Get it on Google Play
Download on the App Store

७ हास्य मोहित १-२

(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

ती दोघे एका माळरानावरून चालत होती .दोघांनीही हातात हात गुंफले होते . सूर्य थोड्या वेळापूर्वी अस्ताला गेला होता .मावळतीचा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरला होता. मंद वारा वाहत होता .आकाशात पाखरांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते . वातावरण चित्तवृत्ती  उल्हसित करीत होते .दोघे  गप्पांत गुंग झाले होते .काळ त्यांच्यासाठी जणू थांबला होता. जगाच्या अंतापर्यंत आपण असेच चालत राहू असे त्याना वाटत होते.एवढ्यात आकाशात काळे ढग दाटून आले .काही वेळापूर्वीचे सायंकाळचे उल्हसित वातावरण एकदम बदलले.धुवाँधार पाऊस सुरू झाला. .वारा सोसाटय़ाने वाहू लागला .प्रचंड थंडी वाजू लागली. अकस्मात सर्वत्र धूसर काळा प्रकाश पडला.ती दोघे एकमेकांजवळ असूनही ती एकमेकांना दिसत नाहीशी झाली . वार्‍याच्या जोरामुळे तिचा हात त्याच्या हातातून सुटला.ती वाऱ्यावर हवेत उडत दूर जाऊ लागली.तिला पुन्हा पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही ती त्याच्या हातात आली नाही .तो तिला पकडण्यासाठी धावत होता .सारंग सारंग अश्या  हाका ती मारीत होती . हळूहळू तिचा आवाज क्षीण होत गेला.धावून धावून त्याचे अंग घामाने निथळत होते.धावून धावून त्याला जोरात धाप लागली होती.पायात पेटके आले होते. 

आणि तो जागा झाला.त्याचे अंग घामाने निथळत होते.जे त्याने अनुभवले ते इतके सत्य होते की ते स्वप्न होते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता .अजूनही त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडत होते.त्याची नाडी जलद चालत होती .त्याच्या अंगाला अजूनही थरथर होती.अतोनात श्रमामुळे त्याला उठताही येत नव्हते .

सुधा आपल्यापासून कायमची दुरावली जाणार असा तर या स्वप्नाचा अर्थ नाही ना? असे  त्याच्या मनात आले .सर्व काही सुरळीत चालू असताना आणि गोड शेवट होईल असे वाटत असताना अकस्मात हा कसला संदेश .पहाटेच्या वेळची स्वप्ने खरी ठरतात.नियतीने दिलेली ही सूचना तर नाही ना?अशा विचारात तो जागच्या जागी थिजून गेला होता .

त्याला सुधाची व आपली पहिली भेट आठवली .      

सारंग व वसुधा स्नेहसंमेलनाच्या कामांमध्ये व्यस्त होती.सारंग महाविद्यालयात व्याख्याता होता .स्नेहसंमेलनात त्याच्याकडे नाट्य विभाग सोपविलेला होता .नाटिका निवडण्यापासून तिचा स्टेजवर प्रयोग करीपर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत असे .वसुधा त्याच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत होती .नाट्य विभागाची विद्यार्थ्यांतर्फे ती प्रतिनिधी होती .सारंग व वसुधा यांचे ट्युनिंग फार छान होते.दोघांच्या देखरेखी खाली महाविद्यालयाचा नाट्य विभाग चांगला फोफावला होता .महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाचे नाटक नेहमी प्रथम येत असे. अशी उज्ज्वल परंपरा होती .या वर्षीही ती परंपरा राखली जाईल अशी खात्री होती .

सारंग विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होता .त्याची लेक्चर्स तर सर्वाना आवडत असतच.विषय समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षण होती.इतर प्राध्यापकांशी तुलना करता सारंग विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच मिसळत असे .असे असले तरीही तो विद्यार्थ्यांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जवळ येऊ देत नसे .

सारंग व वसुधा  कोणत्यातरी विषयावर बोलत असताना वसुधाची एक मैत्रीण तिथे आली.वसुधा व ती थोडे बाजूला जावून थोडा वेळ  कोणत्यातरी विषयावर बोलत होती.त्याने त्या मैत्रिणीला अजून आपल्या कॉलेजमध्ये पाहिले नव्हते .सारंग तिच्याकडे टक लावून पाहात होता .तिच्यामध्ये एवढे आकर्षक काय आहे ते त्याला  लक्षात येत नव्हते.प्रत्येक मुलीमध्ये काहीना काही आकर्षक वैशिष्ट्ये असतात.कुणाची कांती नितळ असते .कुणाचे केस काळेभोर व  लांबसडक असतात.कुणाचे डोळे मोठे व पाणीदार असतात.कुणाचे नाक चाफेकळी सारखे असते .कुणाची कांती तेजस्वी असते . कुणाची शरीरयष्टी  कमनीय असते.कुणाचा आवाज चांदीच्या घंटा किणकणल्या सारखा असतो .कुणाची चाल  इतकी आकर्षक असते की तू सदैव अशीच चालत रहा असे म्हणावेसे वाटते! कुणामध्ये विशेष काही वैशिष्ट्य नसले तरीही एकूण आकृती आकर्षक वाटते. आणि आपली ती भेटली की सगळेच चांगले वाटते! शारीरिक गुणांबरोबरच आंतरिक  गुणही असतात .तीव्र बुद्धिमत्ता, कोणतीही समस्या सहजरीत्या  सोडवण्याची हातोटी,वक्तृत्व ,नृत्य गायन नाट्य इत्यादी कलांमध्ये प्राविण्य,   शारीरिक गुणवैशिष्टय़े प्रथमदर्शनी लक्षात येतात तर आंतरिक गुणवैशिष्टय़े सहवासानंतर लक्षात येतात .प्रथमदर्शनी शारीरिक वैशिष्ट्यांचे दर्शन व प्रभाव पडत असतो.तर दीर्घ सहवासातून आंतरिक गुणांची ओळख होत असते .प्रत्येक मुलीत साधारणपणे काही ना काही आकर्षक असतेच .कुणाचे केस, कुणाचा भालप्रदेश, कुणाचे डोळे, कुणाचे नाक, कुणाची जिवणी, कुणाची मान, कुणाचे शरीरसौष्ठव, कुणाचा रंग, कुणाची बोलण्याची स्टाइल, इ. या मुलीत काय आकर्षक आहे असा विचार करताना त्याला तिचे हास्य  मोहक वाटले .तशी ती मुलगी दिसायला चांगली तर होतीच परंतु तिचे हास्य मात्र लाजवाब होते.तिच्या बोलताना हसण्याच्या व हसताना बोलण्याच्या पद्धतीमध्ये एक आकर्षण होते.~सखी तू सदैव अशीच बोलत राहा~ असे म्हणावेसे वाटत होते.    

हिच्याशी आपली ओळख झाली तर किती चांगले होईल असा विचार त्यांच्या मनात आला .अजूनपर्यंत त्याला कोणत्याही मुलीबद्दल असे आकर्षण वाटले नव्हते .एवढ्यात वसुधा व ती मुलगी दोघेही सारंगकडे आली.वसुधाने ही माझी मैत्रीण सुधा म्हणून तिची ओळख करून दिली.त्याचप्रमाणे ती आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी नसून दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकत आहे असेही सांगितले .तिच्याशी आपली ओळख व्हावी ही त्याची इच्छा लगेच पूर्ण झाली . कदाचित सुधा तिचे काम झाल्यावर घाईघाईने तशीच निघूनही गेली असती .परंतु तसे झाले नाही.ओळख झाल्यावर त्याला एक आंतरिक समाधान मिळाले .तिचे हास्य, बोलताना मानेला किंचित झटका देण्याची पद्धत,चांदीची घंटा वाजवावी त्याप्रमाणे असलेला तिचा मधुर आवाज,या सर्वामुळे सारंग "ती पाहताच बाला कलिजा खलास झाला"या उक्तीप्रमाणे खलास झाला .त्याची विकेट पडली.ती मुलगी निघून गेली आणि सारंग व वसुधा पुन्हा आपल्या कामाकडे वळली.तिची पुन्हा भेट झाली तर फार चांगले होईल असा एक विचार त्याच्या मनात आला आणि नंतर तो तिला विसरुनही गेला .

परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते .

(क्रमशः)

१०/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन