Get it on Google Play
Download on the App Store

२ हरवले ते गवसेल का १-२

आरोह अत्यंत उदास व खिन्न मन:स्थितीत होता.

शहरात फिरताना त्याला ठिकठिकाणी रसिकाच्या व त्याच्या ओळखीच्या खुणा दिसत होत्या.त्या सर्वांपासून कुठेतरी दूर शांत ठिकाणी जावे म्हणजे मनाला थोडे बरे वाटेल म्हणून  आरोह या प्रसिद्ध  समुद्र किनारी आठवणींपासून सुटका व्हावी म्हणून येथे आला होता .तरीही आठवणी आणि उदासी त्याची पाठ सोडीत नव्हत्या .

त्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत आनंदी वातावरण होते.हवेमध्ये सर्वत्र उल्हास ओसंडून वाहात होता. लहान मुले  वाळूमध्ये किल्ला बांधण्यात दंग होती.  त्याहून जरा मोठी लंगडी धावा धावी हुतुतू कबड्डी असे काही खेळ खेळत होती .काही मुले मुली रिंग वगैरे खेळत होती .तरुणांच्या जोड्या हातात हात घालून इकडे तिकडे फिरत होत्या किंवा वाळूवर बसल्या होत्या .या जोड्यांना समुद्रकिनारी फक्त आपणच आहोत असे बहुधा  वाटत असावे. अशी त्यांची परस्परांशी  वर्तणूक होती .कांही जण समुद्रात पोहण्याचा आनंद घेत होते .काही जण समुद्रात पोहून झाल्यावर येऊन अंग सुकवीत व नंतर पुन्हा समुद्रात जात .काही जण उन्हात त्वचेचे टॅनिंग करीत होते.हे टॅनिंगवाले सर्व गोरे परदेशी होते. काही किनाऱ्यावर चालत होते.काही दौडत होते .काही व्यायाम करण्यात मग्न होते.वयस्कर जोडपी हळूहळू फिरत होती किंवा कुठे तरी बसली होती .  थोडक्यात जो तो आपल्या ह्यात होता .

पिकनिक, पर्यटन, यासाठी तो समुद्र किनारा अत्यंत प्रसिद्ध होता . तो समुद्र किनारा एवढा लांब रुंद होता की एवढी गर्दी असूनही गर्दी झाल्यासारखे वाटत नव्हते .प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असलेली प्रायव्हसी विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे मिळू शकत होती .एकंदरीत सर्वत्र आनंद व उल्हास याचे वातावरण होते.

आरोह त्या आनंदाचा एक भाग होऊ शकत नव्हता .सर्वत्र पसरलेला आनंद व उल्हास आरोहची खिन्नता दूर करू शकत नव्हता .तो आपल्याच दु:खमय कोषात गुरफटलेला होता.तो स्वतःला एकच प्रश्न विचारत होता. असे कसे झाले ?आपण दोघे बोलता बोलता भांडता भांडता स्वतःला न सावरता एवढे टोकाला कसे गेलो ?एकालाही थांबण्याचे कसे सुचले नाही ?साध्या सहज बोलण्याने केवढे विचित्र वळण घेतले ? 

आरोह त्या सर्व आनंदमय व उल्हसित वातावरणाकडे बघतही होता किंवा बघतही नव्हता.त्याची नजर शून्यात लागलेली होती .आठवणी त्याचा पाठलाग सोडत नव्हत्या .त्याच्या डोळ्यासमोर गेल्या काही वर्षांचा पट उलगडत होता .

~~~

आरोह 

त्या दिवशी मी मित्रांकडून माझ्या घरी जात होतो .कडाक्याच्या थंडीमुळे सुनसान असलेल्या एमजी रोडवर एक बावरलेली आकर्षक तरुणी उभी होती .रात्रीचे दहा वाजले होते .त्या तरुणीला तसेच एकटे सोडून जाणे माझ्या स्वभावात बसत नव्हते .मी थांबून तिला काही प्रॉब्लेम आहे का? असे विचारले .तिने माझे विचारणे सरळ अर्थानेच घेतले. माझ्या येण्याने व विचारपूस करण्याने तिला धीर आला होता .ती बावरलेली वाटत होती .रस्त्यावरील शांतता व एकांत यामुळे ती थोडी घाबरलेली होती .तिची स्कूटर बंद पडली होती .मी जरी मेकॅनिक नसलो तरी मला सर्वच यंत्रांमध्ये कुतुहल असल्यामुळे मी गाडी संबंधी थोडे बहुत जाणत होतो .मी गाडी सुरू करून दिली .तिला तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोबतही केली .त्या निमित्ताने मला तिचे घरही पाहता आले. तिने माझे पुन्हा पुन्हा  मन:पूर्वक आभार मानले. तिला तिचे नाव विचारावे असे मला वाटत होते.तिच्यात असे काहीतरी होते की ती  पहाताच मला आवडली होती.कदाचित  अमिताभची ती सुप्रसिद्ध घंटी माझ्या डोक्यात वाजली असावी !असे एकदम नाव विचारणे मॅनर्सला धरून नव्हते. ते माझ्या स्वभावातही नव्हते .यू आर वेलकम असे म्हणून मी तिचा निरोप घेतला .अर्थात ती कुठे राहते ते पाहिलेले असल्यामुळे तिचे नाव शोधून काढण्यात काही अडचणी येणार नव्हतीच .

रसिका 

त्या दिवशी रात्री दहा वाजता मी महात्मा गांधी रोडवर एकटीच उभी होते.मैत्रिणींकडून तिचा वाढदिवस साजरा करून मी घरी निघाले होते .मला नऊ वाजताच निघायचे होते.परंतु  गप्पा मारता मारता दहा केव्हा वाजले ते कळले नाही .दहा मिनिटांत मी घरी पोहोचले असते .तेवढ्यात विचित्र आवाज करीत माझी स्कूटर बंद पडली .स्टार्टर दोनचारदा दाबून पाहिला.गाडी स्टॅंडवर घेऊन किकही मारून झाल्या .गाडीतील पेट्रोलही चेक केले.गाडीत काहीतरी फॉल्ट  निर्माण झाला होता.स्कूटर तशीच रस्त्यावर सोडून जाणे योग्य नव्हते .पार्किंगमधून गाड्या चोरीला जात होत्या तिथे रस्त्यावर पडलेली गाडी केव्हाच चोरीला गेली असती. जवळपास कुणीही ओळखीचे नव्हते.रात्रीचे दहा वाजले होते . कडाक्याची  थंडी असल्यामुळे रस्ता सामसूम होता.एकट्याने रस्त्यावर  जास्त वेळ थांबणेही योग्य नव्हते .येणारे जाणारे रिक्षावाले वाकून बघत जात होते .एखादी रिक्षा पकडावी घरी जावे बाबांना घेऊन लगेच यावे असा विचार मी करीत होते .बाबांना फोन करून इथे बोलवावे असाही एक विचार मनात आला .परंतु बाबा येईपर्यंत इथे एकटे उभे राहणे योग्य आहे की नाही तेहि कळत नव्हते. महात्मा गांधी रोडवर लांबवर पाहत असताना मनात गमतीशीर विचार आले .प्रत्येक शहरात बहुधा  एमजी रोड हा असतोच .बहुधा हा रोड शहराच्या मध्यभागी असतो . याच रोडवर महात्मा गांधीच्या सत्य अहिंसा अस्तेय या  तत्त्वांचा सर्रास प्रत्येक मिनिटाला खून केला जात असतो. खरेच हे सत्य विदारक आहे .असे काही विचार मनात येत असताना मी गाडी लॉक केली. मी रिक्षासाठी हात करणार एवढ्यात मोटारसायकलवरून एक उमदा तरुण तिथे येऊन थांबला .त्याने विचारले एनी प्रॉब्लेम ?तो बऱ्यापैकी देखणा तरुण मला सभ्य दिसत होता .त्याच्या डोळ्यात तसे कोणतेही विशिष्ट भाव नव्हते .ही मुलगी काही अडचणीत आहे तिला मदत करावी एवढाच भाव त्याच्या डोळ्यात होता .मी त्याला मोकळेपणाने माझी अडचण सांगितली .त्याला गाडीतील बरेच काही कळत असावे .तो मेकॅनिक वाटत नव्हता .त्याने पाच दहा मिनिटे गाडीशी काही तरी खाटखूट करून किक मारली व गाडी सुरू झाली .तो मला घरापर्यंत सोबत म्हणून पोचवायलाही आला होता .त्याचा मला तेव्हा केवढा मोठा आधार वाटला होता .

आरोह 

ती पुन्हा भेटावी . तिची ओळख व्हावी.असे मला उत्कटतेने वाटत होते .जर तुम्ही मनापासून एखादी इच्छा कराल तर सारी सृष्टी निसर्ग तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असतो.असे तत्वज्ञ,संत, साधू, शाहरुख खान कुठल्यातरी एका सिनेमात म्हणतो ते खरे ठरले . दुसऱ्या दिवशी मी एका मॉलमध्ये जीन्स खरेदीसाठी गेलो होतो .तिथे ती तिच्या मैत्रिणीबरोबर काही खरेदीला आली होती . मला पहाताच ती मैत्रिणींना सोडून माझ्याकडे आली .ती माझ्या पुढ्यात येताच माझे मित्रही जरा चमकले.त्यांच्याकडे लक्ष न देता ती म्हणाली .काल तुमचे आभार मानायचे राहून गेले . मला मोठी चुटपुट लागून राहिली होती. आभार मानावे  एवढेही साधे औचित्य  हिला नाही असे तुम्ही मनात म्हणाले असाल .काल तुम्ही मला केलेल्या मदतीबद्दल पुन्हा पुन्हा मन:पूर्वक आभार .

खरे म्हणजे तिने कालच माझे आभार मानले होते .आभार मानल्याचे ती विसरली तर नक्कीच नव्हती .तिला काहीतरी निमित्त काढून बोलायचे होते हे मी ओळखले .मी तिला मिस्किलपणे  विचारले कोणाकडून मी आभार स्वीकारत आहे हे मला कळेल काय ?!त्यावर तिने हसून रसिका म्हणून सांगितले .ही मुलगी दिसायला तर चांगली होतीच परंतु तिच्या वागण्यातील बोलण्यातील मार्दव ऐकण्यासारखे अनुभवण्यासारखे होते .एवढ्यात तिने मला विचारले की मी कुणाचे आभार मानीत आहे ते मला कळेल काय !मी अर्थातच माझे नाव सांगितले .ती मला आभार मानल्याचे निमित्त करून पुन्हा भेटायला आली त्यावरून मी तिला आवडल्याचे सहज लक्षात येत होते.आता तर तिने माझीच क्लुप्ती वापरून माझे नावही माहीत करून घेतले होते.  

एकंदरीत सुरुवात तर चांगली झाली होती ती कायनात की  काय म्हणतात ती माझ्या बाजूने होती !!

(क्रमशः )

२०/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन