Get it on Google Play
Download on the App Store

५ नि-शब्द २-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

कांही दिवसांपूर्वी चॅनेल सर्फिंग करताना तिने जुना "खामोशी" हा धर्मेंद्र व राजेश खन्ना यांचा सिनेमा पाहिला होता .त्याची तिला आठवण झाली.

आपली वहिदा रहमान तर होणार नाही ना असाही एक विचार तिच्या मनात आला .

त्या विचारांबरोबर एक हास्य रेखा तिच्या चेहऱ्यावर उमटली .  

भविष्यकाळच काय ते ठरवणार होता.

त्या दिवशी महेशची बहिण व भाऊ  त्याला भेटायला आले होते.बहिणीजवळ तिने महेशच्या आवडी निवडीविषयी चौकशी केली .त्याअगोदर तिने स्वतःची ओळख डॉक्टर दिशा म्हणून तिला सांगितली. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यास मला उपचारांची दिशा ठरविता येईल अशीही कल्पना दिली.महेशला चित्रकलेची व संगीताची आवड आहे असे  त्याच्या बहिणीने सांगितले .तसा तो रसिक आहे.वाचन, प्रवास, यांचीही त्याला आवड आहे.नाटक सिनेमा पाहणे त्याला आवडते .जीवन सर्वांगाने उपभोगणे त्याला आवडते .या घटनेपूर्वी तो अतिशय आनंदी ,सर्वात मिसळणारा,मित्रांचा मोठा गोतावळा असणारा,आनंदी मुलगा होता.त्याचप्रमाणे तो अतिशय भावनाप्रधान आहे .मला माझा पूर्वीचा महेश दादा कुणी मिळवून दिला तर मी त्याची जन्माची ऋणी होईन अशीही भर, तिने तिच्या लाडक्या दादाचे वर्णन करताना घातली.झाल्या घटनेला तो जबाबदार आहे अशी त्याने मनाची समजूत करून घेतली असावी,असा तिचा अंदाज तिने सांगितला .तिच्या बोलण्यावरून ही बहिण त्याची लाडकी असावी आणि हा दादा तिचा फार लाडका असावा याचा अंदाज येत होता.दादांचे वर्णन करताना ती कधीही थकली नसती,आणि बहुधा थांबलीही नसती असे दिसत होते. आपला दादा पूर्वी सारखा व्हावा याची तळमळ तिच्या बोलण्यातून दिसत होती.तिच्या एकूण बोलण्यावरून महेश नातेवाईक,कुटुंबीय, मित्र, शेजारी, सर्वत्र प्रिय होता, हेही तिच्या लक्षात आले.महेश दादा हा त्याच्या बहिणीच्या हिशेबी हिरो होता .  

आईचा मृत्यू आणि दादांचे हे असे हरवणे याचा त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता . मोठ्या डॉक्टरने सांगितलेल्या हकिगतीवरून त्याची भावनाप्रधानता व  झालेल्या घटनेबद्दल स्वतःला जबाबदार धरण्याची मानसिकता तिच्या केव्हाच लक्षात आली होती .बहिणीला भेटल्यावर वाटेल ते करून महेशला पूर्ववत केला पाहिजे अशी शपथ तिने स्वत:जवळ घेतली.अत्यंत भावनाप्रधानता हा गुण कि दुर्गुण वगळला तर महेश एक आदर्श तरुण  आहे असे वर्णन  त्याच्या बहिणीने केले होते .

बहिणीने त्याच्या आवडी निवडीच्या केलेल्या वर्णनानुसार निरनिराळ्या गोष्टी त्याला आणून द्यायच्या, त्याची प्रतिक्रिया पहायची, आणि नंतर पुढील उपचारांची दिशा ठरवायची, असे तिने ठरविले .

दुसऱ्या दिवशी तिने त्याच्या पुढय़ात एक चित्रफलक काही कुंचले व वॉटर कलर्स आणून ठेवले.तो काय करतो ते तिला पाहायचे होते .थोडा वेळ त्याने त्या सर्व सामुग्रीकडे पाहिले.त्याच्या  चेहऱ्यावरच्या काही रेषा हलल्यासारख्या वाटल्या.तो पुढे सरसावला खुर्चीत जाऊन बसला .चित्र फलकावर त्याने एक निसर्ग चित्र काढण्यास सुरुवात केली .चित्र काढताना त्याची एकाग्रता, तन्मयता,पाहण्यासारखी होती .तो स्वतःला हरवून गेला होता .त्या भयानक अपघातानंतर  पहिल्यांदाच तो एवढा आनंदात होता.  सुरुवातीलाच मिळालेल्या या यशाबद्दल व त्याच्या प्रतिक्रियेबद्दल दिशाला आनंद झाला.

तिने दुसऱ्या दिवशी निसर्गचित्रांचे एक पुस्तक आणून त्याच्या पुढ्यात ठेवले.ते पहाण्यात तो दंग झाला.त्याच्या या प्रतिक्रिया समाधानकारक होत्या .त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तो अजूनही रममाण होतो. ती क्षमता त्याने हरवलेली नाही.ही समाधानकारक गोष्ट होती.तो पूर्वीसारखा होण्याची शक्यता भरपूर होती.  त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे पाहून त्याप्रमाणे त्याला त्या त्या वस्तू देण्याची कल्पना कोणाच्याच मनात कशी आली नाही याचे तिला आश्चर्य वाटत होते.तिने दुसऱ्या दिवशी असंख्य चित्रफलक, वॉटर कलर्स, ब्रश आणून ठेवले.रोज तो चित्रे काढण्यात दंग होत होता.  

मोठे डॉक्टर अधून मधून तिच्याशी बोलत असत .त्याचे प्रगती पुस्तक पाहत असत.दिशाचे प्रयत्न व त्याला येणारे यश पाहून त्यांना समाधान वाटत होते.

चित्र काढण्याचा त्याला कंटाळा येईल त्याला दुसरी काही गोष्ट दिली पाहिजे.त्याला संगीताची आवड आहे हे लक्षात घेऊन तिने त्याला ऐकण्यासाठी, नामांकित गायकांची गाणी डाऊनलोड केलेले  यूएसबी आणून दिले .तो बोलता व्हावा म्हणून तिने त्याला कोणते गायक जास्त आवडतात असे विचारले.तो उत्तर देईल याची तिला खात्री नव्हती.परंतु तो बोलला. त्याने मला संगळेच गायक आवडतात परंतु त्यातल्या त्यात पंडित जसराज, पंडित गुलाम बडे अली खाँ,  पंडित भीमसेन जोशी, असे सांगितले . 

त्याला चित्रपट संगीत आवडते असेही त्याने सांगितले.विशेष करून सुवर्णकाळातील हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा यातील गाणी आवडतात असेही त्याने सांगितले .तिने त्याची तीही मागणी पुरी केली .आजपर्यंत तो नि:शब्द होता.तो मुका आहे की काय असे वाटत होते. तो भयानक अपघात झाल्यापासून बोलत नव्हता तो बोलू लागला हेच मोठे यश होते.

तो चित्रे काढू लागला .तो संगीत ऐकू लागला.गाणे ऐकताना तो तल्लीन होत असे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असे.या गोष्टी दिशाचा उत्साह वाढविणाऱ्या  होत्या.त्याला कंटाळा येऊ नये,तो सतत त्याच्याच विचारात गढून गेलेला असू नये,यासाठी दिशाला जाणीपूर्वक प्रयत्न करावे लागत होते .एखाद्या मुलाला त्याच त्याच खेळण्याचा जसा कंटाळा येतो त्याचप्रमाणे मोठय़ा माणसांचेही होते.कांही तरी नवीन खेळणे मिळाले की बरे वाटते .

अजूनही तो त्याला कुणी नातेवाईक भेटायला आल्यावर प्रतिक्रिया देत नसे.त्याचे मौन, त्यांचा  निर्विकार चेहरा,तसाच राहत असे.यामध्ये फरक पडणे आवश्यक होते .भाऊ, बहीण ,वडील, मित्र, नातेवाईक, आल्यावर त्याने त्यांच्याशी बोलणे,त्यांना ओळखणे  गरजेचे होते.तो निश्चितपणे सुधारत असल्याचा तो भक्कम पुरावा असणार होता. दिशाने त्याला बोलते करण्यासाठी त्याच्याजवळ गप्पा मारण्याला सुरुवात केली.दिशाला तो आता चांगला ओळखू लागला होता.तिनेच तिला चित्रे काढण्यासाठी सामुग्री आणून दिली होती. तिनेच त्याला संगीत खजिना आणून दिला होता.

दिशा त्याला त्याच्या घराबद्दल,नातेवाईकांबद्दल , शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, मित्रांबद्दल, प्रश्न विचारीत होती. महेश तिच्याकडे कोर्‍या चेहऱ्याने  पाहात होता.तो जेव्हा काहीच उत्तर देत नाही असे लक्षात आले तेव्हा तिने स्वत:बद्दलच बोलायला सुरुवात केली .ती तिच्या घरचे वातावरण, तिचे भाऊ, तिचे आईवडील, तिचे शिक्षण, तिच्या आशा आकांक्षा इत्यादी माहिती सांगत होती.प्रथम त्याच्या चेहऱ्यावर तिचे बोलणे ऐकताना काहीही भाव उमटत नव्हते जसे कांही त्याला ऐकूच येत नव्हते अशी त्याची प्रतिक्रिया होती.दिशा एकतर्फी भाषण दिल्यासारखे बोलत होती .त्याच्यात काहीच फरक पडत नाही असे पाहिल्यावर एक कल्पना तिच्या मनात विजेसारखी चमकली .

जर आपण आईबद्दल बोलायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये निश्चित फरक पडेल.तिने स्वतःची आई व ती याबद्दल माहिती सांगण्याला  सुरुवात केली.आईचे तिच्यावरील नितांत प्रेम, आईची तिच्यासाठी वेळोवेळी लक्षात येणारी माया ,तिला जरा जरी उशीर झाला तरी आईला वाटणारी चिंता,इत्यादीबद्दल ऐकताना त्याच्या चेहऱ्यावरील स्नायू हलू लागले.त्याच्या चेहर्‍यावर  उत्सुकता दिसू लागली.त्याच्या अपेक्षित प्रतिक्रिया बघून दिशाला समाधान वाटत होते.

त्याच्या आईबद्दल  प्रश्न विचारावे असे तिला एकदा वाटले. परंतू जखमेवर धरलेली खपली निघेल. रक्त भळभळा वाहू लागेल. विषाची परीक्षा नकोच असा पुनर्विचार तिने केला .

त्याला कंटाळा येता कामा नये हेही तिला पाहायचे होते .त्याची उत्सुकता तिला तशीच ताणून ठेवायची होती.ती तिच्याबद्दल रोज एखादी गोष्ट त्याला सांगत असे.त्याचा शेवट अशा प्रकारे करी की पुढे काय होणार याबद्दल त्याची उत्सुकता ताणली जावी.दोन तीन दिवस असेच गेले .तो काहीही प्रतिक्रिया देत नव्हता. अशीच काहीतरी हकिगत सांगताना ती एक दिवस मध्येच थांबली.त्यावर त्याने पुढे काय झाले? म्हणून प्रश्न विचारला.

ती त्याला बोलता करण्यात यशस्वी झाली होती .

यापूर्वी तो फक्त त्याच्या संगीतविषयक आवडीबद्दल बोलला होता.

*तिला इतका आनंद झाला की स्वतःभोवती एक गिरकी मारावी आणि महेशला मिठीत घ्यावे असा मोह तिला झाला .*

*आपल्या डॉक्टरी पेशाला हे शोभणार नाही असे तिच्या मनात आले. आणि ती जिथल्या तिथे थांबली.*

*मला आता गेले पाहिजे पुढील हकिकत उद्या सांगेन असे म्हणून तिने त्याचा निरोप घेतला.*

(क्रमशः)

१८/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन