ह-ल-वा तिळाचा
(तिळसंक्रांत स्पेशल)
अगं निशा !
बघु , तुझ्या हलव्याला काटा कसा जमलाय तो?
बाजूच्या बंगल्यातील नवीन आलेली सून निशा बाहेर आलेली दिसताच "ताराबाईने" म्हणजे माझ्या आईने भिंतीच्या अलीकडून तिला विचारले…..
प्रत्युत्तरादाखल निशा म्हणाली…….
"काकू पाक करून ठेवला आहे, उद्यापासून घेईन करायला आणि थोडा काटा आला की नक्की दाखवेन तुम्हाला!
शेजारच्या सगळ्या बायका नवीन आलेल्या या सुनेची खूप तारीफ करायच्या...म्हणायच्या नवीन आलेली शिर्र्क्यांची सून खूप हुशार आहे... आणि शिर्केबाई म्हणाल्या होत्या यावर्षी नवीन सुनबाईला हलवा करायला देणार! तसंही शिर्क्यांच्या कुटुंब मोठे असल्याने त्यांच्याकडे तिघीजणी वेगवेगळा हलवा करायला घ्यायच्या...
तिचं बोलणं ऐकून माझी आई म्हणाली…
" हो का !
दुसऱ्या दिवशी शिर्क्यांची मोठी सून आपण केलेला हलवा घेऊन भिंतीपलीकडे उभी राहिली आणि तिने माझ्या आईला आवाज दिला ….
काकू बघा हो ,मी केलाय "हलवा" !
माझ्या आईने तिच्या हातातल्या पांढर्याशुभ्र रुमालात धरलेल्या हलव्या कडे निरखून बघितले आणि म्हणाली
" मस्तच जमलाय बघ तु केलेला "हलवा" !
संक्रांत जवळ आली की अशा प्रकारचा संवाद आमच्या लहानपणी जवळजवळ सर्वच घरी ऐकू यायचा….
"परफेक्ट "हलवा करणेम्हणजे आपल्या सुगरण पणाचे हळदी कुंकाच्या निमित्त्याने चारचौघीत प्रदर्शन करणे असायचे... हळदीकुंकवाच्या निमित्त्याने ग्रुहिणी एकमेकीच्या कलेचे कौतुक करायच्या . ज्या ग्रुहीणीचा हलवा पांढरा शुभ्र, सुंदर ,काटेदार असायचा तिचे कौतुक व्हायचे सगळ्यांकडून, कारण सगळ्यांना परफेक्ट हलवा जमेलच असं नव्हतं….
आम्ही रहायचं त्या वाड्यात चार-पाच घरं होती …. घरची कामं झाली, नवरे ऑफिसला गेले की ,वाड्यातल्या सगळ्या जणी मधल्या अंगणात जमायच्या...गप्पा गोष्टी करायला... हिवाळ्याच्या दिवसात खूप मजा यायची…12वाजले की सगळ्याजणी अंगणात आपापले जेवणाचे ताट घेऊन यायच्या आणि त्या कुडकुडत्या थंडीत उन्हात बसून मस्त जेवण व्हायचे गप्पागोष्टी करत…. केलेल्या पदार्थाचेआदान प्रदान व्हायचे... आणि मग तिथुन सुरू व्हायचे संक्रात जवळ येत आहे ,तीळ कुठून घ्यायचे …."हलवा" करायला केव्हा सुरू करायचा ….वगैरे...
एखादी गृहिणी घरचं काम लवकर आटपूही दुपारच्यावेळी जर बाहेर अंगणात दिसली नाहीतर समजायचे, हलवा सुरु केलायं वाटतं... मग हळूच कानोसा घेतला जायचा ..."तिच्या" घरी काही निमित्ताने चक्कर व्हायची... हळूच डोकावले जायचे , चौकशी व्हायची, हलव्याचा काटा जमलाय की नाही बघीतले जायचे….
आईच्या मागेमागे मीही जायचे आणि त्यांचे संवाद ऐकत बसायचे, मला गंमत वाटायची ह्या बायका त्यांच्या हलव्याला एवढे कां महत्व देतात? साखरेच्या पाकात घोळलेला तो तिळाचा दाणा गोड तर लागणारच!
माझ्या आईचीही गडबड सुरु झाली….संक्रांतीच्या आठ दिवस अगोदर आईने हलवा करायला सुरुवात केली….
त्या काळी स्वयंपाकासाठी" चुलं" वापरली जायची आणि मग त्या लाकडं जळाल्यानंतर निघालेले निखारे विझवुन कोळशे म्हणून शेगडीत वापरले जायचे…
आईने जास्त आच नको म्हणून एक छोटीशी लोखंडाची शेगडी घेतली... त्यात चार-पाच कोळशे घातले आणि पेटायला ठेवले ...दोन पितळेचे छोटे छोटे टोपले तयार ठेवले… हाताशी धरायला दोन पांढरेशुभ्र रुमाला एवढे कापड घेतले….आणि हलवा करायला सुरुवात केली.. मीही तिच्या बाजूला जाऊन बसले…
ज्योती अलोणे...
प्रथम तीने साखरेचा फुलपात्र भर साधा पाक तयार करून घेतला…पाकात चार पाच थेंब दुधाचे टाकले त्यामुळे पाकातली मळी वर आली.. त्याकाळी साखर मळकट असायची एवढी पांढरीशुभ्र साखर मिळत नव्हती…. तो पाक तिने पांढर्या शुभ्र कापडातुन एक दोन वेळा गाळुन फुलपात्रारात काढून घेतला…. आणि मग हलवा करायला सुरुवात झाली…. शेगडी वर टोपले ठेवून ते थोडं गरम होत आलं की त्यात स्वच्छ निवडून ठेवलेले दोनचमचे पांढरेशुभ्र तीळ घातले आणि ते हाताच्या बोटाने सरकवू लागली... ते थोडे गरम झाले त्यात फुलपात्रातल्या असलेल्या बारीकश्या चमच्याने पाकाचा फक्त एकचथेंब त्या तिळावर घातला….. सुरुवातीला तीळावर पाक घातला की तिच्या बोटांना गरम तिळाचे चटके बसत होते... पण ते कोरडे झाले की परत त्यात एक थेंब टाकून ते ती हलवत रहायची... असं करता करता तिळावर पाक चढत गेला... आता साखरेच्या पाकाने तिळाचा आकार मोठा होऊ लागला…. तसं पाकाच्या थेंबाची संख्याही वाढत वाढत गेली. सतत 2...3 तास एकाग्रचित्ताने तिळावर पाकाचे थेंब टाकत तिचं हलवा करणं सुरू होत…. आता कुठे तिळाला काटा येऊ लागलेला होता….
पाच वाजत आले आईने हलवा करण्याचे बंद केले ...हलवा एका पांढऱ्या शुभ्र रुमालात गुंडाळून वाटीत घालून झाकण ठेवुन दिला. काम झाल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी तीने हलवा करायला घेतला . मला फार गंमत वाटत होती... मी आईला म्हटले …
आई, मी बघू हलवा करून?
आई म्हणाली.. "हो, ये ! बघ तुही करून... तुलाही करता यायला हवा हलवा!
तिळ्याच्या दाण्यावर पाक टाकून तो हलवताना प्रथम माझ्या बोटांना चटके बसले, पण नंतर त्या दाण्यावर पाकाचे आवरण चढुन त्याला काटे येतांना बघुन आनंद वाटायला लागला…..
आई म्हणाली" अगं छान काटा आलाय" पण जरा जपुन हं!आता जरा हळूवारपणे जपुन हलव त्याला, काटे झडायला नकोत!
काटे झडायला नकोत म्हणुन अगदी काळजीपुर्वक , लक्ष देऊन मी तो हलवत होती. हो, उगाच मेहनतीवर पाणी पडायला नको….. जसजसा दाण्याचा आकार मोठा होऊ लागला तसतसा मनाला आनंद मिळत गेला... सलग तीन दिवस मी आणि आईने आळीपाळीने त्या तिळाच्या दाण्यावर पाकाचे आवरण चढविले आणि एकदाचा पांढराशुभ्र हलवा तयार झाला…..
त्या हलव्याचा आकार ,त्याचा पांढराशुभ्र रंग आणि त्याचा काटे बघून मनाला खूप आनंद झाला…. आपली मेहनत फळाला आली म्हणून आईच्या चेहऱ्यावरही हसू फुलले… आईने तो हलवा हातावर घेतला आणि वाड्यातील सगळ्या बायकांना कौतुकाने दाखवला...
दोन चमचे तिळाच्या दाण्याचा काचेची बरणी भरुन झालेला हलवा बघून मलाही कौतुक वाटले….
संक्रांतीच्या सणाला तिळगुळा सोबत हळदी-कुंकवाच्या दिवशी हातावर ठेवलेला पांढराशुभ्र हलवा बघताना बायका खूष व्हायच्या ….. त्या हलव्यावर चर्चा व्हायची ……. करणाऱ्या बाईचे कौतुक व्हायचे….यजमानीनबाई मोठ्या कौतुकाने हलवा कसा तयार केला हे सांगायची.
कुणाच्या घरी गेल्यानंतर जर हलवा मळकट असला तर ती नम्रतेने ते सांगायची…
"अहो यावेळसची साखर मळकट होती त्यामुळे यावेळेस हलवा पांढराशुभ्र झाला नाही…" कुणाच्या हलव्याचा काटा बोथट असायचा ती म्हणायची ….
"अहो यावेळेस हलवा करायला घ्यायला उशीरच झाला ...जरा घाईच झाली.. त्याच्यामुळे लवकर लवकर करतांना सुरवातीलाच काटे झडले…
प्रत्येक घरी हळदीकुंकवाला गेल्यानंतर हातावर हलवा आला की तो निरखून बघून ,त्याची चर्चा या बायका का करतात ,हे मला त्यावेळी कळत नव्हते…..
पण आता वाटतं त्या "हलव्यात" संसाराचं "गमक" लपलेलं होतं !
नववधू सासरच्या नवीन घरात पाऊल ठेवते, तेव्हा ती तिळाच्या दाण्यासारखी असते... संसार रुपी गरमभांड्यात पडल्या नंतर ती थोडी तडतडते ,त्यावर अनुभवाच्या साखरेच्या पाकाचे थेंब पडताना अंग भाजल्या जात….मन पोळल्या जातं …..पण जीवनात येणार्या चांगल्या- वाईट अनुभवांनी तिचं नवंरूप घडत जातं….. वयाच्या चाळीशीनंतर स्त्रीवर जे समजदारीच आवरण चढतं, त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यातफरक पडतो... ती परीपक्व होऊन….तिच्या व्यक्तीमत्वाला वेगळीच झळाळी प्राप्त होते… त्यावेळी ती तिचं एक स्वतंत्र अस्तित्व ती निर्माण करत असते…
तिळाच्या दाण्यासारखे स्निग्ध आणि साखरेचा पाक पडल्यानंतर चमकदार तयार होणाऱ्या देखण्या हलव्याच्या दाण्यासारखं तिच ते रूप मुलांना आणि पती देवांना तर भावतंच ,पण सर्वांचीच दाद मिळवून जातं…..
पोस्ट आवडली असल्यास जरूर शेअर करावी...
(समाप्त)
ज्योती धनेवार-अलोणे