Get it on Google Play
Download on the App Store

अट

स्वराजला   चांगला जॉब मिळाला आणि मीनाला सुनबाई आणण्याची घाई झाली. अनघाचं स्थळ सांगून आलं . दोन्ही स्थळं ऐकमेकांच्या माहीतीतली होती ,स्वभाव पण माहीती होते आणि विशेष म्हणजे मीना अनघाची टीचर राहून चुकली होती .त्यामुळे मीनाला अनघाचा  स्वभाव, तिचं वागणं, बोलणं ,तिचे छंद सगळ्या गोष्टीची कल्पना होती…आणि दिसायला तर अनघा गोड होतीच ! 

स्थळ माहितीतले असल्यामुळे जास्त चौकशीची गरज वाटली नाही. मीनाने अनघाच्या आईला कॉल केला आणि आपली इच्छा बोलून दाखवली .मीनाचा मुलगा "स्वराज"ही एक ऊत्तम वर वाटल्यामुळे अनघाच्या आईबाबांनी लगेच होकार देऊन टाकला….  आणि सगळ्यांनी एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवलं.  

स्वराज कडून त्याचे आई-बाबा,मोठी बहिण ,जीजु, मावशी व स्वराज आणि अनघा कडून तिचे आई-बाबा आणि अनघा असे सगळे हॉटेलमध्ये एकत्रित आले…

पहिल्याच भेटीत पसंती उरकली ,होकार  ठरला.

पण येतांना फ्रेश मूडमध्ये असणारी अनघा थोडी अस्वस्थ दिसायला लागली...आपल्या एका बोटाने ती भिवयीच्यावर चोळु लागली…

अनघाचं वागणं मीनाच्या लक्षात आलं….तीला अस्वस्थ बघून  मीनाने विचारले , "काय ग अनघा काय झालंय  तुला ? ह्या लग्नाने खुष नाहीस कां तु? अस्वस्थ वाटतेस ? कां  काही   अपेक्षा आहे तुझ्या आमच्याकडून?"

अनघा म्हणाली, "मँडम् !मला तुमच्या सगळ्यांचे स्वभाव आवडले आणि सून म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेल ,पण...... "  तिने अर्ध्यावरच आपले वाक्य सोडले.                                          अनघाच्या आईलाही तिच्या बोलण्याचे नवल वाटले ,ही मुलगी घरात तर काहीच बोलली नाही आपल्याला आणि आता काय अट ठेवणार यांच्यापुढे ….. हिच्या अटीमुळे हाता तोंडाशी आलेला घास गेला तर…..थोडं टेन्शन आलं त्यांना...

अनघाच्या 'पण'मुळे सगळ्यांनी तिच्याकडे भिवया उंचावून बघितलं...

मीनाला वाटलं सगळं काही छान जुळून आलंय.माझ्या पसंतीची सुन आणायला मी निघाली होती…. माझ्या मुलाच्या स्थळा सारखं स्थळ शोधूनही सापडणार नाही हिला, आता काय अट असेल हीची आता ! उगीचच विचारलं आपण हिला  अपेक्षेबद्द्ल…. "आम्ही नवराबायको दोघे आमचा वेगळा संसार थाटु "असं तर नाही न म्हणणार ? माझ्या सगळ्या पुढील स्वप्नावर पाणी तर नाहीन फिरविणार , ही पोरगी?  आजकाल काही भरवसा नाही  मुलींचा…"                        ऐका क्षणात मीनाच्या मनात  अनेक नकारात्मक विचार  येऊन गेले…. नाही, नाही तशी नाहीये  अनघा ! मग काय बरं अपेक्षा असेल  हीची !ऊगाच अनघाला तिच्या अपेक्षा विचारल्या… हिच्या अपेक्षा आपल्याला मान्य नसल्या तर….."अति घाई संकटात नेई"... मीनाने स्वतःलाच कोसले!

सगळ्यांना विचारात बघून अनघा  थोडी संकोचुन म्हणाली...."तसं विशेष काही नाही पण मँडम, तुम्हा सगळ्यांना परफ्यूम आणि  डिओचा वापर करायला आवडतं असं दिसतयं. पण या परफ्युमच्या सुवासाने माझं डोकं दुखतं..  मला त्रास होतो  आणि AC चाही त्रास होतो मला.... बघा काय ते ठरवा…"

अनघाच्या आईच्या व मिनाच्या दोघींच्याही मनावरचं टेन्शन दूर झालं.!  मीना म्हणाली…"बस,ऐव्हढंच?  किती टेन्शन दिलं तू आम्हाला!"

"अगं तुझ्या सारखी सुन मिळणार असेल तर आम्ही या सर्व गोष्टींचा वापर  टाळु !"             असे म्हणून मीनाने अनघाच्या तोंडात पेढा कोंबला.... सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि सर्वांनी  हसत हसत एकमेकांना पेढे भरविले!

अनघाच्याही चेहऱ्यावर गुलाब फुलले होते. आपली काळजी घेणारी   आपल्या म्हणण्याचा विचार करणारी सासुबाई व  सासरचे लोकं आपल्याला मिळाले म्हणून….. ती लगेच उठून सगळ्यांच्या पाया पडली आणि स्वराज कडे एक तिरपा कटाक्ष टाकुन गोड हसली….