Get it on Google Play
Download on the App Store

४ मृत्यू सूचना १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

सुधीरचा जन्म झाला तेव्हा तो गुटगुटीत होता.वयाच्या आठ वर्षांनंतर तो वारंवार आजारी पडू लागला. कधी ताप कधी खोकला कधी पडसे काहींना काही त्याला नेहमी होत असे.डॉक्टरांना दाखवल्यावर ते अॅलर्जी एवढे  एकच उत्तर देत.तो शाळेत जात होता .प्रथम बालवाडी आणि नंतर  प्राथमिक व माध्यमिक शाळा चालू होती .वेळोवेळी आजारी पडत असल्यामुळे शाळेत त्याच्या बर्‍याच रजा होत असत.

अॅलोपथी होमिओपॅथी आयुर्वेद सर्व प्रकार झाले.डॉक्टर बदलून झाले. स्पेशॅलिस्ट झाले.डॉक्टर किंवा पॅथी बदलल्यावर  सुरुवातीला काही दिवस बरे वाटते असे वाटे .नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होई.

त्यांना कुणीतरी स्वामी अभयानंद यांचे नाव सांगितले .त्यांचा आश्रम महाबळेश्वर येथे आहे .तिथे ते धडधाकट  त्याचप्रमाणे आजारी व्यक्तीला प्रवेश देतात .धडधाकट व्यक्तीला योग शिकायचा असेल तर त्यासाठी एक ठराविक कोर्स आहे .त्यांच्या येथे एमबीबीएस,बीएएमएस व होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत .आजारी व्यक्ती उपाययोजना करण्यासाठी आली असेल तर ते त्या व्यक्तीला व्यवस्थित तपासतात.नंतर त्याच्या आजारानुसार एक यौगिक कोर्स लिहून देतात.त्यामध्ये क्रिया,प्रक्रिया, व्यायाम,आसने,प्राणायाम, इत्यादी गोष्टी असतात .तिथे प्रशिक्षक ठेवलेले आहेत .ते तुम्हाला नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सर्व कार्यक्रम शास्त्रीय पद्धतीने शिकवतात व करून घेतात एकूण पाठ (कोर्स)  पूर्ण करण्यासाठी तीन महिने लागतात .जेवण्याची राहण्याची व्यवस्था तिथे आहे.त्याचे सर्व पैसे तुम्हाला सुरुवातीला भरावे लागतात .तिथे मर्यादित जागा असतात .अगोदरच आपली जागा निश्चित करावी लागते.इत्यादी गोष्टी सांगितल्या. तिथला फोन नंबर,संकेतस्थळ  (वेबसाइट) इत्यादी माहिती दिली. 

सुधीरच्या बाबानी संकेतस्थळावर जाउन (कोर्स)पाठासाठी सुधीरचे नाव नोंदविले .सुधीरची जागा निश्चित केली.ऑनलाइन पैसे भरले .उन्हाळ्याच्या सुटीत सुधीर आश्रमात हजर झाला.सुधीर त्यांच्या  पाठामध्ये  रममाण झाला.रोज पहाटे उठून स्नान  करून नंतर पाठाला हजर राहावे लागे.बरोबर सातला पाठ (कोर्स)सुरू होई .सात ते आठ मुख्य पाठ असे .नंतर व्याख्यान इत्यादी कार्यक्रम असे .तेथे संपन्न पुस्तकालय होते.तिथे योगाबरोबरच अध्यात्म व इतरही अनेक प्रकारची पुस्तके होती .

संध्याकाळच्या  पाठामध्ये मुख्यत: प्राणायाम प्रवचन इत्यादी गोष्टी असत.

सुधीरला झपाट्याने बरे वाटू लागले .पूर्वी तो नेहमी मरगळलेला दिसत असे.

त्याच्या वयाच्या मुलांजवळ जो उत्साह असला पाहिजे तो पाठ पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये आला. महाबळेश्वरहून आलेला सुधीर व पूर्वीचा सुधीर यांच्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर होते .पूर्वी व्यायाम कर व्यायाम कर म्हणून त्याला सांगून घरातील मंडळी दमून गेली होती. आता त्याला व्यायाम कर म्हणून सांगावे लागत नसे .पहाटे उठून स्नान  करून तो योगिक कार्यक्रमाला सुरुवात करीत असे .शेवट अर्थातच प्राणायामाने होत असे .प्राणायामाचेही विविध प्रकार त्याला शिकविण्यात आले होते.ते सर्व तो आनंदाने करीत असे.काही कारणाने प्रात:अान्हिकाशिवाय  त्याला राहावे लागले तर तो अस्वस्थ होई.

आश्रमात राहून त्याच्या मनोरचनेत,त्याचप्रमाणे प्रकृतीमध्ये, आमूलाग्र बदल  झाला होता.काटकुळ्या लुकड्या सुधीरचे रूपांतर हळूहळू एका आरोग्यसंपन्न सुदृढ तरुणात झाले.त्याचे महाविद्यालयात शिक्षण पुरे झाले. तो नोकरीला लागला .त्याचे सकाळचे अान्हिक सुरूच होते.

हल्ली सकाळी त्याला एक वेगळाचा अनुभव येऊ लागला होता .विविध प्रकारच्या प्राणायामांच्या शेवटी तो ध्यान प्राणायाम करीत असे .त्यासाठी त्याला सुमारे दहा ते पंधरा मिनिटे लागत .तो ध्यानामध्ये पंधरा मिनिटांहून जास्त काळ राहू लागला.  कधी वीस मिनटे  तर कधी अर्धा तास या ध्यानात जाऊं लागला.एक दिवस तर तो एक तास झाला तरी ध्यानामध्ये मग्न होता.ध्यानामध्ये त्याचे काळाचे भान हरवत असे .त्या दिवशी त्याला ऑफिसमध्ये जाण्याला उशीर झाला .एखादा दिवस उशीर झाला असता तरी चालले असते .परंतु  रोज उशीर होऊन चालले नसते.त्याने आईला मला बरोबर  साडेआठ वाजता हाक मारीत जा म्हणून सांगितले .त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो ध्यानात असताना आईने त्याला हाक मारली.तो जागृत होत नाही असे पाहून त्याला खांदा धरून हलविले .तो ध्यानातून बाहेर आला परंतु त्याला मोठा धक्का बसला.त्या धक्क्यामुळे संपूर्ण दिवस तो शारीरिक व मानसिक अस्वस्थ स्थितीत होता .दुसऱ्या दिवसापासून तो ध्यान प्राणायाम संध्याकाळी करू लागला.ऑफिसमधून घरी आल्यावर तो स्नान करीत असे .नंतर मृदू आसनावर बसून तो ध्यानाला सुरुवात करीत असे .आता त्याला ध्यानातून कुणीही बाहेर त्याच्या मर्जीविरुद्ध आणणार नव्हते. मर्जीविरुद्ध ध्यानाबाहेर येण्याची गरजही नव्हती. 

ध्यान प्राणायामामध्ये तू काय करतो असे जर कुणी त्याला विचारले असते तर त्याला तसे काही शब्दांमध्ये सांगता आले नसते.मला समाधान मिळते .मला आनंद होतो.मी प्रकाशात असतो . एका वेगळ्याच विश्वात मी असतो.याहून वेगळे कांही त्याला सांगता आले नसते.

असेच काही दिवस गेले. एक दिवस ध्यानामध्ये असताना त्याला सर्वत्र प्रकाशाऐवजी काळोख दिसू लागला .त्याला आज असे कां होत आहे ते कळेना.एका मोठ्या काळोख्या, भिंती व छत नसलेल्या गुहेत अापण चालत आहोत असे त्याला वाटत होते .काळोखात चालता चालता  तो ध्यानामधून जागृत अवस्थेमध्ये येत असे. काही दिवस असेच काळोख्या गुहेमध्ये चालल्यावर त्याला एक दिवस एक जिना लागला.

हा जिनाही काळोखाने भरलेला होता.तरीही त्याला जिन्याच्या पायऱ्या त्या काळोखात  स्पष्ट दिसत होत्या.तो जिना चढू लागला आणि जागृतावस्थेत आला .आपल्याला प्रकाशाऐवजी काळोख कां दिसू लागला?गुहेत आपण कां चालत आहोत?त्याला कसलाच उलगडा होत नव्हता .एक दिवस तो जिना चढून वरती आला .  हा जिना  एका दालनामध्ये त्याला घेऊन आला.हे दालनही काळोखाने भरलेले होते.दालन लांबलचक भरपूर लांब  होते .दालनाच्या टोकाला एक मंच होता.हॉलमध्ये असंख्य खुर्च्या मांडलेल्या होत्या.त्यावर असंख्य  लोक बसलेले होते.एवढा दाट काळोख असूनही त्याला हे सर्व कसे काय दिसत होते हाही एक प्रश्नच होता .मंचावर कुणीतरी  खुर्चीवर बसलेले होते.मंचावर प्रकाश होता .तरीही खुर्चीत कोण बसला आहे किंवा बसली आहे  ते कळत नव्हते.कदाचित दूर असल्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणाने असेल परंतु त्याला खुर्चीवर  बसलेली व्यक्ती दिसत नव्हती. 

हा त्याचा काळोखातील प्रवास जवळ जवळ एक महिना चालला होता.सर्वाना प्रकाशाची ओढ असते.यालाही होती.ध्यानामध्ये बहुधा तो प्रकाशातच असे. त्याला नक्की सांगता येत नसे .परंतू तो आनंदात समाधानात असे एवढी गोष्ट खरी .गेला महिना दीड महिना मात्र  काळोखातील प्रवास सुरू झाल्यावर त्याची उत्सुकता रोज ताणली जात होती . हा प्रवास आपल्याला शेवटी कुठे घेऊन जाणार आहे ते त्याला पाहायचे होते.

दीड महिन्यानंतर तो दालनामध्ये पोचला होता .अजूनही त्याला खुर्च्यांवर बसलेली माणसे  दिसत नव्हती.तरीही ती माणसे आहेत याची त्याला खात्री होती. मंचावरील व्यक्तीही त्याला ओळखता येत नव्हती.ध्यानाला बसण्यापूर्वी रोज त्याला आज आपल्याला काय दिसणार त्याची उत्सुकता असे.एक दिवस त्याला आपल्या शेजारी दोन्ही बाजूला खूप माणसे उभी आहेत असे लक्षात आले.तरीही ती कोण आहेत ते त्याच्या लक्षात येत नव्हते.सर्व खुर्च्या भरलेल्या असल्यामुळे ही माणसे त्याच्यासारखीच दाटीवाटीने उभी होती .   

.     एक दिवस ध्यानामध्ये असताना तो दालनात पोचल्यावर त्याला .एक रिकामी खुर्ची दिसली. त्यावर आपण बसून घ्यावे असे त्याला वाटले .तेवढय़ात त्याच्या शेजारी असलेला एक माणूस त्या खुर्चीवर बसला.त्या माणसाला सुधीरने ओळखले.तो त्यांच्या ऑफिसमधील शिपाई  होता .आत्तापर्यंत त्याला खुर्च्यांवर बसलेल्या माणसांपैकी कुणीही ओळखता आले नव्हते .त्याचप्रमाणे खुर्ची रिकामी नाही म्हणून दाटीवाटीने उभ्या असलेल्या माणसांपैकी कुणालाही ओळखता आले नव्हते .इथे तर सर्वत्र दाट काळोख भरलेला होता .ना छत दिसत होते ना पायाखालची जमीन दिसत होती.ना हॉलच्या भिंती दिसत होत्या.तरीही खुर्च्या त्यावरील आकृत्या दिसत  होत्या.जाणवत होत्या .त्याचप्रमाणे शेजारी दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या आकृत्या जाणवत होत्या .स्टेजवर एवढा प्रकाश असूनही त्याला स्टेजवर खुर्चीवर कोण बसलेले आहे ते दिसत नव्हते. सर्वच अगम्य  गूढ होते. 

केव्हा केव्हा त्याला ध्यानाला बसूच नये असे वाटे.संध्याकाळच्या ध्यानाऐवजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्यान प्राणायाम करावा असे वाटे. महाबळेश्वरला स्वामींच्या आश्रमात जाउन आल्यापासून,जवळ जवळ गेली दहा वर्षे तो ध्यान प्राणायाम करीत होता.परंतु कधीही त्याला असा अनुभव आला नव्हता .ठरलेल्या वेळेत दहा किंवा पंधरा मिनिटांत त्याचा ध्यान प्राणायाम संपत असे. गेले चार महिन्यांपूर्वी अकस्मात तो त्याच्या  ध्यानामध्ये जास्त गढून जाऊ लागला. त्यातून त्याला कुणीतरी जागृत केल्यावर शारीरिक व मानसिक धक्का बसू लागला.असे होऊ नये म्हणून तो संध्याकाळी ध्यान करू लागला.पहिले कांही दिवस  व्यवस्थित गेले.गेले दोन महिने त्याचा हा काळोखातील प्रवास सुरू झाला होता.त्याला त्याचे एक प्रकारचे आकर्षण वाटत होते .रोज त्याला आता पुढे काय होणार अशी ध्यानाला बसण्यापूर्वी उत्सुकता असे.

गेले काही दिवस दालनात  त्याला कुणीच काहीच दिसत नसे.म्हणजे  स्पष्ट दिसत नसे. ओळखता येत नसे.सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत.तरीही एक प्रकारचे गूढ आकर्षण वाटे.

आज त्याला अकस्मात रिकामी खुर्ची दिसली .त्यावर बसण्याचा विचार त्यांच्या मनात आला .तो त्यावर बसणार एवढ्यात एक जण त्यावर बसला .तो त्याला ओळखता आला होता . तो त्यांच्या ऑफिसमधील शिपाई गंगाधर होता .

त्या दिवशी ध्यानातून बाहेर आल्यावर त्याला एकप्रकारचे समाधान वाटत होते.

प्रथमच रिकामी खुर्ची दिसली होती .

आज त्याला कुणाला तरी ओळखता आले होते.

दुसऱ्या दिवशी तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला.नेहमीचा शिपाई दिसत नव्हता .

*त्याने दुसऱ्या शिपायाला आज गंगाधर रजेवर आहे का म्हणून विचारले.*

* खाली मान घालून तो शिपाई हळू आवाजात म्हणाला.*

*काल रात्रीच त्याला अपघात झाला .*

* रेल्वे रूळ ओलांडत असताना तो गाडीखाली आला .*

*तिथेच तत्क्षणी  तो मृत्यू पावला.*

*सुधीरला ध्यानामध्ये त्या शिपायाचे भविष्य दिसले होते.* 

(क्रमशः)

१३/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन