२ संकोचाचे बळी १-२
(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
शेक्सपीयरचे रोमिओ आणि ज्युलियट हे नाटक सर्वांनाच माहीत आहे .दोन कुटुंबातील खानदानी वैरामुळे दोन तरुणाना लग्न करता आले नाही. ज्युलियटच्या आई वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या एका सरदार कुटुंबातील तरुणाशी ठरविले .आपल्या प्रिय व्यक्तीसोबत लग्न न करता दुसऱ्या कुणाशी लग्न करण्याऐवजी आत्मघात पत्करला अश्या भावनेने त्या दोघांनी आत्महत्या केली हे सर्वाना माहीत आहेच .
इथे याच्या उलट परिस्थिती आहे .दोन कुटुंबांमध्ये दाट मैत्री होती .त्या दोघांनीही प्रियकर प्रेयसीने मनात आणले असते तर सहज लग्न झाले असते .परंतु केवळ संकोचामुळे त्यांचा विवाह झाला नाही .त्यांचे परस्परांवर प्रेम आहे आणि ती दोघे एकमेकांशी लग्न करू इच्छितात हेही एकमेकांना कळले नाही.आणि कळले तोपर्यंत फार उशीर झाला होता.या कथेतील तरुण व तरुणी रमा व रमाकांत यांच्याकडे पाहिल्यावर असे म्हणावेसे वाटते की ~जर तुमचे एकमेकांवर प्रेम असेल तर संकोच करू नका. अनमान करू नका.ती किंवा तो होय म्हणेल की नाही म्हणेल, त्याला किंवा तिला राग येईल का? याचा विचार न करता आपले प्रेम बोलून दाखवा.तसे न केल्यास सर्व परिस्थिती अनुकूल असूनही तुमची स्थिती रमा व रमाकांत यांच्यासारखी होण्याचा संभव आहे . ~
तुम्हाला सल्ला देत बसण्याऐवजी किंवा तात्पर्य सांगत बसण्याऐवजी मी प्रत्यक्षात या दोघांची गोष्टच तुम्हाला सांगतो.तात्पर्य आपोपच स्पष्ट होईल .
सदाशिवराव व माधवराव हे दोघेही बालपणापासूनचे मित्र .शाळा कॉलेज बरोबरच शिकले आणि नोकरीलाही बरोबरच लागले .दोघांचे लग्नही चार सहा महिन्यांच्या अंतराने झाली.दोघांनाही पहिला मुलगा झाला . सदाशिवरावांचा मुलगा रमाकांत तर माधवरावांचा मुलगा प्रतीक .सदाशिवरावाना नंतर मूल झाले नाही.माधवरावांना प्रतीक नंतर एक मुलगी झाली तिचे नाव रमा.प्रतीक व रमामध्ये सात वर्षांचे अंतर होते.अर्थातच रमाकांत व रमा यांच्यामध्ये सात वर्षांचे अंतर होते .
रमाकांत लहानपणी लाजरा बुजरा होता .विशेषतः मुलींशी बोलण्याची वेळ आली तर तो फारच संकोच करीत असे .ही त्याची सवय लहानपणापासून मोठा होईपर्यंत तशीच कायम होती.तो माधवकाकांकडे काही ना काही कारणाने अनेकदा येत असे.प्रत्येकाच्या कौटुंबिक संमेलनाच्या वेळी दोन्ही कुटुंबे एकत्र येत असत .वाढदिवस हळदीकुंकू सणवार याबरोबरच कोणतेही कारण नसताना सुद्धा सर्वजण एकत्र येत असत .
रमाकांत खेळकर होता .हूड होता .खोड्या काढण्यात पटाईत होता.परंतु रमा समोर आली की हा मात्र गप्प गप्प राहत असे.या उलट रमा खूपच हूड होती.रमाकांत दिसला की त्याची काही ना काही खोड काढल्याशिवाय तिला चैन पडत नसे.त्याचा शर्टच ओढ , त्याच्या पाठीत बुक्के मार,डोक्यावर टपली दे, असे तिचे काही ना काही चाललेले असे .ती तीन चार वर्षांची होती रमाकांत दहा अकरा वर्षांचा होता तेव्हापासून असे चालले होते.
रमाकांतला मनातून खूपच वाटे की रमाला जशास तसे करावे.तिचा शेपटा ओढावा.ती आपल्या पाठीत बुक्की मारते त्याप्रमाणेच आपणही तिच्या पाठीत जोरात बुक्की मारावी.तिच्या पाठीमागे धावत जाऊन,तिला पकडून, चिमटे काढावे. ती धावत असताना तिच्या पायात पाय घालून तिला तोंडघशी पाडावे. ती आपल्या अंगावर थंडीत गार पाणी ओतते तसेच आपणही तिच्या अंगावर गार पाणी ओतावे.हे सर्व मनातल्या मनात चाले .प्रत्यक्षात तो रमाने केलेला छळ मुकाटपणे सहन करीत असे .
वर्षे अशीच चालली होती . दोघेही हळूहळू मोठी होत होती .रमाकांत बारावी पास होऊन मेडिकल कॉलेजला गेला त्यावेळी रमा पाचवीत होती. वाढत्या वयाबरोबर रमाचा हूडपणा हळहळू कमी होत गेला. रमाकांतची खोडी काढणे हळूहळू कमी होत गेले.ती मोठी होत गेली तशी तिची दृष्टी बदलत गेली .ती बारावी पास होऊन कॉलेजात गेली त्यावेळी रमाकांत डॉक्टर होऊन आला होता.
रमा सातवीत असताना केव्हातरी रमाकांतने तिला पाहिले त्यावेळी त्याला तिच्यात पडलेला फरक एकदम जाणवला.बारा तेरा या वयामध्ये मुली वयात येऊ लागतात.अक्षरशःसुरवंटाचे फुलपाखरू होते. रमा आता जास्तच आकर्षक दिसू लागली होती.पहिल्यापासूनच तिला नीटनेटके राहण्याची सवय होतीच.आता तर ती जास्तच व्यवस्थित राहू लागली होती .रमाकांत आता पूर्वीचा लाजरा बुजरा राहला नव्हता .पूर्वीची खट्याळ रमा लुप्त झाली होती .
दोघांची पहिल्यापासून मैत्री असल्यामुळे,अनेक वेळा भेटी गाठी होत असल्यामुळे,नेहमीच गप्पा विनोद एकमेकांना चिडवणे वगैरे चालत असे.आता त्यात आकर्षणाची भर पडली होता.रमाला रमाकांत आवडू लागला होता.तिची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली होती .त्याच्याबरोबर आयुष्य काढण्याचे स्वप्न ती बघू लागली होती.त्याच्याबरोबर फिरायला जावे, त्याच्याबरोबर गप्पा माराव्यात, त्याच्याबरोबर सिनेमा पाहावा, असे तिला उत्कटतेने वाटत असे. हे सर्व होत असे परंतु कुटुंबातील मंडळी बरोबर असत फक्त दोघांनीच जायचे स्वप्न पुरे होत नसे.तो त्याच्याकडे आला किंवा ती त्यांच्याकडे गेली तर ती त्याच्याकडे सर्वांच्या नजरा शिताफीने चुकवून एकटक पहात बसत असे .
तिला त्याच्याजवळ आपल्या भावना प्रकट करण्याचे धैर्य होत नसे .दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्री असल्यामुळे परस्परांना भेटण्याच्या वेळा अनेकदा येत असत .तो भेटला की त्याला बाजूला घ्यावे त्याला कुठे तरी एकांतात आपण भेटू या असे सांगावे असे तिला वाटत असे.परंतु प्रत्यक्ष तो भेटल्यानंतर तिची दातकडी बसत असे. त्याचे आपल्यावर प्रेम असेल का? तो आपल्याला हसणार नाही ना?याची तिला चिंता वाटे. त्याच्या मनाचा थांग तिला लागत नव्हता. त्यामुळे ती मनात आलेले अनेक भाव बोलू शकत नसे .आज बोलायचेच,आज सांगायचेच, असे करीत अनेक दिवस गेले.
कदाचित तो बोलेल म्हणून ती वाट पाहत होती .परंतु त्याचे तसे चिन्ह दिसेना . शेवटी तिने आपल्या भावना पत्र लिहून कळवायच्या असे ठरविले.तिने पुढील प्रमाणे पत्र लिहिले.
प्रिय
रमाकांत
आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो .मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते मला कळलेच नाही . लहानपणी मी तुला छळत असे. ते आठवले की आता मला गंमत वाटते. त्याच बरोबर असे करायला नको होते असेही वाटते. तुला प्रेम बोलून दाखवावे,तू माझा होशील का ?म्हणून विचारावे असे मला उत्कटतेने नेहमी वाटत असते.परंतु तू भेटतोस तेव्हा मी संकोचामुळे बोलू शकत नाही.अनेक वेळा मी प्रयत्न केला परंतू जीभ रेटली नाही .म्हणून आज तुला हे पत्र लिहित आहे?
कदाचित तुझ्याही तशाच भावना असतील .
केव्हा केव्हा आपल्या गूढ गर्भी असलेल्या भावना आपल्याच आपल्याला कळत नसतात.
केव्हातरी त्या वर येतात आपल्याला जाणवतात.
तुझ्याबरोबर आयुष्य काढूनइच्छीणारी
माझा होशिल का ?असे नेहमीच म्हणणारी.
सदैव तुझीच
रमा
असे पत्र रमाने लिहिले खरे परंतु ते पाठविण्याचा धीर तिला होईना .
(क्रमशः)
७/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन