६ चुनौती (इन्स्पेक्टर सुधाकर कथा) २-३
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
आठ दिवसांपूर्वी आलेल्या पाकिटावरील व आंतील कागदावरील ठसे त्यावेळी घेऊन इन्स्पेक्टरनी जतन केले होते.
संशयित गुन्हेगार सापडल्यास त्याची ओळख पटविण्यासाठी या ठशांची अनमोल मदत होणार होती.
मागील पत्र आणून देणारा मुलगा निराळा होता.तो रस्त्यावर खेळणी विकणारा होता .त्यानेही पत्र देणारा व त्याची मोटार ओळखली होती.
या मुलाचा पत्ता फोटो वगैरे घेऊन नंतर त्या मुलाला परत पाठविण्यास पोलिसाला सांगितले.हा मुलगा कोपऱ्यावर बुटपॉलिश करीत असे .
इन्स्पेक्टरनी कोपऱ्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज मागवले.त्यात क्रूझर मोटरसायकल, मोटार,पत्र घेताना मुले, त्यांना पत्रे देणाऱ्या व्यक्ती,गाड्यांचे नंबर दिसतात का ते पाहायचे होते .त्यामुळे जेव्हा गुन्हेगार सापडतील तेव्हा केस बळकट होणार होती .गुन्हेगार सापडण्यासाठीही त्या पुराव्याचा उपयोग होणार होता.
दोन्ही मुलांचे पत्ते घेतले होते.ते पत्ते बरोबर आहेत की नाही याची खातरजमा करून घेतली होती. त्या मुलांना जर पत्र देणारा मनुष्य ,ती विशिष्ट क्रूझर मोटरसायकल , ती विशिष्ट मोटार दिसली, तर पोलिसांना लगेच कळविण्यास सांगितले होते.जर त्या व्यक्ती कुठे दुकानात काही खरेदी करताना किंवा आत जाताना दिसल्या तर उपयोग होणार होता.पोलिसांना कळताच तिथे जाऊन त्यांना अटक करता येणार होती.
इन्स्पेक्टर सुधाकरनी आणखी एक गोष्ट केली .दोन साध्या पोषाखातील पोलिसांची त्या मुलांवर लक्ष राहील अशी व्यवस्था केली.त्यांचे नंबर मुलाना दिलेले होते. त्यामुळे लगेचच त्या व्यक्ती व वाहने, ताब्यात घेता येणे शक्य होणार होते.
त्यानी मुलांनी सांगितलेल्या नंबरची वाहने कोणाच्या नावावर आहेत ते शोधून काढण्यास सांगितले होते .
पूर्वीचे पत्र त्यांनी गंभीरपणे घेतले नव्हते .हा कुणाचा तरी खटय़ाळपणा असेल असे गृहीत धरले होते .आता मात्र त्यांनी हे आव्हान गंभीरपणे घेतले.या माणसाला शोधून काढायचाच अशा दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली .
प्रादेशिक परिवहन खात्याकडून माहिती मिळण्यास किंचित विलंब लागणार होता.माहिती मिळताच मुलांनी पुरविलेल्या माहितीची सत्यता असत्यता तपासता येणे शक्य होणार होते .मुलांना बरोबर नंबर सांगता आले नसतील एवढ्या शक्यतेपासून वाहनांवर खोटे नंबर लावलेले असतील इथपर्यंत अनेक शक्यता होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाड्यांचे नंबर दिसले आणि ते खोटे नसले तर सर्वच प्रश्न मिटणार होते.
मुलाना त्या व्यक्ती किंवा वाहन दिसणे केवळ दैवाधीन होते .कोणत्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये दैवाची साथ हा एक भाग असतोच.
तूर्त त्यांनी आलेले पत्र व कार्ड यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. आठ दिवसांपूर्वी आलेले पत्र व आज आलेले कार्ड यांचे निरीक्षण करता ,त्याना त्यात पुढील गोष्टी आढळून आल्या.
१)एकाच वर्तमानपत्रांमधील अक्षरे कापून ती चिकटवून दोन्ही पत्रे तयार केलेली आहेत .
२)अक्षरांचा आकार आणि इतर वैशिष्ट्यें पाहता हा फाँट महाराष्ट्र टाइम्सचा आहे.
३)ज्या पांढऱ्या कागदावर अक्षरे कापून चिकटवलेली आहेत तो कागद झेरॉक्स मशीनसाठी जो कागद वापरला जातो तसाच आहे.
४)ज्याने पत्र पाठवले तो आपल्या घरी बहुधा महाराष्ट्र टाइम्स घेत असावा.
५)ज्याने पत्र पाठविले त्याचा धंदा बहुधा झेरॉक्सचा असावा.किंवा त्याने ते कागद झेरॉक्सच्या दुकानातून मिळविले असावेत.
६)कार्ड व पत्र यावर अज्ञात ठसे नाहीत .पाठविणाऱ्याने त्यावर आपले ठसे राहणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली होती .
७)दोन्ही पाकिटावर मात्र अज्ञात ठसे आहेत .त्याचा उपयोग होउं शकला असता .
८)आव्हान देणारा श्रीमंत असावा त्याशिवाय पंचवीस हजाराचे बक्षीस त्याने लावले नसते.
९)आव्हान देणारा बहुधा तरुण असावा अन्यथा प्रौढ माणसाने असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला नसता.
या लक्षात आलेल्या वैशिष्ट्यांचा लगेच काहीच उपयोग नव्हता .झेरॉक्स दुकाने असंख्य आहेत .महाराष्ट्र टाइम्स अनेक जण घेतात .तरुण पुष्कळ आहेत. श्रीमंतही पुष्कळ आहेत. या माहितीचा उपयोग करून पत्र पाठविणाऱ्यापर्यंत पोचणे शक्य नव्हते.
भविष्यकाळात कदाचित या माहितीचा उपयोग होण्याची शक्यता होती .अन्य उपाय अयशस्वी ठरले तर बडे बापके बेटे कोण आहेत ते शोधून काढून त्यांची चौकशी करून काही मार्ग सापडला असता .
ज्यानी दोन्ही पत्रे आणून दिली ते दोन मुलगे उपयोगी पडण्याचा संभव होता.त्याचप्रमाणे मुलांनी सांगितलेले गाड्यांचे नंबर बरोबर असतील तर निश्चित फायदा होणार होता .सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाड्यांचे नंबर दिसले आणि त्यातील व्यक्ती मुलांना पत्र देताना दिसल्या तर सर्वच प्रश्न सोपे होणार होते .
इन्स्पेक्टरनी तूर्त जिचा खुर्चीला बांधलेला फोटो पाठवला होता तिच्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले .तिचा चेहरा केस कपडे यावरून ती या कटात सहभागी असावी असे वाटत होते.
इन्स्पेक्टर सुधाकरनी त्या मुलीचा फोटो शहरातील सर्व पोलिस स्टेशनना पाठवण्याची व्यवस्था केली .जर कुणी या मुलीला कुठेही केव्हाही पाहिले असेल तर इन्स्पेक्टर सुधाकरशी संपर्क साधावा अशी सूचना दिली होती .त्याचप्रमाणे हरवलेली आहे म्हणून या मुलीची कुणी तक्रार केली असल्यास तीही माहिती इन्स्पेक्टर सुधाकरना द्यावी अशी सूचना केली होती.अर्थात कुणी हरवल्याची तक्रार केली असल्यास ती त्यांना त्यांच्या रुटीन कामामध्ये कळणारच होती
आज दुपारी फोटो मिळाला होता .उद्या सकाळपर्यंत तरी कोणीही हरवल्याची तक्रार करणार नव्हते .मुलगी संध्याकाळपर्यंत घरी येईल म्हणून वाट पाहिली गेली असती .तोपर्यंत ती न आल्यास नातेवाईक तिची मैत्रीण मित्र इत्यादींकडे चौकशी करण्यात आली असती .रात्रीही तिचा तपास न लागल्यास सकाळी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार करण्यात आली असती .
विचार करता तत्काळ एकच शक्यता उपलब्ध होती .ती मुलगी जेथे रहात असेल त्याच्या जवळपास एखाद्या पोलिसाने काही कारणाने तिला पाहिली असण्याची शक्यता होती.अशा एखाद्या पोलिसाचा फोन येण्याची शक्यता होती .
मुलीचा फोटो सर्वत्र पोलिस स्टेशन्सना व पोलिसांच्या वैयक्तिक मोबाईलवर प्रसारित झाल्यावर सुमारे एक तासाने एका पोलिसाचा फोन आला.गाडीचे कागदपत्र चेक करण्याच्या कामावर तो नेहरू चौकात होता .एका मुलीजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते .पोलीस तिच्याकडून दंड वसूल करणार होता .काही कारणाने पर्समधून ड्रायव्हिंग लायसन्स बाहेर काढले होते ते टेबलावरच राहिले .मी जवळच राहते .आता लगेच ड्रायव्हिंग लायसन्स आणून दाखविते .तोपर्यंत मी गाडी येथे ठेवते.दंड न घेता मला ही परवानगी द्या अशी विनंती तिने केली होती.तिला तशी परवानगी दिल्यावर ती मुलगी गेली आणि पाच दहा मिनिटांत लायसन्स घेऊन आली .त्यामुळे ती मुलगी माझ्या पक्की लक्षात राहिली आहे .मुलगी सत्य बोलत आहे.गाडी चोरीची नाही .याची खातरजमा झाल्यामुळे तिला अशी सवलत दिली . असेही तो पोलीस पुढे म्हणाला .
इन्स्पेक्टर सुधाकरना आपल्या दैवाचे कौतुक वाटू लागले.आपल्याला लॉटरी लागली असे त्यांना वाटले .
त्या पोलिसाला त्यानी तू ताबडतोब आहेस तिथेच थांब मी तिथे येत आहे असे सांगितले व लगेच जीप काढून ते तिथे निघाले.
तिथे गेल्यावर त्यांनी त्या पोलिसाला तुला ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता आठवतो का म्हणून विचारले.
*बाकी काही आठवत नाही परंतु सोसायटीचे नाव विशेष असल्यामुळे ते लक्षात राहिले आहे असे सांगितले .*
*सोसायटीचे नाव विचारता "स्यमंतक सोसायटी"असे त्याने सांगितले.*
(क्रमशः)
३१/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन