८ ती कोण होती २-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
एसटी सडय़ावर( घाटमाथ्यावरील सपाटी )आली आणि मध्येच कुठेतरी पंक्चर झाली .दाट काळोख सर्वत्र पसरलेला होता .डोळ्यात बोट घातले तरी शेजारचे माणूस दिसत नव्हते .विजा चमकत तेव्हाच एसटी व बाजूची माणसे दिसत असत .
पावसात टायर बदलणे कठीण होते .एसटीमध्ये स्टेपनी होती . पाऊस कमी होईल आणि बॅटरीच्या प्रकाशात टायर बदलता येईल म्हणून सगळेजण वाट पहात होते.पावसाचा धिंगाणा चालूच होता .विजा चमकत होत्या .विजांचा कडकडाट छातीत धडकी भरवत होता .
गाडीतील दोन तीन जणांजवळ बॅटर्या होत्या . पाऊस थांबण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते .उलट त्याची गती वाढली होती .पावसाच्या अखेरचे दिवस होते .परतीचा पाऊस असावा .विजा चमकत होत्या.विजा कुठेतरी जवळच पडत असाव्यात. आकाशातून विद्युत लहर प्रकाशमान होत समुद्रात जाऊन पडत होती .जवळ जवळ लगेच ,पोटात धडकी भरवणारा गडगडाट होत होता .पावसामुळे अगोदरच काळोख झाला होता .आता संध्याकाळचा काळोख गडद होत होता .थोड्याच वेळात रात्र झाली असती .
एसटी पंक्चर झाल्याबरोबर काही जण सरळ चालत सुटले होते .टायर बदलण्याला निदान अर्धा तास तरी लागेल त्यापेक्षा चालत गेलेले बरे असा त्यांचा विचार असावा .कोकणातील त्या काळातील कोणत्याही माणसाला कमी जास्त चालण्याचे अप्रूप वाटत नव्हते. पावसाचे रौद्र स्वरूप बघून हळूहळू एकेक जण काढता पाय घेत होता .गोळप गाव एक किलोमीटरवर होते.पावस अडीच किलोमीटरवर होते .टायर बदलून एसटी तेथे पोचेपर्यंत ही मंडळी अगोदरच घरी पोचली असती . एका पाठीमागून एक विजा चमकत होत्या .पोटातील पोकळीतून सरकन काहीतरी जात आहे असे वाटणारा भीतीप्रद चमचमाट व गडगडाट चालू होता.
आता पाच सहा पॅसेंजर फक्त शिल्लक राहिले होते.बाकी सर्व केव्हाच निघून गेले होते .मी व आणखी एक बाई आणि तीन चार पुरुष एवढेच शिल्लक होतो.चला चालत जाउया असे म्हणून सर्वजण निघाले.ड्रायव्हर कंडक्टरच्या सोबत एकटे राहणे मला प्रशस्त वाटत नव्हते .मी घरी वेळेवर पोचले नाही तर अण्णा व आई काळजीत पडणारे होते .मी घडाळ्यात पाहिले .सात वाजले होते . एव्हाना मी घरी पोचणे अपेक्षित होते.माझ्या वाटेकडे अण्णा डोळे लावून बसलेले असणार .थोड्याच वेळात अण्णांची उलघाल सुरू होईल.आई उंबरठ्यावर माप उपडे ठेवील.(असे केल्याने येणारा मनुष्य लवकर येतो अशी समजूत आहे )असे सर्व चित्र मला दिसत होते.
मी क्षणार्धात निर्णय घेतला . जे तीन चार पॅसेंजर चालत निघाले होते त्यांच्याबरोबर मीही निघाले.माझ्याबरोबर आणखी एक बाई होत्या.वाटेत चालता चालता कोण कुठे जाणार आहे अशी विचारणा केली.सर्वजण "पावस"ला जाणार होते .मलाच एकटीला पुढे जायचे होते .या अश्या पावसात एकटीने जायचे आणि वाहणारी नदीही काळोखात ओलांडायची याची मला भीती वाटू लागली.भीती वाटो किंवा आणखी काही होवो आल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय गत्यंतर नव्हते .मी मुकाटयाने चालत होते .रेनकोट घातलेला असल्यामुळे माझे सोन्याचे मंगळसूत्र बांगड्या गळ्यातील चेन कुणाला दिसणार नाही असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला .या अंधारात कुठे काही दिसत नव्हते तो भाग वेगळा .काळोखात डोळ्यात बोट घातले तरीही काहीही दिसत नव्हते .
चालता चालता पहिला ओढा (नदी) आला.नदीतून मोटार जावी म्हणून उंच फरशी बांधलेली होती. त्यावरून जाताना मांडीपर्यंत पाणी आले होते .म्हणजे फरशीच्या बाहेर निदान छातीपर्यंत पाणी असणार .पाण्याला ओढ विलक्षण होती .एकमेकांचे हात धरून आम्ही हळूहळू ओढा ओलांडला . पावसला (गावाचे नाव)सर्वजण आपापल्या घरी गेले .जीव मुठीत धरून काळोखातून, वेड्या सारख्या पडणाऱ्या पावसातून,मी एकटीच पुढे निघाले .अजून मला तीन किलोमीटर जायचे होते. "पावस"च्या ओळखीच्या एखाद्या कुटुंबाकडे जावे असा विचार मनात आला.परंतु मी ही अशी भिजलेली त्यांच्याकडे राहाणे योग्य वाटत नव्हते .त्याहूनही जास्त अण्णा आणि आई घरी काळजी करीत असतील याचाच मी जास्त विचार करीत होते .मी आणखी कांही काळ घरी पोचले नसते तर अण्णा मला पाहण्यासाठी निघाले असते. काहीही करून भरभर चालून परंतु घरी पोचायचेच असा माझा निश्चय होता.
शुक्रवारचा उपास, पोटात कोकलणारे कावळे, सर्व काही मी विसरून गेले होते. एवढ्यात पुन्हा जोरात वीज चमकली .त्या विजेच्या प्रकाशात मला पुढे एक थोराड मध्यमवयीन खेडूत बाई चालताना दिसली.मला थोडा धीर आला .मी काही अगदी एकटीच नाही कुणीतरी सोबतीला आहे असा तो विश्वास होता .माझ्या पावलांचा आवाज आल्यावर तिने मागे वळून पाहिले.आम्ही एकमेकांबरोबर चालू लागलो .पुढे लागणारा ओढा ओलांडून तिला आमच्या गावाच्या पुढच्या गावाला जायचे होते.ती बाजाराला आली होती .तिला काही कारणाने उशीर झाला होता .पाऊस आता थांबेल आता थांबेल असे करीत ती काही काळ थांबली होती .शेवटी घरी जाण्यासाठी ती निघाली होती.
मला चांगली सोबत मिळाली होती .ओढ्याला भरपूर पाणी होते .ती बाई म्हणाली तुम्ही घाबरू नका .हा रस्ता ही फरशी माझ्या पाया खालची आहे .तुम्ही माझा हात घट्ट पकडा.एकीला दोघी असल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावर जास्त पकड येते.पाण्याच्या जोरदार प्रवाहात हळूहळू सरकत पुढे जाता येते.एकमेकांच्या आधाराने काळोखात हळूहळू आम्ही ओढा ओलांडला. रस्त्याने जाताना ती बोलत होती.काळोखातून जाताना मला तिचा मोठा आधार वाटत होता .काही घाबरू नका मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत व्यवस्थित सोडते असे ती म्हणाली.तिचा सहवास,तिचे बोलणे, तिचा आधार ,मोठा आश्वासक वाटत होता .थोड्याच वेळात आमच्या घराचा रस्ता आला .
*पाणंदीच्या टोकाला आमचे घर होते.*
*घरात कंदिलांचा मिणमिणता प्रकाश दिसत होता .*
*त्या कंदिलाच्या प्रकाशात दरवाज्याजवळ आई व अण्णा उभे होते .*
* सुखरूपपणे ओढा ओलांडण्यासाठी मदत करणाऱ्या,घरापर्यंत सोबत करणाऱ्या,देवीसारख्या भेटलेल्या, त्या बाईंचा निरोप घेऊन आभार मानून मी आपल्या घराकडे चालू लागले .*
*मी चार पावले चालल्यावर मागे वळून पाहिले .अंधारात त्या बाई अदृश्य झाल्या होत्या .*
*नवरात्रीचे दिवस होते .माझा कडकडीत शुक्रवार होता .मी मनोमन अंबाबाईला हात जोडले*
(समाप्त)
३०/९/२०१९©प्रभाकर पटवर्धन