Get it on Google Play
Download on the App Store

विध्वंसाची पार्श्वभूमी

औरंगजेबाने केलेल्या विध्वंसामागे धार्मिक आवेशापेक्षा राजकीय कारणे ही मुख्य प्रेरणा असल्याचे विद्वान मानतात. ‘द ऑक्सफर्ड वर्ल्ड हिस्ट्री ऑफ एम्पायर’ असे नोंदवते की विध्वंस हा औरंगजेबाच्या "कट्टर सनातनी इस्लामिक प्रवृत्तीचे लक्षण" म्हणून अर्थ लावला जात असला तरी, स्थानिक राजकारणाने या विध्वंसक कृतीमागे प्रभावशाली भूमिका बजावली होती. हिंदू आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांबद्दलची त्यांची धोरणे "भिन्न ,विरोधाभासी आणि अनास्थावादी होती."

माधुरी देसाई बनारसवरील त्यांच्या रचनांमध्ये असे मत मांडतात की औरंगजेबाच्या गुंतागुंतीच्या आणि अनेकदा विरोधाभासी धोरणांचे "धार्मिक कट्टरतेच्या अभिव्यक्तीऐवजी त्याच्या वैयक्तिक जुलमी आणि राजकीय अजेंडाच्या प्रकाशात अधिक अचूकपणे विश्लेषण केले जाऊ शकते."

आशेरने नमूद केले आहे की महाराजा मानसिंगचा पणतू जयसिंग पहिला याने औरंगजेबाच्या कैदेतून निसटून जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता.

तसेच, बनारसच्या अनेक जमिनदारांनी औरंगजेबाविरुद्ध वारंवार बंड केले तर स्थानिक ब्राह्मणांनी देखील इस्लामिक शिकवणीत हस्तक्षेप केला. परिणामी, कॅथरीन आशेर तसेच सिंथिया टॅलबोट आणि ऑड्रे ट्रुशके यांना विध्वंस हा एक राजकीय संदेश आहे असे वाटते. कारण तो विध्वंस जमीनदार आणि हिंदू धार्मिक नेत्यांसाठी इशारा ठरावा असे औरंग्याला वाटत होते. रिचर्ड एम. ईटन आणि सतीश चंद्र यांनी देखील या विषयी समान मत मांडले.

याउलट, जदुनाथ सरकार यांनी औरंग्याच्या विध्वंसक, शक्तीचा दुरूपयोग करण्याची वृत्ती, त्यांच्या जन्मजात रक्तात असलेल्या धार्मिक कट्टरतेला कारणीभूत ठरविले आहे.

ऐकीव गोष्टीनुसार असे सूचित होते की ब्राह्मण पुरोहितांना आवारात राहण्याची आणि तीर्थयात्रा इत्यादी विषयांवर त्यांचे विशेषाधिकार वापरण्याची परवानगी होती. अपवित्र केलेली जागा विशेषत: सभामंडप देशभरातील हिंदू यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले होते.