५ मृत्यू सूचना २-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
त्या दिवशी ध्यानातून बाहेर आल्यावर त्याला एकप्रकारचे समाधान वाटत होते.आज त्याला कुणाला तरी ओळखता आले होते.प्रथमच रिकामी खुर्ची दिसली होती .
दुसऱ्या दिवशी तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला.गंगाधर कुठे दिसत नव्हता .त्याने दुसऱ्या शिपायाला आज गंगाधर रजेवर आहे का म्हणून विचारले.
खाली मान घालून तो शिपाई हळू आवाजात म्हणाला.
काल रात्रीच त्याला अपघात झाला . रेल्वे रूळ ओलांडत असताना तो गाडीखाली आला. तिथेच तत्क्षणी त्याचा मृत्यू झाला.
रात्री किती वाजता हा अपघात झाला? सुधीरने विचारले.
रात्री दहा असे शिपायाने उत्तर दिले .
.काल रात्री आठच्या सुमारास त्याला तो शिपाई रिकाम्या खुर्चीवर बसताना दिसला होता .
रात्री दहाला त्याचा मृत्यू झाला होता.
थोडक्यात सुधीरला त्या शिपायाचे भविष्य दिसले होते .खुर्चीवर बसणे ही त्या व्यक्तीच्या मृत्यूची सूचना होती.
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर आपण बसणार होतो हे त्याला आठवले.
तेवढ्यात तो शिपाई बसला होता.सुधीरच्या काळजात चर्रss झाले.
आपण मरता मरता वाचलो असे त्याच्या लक्षात आले. त्या गूढ दालनामध्ये खुर्चीवर बसणे याचा अर्थ मृत्यूला कवटाळणे असा होता.
खुर्चीवर बसलेली सर्व माणसे मेलेली होती.खुर्ची रिकामी होत असे त्यावेळी त्यावरील व्यक्ती कुठे जात होती कुणास ठाऊक ?खुर्चीवर जो बसत असे त्याचा मृत्यू ओढवत असे किंवा ज्याचा मृत्यू व्हायचा असे त्याला खुर्चीवर बसण्याची इच्छा होत असे.यातील सत्य काय होते? सुधीरला तरी ते एक गूढ होते .
आणखी एक विचार त्याच्या मनात आला . आपण समजतो त्याप्रमाणे असेलच असे नाही .ही घटना म्हणजे बोला फुलाला गाठ पडली नसेल कशावरून ?कावळा बसला आणि ढाक मोडली म्हणजे ती कावळ्याच्या वजनाने मोडली असे होत नाही.
तीच घटना पुन्हापुन्हा घडली तरच आपला निष्कर्ष कदाचित बरोबर असू शकेल.आपल्या ध्यान प्राणायामात आपण अशा कुठल्या तरी प्रदेशात जातो कि तिथे भविष्यात येणारा मृत्यू अगोदर कळू शकतो.आपले प्रमेय सिद्ध करण्यासाठी त्या प्रदेशात पुन्हापुन्हा गेले पाहिजे .त्याचबरोबर असाही विचार त्याच्या मनात आला की आपण भविष्यात घडणारी घटना बदलू शकतो का ?तसे असेल तर कुणाला तरी येणारा मृत्यू टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल .
या घटनेनंतर सध्याकाळी ध्यान प्राणायाम बंद करण्याचे त्याने ठरविले होते.नको त्या काळ्या प्रदेशात,काळोखात जाणे.नको त्या दाट अंध:कारमय गुहेतील व नंतरचा जिन्यावरील प्रवास व दालनात उभे राहणे,असे त्याला उत्कटतेने वाटे . त्यावेळी जरी भीतीदायक वाटत नसले तरी नंतर त्याची भीती वाटत असे . परंतु मृत्यू कदाचित टाळता येईल अशी कल्पना मनात आल्यावर त्याने संध्याकाळी ध्यान प्राणायाम सुरू ठेवण्याचे ठरविले .यामुळे दोन गोष्टी साध्य होणार होत्या .आपल्या ओळखीच्या लोकांचे मृत्यूचे भविष्य कळते की कळत नाही ,हे सिद्ध होणार होते.त्याचप्रमाणे भविष्य कळत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करता येणार होता.
पुढील सहा दिवस काहीही घडले नाही .तो त्या काळोख्या दालनामध्ये जात होता .तिथे गर्दीत अंग चोरून उभा राहात होता.कां कोण जाणे, तो प्रवास, ते दालनात उभे राहणे, त्या वेळी भीतीदायक वाटत नव्हते.ध्यानातून बाहेर आल्यावर मात्र त्या अनुभवाच्या स्मरणाने त्याला भय वाटत असे. कोणीही ओळखीचे भेटत नव्हते .सातव्या दिवशी संध्याकाळी ध्यान प्राणायामामध्ये रोजच्याप्रमाणे तो काळोख्या दालनामध्ये पोचला.आज त्यांच्या सोसायटीतील अण्णासाहेब मंचावर खुर्चीत बसलेले होते .आता पर्यंत त्याला मंचावर खुर्चीत कोण बसले आहे ते दिसत नसे .फक्त धूसर आकृती दिसत असे .आज त्याला अण्णासाहेब स्पष्ट दिसले होते. ते त्यांच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीजवळ काहीतरी बोलत होते .ते काय बोलत होते ते अर्थातच एेकू येत नव्हते.
तो ध्यानातून भानावर आला. जागृत झाला . अण्णासाहेबांचे प्राण वाचवता येतील का? वाचविण्यासाठी काय करावे ?मुळात अण्णासाहेबांच्या प्राणाला धोका आहे का ?आपण उगीचच घाबरत नाही ना ?मनाने प्रक्षेपित केलेले दृश्य आपण पाहत होतो की इतरांना न दिसणारे परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले दृश्य अापण पाहात होतो .अशा संभ्रमात तो पडला होता .विविध विचारांनी त्याच्या डोक्यात नुसता गुंता करून ठेवला होता .त्याने थांबा आणि पहा असे धोरण अवलंबण्याचे ठरविले .गंगाधर शिपाया सारखाच अनुभव आला तर मग काय करायचे ते पाहता येईल असा विचार त्याने केला.
दुसऱ्या दिवशी तो उठला तेव्हा अण्णासाहेबांच्या दरवाज्यासमोर गर्दी होती .त्याने आईला काय झाले असे विचारत आईने रात्री अण्णासाहेबांचे हृदयविकाराने प्राणोत्क्रमण झाले असे सांगितले.आता त्यांचा संभ्रम दूर झाला होता .
ध्यानात आपल्या ओळखीच्या किंवा माहितीच्या माणसांच्या मृत्यूची पूर्वकल्पना येते हे जवळजवळ निश्चित झाले होते.
आपल्याला मृत्यू होणार्याचे प्राण वाचवता येतील का ?यावर त्याचा विचार सुरू झाला .मृत्यू नक्की कशाने होणार हे जर आपल्याला कळले तरच प्राण वाचविण्याचा प्रयत्न करता येईल .उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका ,रस्त्यावरील अपघात ,रेल्वेचा, औद्योगिक, अपघात ,आग इत्यादी .ते जर आपल्याला माहित नसेल तर प्राण वाचविण्याचा प्रयत्न कसा करणार?
समजा कांही दिवसांच्या ध्यानानंतर आपल्याला तेही माहीत झाले तरी ज्यांचा मृत्यू होणार आहे त्याना जाऊन काय सांगणार ?त्याना ते खरे वाटेल का ?की लोक आपल्यालाच दूषण देतील?भविष्य अटळच असेल तर आपण ते कसे बदलणार?
शेवटी तो अशा निर्णयावर आला की आपण काही दिवस थांबा आणि पाहा हे धोरण अवलंबू .नंतर काय करावे ते आपल्याला सुचेल.त्याप्रमाणे वागता येईल .
रोज संध्याकाळी तो ध्यानाला बसतच होता.एक दिवस त्याला प्रसिद्ध नट मंचावर दिसला .दुसऱ्या दिवशी विमान अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने वाचले. याचा अर्थ मृत्यूची भविष्य सूचना जरूर मिळत होती .परंतू त्यात बदल घडवून आणणे शक्य दिसत नव्हते.केवळ अटळ मृत्यू त्याला अगोदर कळत होते.
या सर्वापासून परावृत्त व्हायला त्याला एक शेवटची घटना कारणीभूत झाली .एक दिवस संध्याकाळी ध्यानात असताना त्याला स्टेजवर एक गायिका दिसली .ती त्याची आवडती गायिका होती .ती एकामागून एक गाणी स्टेजवर सादर करीत होती .तो आनंदाने ती गाणी ऐकत होता.गाणी एेकता एेकता तो ध्यानातून बाहेर आला.ती गायिका मरणार याचे त्याला अतोनात वाईट वाटले.तो त्या त्याच्या आवडत्या गायिकेला भेटू शकत नव्हता.तिला सावध करण्याचा कोणताही मार्ग त्याच्याजवळ नव्हता .तिला नक्की कशापासून धोका आहे हेच जर कळणार नसेल तर अशा पूर्व सूचनेचा उपयोग काय ?
त्या गायिकेचा पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होता.तो कार्यक्रम संपल्यावर रात्री ती मोटारीतून पुण्याहून मुंबईला येत असताना,पुणे मुंबई महामार्गावर तिच्या मोटारीला अपघात झाला .त्यात तिचे देहावसान झाले .
संध्याकाळचे ध्यान बंद करायचे त्याने ठरविले.पुन्हा सकाळी ध्यान त्याने सुरू केले. पूर्वीप्रमाणे आता तो प्रकाश पाहू लागला.ती काळी गुहा ,काळे दालन, आता कुठेही दिसत नव्हते. त्याचा ध्यानाचा कालावधी वाढू लागला .पूर्वीप्रमाणेच त्याला ध्यानात अानंद समाधान मिळू लागले.तो फक्त सुटीच्या दिवशी सकाळी ध्यानाला बसत असे.सुटी असल्यामुळे कितीही वेळ ध्यानातून बाहेर यायला लागला तरी हरकत नसे.
त्याला रोज ध्यान करायला बसावे असे वाटे.परंतु त्याला तसे करता येत नव्हते.ऑफिसला वेळेवर पोचणे आवश्यक होते . शनिवार रविवारला जोडून त्याने रजा काढली .तो तडक महाबळेश्वरला स्वामी अभयानंदांच्या आश्रमात गेला.त्याने त्याची समस्या व त्याला आलेले अनुभव सांगितले .स्वामी अभयानंद म्हणाले,कोणत्याही प्रकारच्या ध्यानासाठी सकाळची वेळ चांगली असते.सकाळी आपण अंध:कारातून प्रकाशमय होत असतो .ती वेळ तुलनात्मक जास्त चांगली.ध्यानासाठी तन्मय होण्याची गरज असते . सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेला एकाग्रता जास्त होते.प्रकृती धर्मानुसार एखाद्याला सकाळची वेळ चांगली असते तर संध्याकाळची वेळ काही जणांना जास्त चांगली असते .
तुझ्या बाबतीत विचार केला तर तुला संध्याकाळची वेळ सुयोग्य दिसत नाही .सकाळी तुझी एकाग्रता जास्त चांगली असते .परंतु ध्यानातून नियमित वेळेत तू बाहेर येऊ शकत नाहीस.यासाठी मी तुला उपाय सुचवितो .तो उपाय करून बघ. ध्यानाला सुरुवात करताना तू स्वयं-सूचना देत जा.तुला जेवढा वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे दहा पंधरा वीस मिनिटानी मी ध्यानातून बाहेर येईन अशी सूचना ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी द्यावी. स्वयंसूचनेचा चांगला उपयोग होतो .सवयीने तू तेवढ्या वेळेत ध्यानातून बाहेर येशील.वेळेवर ऑफिसमध्ये जाऊ शकशील.
कित्येक जणांना एकाग्रता साधत नाही .त्यामुळे ध्यानात सुद्धा त्यांचे मन इतस्ततः भटकत असते.असे लोक जिथे असतात तिथे ते नसतात!ते ती जागा सोडून सर्वत्र असतात. तुझे तसे नाही .तुझी एकाग्रता फार चांगली आहे.
*सुधीर नवी ऊर्जा घेऊन महाबळेश्वरहून घरी परत आला.*
*त्याने स्वयं-सूचना देण्याला सुरुवात केली .*
*थोड्याच दिवसात तो ठरलेल्या वेळी त्याच्या ध्यानातून बाहेर येऊ लागला*
*आता त्याला कोणतीही समस्या नाही .*
*काळोखातील प्रवास तो आता विसरून गेला आहे .*
* त्याचे त्याला स्मरणही होत नाही .*
* त्याला ध्यानात कोण लोक दिसत होते?
ती गुहा काय होती?
ते दालन कसले होते ?
तिथे दिसणाऱ्या सर्व दृश्याचा नक्की अर्थ काय होता ?
त्याची निदान त्याला तरी कल्पना नाही .
ध्यान करता करता केव्हा तरी त्याला त्याचा आपोआप उलगडा होईलही .*
(समाप्त)
१४/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन