Get it on Google Play
Download on the App Store

३ निर्दोष २-२

१/२/२०१८

आज मी एका मुलाचा बाप झालो.माझ्या आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाही. नातू झाल्यामुळे ते आनंदात आहेत .

सातव्या महिन्यात मूल झाल्यामुळे काळजी घेतली पाहिजे असे आई म्हणत होती.

डॉक्टरानी काहीही काळजीचे कारण नाही असे सांगितले आहे .डॉक्टर आपल्यापासून काही लपवीत तर नाही ना असा संशय येतो .

१०/५/२०१८

गेले कित्येक महिने सारंगी तिला मला काहीतरी सांगायचे आहे असे सारखे म्हणत होती.विचारल्यावर पुढे ढकलत होती.आता नको पुन्हा केव्हातरी सांगेन असे ती म्हणायची .त्यामुळे माझी उत्सुकता आणखी वाढत होती .शेवटी तिने ते रहस्य सांगितले.मुला मुलींची ट्रीप गेली होती तेव्हा तिच्यावर अत्याचार झाला होता .तिने अत्याचार करणाऱ्याचे नाव सांगितले नाही .त्यातून तिला दिवस गेले होते .डॉक्टरांनी गर्भपाताला मनाई केली होती .त्यात सारंगीच्या जिवाला धोका आहे असे त्यांना वाटत होते.

त्यामुळेच तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाची घाई केली होती .तिला लग्नापूर्वी ही सर्व हकिगत मला सांगायची होती.मला अंधारात ठेवून लग्न करणे तिला पसंत नव्हते .परंतु तिच्या वडिलांनी तू असे केलेस तर मी जीभ हासडून प्राण देईन असे सांगितले होते .कुणीही मुलगा अशा परिस्थितीत तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही.तू लग्नाशिवाय तशीच राहिलीस तर आपली सर्वत्र बदनामी होईल.तुला सुखात राहायचे असेल तर लग्नानंतरही ही गोष्ट तू केव्हाही सारंग जवळच काय परंतु कुणाजवळही बोलू नकोस असा सल्ला त्यांनी तिला दिला होता.अगोदर शक्य झाले नाही तरीही लग्नानंतर तिला ती गोष्ट मला सांगायची होती.आम्ही दोघे एक होण्याच्या अगोदर ते मला सांगणे आवश्यक आहे असे तिला वाटत होते.असे केले नाही तर माझा अपमान केल्यासारखे होईल असे तिला वाटत होते .तिची मला अंधारात ठेवण्याची इच्छा नव्हती . परंतु तिची दरवेळी जीभ रेटत नव्हती.तिला त्यामुळे एक प्रकारची अपराधी भावना वाटत होती.

ही गोष्ट तिला सारखी खात होती . ती मला फसवीत आहे असे तिला सारखे वाटत होते.त्यामुळे ती कशातही आनंद घेऊ शकत नव्हती .आनंदात असतांना एकदम तिचा मूड जात असे. 

एवढे बोलून पुढे ती म्हणाली आता तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा .तुम्हाला मला सोडून द्यायचे असेल तर  त्याला माझी हरकत नाही.मी माहेरी निघून जाते .तुम्ही घटस्फोटाचे पेपर्स पाठवा.मी त्याच्यावर लगेच सही करीन. मला पोटगी सुद्धा नको.यापुढे तिला काहीच बोलता येईना. ती हमसून हमसून रडू लागली .

मी तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिला आश्वासित केले .जे तुझ्या मनाविरुद्ध झाले, जे तुझ्यावर लादले गेले, त्याला तू कशी काय जबाबदार असणार?तू मनात अपराधी भावना ठेवू नकोस .तू माझीच आहेस .हे मूल जेवढे तुझे आहे तेवढेच माझेही आहे.तिची द्विधा मनस्थिती पूर्णपणे माझ्या लक्षात येत होती .तरीही  कुठेतरी तिने ते मला अगोदर सांगायला  पाहिजे होते असे वाटत होते.

२०/६/२०१८

त्या दिवसापासून, मला सर्व काही सांगितल्यापासून,ती खरे म्हणजे जास्त मोकळी व्हायला हवी होती .तिच्या मनावर सतत असलेले दडपण आता दूर झाले होते .परंतु झाले ते उलटेच झाले होते .ती जास्तच नकारात्मक होत होती .तिचा मानसिक तोल जास्त जास्त ढळत होता.  तिचा एकच सूर होता .तिला जगण्यात अर्थ वाटत नाही.तिला कितीही समजून सांगितले तरी तिचे एकच पालूपद मी तुम्हाला फसविले. मी तुम्हाला फसविले.ती एक प्रकारच्या डिप्रेशनमधून जात होती .मी एका मनोविकारतज्ज्ञाकडे तिला घेऊन जाणार होतो.परंतु तेवढ्यात ती महाबळेश्वरला जाऊया असे म्हणाली .

मला वाटले की आता सर्व काही विसरून ती पुन्हा नव्याने सुरुवात करू इच्छित आहे .अशा वेळी डॉक्टर मनोविकारतज्ञ  वगैरे विषय काढणे योग्य होणार नाही .

पुढील पाने कोरी होती .घाटगेला डायरी वाचता वाचता किती वेळ गेला ते कळलेच नाही.

तरीही त्याला नक्की उलगडा होईना .सारंगी आत्महत्या करीत होती आणि तिला वाचविताना दोघेही कड्यावरून खाली पडले की कंटाळून वैतागून रागामुळे त्या रागाच्या क्षणी सागरने  तिला ढकलले आणि तिने सागरचा हात तेवढ्यात घट्ट पकडल्यामुळे तोही  कड्याखाली गेला .

सागर निर्दोष आहे की नाही त्याचा उलगडा होत नव्हता .शेवटच्या क्षणी नक्की काय घडले ते कळत नव्हते .एकूण डायरीतील लिखाणाचा सूर व ओघ पाहता सागर एक उदार व समंजस मनुष्य होता .सारंगी व तिचा मुलगा यांना त्याने मनापासून संपूर्णपणे स्वीकारले होते. 

तथाकथित आत्महत्येनंतर लोक त्याला उगीच दोष देत होते .उगीच त्याच्यावर टीका करीत होते.उगीचच त्याला निर्दयी म्हणत होते.असे असले तरी ते लोकांना पटवून कसे देणार .डायरी संपूर्ण प्रसिद्ध केकली तरच कदाचित लोकांना पटणार होते .तरीही काही जणांनी संशय प्रगट केला असताच.  सागरच्या परवानगीशिवाय तसे करणे योग्य ठरले नसते.सागर परवानगी कशी देणार ? 

घाटगे विचार करीत बसले होते.सागर निर्दयी नाही. त्याने मुलाला वार्‍यावर सोडून आत्महत्या केली नाही.झाला तो अपघात होता .त्याने दोघांचाही मनापासून स्वीकार केला होता.

एवढी डायरी वाचली तरी सागर पूर्णपणे निर्दोष कसा हे त्याच्या लक्षात येईना .अापण एकवेळ तसे मानले तरी लोकांना ते कसे काय पटेल हे त्यांच्या लक्षात येईना.समाज त्याला संपूर्णपणे निरपराधी कसा काय मानील ते लक्षात येईना .

सागरच्या वरिष्ठांनी ती डायरी त्या दिवशी आपल्या घरी नेली.सागर रात्री त्यांच्या स्वप्नात आला .तुम्ही ती डायरी उघडून बसा हातात पेन घ्या तुमचे पेन आपोआप चालेल.पेन काय लिहील ते नंतर वाचा .ते मी तुमच्यात शिरून लिहिलेले असेल.

भारल्यासारखे घाटगेचे वरिष्ठ झोपेतून उठून डायरी व पेन घेऊन बसले .त्यांची पत्नी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहात होती.झोपेतच त्यांनी लिहायला सुरुवात केली.त्यांची पत्नी त्यांच्या मागे उभी राहून ते काय लिहितात ते पाहत होती.पूर्ण मजकूर लिहून झाल्यावर ते खडबडून जागे झाले .जणूकाही त्यांच्या अंगात कुणीतरी शिरले होते .त्यांचा कुणीतरी ताबा घेतला होता.तो ताबा आता त्या कुणीतरी सोडला होता.

सागरने लिहिलेला मजकूर पुढील प्रमाणे होता .

२८/६/२०१८

काही दिवसांपूर्वी एकाएकी सारंगीने महाबळेश्वरला फिरायला जाऊया म्हणून सांगतले.ती बहुधा सर्व विसरली म्हणून मला आनंद झाला.आम्ही महाबळेश्वरला अालो.त्या दिवशी एलिफंटा हेड पॉइंटला फिरायला गेलो असताना एकाएकी तिने मुलाला खाली ठेवले व ती कड्याच्या दिशेने धावली.तिचा इरादा माझ्या लक्षात आला .ती महाबळेश्वरला जाऊं असे का म्हणाली होती तेही लक्षात आले.तिला रोखण्यासाठी धरण्यासाठी मीही तिच्या मागोमाग धावलो .मी तिचा हात पकडला .एवढ्यात तिने जोरात उडी मारली .त्याबरोबर माझाही तोल गेला .आणि आम्ही दोघेही कड्याखाली गेलो .

मला तिला माझ्यासाठी व बाळासाठी वाचवावयाचे होते .परंतु दुर्दैवाने आम्ही कड्याखाली गेलो. आमचा बाळ मात्र वरती तसाच राहिला.आता परमेश्वरच त्याचा आधार .हे आणि हेच सत्य आहे .हे हस्ताक्षर या डायरीतील अगोदरच्या हस्ताक्षराशी ताडून पाहा .तुम्हाला वाटले तर एखाद्या हस्ताक्षरतज्ञाला दाखवा.हे मीच लिहले आहे हे तो छातीठोकपणे सांगेल .

मी निर्दोष आहे. मी निर्दयी नाही. मी सारंगीला ढकलून दिले नाही.मी तिला वाचवीत होतो.लग्नापूर्वी सत्य परिस्थिती ती मला सांगू न शकल्यामुळे ती स्वतःला अपराधी समजत होती .बाळासाठी माझ्यासाठी ती आम्हाला हवी होती .तुम्ही,तुम्ही व घाटगे दोघेही ,तुम्हाला आलेला अनुभव प्रसिद्ध करा.वाटल्यास डायरीही प्रसिद्ध करा .लोकांना खरे काय ते कळू द्या .माझी किंवा माझ्या पत्नीची बदनामी होणार नाही. माझी पत्नी कलंकित नव्हती.मी तिला कधीही कलंकित समजलो नाही.  व आताही समजत नाही. 

       सारंग  

इथे डायरी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती .

(पोलिसांनी डायरी प्रसिद्ध केली .ती सर्वच हकीगत वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून, प्रसिद्ध झाली. सागरला निर्दयी म्हणणारे त्याचे आता कौतुक करू लागले.सारंगीबद्दल सर्वच थरातून परंतु विशेषत: स्त्री वर्गातून हळहळ व्यक्त केली गेली.  त्यावरती सिनेमा निघणार आहे. कुणीतरी नाटक लिहिले आहे. असे ऐकतो.)

(समाप्त )

१२/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन