Get it on Google Play
Download on the App Store

३ आरसा ३-३

घरात सर्वत्र हिंडून त्यांनी शोध घेतला .कुठेही आरसा नव्हता .त्यानी समाधानाचा सुस्कारा सोडला.

हे समाधान क्षणिक होते.आजच्या दिवसापुरते होते. हे त्या दोघांनाही माहित नव्हते!

तो आरसा त्यांचा असा पिच्छा सोडणार नव्हता.

सोमवारी  दोघेही आनंदात होती.त्या आरशाच्या पिच्छातून ते मुक्त झाले होते.  त्या प्रित्यर्थ दोघांनीही रजेचा अर्ज दिला होता .आरसा ग्रहण मुक्ततेचा आनंद ते सेलिब्रेट करणार होते .सुधा नेहमीप्रमाणे सावकाश उशिरा उठली.ती स्नानगृहात स्नान करण्यासाठी गेली .सुटीच्या दिवशी आवडते सिनेसंगीत ऐकत स्नान करणे  तिला आवडे . ती टब बाथ घेऊन  नंतर शॉवर घेऊन आपले शरीर आरशासमोर  उभी  राहून शांतपणे पुसत होती .

अजून तिचे लक्ष आरशाकडे गेले नव्हते .अंग पुसता पुसता तिने आपल्या आरशातील प्रतिबिंबाकडे पाहिले.तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली.स्नान गृहातील नेहमीचा आरसा आज पुन्हा गायब झाला होता .आणि तो जुन्या बाजारात विकत घेतलेला आरसा तिथे लटकत होता. तो आरसा आपल्या अनावृत शरीराकडे टक लावून पाहत आहे असा तिला भास झाला.ती चरकलीच. म्हणजे हा आरसा ती स्नान करीत असताना तिच्याकडे सतत रोखून पाहात होता.आणि याची तिला कल्पनाही नव्हती .ती लाजेने व शरमेने लाल झाली.

तिचा रागही अनावर झाला .तिला पक्के आठवत होते की ती जेव्हा स्नानासाठी स्नानगृहांमध्ये शिरली त्यावेळी नेहमीचा जुना आरसा तिथे होता . तिने स्नानाला सुरुवात केल्यानंतर केव्हा तरी ही अदलाबदल झाली होती . प्राचीन आरसा खट्याळ आणि चावटही होता .तो आंबट शौकीनही दिसत होता .तिच्या मनात आले हे आरसा प्रकरण कुठच्या कुठे चालले होते . याला आवर कसा घालावा तेही लक्षात येत नव्हते .

तिने चटकन गाऊन घातला आणि ती स्नानगृहा बाहेर आली.तिने आल्याआल्या  हे घर सोडण्याचा इरादा श्रीधरजवळ स्पष्ट केला.एकाएकी एवढे स्नानगृहात काय झाले की त्यामुळे सुधा ब्लॉक सोडण्याला निघाली ते श्रीधरला कळेना . तो एवढेच म्हणाला की अग आपण एवढ्या हौशीने ब्लॉक घेतला.काळजीपूर्वक सोयी करून घेतल्या .तो लक्षपूर्वक आवडीनिवडी लक्षात घेऊन सजविला .आणि आता तू म्हणतेस की आपण ब्लॉक सोडून जाऊया.एकाएकी एवढे काय घडले?

सुधा थरथर कापत होती .तिने श्रीधरचा हात धरला आणि त्याला स्नानगृहाच्या दरवाज्याजवळ उभे केले.आणि समोर आरशाकडे पहा म्हणून सांगितले .समोर पाहून तो म्हणाला कुठे काय इथे तर सर्व काही ठीक आहे .   ती पाहते तो तिथे जुना आरसा  भिंतीवर  होता .तो प्राचीन आरसा गायब होता.तिने श्रीधरला काय झाले ते सविस्तर सांगितले .श्रीधरही चक्रावून गेला .तो म्हणाला ब्लॉक बदलणे कपडे बदलण्याएवढी सोपी गोष्ट नाही.समजा आपण ब्लॉक बदलला तरी तिथेही हा बदमाश अारसा येणार नाही याची खात्री काय? 

सुधाला श्रीधरचे बोलणे पटले.समस्येला आपण तोंड दिले पाहिजे.समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे .समस्येपासून पळून जाऊन समस्या सुटेल याची खात्री नाही .दोघेही काय करावे म्हणजे या विचित्र आरशापासून आपली सुटका होईल याचा  विचार करू लागले .  कुठून आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि हा आरसा आपण विकत घेतला असे त्यांना वाटू लागले .

त्या ब्लॉकमध्ये राहण्याची त्यांना भीती वाटू लागली .त्यांना एक कल्पना सुचली . जर भिंतीवरचे सर्व स्क्रू काढून टाकले तर अारसा  लटकविण्यासाठी सोय नाही म्हटल्यावर तो आरसा भिंतीवर येणार नाही .त्याच्यापासून आपली सुटका होईल .त्यावर सुधा म्हणाली तो जमिनीवर भिंतीला टेकून राहिला तर ?

श्रीधर म्हणाला तसे झाले तर काय करायचे ते पाहू . प्रयोग तर करायला  हरकत नाही ?त्यानी भिंतीवरील सर्व स्क्रू काढून टाकले .त्याबरोबर भिंतीवर टांगलेल्या अनेक वस्तू त्यांना काढून घ्याव्या लागल्या .भिंती ओक्याबोक्या दिसू लागल्या .त्यावर स्क्रू काढले त्या जागी भोके दिसत होती .भिंतीवर टांगलेली फ्रेम इत्यादींच्या चौकटी दिसत होत्या. ब्लॉक खराब दिसत होता परंतु दिसला तर दिसला आपल्याला आरशापासून मुक्ती मिळूदे असा दोघांचाही विचार होता .आरशाने दहशत निर्माण केली होती .

रात्र झाली दोघेही शयनगृहात झोपण्यासाठी गेली .शयनगृहातील आरसा काढून ठेवण्यात आला होता .अर्थात स्क्रूही काढून ठेवण्यात आला होता.ड्रेसिंग टेबलही होते.त्याचा आरसा  काढून ठेवणे शक्य नव्हते.ड्रेसिंग टेबल भिंतीकडे तोंड करून ठेवण्यात आले .ती कोणती तरी अदृश्य शक्ती संपूर्ण ड्रेसिंग टेबल फिरवील आणि आरसा आपल्यावर नजर ठेवू लागेल अशी भीती त्यांना वाटत होती .अजून पर्यंत तरी त्या अदृश्य  शक्तीने वस्तूंची फिरवाफिरव केली नव्हती .मूळचा आरसा नाहीसा करणे व आपण स्वतः तिथे स्थानापन्न होणे ही किमया तो आरसा करू शकत होता .तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत होता तेव्हा ड्रेसिंग टेबल तो फिरवणार नाही याची खात्री नव्हती .रात्री दोघेही मधून मधून ड्रेसिंग टेबल फिरविले गेले नाही ना हे पाहात होती .त्या रात्री त्यांना अस्वस्थ झोप लागली .सकाळी ड्रेसिंग टेबल त्यांनी रात्री ठेवले होते त्या स्थितीतच होते. दोघांनीही सुटकेचा सुस्कारा टाकला .

ड्रेसिंग टेबलवर नजर ठेवण्याच्या गडबडीत त्यांनी खोलीत इतरत्र पाहिले नव्हते .दोघेही उठून पाहतात तो भिंतीलगत आरसा जमिनीवर  विराजमान होता .स्क्रू नाही तर तो जमिनीवर भिंतीला टिकून होता .म्हणजे  रात्रभर तो आरसा आपल्याकडे पाहात होता. बहुधा मिश्किलपणे हसतही असेल या कल्पनेने दोघेही हादरली .

थोडक्यात तो आरसा कुठेही जावू शकत होता .भिंतीवरील एक अारसा काढून तिथे स्वतः स्थानापन्न होऊ शकत होता.त्याच्यावर घणाचे घाव घातले तरीही तो फुटत नव्हता . कितीही उंचावरून फेकला तरी तो जसाच्या तसा राहात होता .डिकी कुलूपबंद  केलेली असताना, घर कुलूपबंद केलेले असताना तो घरात येऊ शकत होता.तश्या त्याच्या शक्ती काही प्रमाणात अमर्याद होत्या.

श्रीधरच्या मनात आकस्मात एक कल्पना आली. ती खरी ठरली तर त्यांना त्या आरशापासून मुक्ती मिळाली असती. 

तो आरसा जुन्या बाजारातून आणताना पॅकिंग कसे होते ते श्रीधर आठवत होता. दुकानदाराच्या नोकराने  कागद गुंडाळला होता. नंतर स्थितीस्थापक प्लॅस्टिक पॅकींग गुंडाळले होते .त्यावर टेप मारून तो डिकीमध्ये ठेवला होता .  या अारशाने गडबड सुरू केल्यापासून त्यानी डिकी उघडली नव्हती .नदीवर आरसा नेताना सुधा तो अारसा घट्ट धरून बसली होती.डिकीत ठेवला तर तो कदाचित पळून जाईल अशी भिती त्यांना वाटत होती . 

त्याने जावून डिकी उघडली.पॅकिंग आत तसेच होते. कागद त्यावर प्लास्टिक पॅकिंग होते. आणि ते सर्व जसेच्या तसे होते.पॅकिंगचे निरीक्षण करता त्या पॅकिंगला एक मोठे भोक होते.याचा अर्थ त्या आरशाला जगाकडे बघण्यासाठी एक फट आवश्यक होती.तेव्हाच त्याच्या शक्ती कार्य करीत होत्या .जर त्याला संपूर्णपणे अाच्छादिला तर तो निष्प्रभ होत होता .असा कयास श्रीधरने केला .अर्थात अशीही शक्यता होती की त्या अारशाने आतून फाडून फट निर्माण केली असेल.

प्रयोग करून बघायला हरकत नव्हती .श्रीधर ब्लॉकवर परत आला . बेडरूममध्ये आरसा भिंतीला टेकून तसाच होता .त्याने तो आरसा एका जाड ब्लँकेटमध्ये व्यवस्थित गुंडाळला .त्यानंतर त्याला व्यवस्थित टेप मारली .आणि तो भिंतीलगत ठेवून दिला .

चार दिवस तो आरसा कुठेही प्रगट झाला नाही .श्रीधरने काढलेले स्क्रू पुन्हा भिंतीत बसविले .सर्व फ्रेम्स, आरसे ,इत्यादी जागच्या जागी ठेवले.तसेच चार दिवस जाऊ दिले .आरसा ब्लँकेटमध्ये बांधलेल्या स्थितीतच होता .

श्रीधरची कल्पना बरोबर होती .एखाद्या बारीक फटीतून आरसा जर जगाकडे पाहू शकत असेल तरच त्याच्या शक्ती कार्य करू शकत होत्या .फट नसेल तर तो निर्जीव, निष्प्रभ, निर्बल, निश्चेष्ट, होता. 

श्रीधर तसाच बाजारात गेला .पेंटिंगचा एक मोठा ब्रश व ऑईलपेंटचा डबा घेऊन आला.त्याने अारसा मोकळा केला.ब्रशने काळा ऑईलपेंट सर्वत्र व्यवस्थित काढला.कुठेही  बारीकशी फट ठेविली नाही.रात्री तो आरसा तसाच निपचित पडून होता.दुसऱ्या दिवशी सुकलेल्या पेंटवर त्याने पेंटचा आणखी एक हात दिला.काळा दाट पेंट अारशावर  घट्ट बसला होता .पेंट सुकल्यावर त्याने आणखी चार दिवस वाट पाहिली .आरसा निष्प्रभ झाला होता .नंतर त्याने  तो आरसा आपल्या जुन्या वाड्यामध्ये नेला.वाड्यासमोरच्या त्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये मजूर लावून दहा फूट खोल खड्डा खणला .तो आरसा त्यात टाकला. त्यावर माती लोटली.

*काही दिवस दोघेही धास्तावलेल्या स्थितीत होती .*

*तो आरसा पुन्हा येणार तर नाही ना अशी भीती त्यांना वाटत होती.* 

*घरात शिरताना दोघेही कावऱ्याबावऱ्या नजरेने सर्व ब्लॉकचा तपास करीत असत.*

*घरात दोघेही मनमोकळे पणाने वागू शकत नसत.* 

*आरसा परत येऊ शकला नाही .*

* तेव्हांपासून श्रीधर व सुधा प्राचीन आरसा मुक्त झाल्या आहेत .*

*भविष्यकाळात कोण केव्हा खड्डा उकरील,आरसा बाहेर येईल,त्यावरचा पेंट निघून जाईल,आणि आरसा मग काय करीत ते सांगता येत नाही .*

(समाप्त)

११/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन