३ संकोचाचे बळी २-२
(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
मनाच्या समाधानासाठी ती दर आठवड्याला एक पत्र लिहित असे .त्यामध्ये ती तिच्या भावभावना तिला आलेले निरनिराळे अनुभव मुक्तपणे मांडीत असे .तिचा तो विरंगुळा होता .असे पत्र लिहिण्यात तिला रमाकांतला भेटण्याचेच समाधान मिळत असे .
तिला जे जे बोलावे असे वाटे ,जे जे त्याला सांगावे असे वाटे, ते ती सर्व लिहून काढीत असे.त्याला भेटण्याचा, त्याच्याशी गप्पा मारल्याचा, अनुभव तिला त्या पत्रातून येत असे.
त्या त्या आठवड्यात घडलेल्या घटना, प्रसंग, कौटुंबिक गप्पा ,मैत्रिणींशी मारलेल्या गप्पा, विनोद , केव्हा केव्हा पाहिलेला सिनेमा नाटक याचे थोडक्यात कथानक इत्यादी सर्व ती पत्रांमध्ये मुक्तपणे लिहित असे . परंतू ती पत्रे पाठवण्याचा धीर तिला कधी झाला नाही .पत्रे साचत गेली .
शेवटी तिने चंदनाची नक्षीकाम केलेली एक पेटी त्यासाठी मुद्दाम विकत घेतली. तारीखवार सर्व पत्रे ती त्यांमध्ये जपून ठेवीत असे.
ती सर्व पत्रे काटछाट करून जर छापली तर एक सुरेख कादंबरी तयार होईल.त्यात एका तरुणीचे ज्याच्यावर अतोनात प्रेम केले त्याविषयीच्या सर्व भावना उत्कटपणे मांडलेल्या आढळून येतील .
दुर्दैव एवढेच की पत्र पाठवले तर रमाकांतला काय वाटेल? तो रागावेल का?तो प्रतिसाद कसा देईल ?तो आपल्याला हसणार तर नाही ना ? तो एवढा मोठा डॉक्टर त्याचे दुसऱ्याच कुणा मुलीवर प्रेम तर नसेल ना?आपले वेडेबागडे पत्र त्या मुलीला दाखवून दोघेजण आपली खिल्ली तर उडवणार नाहीत ना?या व अश्या असंख्य प्रश्नमालिकेमध्ये ती गुंतून पडत असे.शेवटी लाज भय चिंता आणि सर्वात मुख्य म्हणजे संकोच यामुळे ती पत्रे तिने कधीही पाठविली नाहीत .
तिला करमत नाहीसे झाले की ती पत्रे वाचणे हाच तिचा विरंगुळा होता .ती चंदनी पेटी कुशीत घेऊन झोपणे,त्या चंदनी पेटीचा वास घेणे, पेटी उघडून त्या पत्रांकडे पाहात बसणे हाच तिचा रिकामपणाचा उद्योग होता .ती चंदनी पत्रपेटी पाहिली की तिला रमाकांत आपल्याजवळ आहे असे वाटत असे .
इकडे रमाची ही अवस्था तर दुसरीकडे रमाकांताचीही काही वेगळी अवस्था नव्हती.तोही रमावर प्रेम करीत होता .ती जेव्हा जेव्हा तिला भेटत असे,जेव्हा जेव्हा ती दोघे गप्पा मारीत असत, त्या त्या वेळी त्याला आपल्या भावना तिला सांगाव्यात असे वाटत असे.परंतु नशिबाचा भाग असा की तोही संकोची होता .पुढाकार घेऊन आक्रमकपणे आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवाव्या हे त्याला कधी जमलेच नाही. ती जेव्हा जेव्हा एकटी सापडे, त्या त्या वेळीही त्याला बोलायचे असे एक,आणि तो बोलून जाई दुसरेच काहीतरी .असे अनेक वेळा होत असे.तो धीर एकवटून आज तिच्याजवळ आपले मन मोकळे करायचे असे ठरवत असे,आणि आयत्या वेळी पुन्हा केव्हा तरी बोलू आता नको अशी त्याचे मन पलटी घेत असे.
त्याने तिला प्रेमभरी,आपले मन मोकळे करणारी, दोन तीन पत्रे लिहिली.त्याने ती पाठवलीही,परंतु दुर्दैवाने ती तिच्यापर्यंत या ना त्या कारणाने पोहोचू शकली नाहीत. त्याने मात्र आपली अशी समजूत करून घेतली की तिला आपले प्रेम पसंत नाही .तिचे दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम आहे.आपण दोघांनी मित्र म्हणून राहू. प्रेमिक, युगुल, पती पत्नी, म्हणून नव्हे .असे तिला वाटत असावे अशी समजूत त्याने करून घेतली .
आपले हृदय त्याने समोरासमोर तिच्याजवळ कधीच मोकळे केले नाही .दोघांचाही संकोची स्वभाव आणि दुसरा काय म्हणेल ?त्याला काय वाटेल? त्याचा प्रतिसाद कसा असेल? याबद्दलच्या अाशंका,यामुळे परस्पर प्रेम असूनही, दोघांच्या त्याच भावना असूनही ,त्याचा उद्गार कुणाकडूनही झाला नाही . परिणामी दोघेही भेटत राहिली. गप्पा मारीत राहिली.हसत खेळत राहिली आणि आपल्या मनात कुढतही राहिली .
दोघांच्याही आई वडिलांना आपल्या कुटुंबातील मैत्री नात्याने दृढ व्हावी असे वाटत होते.परंतु आपण त्या दृष्टीने काहीही प्रयत्न करायचा नाही .आपण काहीही कुणावर लादले असे होऊ नये . असे त्यांचे मत होते. असा त्यांचा स्वभाव होता.त्यामुळे त्यांनीही त्या दृष्टीने काहीही हालचाल केली नाही. त्यांनी जरी किंचित हालचाल केली असती तर आज या कथेचा शेवट वेगळा असता. ती दोघे लहानपणापासून एकत्र वाढलेली राहिलेली आहेत , नेहमी एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात, हास्यविनोद चालतो, जर त्यांना लग्न करावे असे वाटत असेल तर ते आपसात ठरवतील व नंतर अापल्याला सांगतील असा त्यांचा दृष्टिकोन होता.
तात्पर्य दोघांच्याही आई वडिलांनी पुढाकार घेतला नाही. रमा व रमाकांत यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते. निदान एकाने तरी पुढाकार घेणे आवश्यक होते तोही घेतला नाही.शेवटी परिणाम शून्य झाला. जे व्हावे असे सर्वांना वाटत होते ते झाले नाही.
यथावकाश रमाकांतला मुली सांगून यायला सुरुवात झाली .त्याने एक मुलगी पसंत करून लग्नही केले . त्याचा संसार सुरू झाला .
रमाच्या आई वडिलांनी रमाचे लग्न करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.कित्येक स्थळे आणली. तिचे नाव विवाह संस्थांमध्येही नोंदविले .रमाचा एकच धोशा होता. मी लग्न करणार नाही. कारण सांगत नव्हती.रमाला लग्न कर म्हणून तिच्या आई वडिलांनी खूप आग्रह केला. तिने आपला हट्ट सोडला नाही .तिची जीवन उभारीच संपली .तापाने ती आजारी पडली .तिला रमाकांतच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले गेले .तिची जीवनाशा ,जगण्याची इच्छाच संपलेली असल्यामुळे डॉक्टरी उपायांचा काही परिणाम होत नव्हता. तिने शेवटच्या क्षणी रमाकांतला मी तुझ्यावर आतापर्यंत प्रेम करत राहिले, आता आपण पुढल्या जन्मी भेटू,माझी चंदनी पेटी उघडून पहा ,त्यात माझे हृदयआहे असे सांगितले.रमाकांतने मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करीत होतो,परंतु तुझ्याजवळ बोलण्याचे धैर्य मला झाले नाही ,असे सांगितले . दोघांनाही परस्परांवरील प्रेमाचा साक्षात्कार झाला . परंतु आता उशीर झाला होता.समाधान एवढेच की तिला रमाकांतही आपल्यावर प्रेम करतो हे कळले.रमाने समाधानाने प्राण सोडला.
जी चंदनी पेटी ती नेहमी कुलुपबंद ठेवीत असे ती तिच्या मृत्यूनंतर उघडण्यात आली .ही पेटी रमाकांतला द्यावी अशी चिठी सुरुवातीला सर्व पत्रांवर ठेवलेली होती. त्यामधील पत्रांची थप्पी पाहून ,ती पत्रे ओझरती वाचून, तिचे आई वडील स्तिमित झाले .दोघांनाही काय बोलावे ते सुचेना .तिचे आई वडील जरी तिच्याशी मोकळेपणाने बोलले असते किवा जरी ती त्यांच्याशी ,निदान आईशी जरी बोलली असती तर प्रश्न केव्हाच सुटला असता .रमाच्या पत्राप्रमाणे ती पेटी रमाकांतला देण्यात आली
तात्पर्य सांगायलाच हवे का?
*आई वडील काय, मुले काय, मित्र काय, सर्वांनी एकमेकांशी मोकळेपणाने मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत.*
*दुसऱ्याला काय वाटेल? त्याच्या तिच्या प्रतिक्रिया काय असतील?या प्रश्न जंजाळात गुंतून पडता कामा नये.*
*नाही तर रमा, रमाकांत, व्हायला वेळ लागत नाही.*
*म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रमा रमाकांत हे संकोचाचे बळी होत.*
*कदाचित काही जणांना ही अतिशयोक्ती वाटण्याचा संभव आहे .*
*एक इंग्लिश म्हण आहे ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन.*
*सत्य हे काल्पनिक कथेपेक्षा चकित करणारे असते*
(समाप्त )
७/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन