७ चुनौती (इन्स्पेक्टर सुधाकर कथा) ३-३
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
बाकी काही आठवत नाही परंतु सोसायटीचे नाव विशेष असल्यामुळे ते लक्षात राहिले आहे असे सांगितले .
सोसायटीचे नाव विचारता "स्यमंतक सोसायटी"असे त्याने सांगितले.
स्यमंतक सोसायटी शोधून काढणे विशेष कठीण नव्हते.सोसायटीच्या गेटच्या जवळ उभे राहून, मुलीचा फोटो दाखवून, तिचा पत्ता माहीत करून घेण्यास इन्स्पेक्टर सुधाकरनी सांगितले . मुलीचा पत्ता मिळाला .तिच्या घरी जाऊन एकदम चौकशी करण्याऐवजी मोटारीत बसून गेटवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांनी एका साध्या वेषातील पोलिसाकडे सोपवले .ती दिसल्यास काय करायचे तेही त्याला सांगून ठेवले .
रात्री अकराच्या सुमारास एक मोटार त्या सोसायटीपासून थोड्या अंतरावर येऊन उभी राहिली .ती मुलगी मोटारीतून उतरून सोसायटीकडे चालत निघाली.पोलिसाने अर्थातच मोटारीचा नंबर घेतला .मोटार निघून जाताच त्याने त्या मुलीला प्रतिमा मॅडम म्हणून हाक मारली .तिने दचकून मागे पाहिले .एक साध्या वेषातील मनुष्य तिला हाक मारीत होता .तिचा फोटो दाखवून सोसायटीतल्या माणसांकडून तिचे नांव व पत्ता त्याने अगोदरच माहीत करून घेतला होता.
प्रतिमाने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर पोलिसाने आपले ओळखपत्र दाखविले .पोलीस ओळखपत्र पाहताच तिच्या तोंडावरील रंग साफ उडाला .तिला पोलिस स्टेशनवर चलण्याची विनंती केली . आपल्याला कशाला तोंड द्यावे लागणार याचीही तिला कल्पना आली .तिची येण्याची तयारी नाही असे पाहताच त्याने समन्स आणून,लेडी कॉन्स्टेबल आणून तुम्हाला जबरदस्तीने पोलिस चौकीवर मला नेता येईल.परंतु त्यात तुमचीच बदनामी होईल .त्यापेक्षा बऱ्या बोलाने पोलिस चौकीवर चला. साहेबांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत असे सांगितले.तिने मोबाइलवरून घरी यायला काही कारणाने मला उशीर होत आहे असा संदेश दिला .ती बोलत असताना सतर्कपणे पोलीस तिच्याकडे पाहात होता. आपल्या साथीदाराला ती सावध तर करीत नाही ना याबद्दल तो खात्री करून घेत होता.
मुकाटय़ाने ती पोलिसांच्या गाडीत बसली .थोड्याच वेळात ती इन्स्पेक्टर सुधाकरसमोर बसलेली होती.
एक शब्दही न बोलता इन्स्पेक्टर सुधाकरनी तिच्यासमोर तिचा फोटो व पत्र ठेविले .ते एवढेच म्हणाले मला सर्व काही माहित झाले आहे .मला तुमच्याकडून त्याचा कबुलीजबाब पाहिजे आहे .तुम्ही सर्व काही खरे खरे न सांगितल्यास तुमचा मित्र व तुम्ही अडचणीत याल.तिने एकदा इन्स्पेक्टर सुधाकरांच्या चेहऱ्याकडे पाहिले. थोडा वेळ विचार केला.मनाशी कांही निश्चय करून प्रतिमाने घडाघडा बोलण्यास सुरुवात केली .इन्स्पेक्टर सुधाकरनी रेकॉर्डिंग चालू केले होते .
सुधाकरनी अंदाज केला होता त्याप्रमाणेच सर्व घटना घडल्या होत्या .
नागरी सत्काराच्या वेळी पियूष तिचा मित्र तिथे हजर होता . नामांकित उद्योगपती अण्णासाहेब लोखंडे यांचा तो मुलगा होता.त्याचे नांव व तो नामांकित उद्योगपती लोखंडे यांचा मुलगा असल्याचे ती बोलत असताना इन्स्पेक्टर सुधाकरना कळले. पोलिसांचे हात शेवटी गुन्हेगारांपर्यंत पोचतातच.कायद्याचे हात लांब असतात इत्यादी भाषण ऐकून त्याला एक कल्पना सुचली .त्याची मैत्रीण प्रतिमाजवळ त्याने ती बोलून दाखविली.पोलिसांना असले अाव्हान देणे योग्य नाही. कदाचित त्याचे वाईट परिणाम होतील.इत्यादी सांगूनही पियूष ऐकायला तयार नव्हता .शेवटी ती पियूषवरील प्रेमापोटी त्याच्या योजनेत सामील झाली.
हस्ताक्षराच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचता येऊ नये म्हणून, महाराष्ट्र टाइम्समधील अक्षरे कापून ती चिकटवून पत्र तयार करण्यात आले व ते सुधाकरना पाठवण्यात आले .
नंतर आठ दिवसांनी प्रतिमाला एका खुर्चीला बांधून,तिचे हात पाय बांधून , तिचा फोटो काढण्यात आला.तो फोटो व अक्षरे चिकटवून तयार केलेले कार्ड पुन्हा सुधाकरना पाठविण्यात आले.
इन्स्पेक्टर सुधाकर इतक्या लवकर त्यांच्यापर्यंत पोचतील असे त्यांना वाटले नव्हते .किंबहुना ते बहुधा पियूषला व तिला शोधून काढू शकणार नाहीत असेच त्यांना वाटत होते.
पियूषच्या वडिलांचे मॉलवजा दुकान होते .त्यात झेरॉक्स मशीनही ठेवलेले होते .त्यातीलच एक कागद पियुषने पत्र पाठविण्यासाठी वापरला होता. पियुषच्या घरी रोज मटा येत होता .
गुंडांनी पळवलेली, घाबरलेली बावरलेली मुलगी कशी असली पाहिजे, तशी फोटोतील मुलगी नाही .मुलगी या कटात सामील असली पाहिजे . मुलगी व मुलगा एकमेकांना पूर्ण ओळखतात. त्यांचे प्रेमही असावे.(बदामाच्या एक्क्याचे कार्ड वापरण्यात आले होते त्यावरून इन्स्पेक्टर सुधाकरनी हा अंदाज केला होता.) हा त्यांचा अंदाज अचूक ठरला होता.मटाचा फॉन्ट व झेरॉक्सचा पत्र तयार करण्यासाठी वापरलेल्या कागदाचा अंदाजही अचूक ठरला होता.पत्र लिहिणारा तरुण असावा, बडे बापका बेटा असावा,हाही अंदाज बरोबर ठरला होता.
इन्स्पेक्टर सुधाकरांचे सर्व अंदाज बरोबर ठरले होते.
दैवाने त्यांना साथ दिली .स्कूटरचे कागदपत्र चेक करताना ड्रायव्हिंग लायसन्स नसणे,ती मुलगी जवळच राहात असणे,सोसायटीचे नाव स्यमंतक असे वैशिष्टय़पूर्ण असणे ,हा केवळ दैवाचा भाग होता .
अर्थात जरी इन्स्पेक्टर सुधाकरना दैवाने साथ दिली नसती तरी त्यांनी गाड्यांचे नंबर, ती दोन मुले,सीसीटीव्ही फुटेज , यांच्या मार्फत पियूषला शोधून काढला असताच. थोडा आणखी वेळ गेला असता .थोडे आणखी संशोधन करणे आवश्यक ठरले असते .
इन्पेक्टर सुधाकरनी प्रतिमाला फोन करून पियुषला पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्यास सांगितले .प्रतिमा बोलत असताना त्यानी तिच्या हातातील फोन घेऊन त्याला दमही दिला होता.प्रतिमा आमच्या ताब्यात आहे .आमचे तुझ्यावर लक्ष आहे.पळण्याचा प्रयत्न करून तू आणखी गोत्यात येशील.तुला सहीसलामत यातून सुटायचे असेल तर मुकट्याने ताबडतोब येथे ये. प्रतिमाने गयावया करून त्याच्याविरुद्ध तुम्ही कांही कारवाई करू नका,अशी विनंती केली. स्मित करीत त्यांनी तिला आश्वस्त केले .
थोड्याच वेळात घाबरत घाबरत पियूष पोलिस स्टेशनला पोचला.त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता.इन्स्पेक्टर एकदम कडक आहेत असे तो ऐकून होता. पोलिसी थपडा खाव्या लागतील.एक दोन दिवस पोलीस कस्टडीत राहावे लागेल.पोलिसांना हेतूपूर्वक फसविल्याबद्दल गुन्हा शाबित होऊन शिक्षेला तोंड द्यावे लागेल.वडिलांची बोलणी बसतील .मित्रांमध्ये आपण थट्टेचा विषय होऊ. अनेक प्रकारची भीती व संदेह त्याच्या मनात होते.
सुदैवाने इन्स्पेक्टर सुधाकर जेवढे कडक होते तेवढेच नरम होते.
पियूषचा पोरकटपणा त्यानी विशेष गंभीरपणे घेतला नाही .
माझ्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर तुला चौकशीला व व परिणामांना तोंड द्यावे लागले असते .
पोलिसांची थप्पड किती भक्कम असते तुला माहीत नाही .
पोलीस कारवाई करतात तेव्हा काय काय सहन करावे लागते तेही तुला माहीत नाही .
*दोघांनाही पुरेशी कायमची लक्षात राहील अशी तोंडी समज देण्यात आली.*
*त्यांच्याकडून माफीपत्र लिहून घेण्यात आले.*
*पुन्हा पोलिसांची थट्टा करण्याच्या भानगडीत पडू नकोस.*
*त्यांची परीक्षा वगैरे घेऊ नकोस .*
*त्याना आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नकोस.*
*असा इशारेवजा सल्ला देऊन दोघांनाही सोडण्यात आले.*
(समाप्त)
३१/५/२०२० © प्रभाकर पटवर्धन