१ लग्नाचा वाढदिवस
हा समुद्र किनारा फार प्रसिद्ध होता .महाराष्ट्राच्या नामांकित पर्यटन स्थळांपैकी हा एक होता .या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांढरी शुभ्र वाळू ,तसेच लांबी आणि रुंदी.सुटीचे दिवस होते.समुद्र किनारा माणसांनी फुलला होता .संध्याकाळची वेळ होती .सूर्य अजून कासराभर वर होता . पश्चिमेला आकाश लालभडक झाले होते. आकाश जवळजवळ निरभ्र होते .काही तुरळक ढग इकडे तिकडे दिसत होते.सूर्याच्या किरणांनी त्यांचे रंग बदलत होते .एवढ्यात आकाशात इंद्रधनुष्य प्रगट झाले . ज्यांच्या ते लक्षात आले ते दुसऱ्यांना दाखवित होते. लहान मुले वाळूत खेळत होती.तरुण जोडपी कांही इकडे तिकडे फिरत होती तर कांही वाळूत गप्पा मारत बसली होती.काही मुले, तरुण व तरुणी समुद्रात डुंबत होती.
समुद्रात असंख्य होड्या इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या.काही बोटी मच्छीमारीच्या होत्या,तर काही पर्यटकांच्या होत्या. इथे बोट क्लब होता.पावसाळा वगळता बोटींगची व्यवस्था होती. मोटरबोट भाड्याने मिळत असे .अनेक पर्यटक समुद्रात फेरफटका मारून येत असत .दोन्ही बाजूला डोंगर समुद्रात खोलवर घुसलेले असल्यामुळे समुद्र एखाद्या तळ्यासारखा शांत होता. हे एक उत्तम बंदर होते .हे सर्व दृश्य पाहताना एखादा समाधीमग्न झाला असता .
ती दोघे शेजारी शेजारी बसून मधून मधून डोळे बारीक करून हे सर्व दृश्य पहात होती.हे सर्व दृश्य त्यांना काही नवीन नव्हते .आज अनेक दशके ती ते पाहात होती . आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता .साठ वर्षांपूर्वी त्यांनी हातात हात घेतला तेव्हापासून त्यांची हातात हात घालून वाटचाल सुरू होती .दोघेही आता या गावातील रहिवासी होती .दोघानी या समुद्रकिनाऱ्याची व या समुद्रकिनाऱ्याने या दोघांची अनेक रूपे आतापर्यंत पाहिली होती .
त्याचे वय आता नव्वद वर्षे होते. तर तिचे शहाऐशी वर्षे होते.ती दोघे इतकी एकरूप झाली होती की कुणाच्या मनात आता काय विचार येत असेल ते न बोलता त्यांना अनेक वेळा कळत असे.तिने त्याच्याकडे हळूच पाहिले व त्याचा हात आपल्या हातात घेतला .तो म्हणाला तुला आपली पहिली भेट आठवत आहे ना?त्यावर किंचित लाजून तिने आपली मान होकारार्थी हलविली.त्या दोघांना त्यांची पहिली भेट आठवत होती
ती या गावची रहिवासी होती तर तो त्या गावात नोकरीसाठी आला होता.त्याला समुद्रकिनाऱ्याचे विलक्षण आकर्षण होते .कारखाना सुटल्यावर तो नेहमी येथे येऊन बसत असे .त्यावेळी तो एकटाच होता .समुद्रावर एक तरुण मुलगी बहुधा तिच्या लहान बहिणीबरोबर आली होती.दोघी पकडापकडीचा खेळ खेळत होत्या.तिच्याकडे तो टक लावून पहात होता. ती त्याला आवडली होती .ही कोण बरे असेल? हिच्याशी ओळख होईल का? असे विचार त्याच्या मनात येत होते.
वाळूत एक लहान खड्डा होता .कदाचित एखाद्या मुलाने तो खणला असावा.कदाचित एखाद्या खेकड्याने तो खणला असावा.खेळताना तिला तो दिसला नाही .तिचा पाय त्यामध्ये मुरगळला .ती वाळूत जवळजवळ कोसळली .डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी टॅक्सी स्टँड किंवा रिक्षा स्टॅन्डपर्यंत चालत जाणे तिला अशक्य होते .
तो चटकन पुढे झाला .त्याने तिला मदत करू का? म्हणून विचारले.तिने अस्पष्ट होकारार्थी मान हलवली.त्याने तिला उचलून आपल्या मोटारीपर्यंत नेले.ती नको नको म्हणत असताना, मी रिक्षाने जाईन, असे म्हणत असताना त्याने तिला आपल्या मोटारीत बसविले .तिला घेऊन तो एका डॉक्टरकडे गेला .डॉक्टरने फोटो वगैरे काढल्यावर हेअर क्रॅक आहे म्हणून सांगितले . क्रेप बँडेज बांधण्यासाठी दिले. औषधे दिली. शक्यतो पायावर जोर देऊ नका म्हणून सांगितले.तिचे आई वडील काही कामानिमित्त परगावी गेले होते . या दोघी बहिणीच घरी होत्या .डॉक्टरांचे पैसे त्यानेच दिले.त्या दोघींना घरी सोडण्यासाठी तो गेला होता .आठ दिवस तिला संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली होती.
दोन दिवसांनी तिचे आई वडील आले .त्या निमित्ताने त्याचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले .आई वडिलांनी त्याला जावई म्हणून पसंत केले. त्या दोघांनी परस्परांना पसंत केले .पुढे त्यांचा विवाह झाला .
त्याने तिचा हात किंचित दाबला .दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीच्या व पुढे झालेल्या विवाहाच्या आठवणी येत होत्या.
विवाहानंतर दोघेही इथे अनेकदा येऊन बसत असत .
विवाहानंतर त्याची भरभराट होत गेली .कारखान्यात त्याला वरच्या पोस्ट मिळत गेल्या .निवृत्त होताना तो जनरल मॅनेजर होता .त्याची पत्नी सोन्याची पावले घेऊन त्याच्या घरात आली असे तो म्हणत असे .
तो बाप होणार असल्याचे तिने त्याच्या कानात इथेच समुद्रावर सांगितले होते.
त्याच्या प्रत्येक बढतीची बातमी त्याने तिला इथेच समुद्रकिनाऱ्यावर सांगितली होती.
त्याच्या बढतीचे श्रेय तो तिला देत होता. तर ती ते श्रेय त्याच्या कर्तृत्वाला देत होती .
मुले लहान असताना प्रथम मुलांना व नंतर नातवंडांना घेऊन ती दोघे येथे अनेकदा आली होती .
वयोमानानुसार त्यांचे आई वडील मृत्यू पावले. प्रत्येक वेळी दोघेही येथे समुद्र किनाऱ्यावर येवून बसली होती.दोघेही हातात हात गुंफत असत .प्रत्येकाच्या मनातील भावना दुसऱ्याला सहज कळत असत . एकमेकांच्या मनातील भावना कळण्यासाठी स्पर्शाचीही गरज नव्हती.दोघे इतकी एकरूप झाली होती की रेडिओ ट्रान्समिशन प्रमाणे त्यांचे विचार एकमेकांना कळत असत.
त्यांना दोन मुले झाली. एक मुलगा व एक मुलगी. दोघेही उच्च शिक्षित होती.मुलगा परदेशात जावून शिक्षण घेऊन आला. तरीही तो इथेच त्यांच्या जवळ राहत होता.त्याचा स्वतंत्र व्यवसाय होता .तो छान चालला होता.
मुलगी व जावई येथेच होते.त्यांचेही छान चालले होते.
मुलगा सून मुलगी जावई नातवंडे सर्व त्यांच्यावर मनापासून प्रेम करीत असत .हल्लीच्या काळात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते.
एवढ्या प्रदीर्घ काळात अनेक कडू व गोड आठवणी होत्या .मतभेद झाले परंतु कुणीही ते तुटेपर्यंत ताणले नाहीत .प्रेम हा सर्व व्यवहाराचा पाया होता .प्रेम हे सर्व अस्तित्वाचे सूत्र होते .अहंकार डोकावत असे. परंतु तो कधीही वरचढ होवू शकत नव्हता.
दोघांनाही प्रवासाची हौस होती.जमेल तेवढा भारत व जग त्यानी पाहिले होते.वयाच्या सत्तरीपर्यंत दोघांमध्येही जोम, उत्साह व इर्षा होती.
नंतर हळूहळू शरीर थकायला सुरुवात झाली होती .दोघांची प्रकृती जरी एकंदरीत निरोगी असली तरी वयोमानानुसार काही ना काही रोग डोकवण्याला सुरुवात झाली होती.
लग्नाचा पन्नासावा वाढदिवस सर्वांनीच मोठ्या उत्साहात साजरा केला होता .आता दोघांनाही एकच चिंता सतावत असे. निसर्गानुसार मृत्यू अपरिहार्य आहे .दोघेही एकदम जाऊ शकत नाहीत.कुणीतरी पुढे जाणार व कुणीतरी मागे रहाणार.दोघांचीही एकमेकांना इतकी सवय झाली होती की ,ही अगोदर गेली तर माझे कसे होणार?व हा अगोदर गेला तर माझे कसे होणार ? असा स्वार्थी प्रश्न दोघांनाही नेहमी पडत असे.
त्याचबरोबर दोघांनाही आणखी एक प्रश्न पडत असे.मी अगोदर गेलो/ गेली तर हिचे /ह्याचे कसे होणार?प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याची इतकी सवय झाली होती की त्याच्याशिवाय/ तिच्याशिवाय आपण जगू कसे हेच कळत नव्हते .प्रत्येकाला केव्हा केव्हा असे वाटे की हा/ ही अगोदर गेली तर बरे होईल.मी कशीही/कसाही निभावून नेईन. याला/हिला माझ्या मागे जमणार नाही.पदोपदी हा/ही अडखळेल. आपण दोघेही एकदम गेलो तर किती छान होईल असेही त्यांना वाटे.
एकमेकांशिवाय आयुष्य म्हणजे केवळ अंधार वाटत होता.त्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती.
पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानंतर प्रत्येक वाढदिवशी आपण आहोत, बरोबर आहोत, हा आनंद साजरा करीत असताना,त्यांच्या मनात एक जण नसला तर?ही पाल मधूनमधून चुकचुकत असे.
आज सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या लग्नाचा हीरक महोत्सव साजरा केला होता .नातेवाईकानी आप्तेष्टांनी तुम्ही विवाहाची शंभर वर्षे पूर्ण करा अशी इच्छा प्रगट केली होती .
त्यांच्या मुलाने त्यांना आता इथे समुद्रावर आणून सोडले होते .दोघांनाही समुद्र खूप आवडतो हे त्याला माहीत होते .त्यांची पहिली भेट इथेच झाली हेही त्याला माहीत होते .त्यांच्या आयुष्यातील रम्य आठवणी समुद्राशी निगडीत आहेत हे तो ओळखत होता.
दोघेही आता थकली होती .एकमेकांचा आधार घेऊनही त्यांना चालता येणे कठीण जात होते .पदोपदी त्यांना मुलाचा,मुलीचा, नातवंडांचा, कुणाचातरी आधार लागत होता.
मला फोन करा मी तुम्हाला लगेच घ्यायला येईन,असे सांगून त्यांचा मुलगा समुद्रकिनारी असलेल्या क्लबमध्ये गेला होता .
दोघांच्याही मनात गेल्या साठ वर्षांतील असंख्य आठवणी घोळत होत्या.ती दोघे काही आठवणी दुसऱ्याला सांगत होती. तर काही मनातल्या मनातच घोळवीत होती. .तर काही स्वगत बोलल्यासारखे पुटपुटत होती.
समुद्रावर आल्यावर विशेषतः तरुणपणी त्याला तिच्या मांडीवर डोके ठेवून आकाशाकडे पाहत बसणे आवडत असे.तो भावनेने प्रेमाने व्याकूळ झाला की त्याला आपल्या मांडीवर डोके ठेवून पडणे आवडते हे तिला माहित होते .सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने थोपटले होते.अश्या थोपटण्याने स्पर्शाने त्याचा सर्व भावनावेग शांत होतो हे तिला माहीत होते .
सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता .रात्र झाली होती .समुद्रावरील कोलाहल खूपच कमी झाला होता .समुद्राच्या घनगंभीर लाटांचा आवाज येत होता . समुद्रातील बोटींचे दिवे लुकलुकत होते .दोन्ही डोंगरावर असलेल्या इमारतीमधील दिवेही लुकलुकत होते. आकाशात चांदण्या दिसू लागल्या होत्या.क्षितिजाजवळ द्वितीयेची चंद्रकोर अस्पष्ट दिसत होती.
अकस्मात त्याला तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपावे असे वाटले .
तिनेही प्रेमाने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले .
ती त्याला हळूहळू थोपटू लागली .
थोपटता थोपटता तिला विचित्र वाटू लागले.
*तिने त्याला अहो अहो म्हणून जोरात हाका मारल्या.*
*तो अनंतात केव्हाच विलीन झाला होता .*
*तो गेला हे पाहताच तिच्या हृदयात एक कळ उठली .*
* तिनेही वाकून त्यांच्या अंगावर डोके टेकले .*
* जवळजवळ त्याच्या हातात हात घालून तीही अनंतात विलीन झाली होती .*
१/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन