ओटी
आत्ता ! संपला बी भात ? रिकामाबी झाला गंज ? तुले माहित हाय न भाताशिवाय माहं पोट भरत नाही......
बारकी साठी काढून ठेवला हाय वाटीभर .... जेवढे घरात तांदूळ होते तेवढ्याचा भात केला ....... तुमच्या एकट्यालेच वाढला .....
घरातले तांदूळ संपले हाय! राशनचे बी संपले...... मिळालेले तांदूळ बी संपले... आता महागाचे तांदूळ आणाया परवडणार नाही आपल्याले ! टग्या आला की तो बी
भात ,भात करतो... टग्याच्या आईनं घरातील परिस्थिती नवऱ्यासमोर मांडली!
काय.. आन कसं कराचं ते तू पाय! मले रोज भात लागलंच..... भात कमी वाढला म्हणून , परश्याने रागारागाने बायकोला सुनावलं.......आणि ताट आपटून तो जेवणावरुन उठला....
ती तरी काय करणार ! नवरा-बायकोच्या मजुरीच्या पैशात जेवढे जमेल तेवढे राशन आणून ती भूक भागवण्याचा प्रयत्न करायची...... इतक्यात तिचा पाच वर्षांचा मुलगा टग्या..... बाहेरून खेळून आला..!
माय मले बी वाढ व, भूक लागली! म्हणून त्यांनं हातात ताट घेतलं...
ताटातली पिेठल भाकर खाऊन झाल्यावर तो मायला म्हणाला ......माय भात दे की !
अरे .... आजच्या दिसं भात नको मागु...... भात संपला ......
जरासाक देन वं माय ! तो तिकडं वाटीत झाकून दिसत हाय !
अरे ! दूध नाही म्हुण बारकी साठी ठेवलाय चार घास...... तिला लागल की , तुझ्या बापाला बी कमीच वाढला भात आज..... ........
चारा पयकी दोन घास वाढ मले ! म्हणून त्याने ताट समोर केले............. पोराने भातासाठी केलेली विनवणी ऐकून तिने घासभर भात त्याच्या ताटात टाकला ...
माय , तुले त कद़ी रहातच नाही वं भात !
अरं ! भात खाल्ल्यानं अंगात ल ई फुगते म्णत्यात ! म्हुण मी भातच खाण सोडलं हाय!
आन् मी फुगली त मंग माझ्याच्यानं काम कसं हुईल ? तिनं दोन हात बाजुने वाकवून व गाल फुगवून त्याला दाखवले...
खरंतर तिलाही भात खायची इच्छा होत होती पण........ नवरा नुसता भाताचे गोळे गिळायचा गंजातला भात संपेपर्यंत.....
तिनं सांगितलेलं म्हणणं टग्याले काही पटलं नव्हतं ! तांदुळ संपले असेल.... म्हणून आई बहाणा करत आहे हे , त्याला समजायला वेळ लागला नाही...... लहान होता, पण परिस्थितीची जाणीव होती त्याला! तरी पण..… वाटीतला पांढरा भात त्याला खुणावत होता !
ऐव्हढयात पाळण्यात झोपलेली बारकी रडायला लागली......
बारकीचं रडणं ऐकताच त्याची आई जागची उठली लेकीला घ्यायला ! आई पाठमोरी होताच टग्यानं वाटीतला भात ताटातओतला. भरभर घास तोंडात कोंबले आणि हात धुउन तो गडबडीने बाहेर पळाला !
त्याच्या घरापासून थोडे लांब... दुर्गा देवीचे मंदिर होते ! तो व त्याचे सवंगडी रोजच मंदिराच्या बाजूला खेळायला जमत असत. मंदिरात येणारे मुलांच्या हातावर प्रसाद ठेवायचे . मंदिराजवळच पाण्याची हापशी पण होती. खेळताना तहान लागली तर घरी जायचं काम नव्हतं. तिथेच पोरांची तहान भागत असे.... दिवसभर पोरं मंदिराच्या आजुबाजुला खेळत असायचे !
अजून त्याचे सवंगडी खेळायला जमले नव्हते ! आईच्या ओरडण्याच्या भितीने तो घरुन ईकडे पळत आला होता....लवकर आल्याने तिथेच एका दगडावर तो आपल्या सवंगड्याची वाट पहात बसला....
पण.....राहुन राहून ,त्याच्या कानात बहीणीच्या रडण्याचा आवाज घुमू लागला.......आपण उगीचच तिच्या वाटणीचा भात खाल्ला.....
आता आपली आई काय खाउ घालन् तिले !
असा विचार येताच ........ त्याचे बालमन बेचैन झालं .........पस्तावा करु लागलं..... काय करावं.... त्याला काही सुचेना !तो उठला आणि बालसुलभ पद्धतीने तोंडात बोट घालून दुरवर बघत उभा राहिला!
आज शुक्रवार ! देवीच्या मंदिरात दर मंगळवारी व शुक्रवारी ओटी भरण्यासाठी स्त्रिया यायच्या ! त्याची नजर समोर गेली.. लाल व हिरव्या रंगाची साडी नेसून ,हातात ताट घेऊन दोन स्त्रिया त्याला देविच्या मंदिराकडे येतांना दिसल्या..... लाल व हिरव्या चटक रंगाचे त्याला आकर्षण वाटले .......त्या त्याच्याच बाजुने मंदिरात जाउ लागल्या .... आणि त्या दोन स्त्रियाचां संवाद त्याच्या कानी येऊ लागला ......
.............. अगं दर मंगळवार व शुक्रवार ओटी भरायला येते मी देवीची ! घरापासून लांब आहे ....पण देवीच्या पायाशी बसून मनाला जे समाधान मिळते ते दुसरीकडे कुठंहीे नाही.... या निमित्ताने पायी चालणेही होते......
हो नं! तुझ्यामुळे माझेही येनं होतं गं ! आपण दोघी सोबतच येत जाऊ......... पुढच्या वेळेपासून.......
त्यांचे संभाषण ऐकून टग्याच्या मनात विचार आला...... या स्त्रियांनि देवीची ओटी भरली की आपण ते तांदूळ घेऊन घरी घेऊन जाउ ! म्हणजे बारकीची सोय होईल... आनंं आज संध्याकाळी आपल्या घरी सगळ्यांना भात खायला मिळलं........ या कल्पनेने तो सुखावला आणि तो त्या स्त्रियांच्या मागे काही अंतर ठेवून चालु लागला .......
मंदिराबाहेर उभा राहुन तो , त्यांची पूजा संपण्याची वाट पाहु लागला...... पुजा झाली .... दोघींनी देविची ओटी पण भरलीं ..... आरती केली... थोड्यावेळ देवीच्या गाभाऱ्यात बसून झाल्यावर त्या दोघी स्त्रिया मंदिरा बाहेर पडल्या....
त्यांना जातांना पाहुन.... टग्या धावतच आत शिरला आणि एका हाताने शर्टाची झोळी करुन पकडली आणी दुसऱ्या हाताने घाईने घाईने ओटीचे तांदूळ शर्टात घ्यायला सुरुवात केली...........
एवढ्यात , पुजारी आजी बाहेरून ओरडल्या........ चोरी करतोस होय ?
आजीचे ओरडणे ऐकून टग्या घाबरला.... एका हाताने धरलेला शर्ट हातातून सुटला.... आणि ओटीचे तांदूळ खाली पडले .......
नाही.. नाही ...आजी, मी चोर नाही...... माझ्यासाठी नाही, तर.. माझ्या लहान्या बहिणी साठी तांदूळ घेत होतो ! आज घरचे तांदुळ संपले आणि आणायची ही सोय नव्हती म्हणून ....... माझ्या बहीणीच्या वाटणीचा भात मी खाउन टाकला .आता ती रडत आसलं लहाणशीक आहे बहीण माझी दुध बि नसते प्यायलं.... आणी त्याला हूंदका फुटला ! मला चोरी नव्हती करायची आजी.......त्याला हुंदके आवरत नव्हते.......
देवीच्या देवळासमोर खेळणाऱ्या टग्याला पुजारीआजी ओळखत होत्या ......त्यांना त्यांच्या जागी आपला नातू दिसला.... सच्चेपणाने आपली बाजू सांगणारा बहिणीसाठी तळमळणार्या जीवाची त्यांना कीव आली..... त्याचा शुद्ध हेतू पाहून त्या म्हणाल्या .... देवीला तिच्या लेकराची काळजी आहे रे ! तिने या जगात आपल्याला पाठविले ... जिथं तिने चोच दिली... तिथं दाण्या- पाण्याची व्यवस्थाही तीच करते !
पण टग्या... ऐकं ...चोरी करणं हा गुन्हा आहे. या पुढे कधीही दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही. विचारुन घ्यायचे ! आणि मेहनत करुनच पैसे कमवायचे , समजलं का?
चुकलो मी आजी ! टग्याने खाली मान घालून आपल्या चुकीची कबुली दिली!
अजून लहान आहेस तु बाळा, भल्या बुऱ्याची जाण नाही तुला !
बरं ! आज पासून दर मंगळवारी व शुक्रवारी च्या 2 ओटीचे तांदूळ मी तुझ्यासाठी ठेवत जाईल ! येऊन घेऊन जात जा..... तु आणि तुझी बहीण पोटभर खात जा .उपाशी नका राहु....
असे म्हणून ...त्यांनी दोन ओटीचे तांदूळ पिशवीत घालून त्याच्या हातात दिले... येत जा हो बाळ..... म्हणून त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला....त्याला जवळ घेतले ....
त्याने ऐक क्षण देविच्या मुद्रेकडे पाहिले...
आणि पुजारिन आजीला साष्टांग नमस्कार घातला.
आजी ! मी उद्दापासुन हा मंडप झाडायला येत जाईन.....असे म्हणून त्याने ओटीची पिशवी घेऊन घराकडे धुम ठोकली............
ज्योती धनेवार-अलोणे