०३ पहिले चुंबन १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मी लहानपणापासूनच तशी अवखळ मुलगी आहे.अगदी लहान असल्यापासून दोन घ्यावे दोन द्यावे अशी माझी वृत्ती आहे.ही मुलगी फारच भांडखोर आहे. आडदांड आहे.मारामारी करते अशा तक्रारी माझ्या आईकडे अगदी लहानपणापासूनच येत होत्या. आईच्या हातचा सर्वात जास्त मार मी या कारणासाठीच खाल्ला आहे.अगदी लहान असताना मला सर्व मुले सारखीच वाटत असत.मी चार पाच वर्षांची झाल्यावर मुलगा मुलगी असा भेद माझ्या लक्षात येऊ लागला.हा भेद लक्षात यायला लागल्यापासून मी नेहमीच मुलांना कुटत आली आहे.मुलगा असल्याची प्रौढी, मस्ती आणि जास्त ताकदीचा अहंमन्यपणा मुलांच्या मनात लहानपणापासूनच असतो.माझ्या हूडपणामुळे आई मला नेहमी तू मुलाच्याच जन्माला यायचीस,चुकून मुलीच्या जन्माला आलीस असे म्हणत असे.माझ्या बाबांचा मला नेहमी प्रत्येक गोष्टीत पाठिंबा असे.
पंतांची सून या नाटकात "चार पावसाळे गेले कि होईल माझा झंप्या शहाणा"हे जसे काकू म्हणत असतात त्याच चालीवर माझे बाबा "होईल माझी दामू शहाणी" असे म्हणत.काकूंचा झंप्या वेडसर होता मी तशी नव्हते.माझे नाव सौदामिनी.बाबा मला अनेकदा लाडिकपणे दामू दाम्या अशी हाक मारीत असत.माझी आई नेहमी बाबांना, तुम्ही तिला डोईवर चढवून ठेवले आहे,मोठी झाली की आपणा सर्वांनाच जड जाईल असे म्हणत असे.त्यावर बाबा हसून तो विषय सोडून देत असत.
मला भाऊ बहीण कुणीही कित्येक वर्षे झाले नव्हते.मी दहा वर्षांची असताना मला लहान भाऊ मिळाला.माझ्या पाठीमागे बरीच वर्षे लहान भावंड नसल्यामुळे बाबांनी मला मुलासारखेच वाढवले.लहानपणी तर पँट,शर्ट, मुलासारखे बारीक केस कापणे यामुळे अनोळखी लोक मला मुलगाच समजत असत.त्यावेळी मुलांनी लांब केस ठेवण्याची फॅशन नव्हती.अर्थात शाळेत जाताना शाळेचा मुलींचा ड्रेस(युनिफॉर्म) घालून मला जावे लागत असे. कुणीही मला बाबांबरोबर पाहिले तर पँट शर्ट व कापलेले केस यामुळे मुलगाच म्हणत असत.बाबाही कौतुकाने दामू म्हणून माझे नाव सांगत असत. मी आठ वर्षांची झाले आणि मला घरात व बाहेर मुलीचा पोशाख सक्तीने देण्यात आला. तोपर्यंत मी फक्त शाळेत जाताना मुलीचा युनिफॉर्म(ड्रेस) घालत असे.प्रथम मला मुलीचा पोशाख विचित्र वाटत असे. अवघडल्यासारखे(ऑक्वर्ड) वाटत असे.हळूहळू मला त्याची सवय झाली.जरी माझे नाव सौदामिनी असले तरी मला नेहमी दामिनी म्हणूनच सर्वजण हाक मारीत असत.
मी दहा वर्षांची असताना बाबांनी मला कराटेच्या क्लासमध्ये घातले.मुलीच्या जातीला काय कुणालाही स्वसंरक्षण करता आलेच पाहिजे असे बाबांचे मत होते.त्यात मुलीच्या जातीला तर आलेच पाहिजे असे ते म्हणत असत.मुलीच्या वाटेला जायची कुणाचीही हिंमत होता कामा नये.त्यासाठी तिला आत्मविश्वास पाहिजे.मुलगी स्वसंरक्षणक्षम झाली तरच तो आत्मविश्वास तिच्या डोळ्यात व अंगप्रत्यंगात आपोआपच येईल असे त्यांचे म्हणणे होते.कराटेमध्ये माझी प्रगती उत्तम होती.माझ्या बरोबरच्या मुलामुलींना मी हरवत असे.ज्या ज्या वेळी स्थानिक,प्रादेशिक, राज्य,कराटे स्पर्धा होत तेव्हां तेव्हां त्या त्या वयोगटात माझे नाव असे.शाळेत,कॉलेजात,गेल्यावरही मी कराटे स्पर्धांत भाग घेत असे आणि बक्षीसही मिळवीत असे.कॉलेजमध्ये मुले त्यामुळे मला वचकून असत.इतर मुलींच्या वाटेला जाणे,त्यांना टॉण्ट मारणे,वगैरे गोष्टी मुले स्वाभाविकपणे करत असतात.माझ्यापासून मुले दोन पावले दूरच असत.आपण कुठे तिच्या वाटेला गेलो आणि हिने कराटेचा एक डाव टाकला तर सर्वांसमोर आपली फजिती होईल याची भीती त्यांच्या मनामध्ये असे.मी ज्या मुलींच्या ग्रुपमध्ये असे त्यांच्या खोडय़ा मुले काढत नसत.
माझा आवाज गोड होता.तो किंचित पहाडी होता.मला सिनेमाची लहानपणापासूनच आवड होती.मी सिनेमातील गाणी गुणगुणत असे.आईच्या एक दिवस ती गोष्ट लक्षात आली.तिने मला गाण्याच्या क्लासमध्ये घातले.एका बाजूला बाबामुळे मी कराटेमध्ये प्रवीण होत होते तर दुसऱ्या बाजूला आईमुळे गायनात प्रवीण होत होते.गायनाच्या एकामागून एक परीक्षा पास होत होते.शाळेच्या गॅदरींगमध्ये माझे एखादे गाणे हटकून होत असे.गणपती उत्सवात,घरी पाहुणे आले म्हणजे मला गाणे म्हणायला हटकून सांगत असत.मी नुसती गाण्याच्या परीक्षा देत होते एवढेच नव्हे तर स्टेजवर अनेकदा गात असे. शाळेच्या,कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, गणपती उत्सवातच फक्त गात होते असे नव्हे तर माझे लहान मोठे गाण्याचे कार्यक्रम सभागृहातून होत असत.त्याला बऱ्यापैकी दादही मिळत असे.गाताना गोड, मधुर, हवाहवासा, कोमल वाटणारा आवाज,प्रसंगी कठोर होत असे.दुसऱ्याला जरब बसवील असा होत असे. डोळे मिटून दोन्ही आवाज ऐकले तर हे आवाज एकाच मुलीचे आहेत हे सांगूनसुद्धा कुणाला पटत नसे.
कराटे व गायन या दोन्ही डगरीवर हात ठेवून चालताना माझा एकप्रकारे समतोल साधत असे.मी डाव्या किंवा उजव्या बाजूला न झुकता मधून चालत होते.
मुली मुलांपेक्षा लवकर मोठय़ा होतात.वयात येतात. शहाण्या होतात.त्याप्रमाणे मीही मोठी झाले.जसा बौद्धिक विकास होत होता,गायनामध्ये मी एकेक पायरी चढत होते,कराटेमध्ये प्राविण्य मिळवत होते,तशीच शारिरीकदृष्टय़ाही मी विकसित होत होते. कळीचे फूल होत होते.दांडगाई कमी होऊन तिथे कोमलता, नाजूकपणा,विकसित होत होती.माझ्यात शारीरिक व मानसिक दृष्ट्या होत असलेला फरक माझा मलाच जाणवत होता.
मुलांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदललेली दिसू लागली.पूर्वीच्या पिढीमध्ये मुले आणि मुली यांच्यामध्ये नाही म्हटले तरी अदृश्य भिंत असे.हल्ली बऱ्याच प्रमाणात ही अदृश्य भिंत लोप पावत आहे.माझ्या वेळी ती अदृश्य भिंत अस्पष्ट स्वरुपात होती.माझ्या बरोबरच्या इतर मुली,मुलांमध्ये मिसळत असत.बोलत असत.मी जरा जास्तच मोकळेपणाने मिसळत असे.माझ्या जशा अनेक मैत्रिणी होत्या तसेच अनेक मित्रही होते.असे असले तरीही एखाद्या मुलाने जर माझ्याजवळ आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला तर माझी एकच नजर त्याला रोखायला पुरेशी असे.लहानपणापासून मुलासारखे वाढविल्यामुळे असो, कराटेप्राविण्यामुळे असो,मुळातच मी इतरांहून थोडी निराळी असल्यामुळे असो किंवा माझ्यामधल्या आत्मविश्वासामुळे असो,माझ्या नजरेत एक जरब, तीक्ष्णपणा आहे,असे सर्वांचे म्हणणे होते.
मी पुरुषी मुळीच नव्हते.पूर्ण उमललेले फूल होते. मी शेजारून गेले तर मागे वळून एखाद्याने पाहावे अशी मी नक्कीच होते.तरुण काय प्रौढ पुरुषही नक्कीच वळून पाहत असत.
असे असले तरी कां कोण जाणे,मुले माझ्यापासून थोडे अंतर ठेवूनच राहात असत.माझी मैत्री अनेक मुलांशी होती.मी त्यांच्यांत अगदी मोकळेपणाने वावरत असे.तरीही माझ्या कांही मैत्रिणींचे जसे मुलांशी नाजुक बंध जुळले तसे माझे जुळले नाहीत. नाजुक नाते अस्तित्वात आले नाही.
माझे शिक्षण पुरे झाले.मला एका आर्किटेक्ट फर्ममध्ये नोकरी मिळाली.मी त्यामध्येच ग्रॅज्युएशन केले हाेते.घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली.माझ्या मोकळय़ा स्वभावामुळे,अनेक मित्र मैत्रिणीमुळे,मी परस्पर कुठेतरी जुळविले असेल अशी माझ्या आईला शंका होती.तिने तसे मला स्पष्टपणे विचारले.मीही तिला स्पष्टपणे अजून तरी तसे नाही असे सांगितले.बाबाना नेहमीप्रमाणे माझ्याबद्दल खात्री होती.तसे कांही असले तर ते दामू आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही असे त्याना आईजवळ बोलताना मी ऐकले होते.त्यावर आई फक्त नाक उडवीत असे.मी एवढी मोठी झाले.माझा धाकटा भाऊ मोन्या(मोहन) आठवीला आला तरी बाबा मला दामू म्हणत असत.
एकदा बाबांनी माझ्याजवळ माझ्या लग्नाचा विषय काढला.आईही यावेळी अर्थातच तिथे होती.
तिला माझ्या लग्नाची घाई झाल्यासारखे वाटत होते.केव्हां केव्हां लग्न जुळेपर्यंत कित्येक वर्षे जातात.तेव्हां आतापासूनच बघायला सुरुवात केलेली चांगली असे तिचे म्हणणे होते.
*जसे वय वाढेल तसे मनासारखे स्थळ मिळणे कठीण होईल.आपल्याला मनासारखा जावई निवडता येणार नाही.असे ती आवर्जून बाबांना सांगत असे.*
* माझे मित्र पुष्कळ आहेत.मॅरेज मटेरियल ज्याच्यात आहे असा मुलगा अजून मला मिळाला नाही.असे मी दोघांनाही स्पष्टपणे सांगितले.आईने म्हणजे काय असे मला विचारले.*
* ज्याच्याबद्दल त्या विशिष्ट प्रकारची आंतरिक ओढ वाटेल असा मित्र अजून मला मिळाला नाही.मी स्पष्टीकरण दिले.*
(क्रमशः)
२१/११/२०२१©प्रभाकर पटवर्धन