०३ नर्मदेचा सूड १-४
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
जवळजवळ दोन शे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.भारतात कमी जास्त प्रमाणात परंतु जवळजवळ सर्वत्र जमीनदारी प्रथा अस्तित्वात होती. जमीनदारीची जी कांही गावे असतील त्याचा जमीनदार अनभिषिक्त राजा असे.जो कुणी सरदार राजा त्याच्या वरती असे त्याची कृपा त्याने राखली. त्याच्या मर्जीप्रमाणे तो आचरण करीत असला की रयतेशी, प्रजेशी, तो कसा वागतो ते कुणीही पहात नसे.प्रजेच्या दु:खांना क्लेशाना कुणीही वाली नसे. जमीनदार म्हणेल ती पूर्व दिशा असे.त्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा तो सर्वस्वी मालक असे.ती जमीन तो कुळामध्ये रयतेमध्ये त्याच्या मर्जीप्रमाणे वाटून देत असे.कुळाने धान्य पिकवावे आणि त्याचा हिस्सा जमीनदार सांगेल त्याप्रमाणे त्याला द्यावा अशी प्रथा होती.जमीनदाराची मर्जी फिरली तर तो जमीन कुणाकडून केव्हांही काढून घेत असे.कुळाला जमीनदार सांगेल तेव्हां वाड्यावर हजर व्हावे लागे.सांगेल ते काम करावे लागे. सांगेल तसे वागावे लागे.
कांही जमीनदार स्वभावाने चांगले असत.ते रयतेला कुळाना चांगली वागणूक देत असत.तर कांही जमीनदार केवळ राक्षस असत.रयतेवर वाट्टेल तो जुलुम ते करीत असत.कुळांना चाबकाने फोडून काढणे,त्यांचे अनन्वित हाल करणे,इथेच त्यांचे जुलूम न थांबता,त्यांची स्त्रियांवर वाईट नजर असे.स्त्रिया व मुली आपल्या सेवेला केव्हांही म्हणू तेव्हां हजर झाल्या पाहिजेत असा त्यांचा कायदा असे.थोडक्यात हम करे सो कायदा अशी त्यांची वर्तणूक असे. एखाद्याचे लग्न झाल्यावर पहिल्या रात्री त्याने त्याची पत्नी वाड्यावर पाठवली पाहिजे असा कांही ठिकाणी दंडक होता.अशा प्रथेवर आलेला एक मराठी सिनेमा *शापित* कदाचित तुम्ही पाहिला असेल.एखाद्याने उलट उत्तर दिलेले त्यांना सहन होत नसे.साधे उत्तरही केव्हां केव्हां त्यांना उलट उत्तर वाटे. आपला अपमान केला असे वाटे.आणि कुळाचे घरदार पेटवून देत असत. त्याला देशोधडीला लावत असत.या जमीनदारांजवळ त्यांच्या हाताखालील गावांच्या संख्येनुसार लहान मोठे सैन्य असे.या त्यांच्या हाताखाली असलेल्या सैन्यदलामार्फत ते आपली मनमानी करीत असत.सैन्य शब्द जरा मोठा झाला.त्यांच्या हाताखाली सशस्त्र गुंडांची टोळी असे,असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
जमीनदारांचे जर स्थूलमानाने दोन प्रकार पाडले.
पहिला प्रकार रयतेला मुलांप्रमाणे वागवणारे, प्रेमळ,प्रजाहितदक्ष,पापभिरू,
सज्जन,आणि
दुसरा प्रकार क्रूर, उलटय़ा काळजाचे, जुलमी,रयतेला आपलीच मालमत्ता समजणारे,कामपिसाट,
तर हरिनारायण जमीनदार हे दुसर्या प्रकारातील होते.त्यांचे नाव हरिनारायण होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ते राक्षस होते. त्यांनी प्रजेवर सर्व प्रकारचे अत्याचार केले होते.त्यांच्या निर्घृण अत्याचाराला रयत कंटाळून गेली होती.एक दिवस एखादा पीडित हरिनारायणाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही असे सर्व जण म्हणत असत.
हरिनारायण जरी रयतेच्या बाबतीत निष्ठूर, क्रूर असला तरी आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत मात्र तो अतिशय मृदू व कनवाळू होता. त्याला मुलगा शंकर व मुलगी दया अशी दोनच मुले होती.मुलगा बळकट पैलवानी शरीराचा, शरीर कमावलेला होता.तो एकटा चारजणांना भारी होता.केवळ पैलवानी डावपेच त्याला येत असत एवढेच नव्हे तर कराटे ज्युदो यामध्येही तो प्रवीण होता.कोणत्याही प्रकारचे शस्त्र चालवण्यात तो निपुण होता.त्याची प्रवृत्ती मात्र वडिलांसारखीच होती.किंबहुना वडिलांच्या पुढे तो एक पाऊल होता असे म्हटले तरी चूक ठरणार नाही.
मुलगी दया बरोबर याच्या विरुध्द हाेती.ती नाजूक व सुंदर होती.तिचा स्वभाव दयाळू व प्रेमळ होता.लक्ष्मीबाई चारचौघींसारख्या होत्या.पतिराजांच्या बऱ्याच गोष्टी त्यांना पसंत नसत.त्या आपल्या मान खाली घालून आपल्या कामात दंग असत.त्यांनी कधी आपल्या पतिराजांना विरोध केला नाही.कधी त्यांना प्रोत्साहनही दिले नाही.आपले काम बरे की आपण बरे असा त्यांचा स्वभाव होता.अर्थात त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी अनेक सेविका होत्या.त्याना स्वत:ला कांही काम करण्याची वेळ सहसा येत नसे.
हरिनारायण आता उताराला लागले होते.तरुण वयात आणि मध्यम वयातही केलेल्या बर्याच रंगढंगांचा परिणाम अपरिहार्यपणे त्यांच्या शरीरावर दिसू लागला होता.त्यांच्या जमीनदारी असलेल्या गावात ते विशेष फिरत नसत.अजुनही त्यांची घोड्यावरील मांड पक्की होती.क्रूरपणात निर्दयीपणा ते अजूनही पूर्वीसारखेच होते.त्यांची कामपिपासू वृत्ती अजुनही गेली नव्हती.त्यांचे तीन वाडे होते.
एका वाड्यात लक्ष्मीबाई राहात असत.या वाडय़ावर हरिनारायण अधूनमधून येऊन जाऊन असत.
दुसर्या वाड्यात हरिनारायण यांचे सर्व रंगढंग चालत असत.त्या वाडय़ाने नर्तकींच्या पायातील पैंजणांचा जसा छमछमाट ऐकला होता त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अत्याचार झाले अशा स्त्रियांच्या अार्त दर्दभरी किंकाळ्याही ऐकल्या होत्या.
तिसरा वाडा त्यांच्या मुलाचा शंकरचा होता.तो व त्याचे मित्र आणि चमचे यांचा दरबार तिथे भरत असे.त्या वाड्यानेही छमछमाट आणि किंकाळ्या ऐकायला सुरुवात केली होती.
प्रत्येक पापी इसमाचा पापाचा घडा केव्हां ना केव्हां भरतोच.आणि त्यावेळी त्याला त्याने निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.हरिनारायण व शंकर यांना त्यांनी केलेल्या अन्यायाची, पापांची, उत्तरे द्यावी लागणार होतीच.अशावेळी ज्याप्रमाणे अन्याय केलेले पापी लोक शिक्षा भोगतात त्याप्रमाणेच त्यांच्या घरातील मंडळीनाही कांही वेळा शिक्षा भोगाव्या लागतात.सुक्याबरोबर ओले जळते ते असे.
हरिनारायण यांचे जमीनदारीचे पन्नास गाव होते.त्यांचे वाडे कृष्णनगर या गावी होते.त्यांच्या हाताखाली शंभर तगडय़ा पैलवानांची फौज होती.त्यांचे तीनही वाडे एकाच परिसरात होते.संपूर्ण परिसराला भक्कम तटबंदी केलेली होती.जमीनदारांना शत्रू असतातच.आणि हरिनारायण व शंकर यासारख्या स्वभावाच्या लोकांना तर खूपच शत्रू असतात.ते केव्हां आणि कसा हल्ला करतील ते सांगता येत नाही.हा एक छोटासा भुईकोट किल्लाच होता.तटबंदी बारा फूट उंच होती.रुंदी दोन फूट होती.तटावर सर्वत्र काचा लावलेल्या होत्या.कोणालाही चढून त्या काचा ओलांडून आत येणे जवळजवळ अशक्यप्राय होते.एकवेळ शिडीच्या सहाय्याने एखादा तटावर येईल.परंतु पलीकडे खाली उतरणे मुश्कील होते.दिवसरात्र सर्वत्र जागता पहारा असे.एखाद्याने तटावरून खाली येण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा शेवट तिथेच झाला असता.
कृष्णनगरजवळ रामनगर नावाचे एक छोटेसे गाव होते.हरी नारायण यांच्या जमीनदारीचे ते गाव होते.त्या गावात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात तीनच माणसे होती.शेतकरी विठू,त्याची पत्नी रखमा आणि मुलगी नर्मदा.विठोबा माळकरी होता.त्याची आषाढी कार्तिकीची वारी चुकत नसे.दोन्ही वेळा जमले नाही तरी निदान एकदा तरी तो पंढरपूरला जाऊन येत असे.
त्याला दोन एकर जमीन हरि नारायण यांनी बहाल केलेली होती.त्यातील पिकांपैकी निम्मे पीक जमीनदारांना द्यावे लागे.निम्मे तो स्वतःसाठी ठेवीत असे.आपले काम बरे की आपण बरे असा त्याचा स्वभाव होता.ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात असा तो स्वभावाने होता.
त्यांची मुलगी नर्मदा वयात आली होती.तिचे वय जेमतेम सोळा होते.ती देखणी आणि उफाड्याची होती.हरीनारायण व त्यांचे चिरंजीव शंकर घोड्यावरून आपल्या छोटय़ाशा राज्यात फिरत असताना ते रामनगर येथे विठोबाच्या घरावरून जात होते.त्याचवेळी नर्मदा पाण्याचे भरलेले हंडे घेवून घरात जात होती.पाणी हिंदकळल्यामुळे ती थोडीबहुत नको तिथे भिजली होती.तिची साडी त्यामुळे तिच्या अंगाला चिकटून बसली होती.तिचे हात डोई वरील दोन हंडे सांभाळण्यात गुंतले होते.त्यामुळे तिचे शरीर सौष्ठव तिची कमनीय आकृती उठून दिसत होती.त्याचवेळी ही पापी जोडगोळी तेथून जात होती.
त्यांची नजर तिच्यावर पडली.त्यांच्याबरोबरच त्यांचे रक्षक होतेच.त्या रक्षकांना शंकरने खुणेने ती मुलगी आज वाडय़ावर घेऊन या म्हणून सांगितले.रात्रीच्या अंधारात विठोबाच्या झोपड्यावर शंकरच्या गुंडांचा हल्ला झाला.नर्मदेला वाड्यावर नेण्यात आले.
विठोबा व त्याची बायको रकमा यांना आपल्या मुलीला कुणी पळविले याची कल्पना आली होती.परंतु त्या बाबतीत ते कांही करू शकत नव्हते.अशा गोष्टी अनेकांच्या बाबतीत झाल्या होत्या.आठ पंधरा दिवसांनी आपली मुलगी चुरगळलेल्या अवस्थेत , मृतप्राय अवस्थेत, झोपडीबाहेर सोडून दिली जाईल याची त्यांना कल्पना होती.
विठोबाच्या आसपासच्या लोकांनी नातेवाईकांनी नर्मदा कुठे गेली म्हणून चौकशी केली.विठोबा आकाशाकडे हात करीत विठ्ठला विठ्ठला एवढेच म्हणत असे.एकेक दिवस लोटत होता नर्मदा अजून परत येत नव्हती.विठोबा व रखमा यांना रात्री झोप येत नव्हती.नर्मदेला कोणकोणत्या भोगांना तोंड द्यावे लागत असेल या कल्पनेनेच दोघेही मृतप्राय झाली होती.
पंधरा दिवसांनी नर्मदा विठोबाच्या झोपडय़ाबाहेर पडलेली सकाळी त्यांना आढळून आली.तिच्या आईवडिलांनी तिला उचलून घरात आणले.तिच्या जखमांवर औषधपाणी सुरू केले.
नर्मदा एक अक्षरही उच्चारत नव्हती.तिची जणू वाचाच बसली होती .
तिचे डोळे लाल दिसत होते.चार दिवसांनी घरात नर्मदा दिसत नव्हती.
दुसऱ्याच दिवशी तिचे प्रेत गावाबाहेरील तलावात तरंगताना दिसले.असेच चार दिवस गेले.
नर्मदेवर ओढविलेल्या प्रसंगामुळे विठोबा व रकमा यांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते.त्यांना जगण्यातच स्वारस्य उरले नव्हते.
जिथे नर्मदेने आपला देहत्याग केला त्याच तलावात दोघांनीही जलसमाधी घेतली. तलावात विठोबा व रकमा यांचीही प्रेते तरंगताना गावाला दिसली.
संपूर्ण गाव मनापासून हळहळला.गावच काय पंचक्रोशीत ही गोष्ट सर्वत्र झाली होती.त्या कुटुंबाबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रेम व आदरभाव होता.सर्व पंचक्रोशी हळहळत होती.
जुलमाची सर्वांना इतकी सवय झाली होती त्यामुळे इतका मुर्दाडपणा आला होता की याचा प्रतिशोध घ्यावा असा विचारही कोणाच्या मनात आला नाही.
*त्यांच्यावर जमीनदारामुळे ओढवलेला प्रसंग आणि त्याची सर्वांच्या आत्महत्येत झालेली परिणिती सर्व गाव पाहत होता आणि हळहळत होता.*
*विठोबा व रकमा पुढील गतीला गेले.परंतु नर्मदा सूडाच्या भावनेने जळत होती.*
*जमीनदाराला व त्याच्या कुटुंबीयांना धडा शिकविल्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नव्हती.*
(क्रमशः)
२८/१/२०२२©प्रभाकर पटवर्धन