५ मधू मधुकर व माधवी १-३
(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
~मधुकर ~
मी मधूला पुण्याला
जाणाऱ्या गाडीत बसविले.तिचा निरोप घेतला आणि आता ब्लॉकवर परत जात आहे .मी सवयीने गाडी चालवीत आहे.ब्रेक क्लच गिअर थ्रॉटल इत्यादी हालचाली प्रतिक्षिप्त क्रियेने होत आहेत. दुसरीकडे माझ्या मनात मधू भेटल्यापासूनचे प्रसंग उलगडत जात आहेत.लग्न झाल्यापासून जणू काही चांदण्यात हिरवळीवरून मी चालत आहे असे मला वाटत आहे .आमचा विवाह होऊन केवळ सहा महिने झाले आहेत .मी मधूला पुण्याला जाऊ नको म्हणून सांगत होतो .तिच्या लहान बहिणीच्या लग्नाला अजून जवळजवळ पाऊण महिना आहे. आत्तापासून तिथे तुझे काय काम आहे ?मी तिला विचारले .अजून एक दोन आठवड्यांनी जाऊन चालणार नाही का? असा माझा प्रश्न होता.त्यावर ती म्हणाली आईला वडीलाना मदत करण्यासाठी कुणीही नाही. आई आजारी असते .तिला जास्त काम होत नाही .लग्न म्हणजे कापड खरेदीपासून दागिन्यांपर्यंत कित्येक गोष्टी करायच्या असतात .बाबांना त्याच्यात विशेष काही कळत नाही.मलाच सर्व पाहिले पाहिजे .मलाही तुला सोडून जावे असे मुळीच वाटत नाही .परंतु जरा कळ सोस. विरहाने प्रेम वाढते असे म्हणतात.एकदा वासंतीचे लग्न झाले की मी तुझ्याबरोबर लगेच परत येईन.शेवटी लाडीगोडी लावून माझी परवानगी घेऊन ती पुण्याला गेली. मी लग्नाच्या अगोदर तीन चार दिवस आलेच पाहिजे असे तिचे म्हणणे आहे.माझ्यावर ऑफिसात फार मोठी जबाबदारी आहे .पाच सहा दिवस रजा काढून जाणे शक्य नाही .बघूया काय जमते ते .
मधू आणि मी पुण्याला एकत्र शिकत होतो .आमची शाळेत असल्यापासून मैत्री आहे .मी तसा बुजरा. मुलगी आपणहून बोलायला आली तर काय बोलावे ते मला कधी कळलेच नाही.विचारलेल्या प्रश्नांची एक दोन शब्दात उत्तरे देऊन लगेच मी निघून जात असे . संभाषणं वाढवायचे कसे ते मला मधूने शिकविले. मुलामुलींच्या शाळेत साधारणपणे मुले व मुली निरनिराळ्या बाकांवर बसतात. आमच्या शाळेत एक नियम होता प्रत्येक बाकावर एक मुलगा व एक मुलगी अशी बैठक व्यवस्था केली जात असे .याचा हेतू दोघांनीही एकमेकाला बुजू नये निखळ मैत्री निर्माण व्हावी हा होता .ही बैठक व्यवस्था दर महिन्याला बदलली जात असे . निरनिराळी मुले व मुली एकमेकांच्या संपर्कात येत .दोघांचाही बुजरेपणा जात असे .
तर एका महिन्यात मधू माझ्या शेजारी बाकावर आली.गोरी अपर्या नाकाची काळ्या डोळ्यांची दाट किंचित पिंगट केसांची मध्यम उंचीची अशी तिची आकृती होती. माझा सर्व मुली बुजरा म्हणून आपसात उल्लेख करीत असत . हेही मला तिने अत्यंत निरागसपणे सांगितले .तिचा निरागसपणा, स्पष्टवक्तेपणा, सहज संभाषण सुरू करण्याची व वाढवण्याची धाटणी, सर्वच मला आवडत होते .तिने मला सहज धीटपणा शिकविला.माझा मुलींच्या संबंधातील बुजरेपणा केव्हाच गेला.कोणत्याही मुलीशी मी अत्यंत मनमोकळेपणाने बोलू लागलो .पूर्वीचे मुलींशी चाचरत बोलणे माझे केव्हाच संपले.
आमचे शालेय जीवन केव्हाच संपले . कॉलेजमध्ये आमच्या विद्याशाखा निरनिराळ्या होत्या .कॉलेज जरी एकच असले तरी मी सायन्सला व ती कॉमर्सला होती.आता रोज भेटणे होत नव्हते .प्रत्येकजण आपआपल्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात होता .आमच्या भेटी हळूहळू कमी होत गेल्या .पुढे मी इंजिनिअरिंगला गेलो व नंतर एमबीए केले तर ती कॉमर्स करून सीए झाली .
आमच्या भेटींची संख्या जरी कमी झाली असली तरी भेटी होतच होत्या .आमच्या दोघांत इतका आंतरिक संबंध होता की काही न बोलता सुद्धा आमच्या मनातील भाव एकमेकांना कळत असत.शेवटी आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला .परस्परांच्या आई वडिलांच्या संमतीने आमचा विवाह झाला .विवाह दोन व्यक्तींचा होत नाही तर दोन घराण्यांचा होतो याबाबत आम्ही दोघेही ठाम होतो.प्रेमविवाह ही जरी पाश्चात्य पध्दती असली तरी दोन घराणी एकत्र येतात ही भारतीय पद्धती आहे .पाश्चात्य संस्कृती व भारतीय संस्कृती या दोहोंचाही मिलाफ आम्हा दोघांनाही आवडत होता.
तर दोघांच्याही आई वडिलांच्या संमतीने आमचा विवाह झाला होता .आम्ही अंधेरीला एक चार बेडरुमचा अलिशान ब्लॉक घेतला होता . दोघांचेही आई वडील एकाच वेळी राहायला आले तरी तो अपुरा पडू नये अशी आमची इच्छा होती .
आणिआता एक महिन्याची प्रदीर्घ रजा काढून मधू माहेरी पुण्याला जात होती.तिचा काही काळ माझ्या आई वडिलांकडे व बराच काळ तिच्या आईवडिलांकडे असा जाणार होता.ती माणसात,आपल्या माणसात राहणार होती आणि मी मात्र येथे एकटा राहणार होतो .मी माझ्या आई वडिलांना पुण्याहून येथे बोलविण्याचा विचार केला .परंतु आई वडील दोघेही नोकरी करीत असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते .
दादरपासून अंधेरीपर्यंत मोटार चालवीत जात असताना ती पहिल्यांदा माझ्या बाकावर शेजारी येऊन बसली तेव्हापासून आतापर्यंतच्या सर्व गोष्टी मला आठवत होत्या .रुसवे फुगवे, प्रेमाच्या गोष्टी, प्रेमाची भांडणे, दुरावा, पुन्हा आंतरिक ओढीने एकत्र येणे,आई वडिलांची संमती,सर्व सर्व काही आठवत होते .
मी घरी पोहोचलो आणि प्रथम मधूला फोन लावला. तिची गाडी आतापर्यंत कर्जतला पोचली असेल असे मला वाटत होते . फोनला काहीही उत्तर येत नव्हते .रिंग वाजत होती .फोन उचलत नाही एवढाच रेकॉर्डेड मेसेज पुन्हा पुन्हा येत होता .सायलेंट मोडवर असेल , म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केले .तिचा मला फोन येणे अपेक्षित होते .तिचाही फोन मला आला नाही .अशीच दहा पंधरा मिनिटे गेली .का कोण जाणे परंतु मी अंतर्यामी अस्वस्थ झालो .काहीतरी अशुभ घडणार आहे असे मला आतून वाटू लागले .मी पुन्हा एकदा फोन लावून पाहिला .आताही काहीही उत्तर येत नव्हते .
तेवढ्यात मोबाइलवर एक नोटिफिकेशन येऊन गेले .ब्रेकिंग पूना मेलला ठाण्याजवळ अपघात असा तो मेसेज होता. मी बातमी पाहिली.पूना मेल चुकीच्या सिग्नलमुळे भरधाव वेगात असताना ठाणे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीवर आदळली अशी ती बातमी होती .
मी लगेच टीव्ही लावला .दूरदर्शनवर अपघाताची बातमी व तदनुषंगिक इतर गोष्टी पुन्हा पुन्हा दाखविल्या जात होत्या . सांगितल्या जात होत्या.
मी लगेच गाडी काढली व ठाण्याच्या दिशेने निघालो .
~ मधू~
हा मध्या एखाद्या लहान मुलासारखा आहे. त्याच्या प्रतिक्रिया केव्हा केव्हा हसू येण्यासारख्या असतात. एवढे मोठे ऑफिस हा सांभाळतो .सर्वांवर हुकमत गाजवतो . उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ती पूर्ण करून दाखवतो .प्रत्येक गोष्टीत अगोदर नियोजन व नंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी असा त्याचा खाक्या असतो .त्याच्या ऑफिसमध्ये तो वरिष्ठांच्या गळयातील ताईत आहे .ही गोष्ट त्याच्या प्रतिक्रिया पाहिल्या की केव्हां केव्ह़ां पटतच नाही.
शाळेत जेव्हा मी त्याच्या बाकावर प्रथम शेजारी जाऊन बसले त्यावेळी त्याचा चेहरा पाहायला हवा होता .मला स्पर्श होऊ नये म्हणून त्याने आपले अंग चोरून घेतले होते.मी त्याच्या जवळ पेन मागितले तेव्हा त्याला धड बोलता येत नव्हते.हा बोलताना चाचरतो की काय अशी मला शंका आली होती.मी कौशल्याने थोड्याच दिवसांत त्याचा बुजरेपणा घालविला. तो मोकळेपणाने बोलू लागला .त्या लहान वयातही त्याचे भाषेवर प्रभुत्व चांगले होते .थोड्याच दिवसात आमची मैत्री दाट झाली .ती निखळ मैत्री होती .विशुद्ध प्रेम होते . तशी दृष्टी तसा विचार दोघांच्याही डोक्यात केव्हाही नव्हता .दहावीला असताना केव्हातरी तो विचार माझ्या डोक्यात आला .मी त्याच्याकडे वेगळ्याच दृष्टीने तेव्हापासून पाहू लागले .
त्याच्या डोळ्यात तोच निखळ प्रेमाचा भाव होता . मी त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे ते त्या बावळटाच्या लक्षातच येत नव्हते.केव्हा तरी कसे कोण जाणे परंतु त्याला माझ्या डोळ्यातील भाव कळले .त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली .आम्ही तोपर्यंत कॉलेजात पोहोचलो होतो.तो इंजिनीअरिंगला व पुढे एमबीएला, तर मी कॉमर्स व सीए करीत होते .आम्ही भेटत होतो. गप्पा मारीत होतो. फिरायला जात होतो.स्वतंत्रपणे किंवा मित्र मैत्रिणींबरोबर सिनेमा नाटक पिकनिक चालूच होते .कित्येक वेळा परस्परांना न बोलता एकमेकांच्या मनातील भाव कळत असत.या अंतरीचे त्या अंतरी हे ट्रान्समिशन कसे होत होते कोण जाणे? परंतु होत होते हे खरे.
आपण एकमेकांना अनुरूप आहोत हा विचार दोघांच्याही मनात केव्हा तरी उमटला .न सांगता न बोलता न विचारता आम्ही दोघांनीही ते गुह्य जाणले.
परस्परांना शाब्दिक न विचारता आम्ही दोघेही आमच्या आई वडिलांच्या पुढ्यात जाऊन उभे राहिलो.तुम्ही परवानगी दिली तरच आम्ही लग्न करू असे त्यांना सांगितले. सर्वांच्या संमतीने आमचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला .तेव्हापासून मी आणि अर्थात मधुकरही मखमलीच्या पायघडय़ांवरून चालत आहोत.असे अनंतकाळ दीर्घकाळ चालत राहू
असा आमचा विश्वास आहे.
वासंतीच्या लग्नासाठी मी पुण्याला महिनाभर जाणार असे म्हटल्याबरोबर मधुकरचा चेहरा तुम्ही पाहायला हवा होता .एखाद्या लहान मुलासारखा तो रुसून बसला होता . त्याचे रुसणे दूर करण्यासाठी मला बऱ्याच खटपटी लटपटी कराव्या लागल्या .ते सर्व आठवले की आता हसू येत आहे .तो एवढा ऑफिसर, मीही माझ्या ऑफिसात चांगल्या पोस्टवर, आणि लहान मुलांसारखे हे दोघांचे घरात रुसवे फुगवे माझे मलाच हसू येत आहे.
शेवटी मी त्याची समजूत काढली .एक महिन्याचा विरह हां हां म्हणता संपेल असे त्याला सांगितले .शेवटी त्याची समजूत काढून मी महिनाभर वासंतीच्या लग्नासाठी पुण्याला जायला निघाले .दादर स्टेशनवर तो मला निरोप द्यायला आला तेव्हाचा त्याचा चेहरा पाहायला हवा होता.किंचित रुसलेला ,किंचित फुगलेला, आता हिच्याशिवाय मी एकटा कसा राहू अशा विचारात पडलेला,असा तो चेहरा होता .
गाडी सुटली. मधुकर मागे मागे जात आहे असा भास होत होता . शेवटी तो दिसत नाही झाला .अडीच तीन तासात मी पुण्याला पोचणार होते . वासंती,बाबा, मला स्टेशनवर घ्यायला येणार होते .मी निघाले म्हणून त्यांना मेसेज केला .गाडीच्या एका विशिष्ट र्हिदम बरोबर मला मधुकर भेटला तेव्हा पासूनच्या सर्व आठवणी येत होत्या.
आणि अकस्मात गाडीला एक मोठा धक्का बसला .माझी शेवटची आठवण म्हणजे मी सीटवरून फेकले गेले आणि माझे डोके समोरच्या सीटवर जोरात आपटले आणि डोळ्यासमोर अंधारी पसरली .
(क्रमशः)
१७/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन