Get it on Google Play
Download on the App Store

६ मधू मधुकर व माधवी २-३

(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

~मधू~

गाडी सुटली. मधुकर हळू हळू दूर दूर जात होता  . शेवटी तो दिसत नाही झाला .अडीच तीन तासात मी पुण्याला पोचणार होते . वासंती व बाबा, मला स्टेशनवर घ्यायला येणार होते .मी निघाले म्हणून त्यांना मेसेज केला .गाडीच्या एका विशिष्ट र्‍हिदम बरोबर, मधुकर भेटला तेव्हा पासूनच्या सर्व आठवणी येत होत्या.

आणि अकस्मात गाडीला एक मोठा धक्का बसला .माझी शेवटची आठवण म्हणजे मी सीटवरून फेकले गेले आणि माझे डोके समोरच्या  सीटवर जोरात आपटले आणि डोळ्यासमोर अंधारी पसरली . 

~मधुकर ~

माझी मधू जात असलेल्या गाडीला अॅक्सिडेंट झाला हे टीव्हीवर पाहिल्या बरोबर अतीव दुःख व अतीव काळजी यांनी माझा ताबा घेतला.मी तिला सारखा फोन लावीत होतो .ती माझा फोन उचलत नव्हती.त्याचे कारण आता माझ्या लक्षात येत होते .माझी मधू अपघातात सापडली होती .ती शुद्धीवर नसावी .नाही तर तिने मला लगेच फोन केला असता . कदाचित  ती आता या जगात नसेलही.या विचारानेच माझा धीर सुटला .चक्कर घेऊन मी इथेच कोसळतो की काय असे मला वाटू लागले .कसेबसे मी स्वतःला सावरले .मी जमेल तेवढ्या तातडीने गाडी चालवत ठाणे स्टेशनला पोचलो .स्टेशनमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता.अँब्युलन्स व पोलीस यांच्या गाड्यांचे सायरन सारखे वाजत होते.  

लोकलच्या पॅसेंजर्सची एकच गर्दी उसळली होती .स्ट्रेचरवरून जखमी व मृत माणसे अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेत होते.डॉक्टरांचे एक पथक प्रथमोपचार करण्यात गुंतले होते.एका प्लॅटफॉर्मवर पडदे लावून तात्पुरते हॉस्पिटल उभे केले होते .तिथे जखमीवर प्रथमोपचार केले जात होते .नंतर जखमीच्या परिस्थितीनुसार त्याला नोंद करून घरी जाऊ दिले जात होते किंवा रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये पाठविले जात होते .नेहमीप्रमाणे बघ्यांची गर्दी उसळली होती.त्यांना अडविण्यात पोलिसांची ताकद खर्च होत होती . पोलिसांनी साखळी केली होती .कुणालाही आत जाऊ दिले जात नव्हते .मलाही अडविण्यात आले .माझी पत्नी या गाडीने जात होती. तिची खुशाली मला पाहायची आहे.मला  तिला भेटायचे आहे .वगेरे सांगण्याचा काहीही उपयोग झाला नाही.असे सांगणारे ,विनंती करणारे, आत जातो म्हणणारे बरेच होते.सगळ्यांना आत सोडणे शक्य नव्हते .गोंधळ आणखीच वाढला असता . 

मला माझा मित्र पोलीस इन्स्पेक्टर सदाशिव याची आठवण झाली. सुदैवाने त्याचा नंबर माझ्या सेलफोनमध्ये होता. त्याचा फोनही चटकन लागला .त्याला मी माझी समस्या सांगितली.त्याने कुठून चक्रे फिरविली कोण जाणे परंतु माझे नांव पोलिसांकडून पुकारण्यात आले. मी हात वर करून पुढे जाताच मला  आत जाण्याची परवानगी देण्यात आली .मी घाईघाईने जिथे अपघात झाला होता तिकडे गेलो . 

अपघाताच्या जागी मी सर्वत्र शोधाशोध केली . मला कुठेही मधू दिसली नाही.रेल्वेचे दोन डबे घसरले होते .एक दोन डबे उलटले होते.  सर्वत्र पोलीस, प्रवासी,मदत करणारी मदत पथके ,यांची एकच गर्दी उडाली होती .रात्र असल्यामुळे सर्वत्र प्रकाशाचे झोत सोडण्यात आले होते .मी मधूला फोन करून पाहात होतो .आता तर फोनची रिंग वाजणे बंद झाले होते .एवढय़ात माझ्या फोनची रिंग वाजली .मधू असेल म्हणून मी उत्सुकतेने फोन घेतला. फोन माझा मित्र इन्स्पेक्टर  सदाशिव  याचा होता .वहिनी मिळाली का म्हणून तो विचारीत  होता .मी त्याला नाही म्हणून सांगितल्यावर तो तातडीने थोड्याच वेळात ठाणे स्टेशनमध्ये आला. 

मधू फोन उचलत नाही. फोन करीत नाही. ती बोगीमध्ये बेशुद्ध तर नाही ना अशी भीती मला वाटू लागली .तिचा बोगी नंबर व सीट नंबर मला माहीत होता.ती बोगी उलटली होती .बोगीत जावून पाहणे शक्य नव्हते .तरीही आम्ही मदतकार्य करणाऱ्या  एकाला बोगीत कुणी आहे का म्हणून विचारले . त्याला सर्व परिस्थिती समजून सांगितली .त्याने आडव्या असलेल्या बोगीत जाऊन सर्वत्र शोध घेतला.आत कुणीही  नाही म्हणून त्याने सांगितले .

तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो.अपघातग्रस्त गाडीतील जखमी प्रवासी जागांच्या उपलब्धतेनुसार  तीन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते . त्या सगळ्या गोंधळात त्यांच्या याद्याही मिळणे कठीण होते .दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेतला असता मधू कुठेही मिळाली नाही .पोलीस स्टेशनला मी मिसिंग कम्प्लेंट दिली. मधूच्या आई वडिलांना मी केव्हाच फोन केला होता .त्यांनाही अपघाताची बातमी कळली होती .ती सर्वजण व माझे आई वडीलही लगेच मुंबईला आले होते.सर्वजण मला धीर देत होते .परंतु त्या सर्वांचाच धीर सुटलेला मला दिसत होता .तिसर्‍या दिवशी आम्हाला पोलिस स्टेशनमधून फोन आला .त्यांनी आम्हाला पोलिस स्टेशनला बोलवून घेतले .तिथे गेल्यावर जास्त काही न बोलता एक पोलीस आम्हाला शवागारात घेऊन गेला .मी दिलेला फोटो व वर्णन याप्रमाणे दिसणारी एक मुलगी शवागारात आली होती .आम्हाला तो तिथे घेऊन गेला .ड्रॉवर उघडून त्याने आम्हाला बॉडी दाखविली .

माझी मधू तिथे शांतपणे झोपली होती .जशी काही ती गाढ निद्रेमध्ये आहे असे वाटत होते.तेच किंचित पिंगटपणाकडे झुकणारे दाट काळे केस,किंचित उंच मान ,लहानशी जिवणी, गोरा वर्ण , उंच कपाळ,ती माझीच मधू होती.तिचे आता वर्णन करण्याला जेवढा वेळ लागला त्याच्या शतांशात मी तिला ओळखले.मला अकस्मात चक्कर आली .जर माझा मित्र इन्स्पेक्टर सदाशिव बरोबर नसता तर मी जमिनीवरच कोसळलो असतो.सदाशिवने मी पडता पडता मला सावरले. एक तीक्ष्ण कळ माझ्या हृदयातून डोक्याकडे गेली .

या आघातातून मला सावरण्याला बराचकाळ लागला .काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे .दिवस व महिने जात होते.मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होतो . दिनचक्र कालचक्र फिरत होते .यथावकाश माझ्या मेहुणीचे मधूच्या लाडक्या धाकट्या बहिणीचे वासंतीचे लग्न ठरल्याप्रमाणे  झाले होते .

*आणि एक दिवस ती मला मॉलमध्ये दिसली .*

~ माधवी~   

मी काही खरेदीसाठी मॉलमध्ये गेले होते .मला व माझ्या मैत्रिणीला हवे असलेले सामान मी निवडून ट्रॉलीमध्ये टाकीत होते.कुणीतरी माझ्याकडे निरखून पाहात आहे असे माझ्या लक्षात आले .स्त्रियांना एक सिक्सथ सेन्स सहावे इंद्रिय असते .आपल्याकडे कुठूनही कुणीही एक टक निरखून पाहात असेल तर ते तिकडे पाहिल्याशिवाय आमच्या लक्षात येते.माझ्या पाठीमागून कुणीतरी मला निरखीत  होते .मी शांतपणे वळून तिकडे पाहिले.एक अठ्ठावीस तीस वयाचा तरुण माझ्याकडे पाहात होता . त्याच्या डोळ्यात कुठेतरी मला ओळखल्याचे भाव होते.त्याचे प्रिय त्याला सापडल्याचे भाव होते .त्याचे डोळे कारुण्याने भरलेले होते.माझा चेहरा पाहताच तो चपापला .ती मी नव्हेच हे त्याच्या लक्षात आले .मी त्याच्याकडे रागाने मुळीच पाहात नव्हते .मी कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते .तो कुठेतरी मला ओळखीचा वाटत होता. त्याच्या  ओळखीच्या एखाद्या मुलीसारखी पाठमोरी मी दिसत असले पाहिजे.फार दिवसांनी एखादी आपल्याला अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती भेटावी त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव होते .माझा चेहरा पाहताच ती मी नव्हेच हे त्यांच्या लक्षात आले . आणि त्यामुळेच तो चपापला .त्याचा चेहरा खिन्न व उदास झाला. शांत सज्जन प्रेमळ असा तो तरुण दिसत होता.एखाद्या मुलीला छेडण्याचे छिचोरपणाचे कोणतेही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते.पाहता क्षणीच मला तो आवडला .मी ती नव्हेच हे लक्षात आल्याबरोबर माझी नजर चुकवून तो झपाटय़ाने निघून गेला .

या तरुणाचे व माझे काहीतरी नाते असावे असे मला आतून वाटत होते .अजूनपर्यंत मी त्याला कधीच पाहिले नव्हते .तरीही मी त्याला ओळखले होते .माझ्याच विभागात तो कुठेतरी रहात असावा.त्याचा आणि माझा काही तरी  ऋणानुबंध असावा .असे मला खोलवर आत कुठेतरी जाणवत होते. नंतरच्या तीन चार महिन्यांमध्ये मला तो एकूण दहा वेळा भेटला.तो एकूण  किती वेळा मला भेटला ते माझे मन नकळत मोजत होते हे लक्षात आल्यावर माझी मीच चपापले.रेल्वेत, बसस्टँडवर, टॅक्सी स्टँडवर, थिएटरमध्ये, मॉलमध्ये, चौपाटीवर, रेस्टॉरंटमध्ये, नाट्यगृहात, कुठे ना कुठे आमची भेट होतच होती .अजूनही आमचे एकदाही संभाषण झाले नव्हते .प्रथम दोघांच्याही नजरेत अनोळखी भाव होता .हळू हळू त्याचे रूपांतर ओळखीच्या नजरेत झाले होते .परस्परांना भेटल्यावर चेहर्‍यावर ओळखीचे स्मित आपोआप उमटू लागले होते.आम्ही केव्हाही  नकळत एकमेकांना हाय हॅलो करू असे आम्हाला वाटत होते .

एक दिवस मी बसस्टँडवर फोर्टमध्ये जाण्यासाठी उभी होते .एवढ्यात एक चारचाकी माझ्याजवळ येऊन थांबली . तिच्यामध्ये तो तरुण बसला होता .सहजतेने त्याने कुठे जाणार म्हणून मला विचारले .फोर्टमध्ये म्हणून सांगितल्यावर तो म्हणाला मला तिकडेच जायचे आहे चला .मीही पटकन फ्रंट सीटवर  त्याच्या शेजारी जाऊन बसले. माझे मलाच मी अशी कशी एका अनोळखी तरुणांबरोबर जायला तयार झाले ते कळत नव्हते.एका परक्या तरुणाबरोबर जाताना मला काहीही परके वाटत नव्हते .मी उल्हसित झाले होते. मला जे हवे असे कित्येक  दिवस वाटत आहे ते आता मिळत आहे असे  मला वाटत होते .

मी त्याला त्याचे नाव प्रथमच विचारले .त्याचे नाव मधुकर होते . त्याला मी आपणहूनच माझे नाव माधवी आहे असे सांगितले .

मधु व माधवी ही जोडी चांगली दिसेल असा एक विचार माझ्या मनात आला .त्या विचारांबरोबरच माझ्या चेहऱ्यावर नकळत स्मित व खुशी पसरली.त्यालाही माझ्या सारखेच वाटत असेल काय अशा अपेक्षेने मी त्याच्याकडे पाहिले .त्याच्या चेहऱ्यावरील स्मित त्याला तसेच वाटत आहे असे दाखवीत होते .

(क्रमशः)

१७/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन