६ मुखवटे १-३
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
आज गावाहून मामाचा फोन आला .त्याने सांगितलेली बातमी ऐकून माझ्या लहानपणच्या आठवणी जागृत झाल्या .लहानपणी आम्ही मामाच्या गावाला अनेकदा जात असू.गाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मामाचा वाडा खरेच चिरेबंदी होता. संपूर्ण दिवस हुंदडण्यापेक्षा दुसरा कोणताही उद्योग आम्हाला नसे. मामा सहसा आम्हाला रागवत नसे.मामा कदाचित केव्हा रागावला तर आमची बाजू आजी नेहमी घेत असे.चार दिवस पोरं आजीकडे आली तर तू त्यांना कां त्रास देतोस अशी दाट मामाला खावी लागे. त्यामुळे तो आमच्या फंदात सहसा पडत नसे .
भूक लागली की आजीला किंवा मामीला सांगावे .जे मिळेल ते हादडावे आणि पुन्हा खेळायला जावे असा एकूण आमचा एक कलमी कार्यक्रम असे .आजोबा आजीलाही बोलत नसत आणि मामालाही बोलत नसत .परंतू तेवढीच वेळ आली तर ते आमच्या बाजूने आहेत याची आम्हाला खात्री असे.
मामाचा वाडा मोठा होता .त्याला एक तळघरही होते. तळघराला प्रकाश व वारा येण्यासाठी चारी बाजूंनी छोट्या खिडक्या ठेवलेल्या होत्या .तरीही तळघरात बराच काळोख असे. तिथे बागुलबुवा राहतो, तुम्ही जाऊ नका अशी भीती आजीने आम्हाला घातली होती.त्यामुळे आम्ही तळघरात जात नसू. तळघरात जाण्याच्या दरवाज्याला एक साधी कडी अडकवलेली होती . मामेभाऊ, मामेबहिणी,मावस बहिणी,मावस भाऊ, असे आम्ही सर्व खेळत असताना त्या दिवशी आमच्या मनात काय आले कोण जाणे, आम्ही तळघरात जायचे ठरविले.
तळघरांत बरीच अडगळ होती. तळघरातील अंधुक प्रकाशात आम्ही लपाछपी खेळायला सुरुवात केली .तळघरातील काळोखात आम्हाला लपायला भीती वाटत होती .आमची लपाछपी थोड्याच वेळात संपली .आम्ही तळघरातून वर यायला निघालो. मावळतीची सूर्यकिरणे त्याच वेळी एका नक्षीदार पेटार्यावर पडली होती.आम्ही कुतूहलाने तो उघडला .त्यात एक नक्षीदार लहान पेटी होती .मोठ्या पेटार्याला कुलूप नव्हते.त्याचप्रमाणे छोट्या पेटाऱ्यालाही कुलूप नव्हते.आम्ही तो पेटारा उघडला.त्यात आम्हाला काही मुखवटे दिसले.अंधुक प्रकाशात आम्हाला मुखवटे कसे आहेत,कसले आहेत, ते कळत नव्हते.
बच्चे कंपनी तळघरात दंगा करीत आहेत हे बहुधा मामाच्या गड्याने आजोबांच्या कानावर घातले असावे.आजोबा काटक शिडशिडीत होते .ते जिना उतरून खाली आले. तोपर्यंत आम्ही हाताला आलेले मुखवटे आमच्या तोंडावर चढविले होते.मुखवटे चढवलेल्या एकमेकांच्या तोंडाकडे पाहून आम्ही आणखीच घाबरून गेलो होतो.एवढ्यात आजोबांचा आवाज आमच्या कानावर पडला.आमच्या दंग्यात आजोबा खाली केव्हा आले ते आम्हाला कळलेच नव्हते.आजोबांच्या पाठोपाठ मामाही खाली आला होता.
कधी नव्हे ते पहिल्यांदा व बहुधा शेवटचेही अाजोबा आमच्यावर भयंकर रागावले . तोपर्यंत आजोबांना एवढे रागावलेले आम्ही कधीही पाहिले नव्हते.त्यांनी रागारागाने आमच्या चेहऱ्यावरील मुखवटे भराभर काढून घेतले. ते पुन्हा पुन्हा मोजून छोट्या पेटीत ठेवले.मामाला दोन कुलूपे आणायला सांगितले.छोट्या पेटीला व मोठ्या पेटार्याला कुलूप लावले. पुन्हा कधीही तळघरात पाय ठेवायचा नाही. तळघरात एखादवेळी जनावर(साप) आलेले असते .विषारी असले आणि तुम्हाला चावले तर?आमच्या हाताला पकडून सर्वांना मामाने बाहेर काढले .आजोबांनी तळघरांत जाणाऱ्या दरवाजालाही कुलूप लावले.आम्हाला आजोबा तळघरात गेलो म्हणून रागावले कि आम्ही ते मुखवटे घातले म्हणून रागावले ते आम्हाला कळले नाही.
वर्षे गेली. आजोबा आजी निवर्तले.आम्ही मोठे झालो.मामा आता आमच्या बरोबर बरोबरीच्या नात्याने गप्पा मारीत असे .सहज केव्हातरी तळघर, नक्षीदार पेटी ,त्यातील मुखवटे, यांचा विषय निघाला.त्यावेळी मामाने आम्हाला कधीही न रागावणारे आजोबा एवढे कां रागावले,त्याचे रहस्य म्हणजेच मुखवटय़ांचे रहस्य सांगितले.ते रहस्य ऐकून मी अवाक् झालो.रहस्य ऐकता ऐकता मामा आमची फिरकी घेत नाही ना असा मला संशय आला.
मामाच्या तळघरात चोरी झाली असे तो फोनवर बोलला.तळघरात चाेरण्यासारखे विशेष काही नव्हते.परंतु त्यावेळी आम्ही बघितलेले ते सात मुखवटे चोरीला गेले होते .चोराला त्या मुखवट्यांचे रहस्य अर्थातच माहीत नव्हते .ते मुखवटे कुणी घातले तर त्याचे,आणि मुखवटे घातलेल्याच्या तडाख्यात जो कुणी सापडेल त्याचे काय होणार म्हणून मामा चिंतीत होता.
मामाने सांगितलेले मुखवटय़ांचे रहस्य पुढीलप्रमाणे होते .
मामाच्या पूर्वजांनी,एका अर्थाने माझ्याही पूर्वजांनी केव्हा ते माहित नाही,कां ते माहीत नाही,हे सात मुखवटे तयार करून घेतले की त्यांच्याकडे आले,कसे आले , कांही माहित नाही .मामाच्या खानदानात अनेक पिढ्या ते मुखवटे होते एवढे मात्र खरे .ते मुखवटे कुणीही नष्ट कां केले नाहीत तेही माहीत नाही .मुखवटे कुणी केले तेही माहीत नाही . ते महत्त्वाचेही नाही .मुखवटे काय आहेत ते महत्त्वाचे . मुखवट्यांचे रहस्य मागील पिढी पुढील पिढीला सांगत असे .त्यात मुखवटे नष्ट केल्यास कुटुंबावर काहीतरी संकट कोसळेल असे असावे.केवळ संकट कोसळू नये म्हणून त्या मुखवटय़ांचे पिढ्यान पिढ्या जतन केले जात होते .
एकूण सात मुखवटे आहेत .
~काम ~क्रोध ~लोभ ~मोह ~मद~ मत्सर व ~अंतरंग~
पहिले सहा षड्रिपू आहेत असे आपल्याला पिढ्यानपिढ्या सांगितले जाते .हे शत्रू आहेत की काय याबद्दल मला शंका आहे .हे आहेत म्हणून आपण आहोत. जग चालले आहे.असे माझे वैयक्तिक मत आहे .काही लोकांना यांच्यावर नियंत्रण मिळवायचे असते .नियंत्रण म्हणजे ते पिंजऱ्यात बंद करायचे असतात.नियंत्रण मिळवल्याशिवाय,त्यांना जिंकल्याशिवाय मुक्ती नाही असेही सांगितले जाते.पिंजरा तोडून ते केव्हाही बाहेर येऊ शकतात.मोठमोठ्या साधू संतांचे नियंत्रण हरवल्याच्या कथा पुराणात आढळून येतात .त्यांचा विलास हा चिद्विलास आहे .त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यापेक्षा जर त्यांचे परिणाम आपण पाहत राहिलो तर,म्हणजेच त्यांचे साक्षित्व करीत राहिलो तर, जास्त योग्य नियंत्रण राहील असे माझे मत आहे .त्यांच्यामध्ये आवश्यक असलेला समतोल अापोआप निर्माण होईल.असो.
या सहा षड्रिपूंचे सहा मुखवटे आहेत.हे मुखवटे जादूचे आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत,अमानवी आहेत असे आपण म्हणूया. कोणताही मुखवटा चढवला की मुखवटा त्या व्यक्तीमध्ये विरघळून जातो .तो मुखवटा त्या व्यक्तीचा ताबा घेतो . उदाहरणार्थ
~काम~
हा मुखवटा चढला तर ती व्यक्ती कामविकाराने घायाळ होते .तो विकार त्या व्यक्तीचा संपूर्ण ताबा घेतो .काम विकाराने घायाळ झालेली, सर्व सारासार विवेक सुटलेली व्यक्ती, काय करील कशी वर्तन करील, त्याच्यापासून समाजाला कोणता धोका निर्माण होईल,कोणता त्रास सहन करावा लागेल , त्याची आपण कल्पना करू शकतो. या सर्वांची परिणीती कशात होईल त्याचीही आपण कल्पना करू शकतो .
जी गोष्ट काम मुखवट्याची, तीच गोष्ट सर्व इतर मुखवट्यांची.उदाहरणार्थ
~ क्रोध~
मुखवटा घेऊया.हा मुखवटा जो चढवील त्याचा ताबा क्रोध विकार घेईल.रागाने धगधगत असलेला मनुष्य क्षुल्लक कारणावरूनही केव्हाही कुणाचाही खून करू शकतो.एखाद्याला आयुष्यभरासाठी अपंग करू शकतो .
प्रत्येक व्यक्तीजवळ काहींना काही समतोल असतो.एखादा विकार जेव्हा त्याचा संपूर्ण ताबा घेतो तेव्हा ती व्यक्ती त्याची ती राहत नाही. ती व्यक्ती त्या विकाराच्या आहारी जाऊन आत्यंतिक गोष्टी करण्याची शक्यता आसते.
नेमकी याच गोष्टीची भीती मामाला वाटत होती .त्या व्यक्तीने मुखवटे कां चोरले होते माहित नाही.जर त्याने किंवा ज्याच्या कुणाच्या हाताला ते मुखवटे लागतील त्याने, मुखवटा घातला तर घातक परिणाम होण्याचा संभव होता. ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात येणारा कुणीही यांच्यावर,(वेळप्रसंगी मृत्यूही ) काय परिणाम झाला असता ते सागता येत नाही .
सातवा मुखवटा
~अंतरंग~
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता .तो मुखवटा एखाद्या दुरून तापमान मोजणाऱ्या तापमापकाप्रमाणे होता. मुखवटा चढवल्यावर समोरील व्यक्ती कशी आहे ते तो दर्शवित असे.उदाहरणार्थ एखादा आतंकवादी, दहशतवादी, नक्षलवादी,माओवादी असेल तर तो तसा आहे हे मुखवटा घालून त्यांच्याकडे पाहणाऱ्याला कळे.म्हणजे जाणवे.हे कसे होत होते ते माहीत नाही.
आपल्यापैकी सर्व, व्यवहारात वावरताना कोणता ना कोणता मुखवटा घालून फिरत असतात. सभ्य, शांत, सज्जन,गरीब, श्रीमंत ,सद्गुणी, दुसऱ्याचे मन समजून घेणारा,प्रेमळ, इत्यादी आपले मुखवटे असतात.प्रत्यक्षात मनुष्य वेगळाच काही असतो .ह्या सातव्या मुखवट्यामुळे आंतील खरा मनुष्य बघणार्याला दिसतो. दिसतो म्हणजे जाणवतो.
थोडक्यात असे म्हणता येईल की सहा विकारांचे सहा मुखवटे, घालणाऱ्यांचा ताबा घेतात .तर सातवा मुखवटाही ताबा घेतो परंतु तो मुखवटा घालणाऱ्यांवर चांगला परिणाम करतो . अंतरंग मुखवटा घातलेला मनुष्य ज्याच्याकडे पाहील त्याचे अंतरंग ओळखू शकतो.
सातवा मुखवटा पोलीस, गुप्तहेर खाते, यांना फार उपयोगी पडू शकला असता.
त्यांनी तो मुखवटा घातला की बस्स समोरील मनुष्य दरोडेखोर आहे, करचुकवेगिरी करतो,दहशतवादी आहे ,हेर आहे,नक्षलवादी आहे , माओवादी आहे,कि आणखी कुणी समाजाला धोका देणारा, घातक कृत्य करणारा आहे, हे लगेच ओळखता आले असते.
त्याप्रमाणे चौकशी करून पुरावे गोळा करता आले असते.
*समाजातील अशी कीड नष्ट करण्याला मदत झाली असती.*
*मुखवटे चोरीला गेल्यानंतर त्यांचे काय झाले,ते कां चोरले गेले,त्याचा परिणाम काय झाला,ते पाहणे मनोरंजक ठरणार होते .*
(क्रमशः)
३०/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन