भाग २
सावंत अनेक विचारांच्या फेऱ्यात वाहवत गेले. बस थांबली हे त्यांच्या लक्षातच नाही, कैवारीने त्याचा हात पकडला तेव्हा ते दिवास्वप्नातून बाहेर पडले. कैवारीच्या बर्फाळ हस्तस्पर्शाने सावंतांच्या शरीरातून भीतीची लहर चमकून गेली, तो स्पर्श जिवंत माणसाचा खचितच नव्हता. त्यांनी कैवारीचा हात झिडकारला. झिडकारला खरा पण कैवारीने मनावर घेतले नाही.
"चला. उतरा. चहा घेऊया. आळस झटकून टाकूया."
सावंतांच्या मनात त्याच्या बरोबर जायची इच्छा नव्हती. पण नाही म्हटले तर .... आणि त्यांना पण चहाची तलफ आलीच होती. शिवाय त्यांना कैवारीशी बोलायचे सुद्धा होते.
ते टेबलाशी बसले तोवर पोऱ्याने उकळी केलेल्या शिळ्या चहाने भरलेले दोन कप समोर टेबलावर आणून आदळले.(रात्री आडवाटेला ह्यापेक्षा अजून काय चांगली सर्विस मिळणार?चहा मिळाला हेच खूप.चुपचाप प्याना)
"मग काय ठरवलंत? मी सांगितल तस घरी परत जाणार ना? ब्रेक जर्नी करून."
"कैवारी, कधी नव्हे तो मला परदेश गमनाचा योग आला आहे. त्यात तुम्ही काही बाही सांगून मोडता घालता आहात. मिस्टर कैवारी, प्लीज माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
चार चौघात जास्त शोभा करून घ्यायची नसेल तर आता बस करा."
"खरच?"
सावंतांचा मूड पूर्णपणे ऑफ झाला होता. ते तरातरा चालत बस कडे निघून गेले. कैवारीने आपला मोबाईल काढून जवळच्या टेलेफोनच्या मार्शलिंग बॅाक्सपाशी गेला आणि बोलायला लागला.
"गडी बिलकुल ऐकायला तयार नाही. जाणारच म्हणून हटून बसला आहे."
".................................."
"हार्ट अटॅक? नको नको. आम्ही इथे अशा जागी आहोत कि औषधालाही डॉक्टर मिळणार नाही."
"................................"
"हा ते बरं पडेल. तसच करा."
एव्हाना सगळे प्रवासी बस मध्ये येऊन बसले होते. चहा कसा येडझव् होता त्यावर चर्चा चालू होती.
"आले का सगळे प्यासिंजर?" वाहकाने एकदा हेडकाउंट केला,आणि घंटी वाजवली.
ड्रायव्हरने गाडी चालू केली आय मीन चालू करायचं प्रयत्न केला! गाडी चालू होईना. आडमुठेपणा करू लागली.लहान मुलासारखी रुसून बसली. नखरे दाखवू लागली.
"उतारा सगळेजण. अन मारा धक्का. धक्का स्टार्ट!"
पण त्याचाही उपयोग झाला नाही. हॅंड्ब्रेक लावून त्याने केबिनमधून खाली उडी मारली.
"जा जाऊन झोपा गाडीत."
सगळेजण वैतागले. सावंत सगळ्यात जास्त! प्रत्येकाचे पुढचे प्रोग्रॅम गचकले होते. बिचाऱ्या सावंतांची परदेशगमनाची संधी हातची हुकली. काही इलाज नव्हता. तासाभरात फ्लाईट सुटणार होती आणि मिस्टर सावंत मॅनेजर (इन्जिनिअरिंग) डायनॅमिक प्रोसेस कंसलटंट्स लिमिटेड हे ती फ्लाईट पकडू शकणार नव्हते. निराशेने त्यांचे अंतःकरण भरून गेले.
आणि एकदम वीज चमकावी तसा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.
कुठे आहे तो साला कैवारी? त्यानेच नाट लावला. सारखा म्हणत होता. नका जाऊ. नका जाऊ. ##ला जाऊन भोसडतो. कुठे आहे तो?
कुठे आहे तो?
कुठे आहे तो?
जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी कुठेही कैवारी नव्हता. जणू हवेत विरून गेला.