१० वारस
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
सुहासची शहीदनगरला बदली झाली आणि मालिनी काळजीत पडली.शहीदनगरला भाड्याने जागा मिळत नाही असे तिने ऐकिले होते.गाव लहान आहे .मागणी नसल्यामुळे अजून तिथे बांधकामाला गती मिळालेली नाही. जर शक्य असेल तर लोक आपल्याच घरातील काही खोल्या भाडय़ाने देतात .परंतु गैरसोय खूपच असते .एखादे कुटुंब राहण्याच्या दृष्टीने खोल्या बांधलेल्या नसतात .त्यामुळे स्वयंपाकापासून सर्वच गोष्टींची पंचाईत पडते .भाडे मात्र खूप द्यावे लागते .असंख्य गैरसोयी आणि भाडे मात्र प्रचंड अश्या कथा तिने ऐकल्या होती .त्यामुळे ती काळजीत पडली होती .मुलाच्या शाळेची सोय कशी होईल ?शाळा चांगली असेल का? शाळा जवळ असेल का ?असे अनेक प्रश्न तिला पडले होते .
त्याच रात्री तिला स्वप्न पडले .एक उंच निंच राकट दणकट परंतु प्रेमळ चेहरा असलेली व्यक्ती तिच्या स्वप्नात आली .त्यांचे वय पंच्याहत्तरीच्या पुढे असावे .त्या आजोबांना पाहिल्यावर मालिनीला आश्वस्त वाटले .त्यानी तिला सांगितले मुली एका अर्थाने तू त्याच गावची आहेस.तुझी आजी माझी मुलगी. तिथे तुझा एक भलामोठा जुनाट वाडा आहे.तुझी तिथे राहायची सोय होईल . एवढेच नव्हे तर तिथे राहणे हा तुझा हक्क आहे .तिथे सुभाष पाटकर नावाचे एक सदगृहस्थ राहतात.त्यांच्याकडे आपल्या वाड्याची चावी आहे. तिथे गेल्यावर त्यांना भेट. मी त्यांना सांगून ठेवतो . सर्व काही ठीक होईल.काळजी करू नकोस .
मालिनी स्वप्नातून जागी झाली .तिला त्या स्वप्नाचा अर्थ कळेना .ती तर पुण्याची होती .तिचा जन्म पुण्याला झाला होता .ती मूळची त्या गावची कशी त्याचा तिला उलगडा होत नव्हता .काय असेल ते असो आपण शहीदनगरला जायचे. सुभाष पाटकर यांना भेटायचे मग पुढे काय होते ते पाहता येईल .एवढ्यात तिचा नवरा सुहास जागा झाला .का गं तू अशी रात्री बसलेली कां? तुला बरे वाटत नाही का? म्हणून त्याने तिला विचारले .
तिने सुहासला तिला पडलेले स्वप्न सविस्तर सांगितले .त्या स्वप्नाचा अर्थ दोघांनाही कळला नाही .अगोदर शहीदनगरला एक चक्कर मारू, सुभाष पाटकर यांची चौकशी करू, मग जे काही होईल ते पाहता येईल, असे त्यांनी ठरविले .एक दिवस रविवारी त्यांनी आपली मोटार काढून शहीदनगरचा रस्ता धरला .तेथे गेल्यावर त्यांनी सुभाष पाटकर कुठे राहतात म्हणून चौकशी केली .सुभाष पाटकर यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आपली ओळख करून दिली .
पाटकरानी दोघांचेही आगतस्वागत केले .ते म्हणाले काल रात्रीच अण्णासाहेब माझ्या स्वप्नात आले होते.त्यांनी तुम्ही आज येणार आहात म्हणून सांगितले . त्यांनी मला तुमच्या वाड्याची किल्ली तुमच्या स्वाधीन करायला सांगितले आहे .त्यावर सुहास म्हणाला आम्ही तुम्हाला पूर्णपणे अनोळखी आहोत.आमचा वाडा आमची किल्ली तुम्ही काय म्हणता ते आम्हाला मुळीच कळत नाही .हे अण्णासाहेब कोण तेही आम्हाला माहित नाही .त्यांचे आमच्याशी नाते काय तेही आंम्हाला माहीत नाही .आम्हाला सर्व काही सविस्तर समजून सांगा .
त्यावर पाटकरांनी सर्व हकिगत सांगायला सुरुवात केली.इथे गावात अण्णासाहेब जगदाळे यांचा वाडा सुप्रसिद्ध आहे .अण्णासाहेब माझ्या आजोबांचे मित्र . मी माझ्या लहानपणी त्यांना पाहिले आहे .अण्णासाहेबांना एक मुलगा व एक मुलगी .त्यानी हौशीने मुलाला अमेरिकेत शिकायला पाठविले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने इकडे येऊन नोकरी करावी व आपण आपले उर्वरित आयुष्य त्याच्याकडे काढावे अशी अण्णासाहेबांची इच्छा होती.मुलाने इकडे येण्यास नकार दिला .तो तिकडे स्थायिक झाला .त्याने अण्णासाहेबांना तुम्हीच तिकडे माझ्याकडे या असे सांगितले .आपला वाडा, आपली माणसे, आपला प्रदेश, सोडून अण्णासाहेब तिकडे जाणे शक्यच नव्हते.अण्णासाहेबांनी त्यांच्या वाडय़ाची एक किल्ली माझ्या आजोबांकडे दिली होती .जर कधी काळी त्यांचा मुलगा अरविंद किंवा त्यांचे कुणी वंशज इकडे आले तर त्यांना ती किल्ली द्यावी असे त्यांनी सांगितले होते .त्याचप्रमाणे त्यांनी त्यांची मुलगी गोदावरी किंवा तिचे वंशज कुणी आले तर त्यांनाही किल्ली द्यावी असे सांगितले होते .
काल रात्री अण्णासाहेब माझ्या स्वप्नात आले.त्यानी मालिनी ही त्यांच्या मुलीच्या मुलीची मुलगी आहे असे मला सांगितले .ती व तिचा नवरा उद्या येतील. त्यांची या गावात बदली झाली आहे. त्यांची राहण्याची सोय नाही .वाडा त्यांचाच आहे .तो त्यांना द्यावा.असे त्यांनी मला सांगितले.
अण्णासाहेब पुढे मला म्हणाले ,माझा मुलगा अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला . त्याची मुले अमेरिकेतच असतात .ती इकडे येण्याची शक्यता नाही. मालिनी ही माझी पणत तीच आता या इस्टेटीची वारस आहे .
ही सर्व हकीकत ऐकून सुहास व मालिनी आश्चर्यचकित झाले. मालिनीला तिच्या आईच्या आईचे माहेर जगदाळे यांच्याकडे होते का ते अर्थातच माहीत नव्हते .ते शोधून काढण्यासाठी वेळही लागला असता .तूर्त अण्णानी स्वप्नात सांगितले ते बरोबरच असणार असे गृहीत धरण्यास हरकत नव्हती.
सुभाष पाटकरांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली .आतापर्यंत अण्णासाहेबांचा मुलगा एकदा व नातू एकदा आपल्या मूळगावी येथे आले होते.अण्णासाहेब वारल्यानंतर त्याचा मुलगा येथे आला होता .त्याने किल्ली आमच्याकडेच देऊन वाड्याची व परिसराची देखभाल करण्यास सांगितले.वाडा असलेल्या परिसराला भक्कम दगडी कुंपण आहे . वाडाही भक्कम आहे .आम्ही वर्षातून एक दोनदा त्याची साफसफाई करतो.पावसात कुठे पाणी गळत नाही ना वगैरे पाहतो .वाडा इतका भक्कम आहे की याहून जास्त काही करावे लागत नाही . वाड्या सभोवताली असलेल्या बागेत आंबे सीताफळ पेरू जांभूळ यांची झाडे आहेत.
सुहास म्हणाला अण्णासाहेब तुमच्या स्वप्नात आले ते ठीक आहे .परंतु तेवढ्या स्वप्नावर आम्हाला वाडा तुम्ही विश्वासाने देत आहात हे जरा आश्चर्यच वाटते.
पाटकर म्हणाले समजा तुम्ही त्यांचे वंशज नसाल तरीही तुम्हाला वाडा राहिला द्यायला हरकत नाही .तुम्ही वाडा काही बरोबर घेऊन जाणार नाही .वाड्याची साफसफाई होईल.वाडा नांदता राहील हे आम्हाला पुरेसे आहे.
तात्या पाटकर सुहास व मालिनीला घेऊन (त्यांच्या) वाडय़ावर गेले.वाडा ऐसपैस होता.सर्व सुखसोयी होत्या .विहिरीवर मोटार बसवल्यावर व पाण्याची टाकी बसविल्यावर पाण्याचीही चौवीस तास सोय झाली असती.
मालिनीला जवळपास शेजार नाही आपण एकटेच इथे कसे राहायचे असा प्रश्न होता .तिला थोडी भीती वाटत होती .त्यावर हसत सुहास म्हणाला अग अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वारसाहक्काने हा तुझाच वाडा आहे.त्याची भीती वाटण्याचे कारण काय ?उलट आपली राहाण्याची सोय झाली याबद्दल आनंद मानला पाहिजे .कशी जागा मिळेल ?आपले कसे होईल? ही आपली काळजी मिटली.
वाड्याची साफसफाई करण्याची, मोटार बसवण्याची, पाण्याची टाकी बसवण्याची,व आणखी काही सोयी करण्याची विनंती मालिनीने तात्यांना केली.सुहासने त्यांना त्यासाठी पुरेशी रक्कमही दिली .तात्यांनी पंधरा दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सर्व सोयी करून ठेवतो म्हणून सांगितले .
त्याच रात्री मालिनीला पुन्हा स्वप्न पडले .स्वप्नात अण्णापंजोबा आले होते. त्यानी तू त्या वाड्यात बिनधास्त राहायला जा.मुलाप्रमाणेच मुलीचा हक्क असतो.अमेरिकेतून कुणीही येण्याचा संभव नाही .तो वाडा तुम्ही विकत घ्या . अमेरिकेतील माझ्या मुलाची मुले नाही म्हणणार नाहीत. त्यांचा हक्क ते आनंदाने विकण्यास तयार होतील.त्यांचा पत्ता सुभाष जवळ आहे.
या वाड्यात कुणीतरी आपल्यापैकी येऊन राहावे अशी माझी इच्छा होती.ती आता पूर्ण होत आहे .जरी सुहासची बदली झाली तरी तुमचे येथे येणे जाणे राहील .सुहासच्या निवृत्तीनंतर तुम्ही येथे येऊन राहा.तुमच्या पाठीमागे आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे .एवढे सांगून अण्णा अंतर्धान पावले .मालिनी दचकून स्वप्नातून जागी झाली .
वाड्यात राहिला आल्यानंतर तात्यांकडून त्यांनी अमेरिकेतील अण्णांच्या नातवाचा पत्ता मिळविला .आपली आजी जगदाळेकडील होती याचीही त्यांनी कुतूहल म्हणून खात्री करून घेतली .
अण्णासाहेबांच्या नातवाकडून त्यांचा हिस्सा सुहासने आता विकत घेतला आहे. मालिनी त्या वाड्याची मालक झाली आहे.सुहास तिला काय मालकीणबाई म्हणून चिडवत असतो .साफसफाई करून मालिनीने वाडा व परिसर स्वच्छ ठेवला आहे . आंबे पेरू सिताफळ जांभूळ मुलांना खायला तर मिळतातच परंतू त्यातून वाड्याच्या साफसफाईसाठी लागणारे पुरेसे उत्पन्नही मिळते.
*वाड्याचे वारस तर होतेच परंतु ते कुणी येथे राहात नव्हते.*
*त्यामुळे अण्णासाहेबांचा आत्मा तळमळत होता*
*एवढा जीव कशात अडकवणे उचित नाही .*
*परंतु एखाद्याचा अडकतो त्याला काय करणार ?*
*आता वाड्याचे वारस येथे राहात आहेत .*
*त्यानंतर मालिनीला स्वप्नात कधीही अण्णासाहेब दिसले नाहीत*
२८/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन