर्षभरात शीतलवर चार प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आल्या .तरीही ती पूर्वीसारखी होऊं शकली नाही.एकदा केव्हातरी संजय औपचारिक भेटण्यासाठी आला होता .मला तुला अशी बघवणार नाही. तू मला विसरून जा.असे कोरडे चार शब्द बोलून तो थोड्याच वेळात निघून गेला होता.त्यानंतर कधीही तो फिरकला नाही . आतापर्यंतच्या सर्व गोष्टी,दिलेल्या अाणाभाका तो विसरला होता . 

शीतल ज्याला सोने समजत होती ते पितळ निघाले.पूर्वी तिला वारंवार भेटणारा, तिच्या भोवती रुंजी घालणारा संजय, अस्तंगत झाला होता .या निमित्ताने शीतलचा भ्रमनिरास झाला होता . "जे चकाकते ते सर्व सोने नसते" ही गोष्ट  सर्वांच्याच लक्षात आली.

जवळजवळ वर्षभराने शीतल या सर्व अपघातातून पूर्णपणे सावरली . प्लॅस्टिक सर्जरीची चार ऑपरेशन होऊनही शीतलला आरशात पाहावत नव्हते .या अपघातानंतर सुरुवातीला ती चालू लागल्यावर जेव्हां प्रथम  बाथरूममध्ये गेली तेव्हा आरशात पाहिल्यावर ती किंकाळी फोडून बेशुद्ध झाली होती.हळूहळू  तिने धैर्य  एकवटले होते.मनुष्य शेवटी प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतो हेच खरे .

या सर्व काळात अनिकेत तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता.त्याच्याच मानसिक आधारामुळे ती या जीवघेण्या अपघातातून सावरू शकली .

अनिकेत केवळ मित्र नाही तो त्याहूनही काहीतरी जास्त आहे हे तिच्या हळूहळू लक्षात आले .तो प्रथमपासूनच आपल्यावर प्रेम करीत असला पाहिजे हेही तिला उमजले.आपल्या ही गोष्ट अगोदरच कशी लक्षात आली नाही याचे तिला आश्चर्य वाटत होते.संजयच्या बोलण्याला आपण कसे काय भुललो तेच तिला उमजत नव्हते. 

अनिकेत एक दिवस आपले प्रेम बोलून दाखवील म्हणून ती वाट पाहात होती. तो दिवस उजाडला .त्या वेळी काय करायचे ते तिने अगोदरच निश्चित केले होते .

अनिकेतला घेऊन ती आरशासमोर उभी राहिली .ती त्याला म्हणाली .नीट आरशात पाहा. माझ्याबरोबर फिरताना तुझ्याकडे सर्वजण दयेने पाहतील.या विद्रूप स्त्रीबरोबर याने कां बरे लग्न केले असेल असा विचार करतील.काका काकूही मला सून म्हणून मान्य करतील असे मला वाटत नाही.लग्नात व लग्नानंतर तुमचे नातेवाईक व पाहुणे आपणा दोघांना  हसतील.मला लोकांनी आपल्याकडे असे पाहिलेले आवडणार नाही.लोकांनी तुझी कीव केलेली मला सहन होणार नाही .मला तुझी दया नको आहे.मी आहे अशीच ठीक आहे.तू माझा मित्र होतास, आहेस, व राहशील तेवढे मला पुरे आहे.

यावर अनिकेतने तिला बाहुपाशात घेतले.मी तुझ्यावर दया करीत नाही.तसा विचार चुकूनही माझ्या मनात आला नाही.मी  तुझ्यावर पहिल्यापासून प्रेम करीत होतो.तू संजयवर प्रेम करू लागलीस.तू सुखी व्हावीस, तू आनंदी असावीस, एवढीच माझी इच्छा होती.संजयने तुझा तू आता आहेस तसाच स्वीकार केला असता, तू सुखी व आनंदी झाली असतीस, तर मी त्यातही  आनंदी झालो असतो.

परंतु आता परिस्थिती वेगळी आहे.मी तुला तुझ्यावरील प्रेमामुळे एकटे सोडू शकत नाही.मला लोकांची पर्वा नाही.बोलणारे केव्हाही, कोणत्याही बाजूने कसेही बोलतच असतात. लोक आपल्या समस्या सोडवायला येत नाहीत. लोक बोलतच असतात. आपण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे ते आपणच ठरविले पाहिजे .मला तू पाहिजेस व तुला मी पाहिजे हे महत्त्वाचे आहे.जन्म आपल्या दोघांना बरोबर काढायचा आहे .आपल्या नात्याला लोकांनी नावे ठेवली तर मला आवडणार नाही .तुझे काका काकू, माझे आई वडील, मला व तुला पूर्णपणे ओळखतात.तुझे मन,तुझ्या मनाचा मोठेपणा,तुझी आपुलकी ते ओळखतात.

शरीराचे सौंदर्य महत्वाचे नाही असे मी म्हणत नाही.परंतु मनाचे सौंदर्य त्याहून महत्त्वाचे आहे .तू काहीही काळजी करू नकोस .सर्व काही ठीक होईल .

त्याच्या मनाचा सच्चेपणा, त्याचे तिच्यावरील निरतिशय प्रेम,ज्याची तिला अगोदरच खात्री पटली होती,त्याचा तिला पुन: प्रत्यय आला.तिने निरतिशय आनंदाने व सुखाने डोळे मिटून घेतले.

(समाप्त) 

(राकेश व प्रकाश या दोघांनीही व त्यांच्या वडिलांनी,शीतलने साक्ष फिरवावी म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला .पैशाचा प्रयोग करण्याचाही  प्रयत्न केला. शीतल दबावाला बळी पडली नाही .आपल्या मूळच्या साक्षीपासून शीतल तसुभरही दूर सरकली नाही.दोघांनाही पाच पाच वर्षांची सक्तमजुरी झाली .शिवाय प्रत्येकाने शीतलला भरपाई म्हणून दहा दहा लाख रुपये द्यावे असा  निकाल कोर्टाने दिला. )  

९/६/२०२०©प्रभाकर पटवर्धन