Get it on Google Play
Download on the App Store

१२ प्राणदंड २-४

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

पोलिसांनी कालिंदीची फाईल बंद केल्यावर, आपण फाईल उघडायची आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यायची असे मी मनाशी ठरविले होते.

सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले होते.

त्याचा अभ्यास केला होता.

मला गुन्हेगार माहीतही झाले हाेते.

त्यांना पाहिल्यावर माझ्या अंगाची लाहीलाही होत होती.

तिथेच त्यांचा गळा दाबून त्याना ठार मारावे,असे मला वाटत होते.

गुन्हेगारांना मी ओळखले आहे हे मला त्यांना  जाणवू द्यायचे नव्हते.त्यांना पकडून शिक्षा करायची होती.

माझ्यासमोर दोन पर्याय होते.

पहिला त्यांना त्यांच्या अपराधाची जाणीव करून देऊन, त्यांना त्यासाठी पुरेशी शिक्षा करून, नंतर त्यांना ठार मारणे.

दुसरा त्यांना शिक्षा करून जिवंत मरण यातना जन्मभर भोगायला लावून सोडून देणे.

यातील कोणता मार्ग स्वीकारावा त्यावर माझा निश्चय होत नव्हता.

गुन्हेगार बेसावध झाल्यावर,निवांत झाल्यावर,त्यांना पकडून आश्चर्यचकित करायचे आणि शिक्षा करायची अशी माझी योजना होती.

जे कुणी गुन्हेगार असतील त्यामध्ये निदान एकतरी, कालिंदीच्या माहितीचा, ओळखीचा, ज्याला घरात घेतले तरी हरकत नाही असा, मनुष्य असला पाहिजे.त्याशिवाय तिने सुरक्षा दरवाजा उघडला नसता याची मला खात्री होती.ज्याच्यावर तिने विश्वास टाकला त्यानेच तिचा अक्षरश: गळा कापला होता.

आमच्या संवाद संकुलात बी बिल्डिंगमध्ये राहणारे अरविंदराव यांची मी अगोदरच माहिती सांगितली आहे.त्यांच्याशी माझी जॉगिंग ट्रॅकवर ओळख झाल्यापासून ते आमच्या घरी अधूनमधून येत असत.जवळजवळ माझ्याच वयाचे ते होते.कालिंदी   त्यांना काका म्हणून हाक मारीत असे.त्यांची पत्नी सुषमा कालिंदीच्या शाळेत शिक्षिका होती.ती गणिताची शिक्षिका होती.कालिंदी अडलेली गणिते सोडविण्यासाठी तिच्याकडे जात असे.

सुषमा मॅडम गावाला गेलेल्या होत्या.अरविंदराव घरात एकटेच होते.त्यांना मूलबाळ नव्हते. कालिंदीविषयी त्यांच्या मनात तसे कांही येईल याची मला सुतराम कल्पना नव्हती.सीसीटीव्ही पाहताना अरविंदरावाना पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो.दुसऱ्याच क्षणी ते जे कांही करीत होते ते पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.त्यांच्या मुलीसारखी असलेली कालिंदी त्यांच्या तडाख्यात भक्ष म्हणून सापडली होती.कालिंदीने सुरक्षा दरवाजा उघडला याचे कारण स्पष्ट झाले होते.अरविंदकाकाना ती ओळखत होती.ते अनेकदा आमच्याकडे आले होते.माझी व त्यांची जॉगिंग ट्रॅक पासूनची दोस्ती तिला माहीत होती.त्यांची पत्नी सुषमा मॅडम हिच्याकडे कालिंदी गणितातील अडचणी निवारणासाठी अधूनमधून जात असे.

हरामखोर अरविंदने त्यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाचा गैरफायदा घेतला होता.नाजूक फुलासारखी असलेल्या माझ्या कालिंदीला आणखी दोघांना बरोबर घेऊन चुरगाळून टाकले होते.त्याला जेवढी शिक्षा करावी तेवढी थोडीच होती.

दुसरा गुन्हेगार सुरक्षारक्षक गंगाराम होता.संवाद संकुलाचे जे सुरक्षारक्षक होते त्यातील तो एक होता.त्याला राहायला संवाद संकुलामध्येच लहानशी खोली दिली होती.त्याची ड्युटी बऱ्याचदा रात्री असे.अरविंद सुरक्षा रक्षकाबरोबर अशा नीच कृत्यात सामील होईल असे जर कुणी कधी म्हणाला असता तर त्यावर कुणीच विश्वास ठेवला नसता.बऱ्याचवेळा मनुष्याचे बाह्य़ रूप आणि अंतरंग यात जमीन अस्मानाचं अंतर असते.मनुष्याचे मन एखाद्या अंत नसलेल्या डोहाप्रमाणे आहे.त्याच्यात काय काय दडलेले असेल सांगता येत नाही.मनात काय काय येईल त्यावर आपले नियंत्रण नसते.परंतु मनात आलेल्या गोष्टी कार्यवाहीत आणायच्या की नाही यावर आपले नियंत्रण निश्चितच असते असे मी समजतो.नीच अरविंदने त्याच्या मनात दडलेला राक्षस प्रत्यक्षात कार्यवाहीत आणला होता.

गंगाराम अशिक्षित होता.एकटा राहत होता.त्याची पत्नी गावाला राहात होती.त्याच्या मनात काय काय येणे संभवनीय होते.तो या संकुलाचा सुरक्षा रक्षक होता.रक्षकच भक्षक होणे कोणत्याही परिस्थितीत निंदनीय होते.

तिसरा गुन्हेगार दररोज दुधाच्या पिशव्या आणून घरोघर वाटणारा सुभाष होता.तिघेही ओळखीचे होते.सुभाष अठरा वीस वर्षांत जेमतेम असेल.गंगाराम पस्तिशीचा होता.तर अरविंद पंचेचाळिशीचा होता.

भिन्न वयाचे,भिन्न आर्थिक परिस्थितीतले,निरनिराळ्या सामाजिक स्तरातले,शैक्षणिक दृष्ट्या कुठेही कांहीही समानता नसलेले,एका नीच कृत्यात एकत्र आले होते.त्यांची ओळख परस्परांशी कशी झाली हा प्रश्न नव्हता.माझीही त्यांच्याशी ओळख होती.अशा नीच कृत्यात ते एकत्र सामील कसे झाले हा प्रश्न होता.

त्यावर विशेष मला विचार करण्याचे कारण नव्हते.माझ्या मनात प्रश्न आला तो मी मांडला एवढेच.मी त्याना गुन्हा करताना पाहत होतो.कालिंदीचा अक्षरश: चुराडा करताना पाहात होतो.मला पाहावत नव्हते.बघवत नव्हते. सहन होत नव्हते. डोळ्यांतून अश्रुधारा चालल्या होत्या.दातओठ नकळत चावले जात होते. हाताच्या मुठी वळत होत्या.

या तिघांच्या कृत्याचा  त्यांना जाब विचारणे, केवळ जाब विचारणे नव्हे,तर पुरेपूर शिक्षा देणे अत्यावश्यक होते.आणि मी ते करणार होतो.त्यांना शिक्षा कशी करावी याची योजना माझ्या मनात तयार होत होती.सर्व बारकाव्यांसहित कुठेही फट न राहता शिक्षेची अंमलबजावणी मला करायची होती. 

मी प्रथम एक गनसारखी दिसणारी पिचकारी मिळविली.त्यामध्ये मनुष्य अर्धवट बेशुध्द होईल असे औषध भरले.ती पिचकारी नाकावर मारताच त्याच्या वासाने मनुष्य अर्धवट बेशुध्द होत असे.त्याच्या हातापायावरील नियंत्रण जात असे.मेंदू मात्र शुद्धीवर राहात असे.अरविंद, गंगाराम व सुभाष तिघेही माझ्याशी तुलना करता धष्टपुष्ट ताकदवान होते.त्यांना मला विशेष त्रास न होता, मला कष्ट न पडता, माझी ऊर्जा खर्च न होता,काबूत आणणे गरजेचे होते. 

एक दिवस मी गप्पा मारण्यासाठी अरविंदरावाना माझ्या घरी बोलावले.मला त्यांच्याबद्दल कांहीही संशय आलेला नाही हे पाहून त्यांना परम समाधान वाटत होते.ते माझे अपराधी होते.जगातील कोणतीही कठोर शिक्षा अपुरी पडेल असा गुन्हा त्यांनी केला होता.तरीही ते गिल्टी कॉन्शिअस(दोष जाणीव युक्त) होते.मला भेटले की त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यात ते दिसत असे.

त्यांना चहाला बोलावले यावरून मला कांहीही संशय आलेला नाही याची त्यांना बालंबाल खात्री पटली होती.त्यांनी लगेच यायचे कबूल केले.सुटीचा रविवारचा दिवस मी निवडला होता.मी सूड घेत असताना मध्येच कुणी टपकू नये याची काळजी घेणे आवश्यक होते.दुपारी चारची वेळ मी निवडली होती.ते आल्यावर थोडा वेळ त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.बाहेरचे दोन्ही दरवाजे नेहमीप्रमाणे लावून घेतले होते.दरवाजे नेहमीच मी लावत असल्यामुळे दरवाजे बंद केले म्हणून त्यांना काही संशय येणे शक्य नव्हते.

बोलता बोलता त्यांच्या नाकावर फवारा मारला. पिस्तूलसारखी दिसणारी गन त्यांच्यावर रोखताच अहो हे काय करता?अहो हे काय करता?म्हणून ते ओरडले.तोपर्यंत फवारा सुटला होता.त्यांच्या हातापायातील ताकद नष्ट झाली होती.एखाद्या पोत्यासारखे ते सोफ्यावर पसरले होते.

दरवाजा बंद होता. बेल बंद होती.कुणी आला तर मी घरात   नाही असे समजून तो निघून गेला असता.फोन स्विच ऑफ ठेवला होता.सीसीटीव्ही बंद केले होते.नाहीतर मी काय करीत होतो तेच त्यात मुद्रित झाले असते.

त्यांच्या पापाचा पाढा त्यांच्यासमोर मी वाचला.त्यांचा गुन्हा सर्वात मोठा आहे हेही त्यांच्या लक्षात आणून दिले.सुभाष पोरगा आहे.गंगाराम अशिक्षित आहे. असंस्कृत आहे. त्याची पत्नी दूर गावाला आहे.तुमचे काय?तुम्ही  माझ्या घरात येऊन माझ्या मुलीचा विश्वास संपादन केला.माझा विश्वास संपादन केला.कालिंदी तुम्हाला काका म्हणत होती.ती तुम्हाला मुलीसारखी होती.तरीही पापकृत्य करण्याला तुम्ही धजला.उमलती कळी तुम्ही कुस्करून टाकली.तिचा गळा चिरून टाकला.या तुमच्या गुन्ह्याला कोणती शिक्षा द्यावी अशा विचारात मी आहे.

मला कांहीच माहिती नाही अशा भ्रमात ते होते.मला सर्वकांही माहित आहे हे पाहून ते थंडगार पडले होते.त्यांचे पाय धरून मी त्यांना फराफरा ओढत बाथरूममध्ये नेले.त्यांना हालचाल करता येत नव्हती.मी मारलेल्या फवाऱ्याने काम केले होते.त्यांचे हातपाय पॅरेलिसिसचा अटॅक यावा तसे निर्जीव झाले होते.त्यांचे डोके पाण्यात बुडवले.घुसमटून ते हातपाय झाडू लागले.त्यांचे डोके पाण्याबाहेर काढले.पाच दहा वेळा असे केले.आधीच अर्धमेले झालेले ते हातपाय पसरून बाथरूममध्ये पसरले.

त्यांना बोलता येत नव्हते.त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे दोन हात जोडून नमस्कार केला.मला वाचवा. मला मारू नका. मला शिक्षा करू नका.असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

तुमच्या गुन्ह्याला क्षमा नाही. मी त्यांना सांगितले.रात्र होण्याची वाट पाहत होतो.त्यांचे मला जे कांही करायचे होते त्यासाठी गावाबाहेर जाणे जरुरीचे होते.रात्री अकरा वाजता त्यांना मी धरून धरून लिफ्टपर्यंत नेले.मोटारीत बसून गावाबाहेर टेकडीजवळ गेलो.बरोबर कात्री सुरा नेला होताच. 

* टेकडीजवळ कांही बाके कॉर्पोरेशनने टाकली होती. त्यातील एका बाकावर त्यांना बसविले.*

*मी आता त्यांचे काय करणार म्हणून भीतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.*

*त्यांना कांहीही हालचाल करता येत नव्हती.मी मारलेल्या फवाऱ्याने बेमालूम काम केले होते.*

*मी त्यांना म्हणालो.मी तुमचे जे कांही करणार आहे ते आता तुम्हाला कळेलच.*

*जर तुम्ही माझे नाव कुणालाही सांगाल तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही.*

*मी त्यांचे कान,नाक, जीभ व  प्रायव्हेट पार्ट कापून टाकला!!*

(क्रमशः)

१५/५/२०२२©प्रभाकर  पटवर्धन