शंखाचा ध्यास
आता तो अनायासे तें अंतर कापून आला होता. परंतु दुसरा प्रश्न उभा होताच, शंख कसा मिळवावयाचा? या प्रश्नावर तो मनातल्या मनांत उहापोह करीत असतां एक भयंकर आवाज त्याला ऐकू आला. चंद्रवर्मा दचकून ताठ उभा राहिला. पुन्हां तो आवाज ऐकू आला. तो आवाज त्याच्या परिचयाचा होता. तो त्या अग्निपक्ष्याचा आवाज होता. गरुड पक्ष्याच्या पंखांत तो बसला असतांना अग्निपक्षी तेथे आला होता व त्याने येतांना व जातांना अशाच प्रकारचा विचित्र आवाज केला होता. त्यावरून तो पक्षी जवळपास कोठे तरी असला पाहिजे हे त्याने ओळखलें. तो जास्त सतर्क होऊन ऐकू लागला. आतां आपण शंखाच्या पर्वताजवळ पोचलो आहों या गोष्टीची त्याला शंका राहिली नाही.
आजूबाजूला त्या शंखाचे हेर निरनिराळी रूपे घेऊन हिंडत असणार. या अग्निपक्ष्याला दिवसां काही दिसत नाही. म्हणून त्याच्या पासून आपल्याला दिवसां तरी काही धोका नाही. पण त्या शंखाचें आणखी हेर कोण आहेत कोण जाणे..! चंद्रवर्मा काही वेळ हाच विचार करीत की पुढे जावे की नाही, तिथेच बसला होता. नंतर तो धीर करून उठला. येणाऱ्या कल्पित संकटाची भीति बाळगून स्वस्थ बसण्यांत शहाणपण नाही, संकट आले की त्याला तोंड देण्याचा मार्ग ही निघेल, असा विचार करून त्याने एका ओढयावर जाऊन तोंड धुतलें. घोटभर पाणी प्याला व झाडावर चढून काही आवे तोडले आणि खाऊं लागला. एका झाडावर चढून त्याने विश्रांति घेतली.
रात्र होऊन काळोख पडल्यावर पुढे जावयाचे त्याने मनाशी ठरविले. कारण काळोखांतच शंखाच्या पर्वतावर चढणे जास्त सोईचे व कमी धोक्याचे होईल असें त्याला वाटले. झाडावर पडल्या पडल्या त्याला छान झोप लागली व त्याला स्वप्ने पण पडू लागली. सूर्य ऐन डोक्यावर आला तेव्हा देखील त्या झाडींत त्याला ऊन लागले नाही. म्हणून केव्हां सूर्यास्त झाला हे सुद्धा त्याला कळलें नाही. चांगलाच काळोख पडल्यावर देखील तो झोपूनच होता. रात्री एकाएकी त्याची झोप मोडली, त्या वेळी दाट काळोख पडला होता. शेजारच्या तलावांतून लाटांचा मंजुळ आवाज येत होता. वाऱ्यामुळे पानांचा सुळसुळाट ऐकू येत होता. तरी वातावरण शांतच होतें. त्याने विचार केला, फार रात्र झालेली दिसते आहे. पण आपण अंगिकारलेले काम पार पाडण्यास हीच वेळ चांगली आहे.
“डोंगरावर चढून शंखाच्या पूजागृहांत एकदा डोकावून तर पाहूं या...!”
असा विचार करून चंद्रवर्मा झाडावरून खाली उतरला. एकदा आपली तलवार ठीक आहे की नाही पाहून घेतली आणि निघाला. काळोखांत झाडा झुडपांतून लपत छपत तो डोंगराच्या दिशेने काही अंतर चालुन गेला. कोठे तो अग्निपक्षी येतो का, हे पहात तो एक एक पाऊल पुढे टाकत त्याच्या मनाने का कोणास टाऊक त्या पक्ष्याची धास्ती घेतली होती. तोच आपल्या कामांत प्रथम विघ्न आणणार आहे, असे त्याला वाटले. तो पक्षी येथे नसेल तर मी निर्विघ्न पणे शंखाच्या पूजागृहापर्यंत खास पोचू शकेन व काम उरकून परत येऊ शकेन.
चंद्रवर्मा डोंगराकडे जात असता अकस्मात त्याला कोणाचे तरी कण्हणे ऐकू आले आणि त्याबरोबर त्याच्या कानावर “वर्मा" असे शब्द पडले. त्याचा विश्वास बसेना स्वतःच्या कानांवर. हा आवाज तर त्या कपालिनीचा आहे. ही इकडे कशी आली? रात्री गरुड पक्ष्यांना त्या अग्नीपक्ष्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच ते कपालिनीला उचलुन घेऊन आले वाटते. तो
"कपालिनी!"
असे म्हणत ज्या बाजूनें तो आवाज आला होता त्या दिशेने चालु, लागला.