१ आरसा १-३
आज सर्वजण नवीन जागेत राहायला जाणार होते .जुनी जागा जरी स्वतःच्या मालकीची असली तरी तो जुन्या काळचा वाडा होता .वाडा फार जुना झाला होता .तो योग्य किमतीला विकत घ्यायला कुणीही तयार नव्हता.दुरुस्तीचा खर्च अफाट आला असता .निष्कारण त्यावर खर्च करण्यात अर्थ नव्हता .त्यापेक्षा तो पाडून तिथे नवीन प्रकारचा एखादा टुमदार बंगला बांधणे योग्य होते.बंगला बांधायचाच तर तो गावाबाहेर नवीन वसाहत विस्तार पावत होती तिथे बांधणे योग्य ठरले असते .त्यासाठी विशेष जादा खर्च आला नसता . वाड्याची दुरुस्तीही होत नव्हती. पैशाअभावी बाहेरही बंगला बांधला जात नव्हता .
श्रीधरचे बालपण इथेच वाड्यात गेले होते .कॉलेजात जाईपर्यंत तो तिथे आनंदात रहात होता .गाव वाढत होते .गावाबाहेर टुमदार बंगले व सदनिका तयार होत होत्या .कॉलेजमधील त्याचे काही मित्र अशा गावाबाहेरील सदनिका किंवा बंगले यांच्यात रहायला गेले होते.मित्रांकडे गेल्यावर तेथील टुमदार जागा पाहून त्यालाही आपण अश्या अद्यावत सुविधा असलेल्या जागेत जावे असे वाटत असे.तो नोकरीला लागेपर्यंत हे शक्य नव्हते .त्याचे आईवडील वाड्यातील रहवासाला सरावलेले होते.आधुनिक सुविधा पाहून त्याप्रमाणे वाडय़ांमध्ये नवीन रचना नवीन सुविधा केल्या होत्या.ओटा, किचन ड्रॉवर्स, सोफा, कमोड, इत्यादींमुळे स्वयंपाकघर हॉल बाथरूम यांचे स्वरूप आधुनिक झाले होते .वाड्याच्या भिंतीनाही प्लास्टरिंग करून रंग देऊन आधुनिक रूप आणण्याचा प्रयत्न केला होता .तरीही शेवटी जुने ते जुनेच. जुनी रचना थोडीच बदलता येणार होती ?
जुन्या जागेत चारचाकी आणणे शक्य नव्हते .ती कोपऱ्यावर लांब ठेवावी लागली असती.गावातील रस्तेही अरुंद गर्दीचे होते.येण्या जाण्यात खूप वेळ जात असे.
पूर्वी त्याचे मित्र जवळपासच राहत असत .जरा घराबाहेर पडले की लगेच मित्र भेटत असत.हल्ली एकेकजण हळुहळू गावाबाहेर राहण्यासाठी जात होता .त्यालाही आपण गावाबाहेर मित्रांप्रमाणे एखादा टुमदार बंगला किंवा फ्लॅट घ्यावा आणि तेथे राहण्यासाठी जावे असे वाटत होते .त्याच्या आई वडिलांना ते मुळीच पटत नव्हते .त्यांचे आयुष्य गावात गेलेले असल्यामुळे त्यांना त्या जीवनाची सवय झाली होती .त्यांची देवळे कीर्तन प्रवचन व्याख्यान पुस्तकालय इत्यादी सर्व गावातच होते.गावाबाहेर गेल्यावर त्यांना करमणे शक्य नव्हते.
दिवस असेच चालले होते .श्रीधरचे शिक्षण पुरे झाले. त्याला नोकरीही याच गावात लागली .श्रीधरचे लग्न झाले .पत्नी पुण्याची होती.तिला आधुनिक पद्धतीने रहाण्याची सवय होती.तिला वाडा व एकूणच सभोवतालचे वातावरण पसंत नव्हते.
श्रीधर चांगल्या पोस्टवर होता. सुधाही नोकरी करीत होती.तिने बाहेर फ्लॅटमध्ये रहायला जाण्यासाठी उचल घेतली .अगदी गावाजवळ नाही,फार लांबही नाही अश्या एक हवेशीर चांगल्या सर्व अंतर्गत सुविधा असलेल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये ब्लॉक बुक करण्यात आला.
ब्लॉक ताब्यात मिळाला होता. कलश पूजनही झाले होते. आज तिकडे मुहूर्तावर राहायला जाण्याचे ठरले होते . शेवटी ट्रकमध्ये सामान भरून सर्वांनी नवीन जागेकडे प्रयाण केले.
नवीन ब्लॉकमध्ये आल्यानंतर सामान लावण्यात दोन चार दिवस सहज गेले.येथे राहायला यायचे म्हणून अगोदरपासूनच खरेदी चालली होती .खरेदी केलेले नवीन सामान नव्या जागेतच आणून ठेवले होते .शेवटी सर्व सामान मनासारखे लावून झाले.श्रीधरचे आई वडील काही दिवस जुन्या जागेत तर काही दिवस नव्या जागेत राहणार होते .एकूण त्यांना जुनी जागा पसंत होती .शक्यतो जमेल तितके दिवस जुन्या वाड्यात राहण्याचे त्यांनी ठरविले होते .श्रीधर व सुधा यांना नवीन जागेत स्वतंत्र राहू द्यावे असाही त्यांचा विचार होता .
एक दिवस सुधा व श्रीधर जुन्या बाजारात फिरत होते .जुन्या बाजारात केव्हा केव्हा प्राचीन व खानदानी (अँटीक व क्लासिक) वस्तू स्वस्त भावात मिळतात .त्या वस्तूंच्या ऐतिहासिक व खानदानी स्वरुपामुळे त्या अनमोल असतात .अशा प्राचीन व नामांकित वस्तू खरेदी करण्याचा दोघांनाही षोक होता.ते त्या वस्तू आपल्या घरात योग्य प्रकारे मांडणी करून ठेवीत असत .
हा जुना बाजार नामांकित होता तिथे जुन्या वस्तूंची दालने केलेली होती .त्यातील एक आरसा महाल हा होता .येथे सर्व प्रकारचे आरसे मिळत होते .लहान बाळाच्या तळहाताच्या आकाराएवढ्या आरशापासून संपूर्ण भिंतीवर लावता येईल एवढ्या अारशापर्यंत ,सर्व प्रकारचे आरसे तिथे होते.अंतर्वक्र, बहिर्वक्र, एकाच आरशाचा अर्धा भाग अंतर्वक्र व अर्धा भाग बहिर्वक्र,कमरेवरती अत्यंत बारीक व कमरेखाली प्रचंड जाड अशी प्रतिमा त्यात दिसत असे. त्या आरशासमोर उभे राहून फोटो काढण्यासाठी चांगल्यापैकी गर्दी होती. आणखीही निरनिराळया प्रकारचे, ढंगाचे, आरसे तिथे होते.त्यामध्ये आपले शरीर फारच विचित्र दिसत असे .विविध प्रकारचे प्राचीन अारसे तिथे होते.
एका आरशासमोर उभी राहून सुधा आपले प्रतिबिंब पाहत होती. पहात असताना तिला काहीतरी विचित्र भास झाला . त्या आरशात एक मुलगी उभी आहे आणि ती ~तू हा आरसा विकत घे मजा येईल असे सांगत आहे ~असे तिला वाटले .असे कसे असेल काहीतरी भास झाला असेल असे तिला वाटले .कदाचित आपल्या पाठीमागून कुणी एखादी मुलगी आरशात पाहात असेल आणि ती बोलत असताना आपल्याला ती तू हा आरसा विकत घे असे सांगत आहे असा भास झाला असेल .असे मनाशी म्हणून तिने तो विचित्र विचार दूर केला.
आरसे महालात फिरत असतांना सुधा त्या विशिष्ट अारशाकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होती.तो अारसा विकत घेतल्याशिवाय आपण या बाजारातून बाहेर पडू शकत नाही अशा प्रकारची एक विचित्र संवेदना तिला झाली.ती श्रीधरला घेऊन त्या आरशासमोर पुन्हा आली.आरशात पाहात असताना दोघांचेही प्रतिबिंब आरशात दिसणे स्वाभाविक होते .परंतु तिला फक्त तिचेच प्रतिबिंब दिसत होते.श्रीधरचे प्रतिबिंब दिसत नव्हते .ती चमकली.हा अारसा काही भविष्यकालीन घटना सांगत तर नाही ना असा विचार तिच्या मनात आला .हा अारसा अशुभ आहे असाही एक विचार होता.हा आरसा खरेदी करू नये असे तिला आत कुठे तरी उत्कटतेने वाटत होते.त्याचबरोबर तो अारसा खरेदी करण्याची तीव्र इच्छा तिला होत होती .हा आरसा खरेदी करणे आपले भाग्यध्येय आहे असे तिला वाटले.ती हा आरसा खरेदी केल्याशिवाय त्या जुन्या बाजारातून बाहेर पडूच शकत नव्हती. आरसा खरेदी करणे अपरिहार्य होते.
श्रीधरला त्या आरशात दोघांचेही प्रतिबिंब दिसत होते.त्याला तो अारसा एकदम नॉर्मल सामान्य नेहमीच्या आरशाप्रमाणे वाटत होता.सुधाला पुन्हा एकदा तो आरसा आपल्याला खुणावत आहे असा भास झाला .विकत घ्यावा किंवा विकत घेऊ नये या रस्सीखेचीमध्ये विकत घेतलाच पाहिजे या विचाराचा शेवटी विजय झाला.तिने श्रीधरला आपण हा आरसा विकत घेऊ या असे सांगितले .आरसा आपल्या बाथरूममध्ये चांगला शोभेल असेही ती म्हणाली .त्यावर श्रीधर म्हणाला हा इतका डेकोरेटिव्ह अारसा आहे की तो दिवाणखान्यातच चांगला दिसेल.इथे वाद घालत बसण्यापेक्षा आपण तो आरसा खरेदी करावा आणि घरी गेल्यावर तो कुठे लावावा ते ठरवू असे सुधा म्हणाली.
शेवटी विक्रेत्यांशी घासाघीस घालून तो आरसा खरेदी करण्यात आला .दुकानदाराने उत्तम प्रकारे पॅकिंग करून तो अारसा मोटारीच्या डिकीमध्ये आपल्या नोकरांकडून नेऊन ठेवला.
दोघेही आज फार छान खरेदी झाली अश्या समाधानात शनिवारी संध्याकाळी घरी परतले.शनिवारी रात्री कुठेतरी बाहेर जेवायला जाण्याची त्यांची पद्धत होती . दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे लवकर उठण्याची काहीही धांदल नसे.आरामशीर उशिरा उठता येई. जेवून रात्री घरी येईपर्यंत अकरा वाजले होते . उद्या सकाळी आरसा डिकीतून घरात आणू असा विचार करून दोघेही फ्लॅटवर परतली.
रात्री सुधाला एक विचित्र स्वप्न पडले .तिच्या स्वप्नात तो अारसा आला.रात्री तू मला घरात का आणले नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारीत होता.ती स्वप्नातून जागी झाली.तिला त्या थोड्याशा विचित्र स्वप्नामुळे किंचित घाम आला होता .रात्रीचे दोन वाजले होते .जेवण जास्त झाल्यामुळे कदाचित असे स्वप्न पडले असेल अशी तिने मनाची समजूत करून घेतली . पाणी पिऊन ती पुन्हा झोपली.तिच्या स्वप्नात तो आरसा पुन्हा आला .यावेळी त्या आरशाचा चेहरा रागीट होता.त्याला डिकीमध्ये घुसमटत ठेवल्याबद्दल तो सुधाला दोष देत होता.मी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरून जाईन असे तो म्हणत होता .
*तू दुष्ट आहेस. तुला कुणाची पर्वा नाही. मी मेलो तर तुझे काय बिघडले ?*
तू मला आता ताबडतोब घरात घेऊन ये म्हणून तो सांगत होता.*
*नाहीतर मी मरेन आणि तू खुनी ठरशील.तुला फाशी होईल. असेही तो सांगत होता .*
* सुधा जागी झाली ती घामाने थबथबलेली होती .*
(क्रमशः)
१०/१/२०२०©प्रभाकर पटवर्धन