९ निरोप
फाइव्हस्टार हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉल फुलानी माळांनी सजविलेला होता.आज यशस्वी परांजपे यांना निरोप देण्याचा समारंभ होता.या ब्रँचला यशस्वी आज तीन वर्षे ब्रँच मॅनेजर म्हणून होता.त्याची बदली हेड ऑफिसला प्रमोशनवर मॅनेजर म्हणून झाली होती .त्याची आतापर्यंतची प्रगती पाहता तो लवकरच सीईओ होईल असे सर्वजण म्हणत होते .
कामाचा झपाटा,योग्य निर्णय तात्काळ घेण्याची क्षमता, हाताखालील लोकांना योग्य मान देऊन त्यांना सांभाळून घेऊन काम करून घेण्याची कुशलता,यामुळेच तो इतक्या लहान वयात एवढ्या मोठ्या पोस्टवर प्रमोट होत होता .त्याची क्वॉलिफिकेशनसही जबरदस्त होती.एम.ई.इन कॉम्प्युटर, एमबीए,याबरोबरच त्याने कायद्याची पदवीही घेतली होती. आणि हे सर्व त्याने वयाच्या चौविसाव्या वर्षी प्राप्त केले होते.कंपनीत एक दोन वर्षे असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर तो इथे ब्रँच मॅनेजर म्हणून आला होता.आणि आता हेड ऑफिसमध्ये तो मॅनेजर म्हणून जात होता .
त्याची पी.ए.साक्षी हिची लगबग चालली होती .निरोप समारंभ यशस्वी करण्याचे काम तिच्याकडे होते .सर्वांनाच काहीना काही अशा प्रसंगी बोलायचे असते .प्रत्येक जण जर बोलू लागला तर कार्यक्रम कंटाळवाणा होतो .प्रत्येकाच्या बोलण्यात त्याच त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत असते .स्टाफपैकी एक व असिस्टंट ब्रँच मॅनेजर ,असे फक्त दोघे जण बोलणार होते .शेवटी आभार मानण्याचे काम साक्षीकडे होते .
साक्षीला यशस्वी बरोबर हेड ऑफिसला बदली मिळत होती .किंबहुना यशस्वीने साक्षीला त्याची पी.ए.म्हणून शिफारस करून मुद्दाम मागून घेतले होते .ही गोष्ट साक्षीला माहीत होती कारण ते पत्र तिनेच मेल केले होते .तिथेही तिला यशस्वीची पी.ए. म्हणून काम करायचे होते.तिला यशस्वी बरोबर हेड ऑफिसला जाणे आवडले असते .परंतु तिचा नाइलाज होता .यशस्वी बरोबर त्याची पत्नी म्हणून जाणे तिला आवडले असते .तिने नम्रपणे घरगुती कारणे देऊन बदली नाकारली होती .ही गोष्ट यशस्वीला आवडली नव्हती त्याने तू तिथे माझी पी.ए. असतीस तर चांगले झाले असते . आपले ट्युनिंग फार छान जुळले आहे.असे म्हटले होते.त्यावर ती फक्त किंचित हसली होती .
*आपले ट्युनिंग ऑफिसात नव्हे तर ह्रदयात झाले पाहिजे .असे ती मनात म्हणाली होती .*
यशस्वीची पी.ए. म्हणून तिची नेमणूक झाली.त्या अगोदरही ती पी.ए. म्हणूनच काम करीत होती.पीए म्हणून ती यशस्वी होती आणि त्यामुळेच आता तिची यशस्वीची पीए म्हणून नेमणूक करण्यात आली होती. एखादा मध्यमवयीन किंवा बुजुर्ग, मॅनेजर म्हणून येईल अशी तिची कल्पना होती. यशस्वीला पाहून ती जरा चमकलीच .हसतमुख देखणा उमदा तरुण, मॅनेजर म्हणून येत असेल असे तिला वाटले नव्हते. अर्थात तिच्या भावना तिने यशस्वीपणे लपविल्या .एक कर्तव्यदक्ष पी.ए . म्हणून ती तिच्या कामावर रुजू झाली .त्याच्या हाताखाली काम करता करता त्याचे अनेक गुण तिच्या लक्षात आले.
तो कार्य कुशल व कार्यतत्पर होता.तो अचूक निर्णय घेत असे .ज्यावेळी तो निर्णय घेई त्यावेळी हा निर्णय बरोबर आहे ना असा संभ्रम काही वेळा पडत असे .परंतु भविष्यकालीन घटना, त्याचा निर्णय बरोबर आहे ,असे लक्षात आणून देत असत. व्यवस्थापक म्हणून तर तो श्रेष्ठ होताच ,परंतु माणूस म्हणूनही तो श्रेष्ठ होता.नर्म विनोद, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता,मृदू हृदय, आणि ऑफिसमधील सर्व स्टाफला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजण्याचा उदारपणा त्याच्याजवळ होता .
एखाद्याला त्याच्या आडनावापेक्षा त्याच्या नावाने जर एखादी व्यक्ती ओळखत असेल तर तिच्याबद्दल जास्त प्रेम व आपुलकी निर्माण होते .स्टाफमध्ये तीस पस्तीस जण होते प्रत्येकाला तो त्याच्या नावाने ओळखत असे.प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहीत होती .त्याचा योग्य वापर तो करीत असे .कुणाच्या मुलांची चौकशी कर, कुणाच्या आई वडिलांची चौकशी कर,कुणाच्या मुलांच्या प्रगतीची चौकशी कर ,यामुळे प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम व जिव्हाळा निर्माण होत असे.त्याच्या कामाचा झपाटा विलक्षण होता आणि स्टाफमधील प्रत्येकाने तसेच असावे असे त्याला वाटे.आणि तसे काम तो कुशलतेने करून घेत असे . कामाच्या व वेळेच्या बाबतीत यशस्वी अत्यंत काटेकोर होता .वेळेवर प्रत्येकाने आलेच पाहिजे असे त्याला जसे वाटत असे, त्याचप्रमाणे ऑफिसची वेळ संपल्यावर प्रत्येकाला घरी जाण्यासाठी मुभाही पाहिजे असे त्याचे मत होते . जर ज्यादा काम करायचे असेल तर त्याची प्रत्येकाला कल्पना पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यासाठी प्रत्येकाला योग्य मेहनताना मिळाला पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असे .
थोड्याच दिवसांत यशस्वीने सर्व स्टाफला जिंकले होते.सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आदर व कौतुक निर्माण झाले होतेऐ. जर आपण यशस्वी व्हायचे असेल तर स्टाफमध्ये अंतर्गत पूर्ण सहकार्य पाहिजे त्याचप्रमाणे स्टाफचेही आपल्याला सहकार्य पाहिजे हे तो जाणून होता .ते मिळविण्यात तो कुशल होता .
साक्षीला यशस्वी पहिल्या दिवसापासून, त्याला पाहिल्यापासून, आवडला होता. यशस्वीला कुणीही पाहिले तरी त्याची त्या व्यक्तीवर छाप पडत असे.त्याची क्वॉलिफिकेशन जबरदस्त होती.त्याचे बोलणे ऐकून कुणीही प्रभावित होत असे . साक्षीही अर्थात याला अपवाद नव्हती.यशस्वीची पी.ए. म्हणून काम करताना ती त्याच्या जास्त जास्त जवळ येत गेली .त्याच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू उलगडत गेले . आणि त्यामुळे तो तिला जास्त जास्त आवडत गेला. तो बॉर्न बॉस होता .
दिल्ली चेन्नई कलकत्ता येथे यशस्वीला अनेक वेळा मीटिंगसाठी जावे लागे.पीए म्हणून साक्षीलाही त्याच्याबरोबर जावे लागे.अगदी सुरुवातीला तिला असे कुणाबरोबर तरी जाणे विचित्र वाटले होते. परंतु तो तिच्या कामाचा भागच असल्यामुळे ती पुढे रुळली होती. त्याचे वर्तन नेहमी काटेकोर असे .त्याचे वागणे मर्यादेला धरून असे.त्याने कधीही चुकूनही लघळपणा केलेला तिला आठवत नव्हता.कागदपत्र देताना घेताना लिफ्टमधून जाताना प्रवास करताना कधीही त्याचा स्पर्श झाला तर तो अत्यंत सहज स्पर्श असे.निर्विकार असे.सहज स्पर्श,चुकून झालेला स्पर्श, मुद्दाम केलेला स्पर्श,स्त्रियांना चटकन ओळखता येतात .त्याने कधीही गैरवर्तन केले नाही .अर्थात तीही नेहमी काटेकोरपणे आपला आब राखून असे.साक्षी देखणी होती. सुंदर होती.नियमित योगसाधनेद्वारे तिने आपले शरीर बांधेसूद ठेविले होते.आपल्या कामात ती वाकबगार होती.बॉसला त्याच्या कामाच्या संदर्भात काय हवे काय नको ते बरोबर ओळखून,त्याच्या पुढे दोन पावले ती नेहमी असे .थोड्याच दिवसात बॉस तिच्यावर सर्वस्वी विसंबून राहू लागे.ऑफिसमध्ये कोणत्या फाईल्स महत्त्वाच्या,कोणते कागदपत्र कुठे ठेवलेले आहेत, यांची एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे तिच्या डोक्यात नोंद असे.एखादे काम कोण जास्त चांगल्या प्रकारे करील यासंबंधीही ती योग्य सल्ला बॉसला देत असे.वेगळ्या अर्थाने प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडत असे.
यशस्वी बद्दल वाटणारे कौतुक व आदर याचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे तिचे तिलाच कळले नाही.
आज ना उद्या आपले प्रेम त्याच्या लक्षात येईल अशी आशा तिला होती.बोलताना, काम करताना, ती त्याच्या डोळ्यात क्षणभर निरखून पाही, तिला हवे असलेली साद,तिला हवा असलेला भाव त्यात आढळत नसे.केव्हा तरी क्षणभर तो भाव त्याच्या डोळ्यात चमकून गेला की काय असा तिला संशय येई.परंतु तिची खात्री पटत नसे.तिला ते आपल्या मनाचे खेळ वाटत.
तो आज बोलेल उद्या बोलेल केव्हातरी काहीतरी दर्शवील म्हणून ती वाट पाहत होती .परंतु तसे त्याचे काहीही लक्षण दिसत नव्हते.आपण त्या गावचेच नव्हे असे त्याचे वर्तन होते .त्याच्या डोळ्यात आपल्याला जो काही भाव दिसला असे वाटले तो केवळ भास असावा या निर्णयाप्रत साक्षी आली होती .
एकदा सर्व काही आपण बोलून टाकावे जे व्हायचे असेल ते होईल असे साक्षीला वाटे.परंतु तसे करण्याला तिचे मन तयार होत नसे .तसे काही त्याच्या मनात नसले तर आपण आगाऊ ठरू. अप्रत्यक्षरित्या अपमानित होऊ. असे तिला वाटत होते.स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी अश्या वेळी पुढाकार पुरुषानेच घेतला पाहिजे असे तिचे ठाम मत होते .
आज निरोप समारंभात ती नेहमीच्या दक्षतेने, कार्यतत्परतेने फिरत होती. परंतु तिचे लक्ष त्यामध्ये नव्हते.उद्यापासून ती यशस्वीच्या सहवासाला मुकणार होती.दुसरा कुणी मॅनेजर म्हणून येणार होता. त्याची कर्तव्यदक्ष पी.ए. म्हणून ती काम करणार होती.आपण आपली झालेली बदली नाकारून योग्य केले की अयोग्य केले असा अनेक वेळा तिला संभ्रम पडे.आपण त्याच्याबरोबर हेड ऑफिसला गेलो असतो तर त्याच्या सहवासात आपल्याला राहता आले असते .तो आपल्याला मिळण्याचा संभव वाढला असता, असेही तिच्या मनात येत असे.
तिचे हृदय आक्रंदत होते .तिचा चेहरा उतरला होता.ती कितीही लपविण्याचा प्रयत्न करीत असली तरी तिचे काही तरी बिनसले आहे हे यशस्वीने बरोबर ओळखले. यशस्वीने तिला तुला बरे वाटत नाही का? म्हणूनही विचारले .त्यावर कसनुसे हसत तिने कुठे काय ,काही नाही ठीक आहे म्हणून सांगितले.
कधी नव्हे ते यशस्वीने तिच्या खांद्यावर हळुवार थोपटत काही काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले.त्या स्पर्शाने,त्या हळुवार बोलण्याने ती सुखावली होती .
निरोप समारंभ यशस्वीपणे पार पडला .दुसर्या दिवशीच्या फ्लाइटने यशस्वी हेड ऑफिसला रुजू होण्यासाठी निघून गेला .साक्षी यशस्वीला निरोप देण्यासाठी विमानतळावर गेली होती.एका बाजूने तो तिच्या कामाचा भागही होता .तिला त्याला सारखे पाहात राहावे असेही वाटत होते. त्यामुळे जरी तो तिच्या कामाचा भाग नसता तरीही ती विमानतळावर गेली असली .ऑफिसातील आणखीही काही मंडळी यशस्वीला निरोप देण्यासाठी विमानतळावर आली होती.
सहज बोलता बोलता आसपास आणखी कुणी नाही असे पाहून तो तिला आपण नक्की पुन्हा भेटू असे म्हणाला होता .ते बोलणे केवळ औपचारिक होते की त्यामागे काही अर्थ होता ते अजूनही साक्षीला कळत नव्हते.
*त्याचे ते बोलणे तिला थोडे गूढ वाटत होते*
यशस्वीने तिच्या खांद्यावर थोपटत काही काळजी करू नकोस,सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले.ते सहज होते, समारंभाच्या संदर्भात होते, की त्यामागे आणखी काही गूढ हेतू होता ते यशस्वीच जाणे.
* साक्षीने यशस्वीला दिलेला निरोप तात्पुरता होता की कायमचा होता ते काळच ठरविणार आहे .*
२२/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन