Get it on Google Play
Download on the App Store

निरोप

त्याने एकदा डोंगराखाली दूरवर पाहून दीर्घश्वास सोडला. चंद्रवर्मा दमला आहे हे पाहून कपालिनी कालसर्पाला म्हणाली

"कृष्णसर्पा..! घे तुझें मानव रूप. मी तुला ते परत देत आहे. आज पासून तूं स्वतंत्र आहेस. तुला वाटेल तिकडे तुला जाता येईल."

असे सांगून तिने काही तरी मंत्र म्हटला आणि आपली जादूची कांडी फिरविली.

सुंदर सहा फूट उंच तरुण त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने कपालिनीला लांबून नमस्कार केला आणि म्हणाला कपालिनी

“मी तुझ्या या उपकाराबद्दल आभारी आहे. जन्मोजन्मी मी या उपकाराची परत फेड करू शकेन असें मला वाटत नाही."

असे सांगून त्याने प्रथम कपालिनीला व नंतर चंद्रवर्माला नमस्कार केला.

“तुझें पूर्वी काय नाव होते हे मला माहीत नाही. सर्पकेतु नांवाचा माझा एक शत्रु आहे. तूं माझा मित्र आहेस. म्हणून मी तुझें नांव कालकेतु असें ठेवितो." चंद्रवर्मा म्हणाला.

"कबूल...! मला हे नांव फार आवडले आहे. मी एक दिवस खात्रीने तुझ्या शत्रूचा वध करून आपलें कालकेतु हे नांव सार्थक करीन." तो तरुण म्हणाला.

नंतर तो तरुण डोंगरावरून खाली उतरला. तलावाकाठच्या मळ्यांत जाऊन त्याने निर- निराळ्या प्रकारची फळे तोडून आणली. तिघांनी मिळून पोटभर फळे खाल्ली आणि पाणी पिऊन थोडा वेळ विश्राम केला. थोडा वेळ विश्राम करून चंद्रवर्मा व कालकेतु दोघांनी मिळून शंखाच्या पूजागृहाच्या पायावर कपालिनीसाठी एक घर बांधण्यास सुरवात केली व संध्याकाळपर्यंत तें काम पुरे देखील झाले. त्या घरांत त्यांनी सर्वांनी ती रात्र काढली. मध्य रात्र झाली तरी चंद्रवर्माला मात्र झोप आली नाही.

आपल्या पुढील आयुष्याबद्दल विचार त्याच्या मनात घोळत होते. कपालिनीच्या मदतीने आपले राज्य परत मिळविण्याची स्वप्न आता लयास गेली होती. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

आपल्या वडिलांचा विश्वासघातानें खून करणारा सर्पकेतु आतां माहिश्मतीच्या सिंहासनावर बसला असणार व प्रजेचा छळ करीत असणार. त्याला हरवून परत आपले राज्य मिळविणे म्हणजे सोपे काम नव्हें. मोठ्या सैन्याची जमवाजमव करावी लागेल आणि किती खर्च होईल! मला हे एवढे सैन्य कोठून मिळणार आणि धन तरी कोठून मिळणार? याच विचारांत चंद्रवर्माला झोप लागली नाही. तो उठून बाहेर चांदण्यांत फिरत विचार करू लागला. थोड्या वेळानें कालकेतूची झोप मोडली. चंद्रवर्माला जागेवर न पाहून तो उठून बाहेर आला व विचारलें

"अहो..! इतक्या लवकर उठून काय करता..??”

कपालिनी जवळ जाऊन तिचा निरोप घेतांना म्हणाला

"आता मला पुढला मार्ग पाहिला पाहिजे, तूं आपल्या शक्तीप्रमाणे प्रयत्न केलास, पण तुला यश मिळाले नाही. नाइलाज...!”

कपालिनी आशीर्वाद देत म्हणाली

“वर्मा..! तुझ्यावर किती संकट ओढवली तरी माझी खात्री आहे की तुला तुझें राज्य परत मिळेल. नंतर चंद्रवर्मा कपालिनी व कालकेतूचा निरोप घेऊन डोंगराच्या पायथ्याशी आला.