९ मुलींचे अपहरण इ.सुधाकर कथा २-३
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
रावसाहेब चव्हाण इन्स्पेक्टर सुधाकरना सांगत होते
फोनवर बोलताना वासंती दबावाखाली असल्यासारखी कां वाटली?कुणीतरी तिच्याकडून जबरदस्तीने तिला फोनवर बोलते करून ती सुखरूप आहे असे आम्हाला भासवण्याचा प्रयत्न करीत नाही ना?आम्ही पोलिसांत जाऊ नये जास्त चौकशी करू नये म्हणून तर प्रयत्न केला जात नाही ना?
ती सुखरूप आहे ना ?
ती कपडे घेतल्याशिवाय,घरात कांही सांगितल्याशिवाय, अकस्मात कशी गेली?अशा आम्हाला अनेक शंका आहेत.
वासंती अगोदर घरात कुठे जाते, ट्रिपला जाते, हे सांगितल्याशिवाय जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. ती घरात कांहीही सांगितल्याशिवाय कपडे घेतल्याशिवाय निघून गेली त्यामुळे जास्त काळजी वाटत आहे.
तुम्ही पोलिस खात्यामार्फत चौकशी करावी अशी इच्छा आहे.
वासंती सुखरूप असावी.तिची व आमची लवकरात लवकर भेट व्हावी.त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती मी करीत आहे.
एवढे प्रदीर्घ भाषण करून रावसाहेब चव्हाण बोलायचे थांबले.
इन्स्पेक्टर सुधाकरना एक कल्पना सुचली.त्यांनी सायबर सेलला फोन लावला. रावसाहेबांना त्यांचा नंबर विचारला.तो नंबर सायबर सेलला दिला व सुधाकर म्हणाले थोड्याच वेळात या नंबरवरून फोन जाईल.तो फोन ट्रेस करा.जिथे फोन केला जाईल त्याची मला लोकेशन पाहिजे.थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी रावसाहेबांना,त्यांच्या मुलीला फोन करायला सांगितला.फोनवर मुलगी बोलत होती ते संभाषण रेकॉर्ड करण्याचीही व्यवस्था सुधाकरानी केली होती.मुलीने मी मालवणहून बोलत आहेत आम्ही मैत्रिणी मजा करीत आहोत इत्यादी गप्पा मारल्या.तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी नाहीत याबद्दल रावसाहेबांनी एक अक्षरही बोलू नये. त्यांना ती एकटीच गेली आहे हे माहीत झाले आहे वगैरे गोष्टी तिला कळू नयेत याची काळजी घेण्यास इन्स्पेक्टर सुधाकरनी रावसाहेब चव्हाण यांना अगोदरच सांगितले होते. जर वासंतीचे अपहरण झाले असेल तर ती फोनवर बोलताना शेजारी अपहरणकर्ते असणारच.फोन स्पीकर मोडवर असणार.त्यांना वासंतीचे अपहरण झाले आहे, ती मालवणला गेली नाही, हे रावसाहेबांना कळले आहे ही गोष्ट अपहरणकर्त्यांना कळू नये ते बेसावध राहावेत असा हेतू यामागे होता.आणखी एक दूरस्थ शक्यता.वासंती मित्राबरोबर पळाली असेल तर रावसाहेबांना ती मालवणला गेली नाही हे कळले आहे हे कळू नये अशीही इच्छा होती
वासंती अपहरणकर्ते दोन्हीही बेसावध राहिले असते.
सुधाकरांचा निरोप घेऊन रावसाहेब निघून गेले.त्या अगोदर सुधाकरानी वासंतीचा फोटो मागून घेतला होता.रावसाहेबांच्या फोनमध्ये त्यांच्या मुलीचे अनेक फोटो होते.त्यातील एक व्यवस्थित फोटो म्हणजेच समोरून व्यवस्थित चेहरा दिसेल असा फोटो सुधाकरानी निवडला होता. रावसाहेब गेल्याबरोबर सुधाकरानी सायबर सेलला फोन लावला.रावसाहेबांचा फोन जवळच जास्तीत जास्त वीस किलोमीटर अंतरापर्यंतच्या एखाद्या ठिकाणी गेला होता असे सायबर सेलकडून समजले होते.याचाच अर्थ वासंती मालवणला गेली नव्हती.ती इथेच कुठेतरी जवळपास होती.ती तिच्या मर्जीने होती किंवा कदाचित बळजबरीने तिला तिथे ठेवण्यात आले होते.
तरीही खात्री करून घेण्यासाठी त्यांनी तिचा फोटो मालवणच्या पोलिस स्टेशनला पाठविला.सी शोअर रिसॉर्टमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी उतरलो आहोत असे ती म्हणाली होती.त्या रिसॉर्टमध्ये जाऊन फोटोतील मुलगी वासंती चव्हाण तिथे राहते का याची त्यांनी चौकशी करायला सांगितले.दोन तीन तासांत त्यांना मेसेज आला.त्या रिसॉर्टमध्ये शिरगावातून आलेल्या कुणीही मुली राहात नाहीत.वासंती चव्हाण या नावाची किंवा फोटोतील चेहऱ्याची मुलगी त्या रिसॉर्टमध्ये नाही.
सायबर सेलने दिलेल्या माहितीला या माहितीने बळकटी दिली होती.शिरगावच्या आसपासच कुठेतरी वासंती होती.कदाचित तिच्या मित्राबरोबर तिच्या मर्जीने असेल किंवा आणखी कुणाच्या बळजबरीने असेल,सत्य काय तेच शोधून काढायचे होते.
आसपासच्या गावांतील ज्या मुली परत आल्या नव्हत्या.त्यांच्या पालकांना पोलीस जीप पाठवून पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.प्रत्येक पालकाची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. शक्य असल्यास आईवडिलांना दोघांनाही बोलाविण्यात आले होते. मुलीच्या मैत्रिणी, मुलीचे मित्र, मुलीचा स्वभाव,कुणाबरोबर तरी किंवा स्वतंत्र पळून जाण्याची शक्यता,त्यांनी बरोबर कपडे बॅग, पैसे नेले कि तशाच गेल्या,नातेवाईकांकडे चौकशी केल्यावर मिळणारा प्रतिसाद,घरात झालेले भांडण,मनाविरूद्ध लग्न ठरविण्यात आले का,या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.त्या सर्वांची हकिगत साधारण मिळती जुळती होती.मुली बारा ते अठरा या वयातील होत्या.त्यांना कुणीही मित्र नव्हते.सातच्या आंत घरात या संस्कृतीतील त्या मुली होत्या.त्यांचे घरात कुणाशीही भांडण झाले नव्हते.रागावून गेल्या, भांडून गेल्या, कांही आकर्षणापायी गेल्या, पळाल्या,असा कोणताही संभव वरकरणी तरी दिसत नव्हता.याचाच अर्थ एकच शक्यता शिल्लक रहात होती.त्या मुलींना पळवून नेण्यात आले होते.कदाचित जवळपास त्यांना कुठे ठेवण्यात आले असू शकेल.त्यांचा शोध थांबल्यानंतर, शांतता प्रस्थापित झाल्यावर,मग त्यांना कुठे तरी हलवण्यात येईल, अशीही एक शक्यता होती.कदाचित हे एका टोळीचे काम होते.किंवा मुली स्वतंत्रपणे निरनिराळ्या कारणांनी गायब झाल्या होत्या, अशीही एक दूरस्थ शक्यता होती.
निरनिराळ्यस शक्यता लक्षात घेऊन अनेक दिशांनी तपास करणे आवश्यक होते.कदाचित वासंती आणि इतर मुलीही एकत्र सापडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.सुधाकरनी पोलीस कामाला लावले हाेते.वासंती व त्या मुलींचे फोटो बरोबर घेऊन रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, टॅक्सीस्टॅन्ड, फेरीबोटधक्का, इत्यादी ठिकाणी मुली दिसल्याचे कुठे गेल्याचे आढळून येते काय याची चौकशी पोलिसांनी केली.त्यांना त्या मुली शिरगाव व आसपासचा परिसर सोडून कुठे गेल्याचे आढळले नाही.याचाच अर्थ त्या येथेच जवळपास कोठेतरी बंदिस्त करून ठेवण्यात आल्या असाव्यात. सायबर सेलने दिलेली माहिती व पोलिसांनी जमा केलेली माहिती याचा एकत्रित विचार करता शिरगावपासून कमाल पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर वासंती असली पाहिजे असा अंदाज करता येत होता.वासंती सापडली की कदाचित इतर मुलीही तिथे सापडण्याची शक्यता होती.
सुधाकरनी मुलींना शोधण्यासाठी मोहीमच उघडली.पोलिसांना निरनिराळ्या टोळ्यांची, गुंडांची, अवैध धंदे करणाऱ्यांची,भूमिगत जगाची(अंडरवर्ल्ड अॅक्टिव्हिटीज) माहिती असते.कितीही शांत परिसर म्हटला तरी तिथे कांही ना कांही छुपे बेकायदेशीर धंदे(अंडरग्राउंड अॅक्टिव्हिटी)चाललेले असतातच.पोलिसांचे खबरे कमी जास्त प्रमाणात सर्वत्र असतातच.या खबऱ्यांना पैसाही दिला जातो तशाच कांही सवलतीही दिल्या जातात.विशेष घातक नसलेल्या त्यांच्या काही बेकायदेशीर कृत्यांकडे पोलीस कानाडोळा करतात.त्यांना पकडले तरी सोडून देण्याची प्रवृत्ती असते.विशेष गंभीर गुन्ह्याखाली त्याना अटक केली जात नाही.मिळणारा पैसा, मिळणाऱ्या सवलती आणि गुन्हेगार टोळीशी असलेले शत्रुत्वाचे संबंध याचा एकत्रित परिणाम म्हणून पोलिसांना गुन्हे विषयक खबरी मिळत असतात.या खबर्यांच्यामार्फत मुलींना पळवून त्यांना गैरमार्गाला लावणारी एखादी टोळी अस्तित्वात आहे काय याची कसून चौकशी सुधाकरनी सुरू केली. सुधाकर येथे येण्याच्या अगोदरच कार्यरत असलेल्या पोलिसांना खबऱ्यांना बोलवून आणण्यास सांगण्यात आले.जुन्या पोलिसांना खबर्यांची इत्थंभूत माहिती होती.त्यांची अंडीपिल्ली माहिती होती.त्यांची दुखरी नस बरोबर पकडता येत होती.एकेक खबरी स्वतंत्रपणे बोलावण्यात येत होता.नवीन साहेब त्याची स्वतंत्र मुलाखत घेत होते.नवीन साहेब कडक आहेत हे खबऱ्यांना कळले होतेच.ते दबकत दबकत सुधाकरांशी बोलत होते.खोटे बोलणे, लपवाछपवी करणे, आपल्याला महागात पडेल याची त्यांना कल्पना होती.
निरनिराळ्या खबऱ्यांनी अलग अलग दिलेली माहिती एकत्र करून इन्स्पेक्टर सुधाकरानी डोळ्यांसमोर एक चित्र उभे केले.गरीब मुली आर्थिक प्रलोभनाला बळी पडतात.हळूहळू मुलीना ऐषारामाची,पैशाची चटक लागते.त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना कुठेतरी एकांत जागी नेऊन पळवून नेणे सोपे जाते. कांहीवेळा मुलीच त्यांच्याबरोबर आपखुशीने यायला तयार होतात. कांही वेळेला निर्मनुष्य रस्त्यावरून मुलीला पळवले जाते.नंतर त्या मुलीला हे सर्व रॅकेट चालविणार्या प्रमुखाच्या हवाली केली जाते.मुलगी आणून देणाऱ्याला पैसे मिळतात.त्याचा संबंध संपतो.पुढे त्या मुलीचे काय होते ते खबऱ्याना माहीत नसते. माहीत करून घेण्याची इच्छाही नसते.काय होत असेल त्याची सर्वसाधारण कल्पना असतेच. हा रॅकेट प्रमुख कोण आहे तेही माहित नसते.इथेही वेगळी परिस्थिती नव्हती.खबर्यानी असे धंदे करणाऱ्या लोकांची माहिती दिली.त्या लोकाना सुधाकरनी पकडले नाही.त्यामुळे ती टोळी सावध झाली असती.फक्त अशा गैर धंदे करणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्याची व्यवस्था केली.
वासंती कुठे असेल? हा एक प्रश्न होता.या मुली जर परिसर सोडून बाहेर गेल्या नसतील तर त्या कुठे असतील? हा दुसरा प्रश्न होता.त्या सर्व एकत्र तर नसतील ना? असाही संशय होता.त्यादृष्टीने आसपासच्या परिसराचे निरीक्षण करण्याचे सुधाकरानी ठरविले.
पोलिस जीप, सायरन, पोलिसी कपडे या सर्वांचा त्याग केला.साध्या वेषात आपली मोटार, मोटारसायकल,यावर फिरण्यास सुरुवात केली.थोडेसे वेषांतर केले.त्यांना मिशा होत्या.त्या त्यांनी काढून टाकल्या. दाट भरपूर लांबलचक किंचित पिंगट केस असलेला विग घातला.त्याबरोबर ते ओळखता येत नाहीसे झाले.समुद्र किनारीच्या एका हॉटेलमधील खोलीही घेतली.त्यांच्यावर कुणी पाळत ठेवत असल्यास ते पोलिस चौकीत जातात हे कुणाच्या लक्षात येवू नये, कोणालाही कळू नये,हा हेतू त्यामागे होता.पैसे उडविण्यासाठी एखादा गुलछबू मुंबईहून आला आहे अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांच्याबरोबर त्यांचा हस्तक होताच.तोही नोकराच्या रुपात होता.हॉटेलमधील नोकरांशी बोलता बोलता त्याने साहेबांना एखादी मुलगी कुठे मिळेल का अशी पुडीही सोडून दिली होती.त्यातूनही एखाद्या रॅकेटचा तपास लागला असता.
इकडे साहेब आसपासचा परिसर पिंजून काढत होते.समुद्र किनार्याला एका बाजूला दालदी वाडा(मुस्लीम मच्छिमारांची घरे) खारवी वाडा(हिंदू मच्छिमारांची घरे) आणि भंडारवाडा(मुख्यतः माडीचा धंदा करणार्यांची घरे.ही हिंदू वस्ती होती.) होता.खारवी व दालदी मुख्यत्वे मच्छिमारी करीत असत.भंडाऱ्यांचे विविध उद्योग होते. मच्छीमारीबरोबरच ते शेती करत. माडावरून माडी काढून ती विकत.इतरही कांही व्यवसाय करीत,या मच्छीमारांच्या घरात मुली सापडणे शक्य नव्हते.
* समुद्रकिनाऱ्याजळून सागरी हमरस्ता (कोस्टल हायवे) गेला होता.त्यावरून फिरत असताना त्यांना एक टेकडी दिसली.*
(क्रमशः)
५/८/२०२१©प्रभाकर पटवर्धन