Get it on Google Play
Download on the App Store

१४ प्राणदंड ४-४

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)  

लोळागोळा झालेल्या अवस्थेत तो माझ्यासमोर पडला होता.

त्याला नंतर उचलून मी कठड्यावरून दरीत फेकून दिला.

त्या अगोदर मी खिशातून गावठी दारुची बाटली काढली.त्यातील बरीच त्याला पाजली.उरलेली त्याच्या अंगावर शिंपडली.

दारूच्या नशेत तो कड्यावरून खाली पडला.

किंवा येथे त्याचे मित्र व तो दारू पार्टीसाठी जमले होते.

त्यातून बाचाबाची, भांडण, मारामारी आणि शेवटी गंगारामला दरीत फेकून देण्यात आले असावे.असे एकूण चित्र निर्माण केले.

आणि शांतपणे घरी निघून आलो.

माझ्या मोटारीचे,किंवा बुटाचे ठसे राहणार नाहीत याची काळजी घेतली होती.

हातमोजे तर मी घातले होते.त्यामुळे ठसे उमटण्याची शक्यताच नव्हती.

आता सुभाष  शिल्लक राहिला होता.      

माझे सूडनाट्य दोन तृतीयांश पुरे झाले हाेते. किल्ल्याखाली फिरणार्‍या  जनावरानी त्याला कदाचित खाल्ले असते.कदाचित किडे मुंग्या यांचे तो भक्ष्य झाला असता.कडय़ावरून पडल्यावर तो जिवंत राहणे शक्यच नव्हते.कदाचित किल्ल्याखालील गावातील लोकाना तो सापडला असता.पोलिस केस झाली असती. गंगाराम कोण कुठचा शोधून काढले गेले असते.पोलीस संवाद संकुलापर्यंत येऊन पोहोचले असते. चौकशी झाली असती.कदाचित ते माझ्यापर्यंतही आले असते.त्याची अशी अवस्था मी केली हे कळायला कांही मार्ग नव्हता.दारू पिण्यासाठी मित्र येथे एकत्र जमले.त्यातून भांडण झाले.हाणामारी झाली.दारूच्या नशेमध्ये गंगारामला कड्यावरून खाली फेकून देण्यात आले.केस पोलिसांनी फाईल केली असती. गंगारामच्या मित्र वर्तुळात चौकशी केली गेली असती.त्यातील कांही जणांना पोलीस कोठडी देऊन फटकेही मारण्यात आले असते.खऱ्या गुन्हेगाराचा,माझा शोध लागणे शक्य नव्हते.आता सुभाषची  पाळी होती.मला कांही गर्दी नव्हती.गंगारामच्या प्रकरणाचे काय होते ते अगोदर पाहणार होतो.त्यानंतर सावकाश सुभाषकडे वळणार होतो.

रानटी जनावरे कीड मुंगी गंगारामला खाऊन टाकतील केवळ हाडे शिल्लक उरतील अशी माझी कल्पना होती.कड्यावरून ढकलल्यावर खोल दरीत जिथे खूप अरण्य होते तिथे तो पडला होता.सुकलेली लाकडे तोडण्यासाठी कुणीतरी गाववाला जंगलात गेला होता.त्याला एका ठिकाणाहून खूप घाण वास येत होता.वाघ,लांडगा, यांनी मारलेले एखादे जनावर कुसले असेल असे त्याला वाटले.तो आणखी चार माणसे बरोबर घेऊन तिथे गेला.त्याला माशा किडेमुंग्या यांनी घेरलेले गंगारामचे प्रेत सापडले.त्यांनी प्रथम गावच्या पोलिस पाटलाला ही हकिगत सांगितली.त्याने पोलिसांना कळवले.पोलिस प्रेत घेऊन गेले आणि चौकशीला सुरुवात झाली.पोस्टमार्टेम करण्यात आले.गंगारामच्या कपड्यांमध्ये त्याचे ओळखपत्र होते.त्यावरुन पोलीस संवाद संकुलामध्ये चौकशीसाठी आले.

शवचिकित्सेमध्ये हातापायाची मोडलेली हाडे नमूद केलेली होती.परंतु ती मोडल्यानंतर गंगारामला दरीत फेकण्यात आले की दरीत पडल्यावर ती मोडली हे निश्चितपणे शवचिकित्सेत डॉक्टरांना सांगता आले नव्हते.त्यांनी फक्त संशय प्रगट केला होता.गंगारामच्या मित्रांना पकडून ते किल्ल्यावर दारू पार्टीला गेले होते का इत्यादी चौकशी करण्यात आली.त्याच्या मित्रांना थोडा पोलिसांचा प्रसाद खावा लागला.त्यातून कांहीच निष्पन्न झाले नाही.सुदैवाने त्याच रात्री पाऊस पडला होता.त्यामुळे ज्या काही खुणा राहिल्या असतील त्या सर्व पुसल्या गेल्या होत्या.  थोड्याच दिवसांत चौकशी पूर्ण झाली.गंगारामची फाईल बंद करण्यात आली.  

माझे अंत:करण  क्रोधाने धगधगत होते.दोन तृतीयांश सूड पुरा झाला होता.आता फक्त सुभाष राहिला होता.त्याच्यासाठी मी एक वेगळीच योजना आखली.एक दिवस तो दुधाची पिशवी फ्लॅटबाहेर ठेवलेल्या खोक्यात ठेवीत असताना,मी त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या.तो काम कुठे करतो? तो शिकतो का? तो कुठे राहतो? त्याच्या घरी कोण आहे?अशी सर्वसाधारण चौकशी केली.तो एका दुकानात काम करीत होता.तिथे त्याला फार मामुली पगार मिळत होता.तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता.जवळच्या गावी माझा एक मित्र आहे त्याचे फार्म हाऊस आहे. फार्महाऊसवर काम करण्यासाठी नोकर पाहिजे.तिथे राहायचीही व्यवस्था आहे वगैरे थापा मारल्या.

सुभाषने त्या माझ्या मित्राशी त्याची ओळख करून द्यावी.त्याला नोकरी देण्यासाठी  शिफारस करावी. अशी विनंती केली.मी येत्या रविवारी फार्म हाऊसवर जाणार आहे.तू येणार असलास तर चल. तुझ्या नोकरीचे जमले तर पाहू,अशी थाप मी मारली.तो माझ्या बरोबर येण्यास तयार झाला.त्याला मोटारीत घेऊन मी त्या काल्पनिक गावाच्या रस्त्याला लागलो.मध्येच रस्ता सोडून मी डावीकडच्या कच्च्या वाटेवर वळलो.सुभाषने इकडे कुठे असे विचारता इथे जवळच मित्राचे फार्महाऊस आहे असे त्याला सांगितले.  

स्प्रे फवारा तयारच होता.तो मी त्याच्यावर मारला.मी अगोदरपासूनच मास्क लावला होता.मास्क कां लावला आहे?हल्ली मास्कशिवाय फिरता येते ना?असे सुभाषने विचारता,त्याला गंगारामला दिलेलेच उत्तर दिले.तो घातक फवारा नाकातून आत जाताच सुभाष मलूल होऊन पडला.मी मोटार काळडोहाच्या बाजूला घेतली.जवळच सरिता नावाची एक नदी वाहत होती.त्यावर एक मोठा डोह होता.त्या डोहात सुसरी राहत होत्या.माणूस जवळपास मिळाल्यास सुसरी पाण्याबाहेर येऊन त्याला पकडून आंत घेऊन जात असत.डोहावर झाडांच्या फांद्या वाकल्या होत्या.गर्द झाडीमुळे भर दुपारी सुद्धा तिथे काळोख असे.तिथे गेल्यावर कुणालाही धडकी भरत असे.डोहाच्या आजूबाजूच्या झाडांवर भुतांची वस्ती आहे अशी अफवा पसरली होती.त्यामुळे या बाजूला कुणीही येत नसे.जवळच एक कुणीतरी केव्हांतरी बांधलेले लाकडी झोपडीवजा मोडकळीला आलेले घर होते.त्यामध्ये सुभाषला घेऊन गेलो.

सुभाषचे शरीर त्या विशिष्ट घातक फवार्‍यामुळे   गलितगात्र झाले हाेते.लटपटणार्‍या त्याला हात धरून मी त्या घरात नेले.त्याला आता त्याचे काय होणार याचा अंदाज आला होता.अरविंदरावांचे व गंगारामचे  काय झाले ते त्याला माहीत होते.त्यांचे तसे कां झाले तेही त्याला माहीत होते.त्याने अंदाज बांधला होता.तो माझ्याबरोबर यायला कसा तयार झाला तेच कळत नव्हते.मी त्याच्याशी गप्पा मारतो,प्रेमाने बोलतो, नोकरी देऊ करतो,   त्यामुळे त्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे मला माहीत नाही असे त्याला वाटले असावे.

मी फवारा मारताच,तो गलितगात्र होताच, मी त्याला धरून या लाकडी घरात आणताच,त्याला मी त्याचे काय करणार आणि कां करणार, हे त्याच्या लक्षात आले होते.त्याचे डोके पूर्णपणे जाग्यावर होते.शरीर गलितगात्र, मात्र डोके पूर्णपणे व्यवस्थित,असे त्या फवारलेल्या औषधाचे वैशिष्ट्य होते.तो गयावया करू लागला होता. तो अडखळत अडखळत मोठ्या कष्टाने थांबत थांबत सांगू लागला,"मी गंगारामच्या नादाला लागलो.तोच मला बदनाम वस्तीमध्ये घेऊन जात असे.तेथेच आम्हाला अरविंदराव भेटले.त्यांनी सर्व योजना आखली.शिळ्या कढीला ऊत आणण्याऐवजी ताजी कढी पिऊ असे ते म्हणाले.त्यांनी मला बाहेर उभा केला होता.कुणी आल्यास मी तुमची वाट पाहत आहे.तुम्हाला फोन केला.तुम्हाला यायला अजून बराच वेळ आहे.माझे काम महत्त्वाचे असल्यामुळे मी येथे तुमची वाट पाहत थांबलो आहे.असे सांगून त्याला वाटेला लावायचे काम माझ्याकडे होते." 

" ते दोघे बाहेर आले आणि मला चल चल म्हणू लागले.कुणी आले तर गोंधळ होईल. आपण सापडू त्या अगोदर पळून जाऊया असे ते म्हणू लागले.मी त्यांच्याबरोबर निघून गेलो.मी कांहीही केले नाही. फक्त बाहेर उभा होतो."एवढे बोलण्यास त्याला दहा पंधरा मिनिटे लागली.तो गयावया करीत होता.तो अर्ध सत्य सांगत होता हे माझ्या लक्षात आले होतेच.मी बसवलेल्या कॅमेर्‍यात तो कालिंदीच्या शरिराशी खेळताना मी पाहिला होता.आपण इनोसंट आहोत,निष्पाप आहोत,असा आव तो आणीत होता.मी त्याला सोडून द्यावे यासाठी त्याचे हे सर्व प्रयत्न चालले होते.

मी कांहीही न बोलता त्याच्या पाठीवरील शर्ट फाडून काढला.त्याच्या पाठीवर मिठाचे पाणी लावले.ते द्रावण मी अगोदरच करून आणले होते.चाबूक, चामड्याचा चाबूक आणलाच होता.कांहीही न बोलता त्याला फटके मारायला सुरुवात केली.तो ओरडू नये. ओरडला तरी आवाज  बाहेर जाऊ नये यासाठी त्याच्या तोंडात बोळा कोंबला होता.प्रत्येक फटक्याबरोबरच त्याचे शरीर वेदनेने पिळवटत होते.फटक्या बरोबर पाठीवरची कातडी सोलली जात होती.फटक्यांमुळे सोलल्या गेलेल्या   कातडीवर रक्ताचे ओघळ वाहत होते.त्यावर मी मधून मधून मिठाचे द्रावण सोडीत होतो.

शेवटी तो बेशुद्ध झाला.कोणतीही दयामाया न दाखवता मी त्याला उचलून तसाच काळ डोहामध्ये फेकून दिला.तो पाण्यात पडताच सर्रदिशी एक सुसर आली आणि त्याला घेऊन पाण्यात खोलवर निघून गेली.

लाकडी घरातील सर्व सामान घेऊन, माझी मोटार घेऊन मी संवाद संकुलात परत आलो.मी तिथे गेलो होतो याचे शक्य तेवढे ठसे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता.हातमोजे तर वापरले होतेच.बुटांचे ठसे उमटू नये म्हणून बुटांवरून जाड मोजे घातले होते.

सुभाषला सुसर खोल पाण्यात घेऊन गेली होती.सुभाषची हाडेही आता सुसरीच्या पोटात जाऊन पचून जाणार होती.त्याचा मागमूसही राहणार नव्हता.

माझ्या फ्लॅटमध्ये मी सोफ्यावर आतापर्यंतच्या झालेल्या मानसिक व शारीरिक श्रमाने, ताणाने, क्लांत होऊन बसलो होतो.माझा जीव की प्राण असलेल्या कालिंदीचा त्यांनी केलेला चोळामोळा माझ्या डोळ्यासमोर येत होता.सूड घेण्याची केलेली प्रतिज्ञा आठवत होती.केवळ मी लावलेल्या सर्व खोल्यांतील कॅमेऱ्यांमुळेच मला ते तिघे बदमाश सापडले होते.  

*माझा सूड पूर्ण  झाला होता.*

***

*उपसंहार* 

आतापर्यंत माझा.मी राहिलो नव्हतो.सूडाने मी धगधगत होतो.सूड पूर्ण झाल्यामुळे आता मी थाऱ्यावर येत होतो.मी केलेली शिक्षा, मी केलेले वर्तन, योग्य आहे का? असा विचार माझ्या मनात सुरू झाला होता.

प्रत्येक व्यक्ती नियतीच्या हातातील बाहुले आहे असे आपण म्हणतो. लहानपणापासून व्यक्तीवर सर्व दिशांनी अनंत संस्कार होत असतात.त्याचा एक समवाई (एकत्रित) परिणाम म्हणून व्यक्तीचे वर्तन होत असते.

मनात अनेक गोष्टी येतात.मनात कोणता विचार यावा यावर आपले नियंत्रण नाही.कृती करताना त्यावर आपले नियंत्रण असते.असे सर्वसाधारणपणे समजले जाते.परंतु हे नियंत्रणही धारणेवर(कंडिशनिंग)अवलंबून असते.धारणा आपल्या हातात नसते.आपले वर्तन हा रिझल्टंट फोर्स असतो.एकत्रित परिणामी शक्तीचा, धारणेचा, तो परिणाम असतो.

असे जर आहे तर या जगात कुणालाच दोष देता येणार नाही.विचार व वर्तन अपरिहार्य आहे.अरविंद, गंगाराम ,सुभाष, यांनी केले तेही अपरिहार्य होते.तो त्यांच्या धारणेचा (कंडिशनिंगचा)(रिझल्टंट फोर्सचा) परिणाम होता.  

हाच आशय ~सर्वजण  नियतीच्या हातातील बाहुली आहेत~ या वाक्याने  दर्शविला जात असावा."परमेश्वर आपल्याला जसे हलवतो  तसे आपण हलतो."याचाही आशय तोच आहे.

तत्त्व एकच सांगण्याच्या पध्दती निरनिराळ्या.      

मी जे कांही केले तेही अपरिहार्य होते.तो माझ्या धारणेचा परिणाम होता.आता माझ्या मनात येत असलेले विचार हाही त्या धारणेचाच परिपाक आहे.अशा प्रकारच्या कांही विचारात मी बुडालो होतो.

शिक्षा देणारा मी कोण?त्यांना नियतीने शिक्षा दिली असती.

ती नियतीच माझ्याकडून ती शिक्षा देत नसेल कशावरून?

असे उलट सुलट विचार माझ्या मनात येत होते.

त्या तिघांना क्रूरपणे मारण्यात मी पाप केले की नाही माहीत नाही.

मला आता कोणताही पाश नव्हता.मला जीवनातच आता अर्थ वाटत नव्हता.

तो स्प्रे माझ्याजवळ होताच.त्याचा जास्त उपयोग,त्याची जास्त फवारणी, फुप्फुसात ते विष जाऊन परिणामी हार्ट अॅटॅक येऊन मृत्यूमध्ये होणार होता.

*मी पुन्हा पुन्हा 

तो स्प्रे माझ्या नाकावर मारीत राहिलो.*

***

*फ्लॅट नंबर ए तीनशे सहामधून घाणेरडा वास येऊ लागला होता.*

*सेक्रेटरीकडे तक्रार करण्यात आली.पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला.आंत गंगाधर मृतावस्थेत सोफ्यावर पडलेला होता.*

*शेजारीच कसली तरी गन पडलेली होती.सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन गंगाधरला भडाग्नी देण्यात आला.*

(समाप्त)

१७/५/२०२२©प्रभाकर  पटवर्धन