Get it on Google Play
Download on the App Store

भाग १

सात साडे सात वाजले असावेत. सावंतांची एस टी फलाटाला लागली होती. पण कंडक्टर ड्रायवर चहा प्यायला गेले होते. साधी लाल गाडीच होती. त्यामुळे कुणाला काही घाई नव्हती. प्रवासी तसे थोडकेच होते. खिडकीपाशी बसायला मिळावे म्हणून सगळ्यांची गाडीत घुसण्याची घाई, पण बसचा दरवाजा काही उघडेना.

"दरवाजा लॉक झाला जणू". कोणीतरी रिमार्क टाकला. 

"अहो उघडेल की. जरा हैय्या म्हणून जोर लावा."

"सगळा अनागोंदी भोंगळ सरकारी कारभार. साधा एस टीचा दरवाजा...... "

"रायटिंग मध्ये तक्रार करायला पाहिजे. साल्यांना ##त लाथा घालायला पाहिजेत."

"काय उपयोग? कचऱ्याची टोपली दाखवतील."

सावंत हा तमाशा बघत बसले होते.

मग सगळे येऊन स्वस्थ बाकड्यांवर येऊन टेकले, फुसका वांझोटा राग वायफळ बडबडीतून काढायला लागले. ड्रायवर  कंडक्टर यायची वाट पाहत बसले. दुसरं काय करणार?

सरते शेवटी ड्रायवर  कंडक्टर डुलत डुलत आले. 

"आईला, तुम्ही लोक गाडीत बसला नाहीत? उघड्यावर थंडीत कुडकुड...."

"अहो, ड्रायव्हर साहेब दरवाजा लॉक झाला आहे. आता तुम्हीच जादू करा आणि उघडा."

ड्रायव्हर पुढे झाला आणि त्याने सहज दरवाजा उघडला. प्यासेनजेर्सकडे एक तुच्छतापूर्ण दृष्टीक्षेप टाकला. 

एवढे शिकले सवरलेले पण बंद दरवाजे कसे उघडायचे ते बरीक माहित नाही. हे नुसते दरवाजे फोडणार.

"चला घ्या पटापट बसून. आधीच उशीर झालाय." 

सगळ्यांनी बुडं टेकली. ड्रायव्हरने बसची टायर बुक्की मारून चेक केली. समोरची काच थूक मारून पेपरने साफ केली आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. स्टार्टर मारून गाडी चालू केली. मग पद्धतशीरपणे इंजिन रेझ केलं. कंडक्टरच्या घंटीची वाट पहात.

कंडक्टरने बेल मारली, ड्रायव्हरने गाडी फर्स्ट गिअर मध्ये घेतली न घेतली तोच एक सद्गृहस्थ पळत धापा टाकत आरडत आला, "अहो कंडक्टरसाहेव, जरा गाडी थांबवा." 

"या. तुमचीच वाट पाहत होतो. वाटलं येतायत की नाही, साहेब." जेव्हढा जमेल तेव्हढा कुत्सितपणा एकत्र करून कंडक्टरने एक पिंक टाकली.

त्या माणसाला कंडक्टरच्या बोलण्याचा रोख समजला कि नाही कुणास ठाऊक. समजला असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करून(नसेल समजलातर चांगलेच) त्याने विचारले, "एम एच १३१३ नंबरची गाडी आहे न"

बसचा नंबर विचारणारा हा पहिलाच माणूस असावा.

"नंबरप्लेट बघायची होती न."

"नंबरप्लेटचा कलर उडाला आहे. म्हणून विचारतोय."

"तुम्हाला कुठं जायचंय?"

"हे पहा मला एम एच १३१३ नंबरच्या गाडीने जायचं आहे मग ती कुठेहिका जाईना."

"अरे भाऊ, त्याला सांग हाच नंबर आहे. चल घे आत त्याला. उगा टाईमपास काउन बे करून राह्यालास." आता ड्रायव्हर बोलला.

"या, ही गाडी  ###%&ला जाते. आधीच सांगतो. मागून झमेला नाय पाहिजेल आपल्याला."

कोणी एक मध्यम उंचीचा, गहू वर्णाचा, तरतरीतपणाचा अभाव असलेला माणूस बसमध्ये चढला, बाकी काही असो त्याची नजर मात्र भेदक होती. ज्या कोणाकडे बघेल त्याच्या आरपार जाणारी. त्याने गाडीवर नजर टाकली. 

आत बसलेल्या दहा बारा जणांची एका क्षणात त्याने पारख केली.  नंतर तो सरळ सावंतांकडे आला. गाडीत एवढ्या शिटा मोकळ्या होत्या पण नाही त्याला सावंतांच्या जवळच बसायचे होते. गाडीतलं वातावरण एकदम बदललं.

थंड वाऱ्याची झुळूक आली. तो थंडपणा जरा निराळा होता. सावंतांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्या माणसाच्या वेगळेपणाची जाणीव झाली.

त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून मग सावंतांनी खिडकीच्या तावदानाला डोकं टेकवून झोपेचे ढोंग आणले. 

बसने आता वेग पकडला होता आणि ती शहराच्या बाहेर पडली होती. 

"मी इथं बसू शकतो काय?" 

"बसा की." ( नाही म्हणणारा मी कोण.)

सावंतांनी बाजूला सरकून त्याला ऐसपैस जागा करून दिली. 

"मी राजेश कैवारी."

"वा वा. छान." सावंतांना खरतर दोन तीन तास झोप घ्यायची होती. हा जर असाच बक बक करत राहिला तर मुश्कील होती. त्याला कटाप करण्याच्या उद्देशाने सावंतांनी त्याला मोजकेच उत्तर दिले.

"ह्यात "वा वा. छान" असं काय आहे? आपलं नाव-आडनाव. आई-बाप, प्रदेश, देश, जाति-धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला थोडेच असते? देव, फ्री विल वगैरे सब झूट आहे. खर आहे आहे फक्त डीएनए! ते देखील आई बाबा देणार. उगाच आपण आपल म्हणायचे 'दैवायुत्तं कुले जन्मः मदायुत्तं तु पौरुषम्."

कुठून कुठं पोचला हा माणूस! हा काय मला झोपू देणार नव्हता.

"वा वा. हे पण छान बरका." सावंतांच्या स्वरातला उपरोध त्याच्या पर्यंत पोचला असावा. तो थोडा गप्प झाला. 

"आपण बँकेत नोकरीला असता काय? नाही म्हणजे कधीतरी बघितल्या सारखं वाटतय. आपल्या त्या स्वामी अखंडानंद सहकारी बँकेच्या विजयपूर शाखेत. नाव काय म्हणालात आपलं."

सावंतांनी आपले नाव त्याला कधीच सांगितले नव्हते. पण असं—इंडायरेक्ट का होईना -- त्याने विचारले तर आता सांगणे क्रमप्राप्त होते.

"मी प्रभुदेसाई, अखंडानंद सहकारी बँकेच्या विजयपूर शाखेत रोखपाल आहे. मला एक मुलगा आहे. माझी बायको कुठेही नोकरी करत नाही. मी सहकार नगर मध्ये राहतो. अजून काही माहिती पाहिजे? म्हणजे माझा पॅन, आधार नंबर? विचारून घ्या. पुन्हा भेट होईल अशी ग्यारंटी नाही. मिस्टर कैवारी, माइंड युअर ओन बिसिनेस." सावंत चिडूनच बोलले.

"तेच तर मी करतो आहे. माइंडिग युअर बिसिनेस इज माय बिसिनेस. नाही कळले न. कळेल हळू हळू. प्रभुदेसाई, तुम्ही फार पटदिशी रागावता बुवा. जर तुम्ही माझं ऐकलत तर  निश्चित आपली भविष्यात भेट व्हायची शक्यता आहे. नाही तर मात्र प्रॉब्लेम आहे खरा." ह्या त्याच्या बोलण्यात केवळ गूढपणाच नव्हता तर एक छद्मी धमकीसुद्धा होती. 

"म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट्ली काय म्हणायचे आहे?" तो सावंतांना बोलण्यात ओढू पाहत होता आणि सावंतही त्यात खेचले जात होते. 

आता त्याने आपल्या हँडबॅगमधून बिस्किटांचा पुडा काढला. "घ्या, हे बिस्कीट खा. राग थोडा शांत होईल. आता इथे गाडी थोडा वेळ थांबेल. आपण उतरून चहा घेऊ."

सावंतांना पेपरात वाचलेल्या घटना आठवल्या. बिस्कीट खायला देऊन बेशुद्ध करून लुटणारे भामटे! त्यांनी मानेनच बिस्कीटाला नकार दिला.

"बिस्कीट नसेल आवडत तर हे संत्र घ्या. संत्र देखील नको? कमाल आहे."

सावंतांना वाईट वाटले. आपण उगीचच त्याला लफंगा समजत गेलो. 

बस थांबली. थांबली ती देखील एका वैराण जागी. इथे ना टेकायला काही होते ना खायला. एक चहाची टपरी मात्र होती. इथे कशी थांबली बस? 

सावंतांनी ड्रायव्हरला विचारावेसे. पण मग त्यांनी विचार बदलला. उगाच काही खोचक भोचक अपमानास्पद ऐकायची त्यांची तयारी नव्हती. चहाची ऑर्डर देण्याआधी कैवारीला विचारावे म्हणून ...

कैवारी इलेक्ट्रिकच्या खांबावर चढून स्वतःचा मोबाईल तारांना जोडत होता. हा काही अचाट आचरटपणा होता. ह्याला आता विजेचा झटका बसणार! सावंत त्याला ओरडून सावधान करणार तीपर्यंत त्याने बोलायला सुरवात देखील केली.

"हो हो भेट झाली. मला फुल डिटेल पाठवून द्या." एवढेच बोलून कैवारी खाली उतरला. 

"कैवारी, तुम्हाला विजेचा झटका बसला असता म्हणजे?"

"विजेचा झटका? तो काय म्हणून? वीज तर आपल्याला मदत करते." कैवारी सावंतांना नवीन फिजिक्स शिकवू पहात होता. सावंतांना त्याच्याशी वादविवाद करायची इच्छा नव्हती.

चहा पिऊन झाल्यावर सगळे बसमध्ये चढले.

कैवारीच्या मोबाईलने आवाज दिला. त्याच्यासाठी बहुतेक संदेश असावा. बराच वेळ तो वाचत होता. 

"मिस्टर प्रभुदेसाई-कम-सावंत, तुम्ही मला तद्दन खोटी माहिती दिली. का? तुमचा माझ्यावर विश्वास नाही? हे पहा, तुमची केस कंपनीने माझ्याकडे दिली आहे. मी तुम्हाला मदत करत आहे.(तशी वरिष्ठांची इच्छा आहे) नाहीतर मला तुमच्याशी काहीही देणेघेणे नाही. समजलात?" कैवारीचा आवाज थोडा चढलेला होता. 

सावंत थोडे गोंधळलेले थोडे टरकलेले होते. कोण आहे हा? माणूस का अमानुष? 

सगळा धीर एकवटून त्यांनी प्रश्न केला, "माझी केस? कोण आहात तुम्ही? माझं आडनाव तुम्हाला कसं समजलं?"

"मी 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स अनलिमिटेड' कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे.. फ्युचर्स म्हणजे तुमचे भविष्य आणि ऑप्शन्स म्हणजे तुमच्या हाती काय विकल्प आहेत ते." कैवारीने सावंतांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सावंतांचा गोंधळ अजून वाढला.

"काय आहे माझे भविष्य आणि काय आहेत माझे विकल्प?" 

"ते मी तुम्हाला सांगणार नाहीये. फक्त एकच सांगतो, तुम्ही पहिली बस पकडून परत घरी जा. तुमच्या मिसेसला-पुष्पाला- आणि तुमच्या होणाऱ्या मुलीला म्हणजे निशिगंधाला तुमची नितांत गरज आहे." 

हे मात्र धक्कादायक होते.

ह्याला माझे नाव, माझ्या पत्नीचे नाव, आणि आमच्या होणाऱ्या मुलीचे नाव कसं माहित झालं? विशेषतः माझ्या भविष्यात येऊ घातलेल्या छकुलीचं नाव? ज्या दिवशी पुष्पाची सोनोग्राफी केली त्या रात्री बेडरूममध्ये एका रोमांटिक क्षणी आम्ही दोघांनी निशिगंधा हे नाव निश्चित केले होते. ते ह्या त्रयस्थापर्यंत कसं पोचलं? का कुणास ठाऊक पण ह्या कैवारी समोर मी नागडा उघडा उभा आहे अशी भावना झाली. पूर्वी कधीतरी नाडीग्रंथाविषयी मी वाचले होते. त्यात म्हणे भविष्य जाणण्यासाठी समोर बसलेल्या इच्छुकाच भूत, वर्तमान, भविष्य आपोआप उमटतं. कैवारीच्या हातातलं यंत्र नाडीग्रंथाची नवयुगातील आवृत्ति तर नव्हती? का ह्याला कर्णपिशाच्च वश झाले आहे. हा मघाशी खांबावर चढून कोणाशी बोलत होता? सारेच रहस्यमय होते.

तू माझा कैवारी

अतुल प्रभुदेसाई
Chapters
भाग १ भाग २ भाग ३