Get it on Google Play
Download on the App Store

६ अफलातून प्रेमकथा २-२

(ही गोष्ट काल्पनिक आहे.कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

.मी तुझ्याजवळच होतो परंतु मला तुला भेटण्याइतपत धीर नव्हता.~मी योग्य वेळेची वाट पाहत होतो .मी मनाशी ठरविले होते की जर सलग तीन महिने मी समस्यापूर्ती करू शकलो तरच दैव मला अनुकूल आहे नंतरच तुला भेटायचे .आता मी तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे .कुठे भेटायचे ते मला सांग.~

आणि मला भेटायचे नसले

तर ?

ते शक्यच नाही.तुझा चेहरा आरसपानी, पारदर्शक आहे.तुला तुझ्या चेहऱ्यावरील भाव लपविता येत नाहीत.आता तू मला कुठे भेटण्यासाठी  बोलवावे असा विचार करीत आहेस.हा विचार तुझ्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत आहे .

या माझ्या बोलण्यावर तू थोडी लाजलीस हेही मला दिसत आहे . लाजलीस की तू आणखीच गोड दिसतेस. तुला विचार करताना या गालातून त्या गालात जीभ फिरविण्याची सवय आहे.तशी तू आत्ता फिरवत आहेस, म्हणजेच तुझा विचार चालला आहे .बघ पुन्हा लाजलीस.

आता मात्र ती हैराण झाली .व्हिडिओ कॉल तर नाही ना म्हणून तिने एकदा स्क्रीनकडे पाहिले .तिला तिच्या विचाराचे हसू आले .आपण जर फोन कानाला लावून बोलतो तर त्याला आपल्या चेहऱ्यावरील भाव कसे दिसतील ?व्हिडिओ कॉल असता तर ते  आपल्याला सुरुवातीलाच लक्षात आले असते.हा मनकवडा असला पाहिजे .कदाचित सिनेमाप्रमाणे हा लांबून कुठुनतरी दुर्बिणीतून आपल्याला पहात असला पाहिजे असा एक गमतीशीर विचार तिच्या मनात आला .

लगेच तिने आपले कपडे ठिकठाक केले.केसांवरून हात फिरविला.

अग तू इतकी कॉन्शस होऊ नकोस. तू कशीही चांगली दिसतेस.

आता मात्र ती हैराण झाली हा नक्कीच कुठुनतरी आपल्याला पाहात असला पाहिजे.

ती तशीच फोन घेऊन गॅलरीत आली आणि तिने चौफेर खिडक्यांकडे पाहण्यास सुरुवात केली.

हा पाहात असला तरी कुठून पाहतो ते तिच्या लक्षात येईना .

अग तू पाहात असलेल्या कुठच्याच खिडकीत मी नाही. परंतू मी तुझ्या पुढ्यातच आहे.आता जास्त विचार करत बसू नकोस. कुठे भेटणार ते सांग.

त्यावर तिने गावाबाहेरील तलावाकाठच्या बागेत भेटू म्हणून सांगितले.

तिने पुढे मी तुला कशी ओळखणार?असे विचारले त्यावर तो म्हणाला मी तुला भेटेल तू काळजी करू नकोस .तीन महिने जशी वाट पाहिली तशीच आणखी काही तास वाट बघ.

नंतर तळ्याकाठी त्यांची भेट झाली .

ती तळ्याच्या काठी कट्ट्यावर बसून भिरभिरणार्‍या नजरेने तो कुठून येतो म्हणून पाहत होती . 

शेवटी तो आला.तो तिच्या समोरच्या सोसायटीत राहत होता.रोज येता जाताना तो तिला पाहात होता .तिची ओळख व्हावी असे त्याला उत्कटतेने वाटत होते .तो एका सीए फर्ममध्ये नोकरीला होता.तिच्या मित्र मैत्रिणीना नावाने पण लांबून ओळखत होता.त्यांचा समान मित्र समान मैत्रीण समान नातेवाईक सापडत नव्हते .तिची ओळख कशी करून घ्यावी या विचारात तो होता.निरनिराळय़ा मार्गांचा त्याने विचार करून पाहिला .सिनेमात हे मार्ग ठीक आहेत परंतु प्रत्यक्षात ते कठीण आहेत असे त्याच्या लक्षात आले . सहजच त्याचे लक्ष त्या  मासिकाकडे गेले.  त्यात त्याला तो समस्यापूर्ती कूटप्रश्न सापडला .त्याच वेळी त्याने आपल्या दैवाला कौल लावून पाहायचे ठरविले .जर आपण सलग तीन महिने समस्यापूर्ती करू शकलो तरच तिला फोन करायचा असे त्याने ठरविले होते .मिशन यशस्वी झाल्यामुळे तो आता तिच्यापुढे होता .

हे सर्व त्याने संभाषणामधून सहजरित्या बोलता बोलता तिला सांगितले .

तुला मला का भेटायचे होते असे तिने मिश्किलपणे विचारले       

त्यानेही तितक्याच मिष्कीलपणे ते मी अजून ठरविले नाही असे उत्तर दिले.

तिने मग ते कधी ठरविणार असे विचारता त्याने आपण रोज भेटत तर राहू.फोनवर बोलत तर राहू . तू मला आवडतेस .मला तुझी मैत्री पाहिजे. तुझ्या बरोबर रहाणे फिरणे मला आवडेल .काय बोलायचे ते आपोआप बोलले जाईल .त्यासाठी विचार करावा लागणार नाही .जे काही होईल ते उत्स्फूर्त होईल .असे उत्तर दिले .

प्रज्ञाला त्याची ओळख करून घेण्याची पद्धत खूपच आवडली होती.समस्यापूर्तीवर तर ती बेहद्द खूष होती.सतत तीन महिने समस्या पूर्तीचे प्रथम बक्षीस मिळणे यामध्ये बुद्धिमता,कलादृष्टी,रसिकता,प्रतिभा तर होतीच,परंतु दैवाची अनुकूलता आहे की नाही हे ओळखण्याची पद्धतही तिला फार आवडली .

एकाच वेळी बुद्धिमत्ता व दैव यांची त्याने उत्कृष्ट सांगड घातली होती .घाई घाईने कुठचाही निर्णय घ्यायचा नाही .सावधपणे समंजसपणे तोलून मापून नंतरच निर्णय घ्यायचा ही पद्धतही तिला आवडली होती .त्याच्या वर्तणुकीत उतावळेपणा कुठेही दिसून येत नव्हता. ही गोष्ट एखादीला आवडली असती तर एखादीला आवडली नसती .जिच्या तिच्या दृष्टिकोनावर ते अवलंबून आहे .

त्याची आवड,त्याची इच्छा ,त्याचे आपल्यावरील प्रेम,सहज ओळखता येत होते.हा सर्व खटाटोप त्याने तिला मिळवण्यासाठीच केला होता .ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट होती.

आपण तिला आवडतो की नाही,तिला आपण पसंत आहे की नाही ,हे तिला पारखू देण्याची संधी तो देत होता .हेही तिच्या लक्षात आले .त्याचा दृष्टिकोन उदार होता .

त्याचबरोबर प्रथमदर्शनी जरी ती त्याला आवडली असली तरी खरोखरच ती आपल्याला आवडते की नाही हे त्याला पाहायचे होते .त्यांची दूरदृष्टी, प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याची लकब आवडली ."प्रथमदर्शनी प्रेम" व "सर्व दर्शनी प्रेम" याची तो सांगड घालीत होता .

त्यांची भेट रोज होत असे असे नाही.फोनवर बोलणे मात्र न चुकता होत असे .

एकमेकांची नावे माहीत असूनही त्यांनी आपल्या फोनवर परस्परांचे नाव अनामिक व आवडी म्हणून सेव्ह केले होते.  

बोलण्यातून व भेटण्यातूम एकमेकांची आवडनिवड नातेवाईक यांची ओळख होत गेली .

शेवटी एक दिवस त्याने तिला रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी खास निमंत्रण दिले  .तिथे स्पेशल अॅरेंजमेंट करून कॅण्डललाइट डिनर ठेवले होते.व्हायोलिनचे मंद सूर पार्श्वभूमीला होते .तिच्या आवडीच्या डिशिस ठेवल्या होत्या . तिच्या आवडीचा ड्रेस त्याने घातला होता.

आजचे डिनर स्पेशल आहे हे तिने मनोमन ओळखले होते.तो आज आपल्याला मागणी घालणार हेही तिला आतून कुठंतरी जाणवले होते. तीही त्यांच्या आवडीचा ड्रेस घालून आली होती .त्याला आवडणाऱ्या अत्तराचा मंद सुगंध सर्वत्र पसरला होता .त्याला आवडणारे रवाखवा लाडू तिने आईच्या देखरेखीखाली  स्वतः करून आणले होते.

*कुणी कुणाला प्रपोज करावे यामध्ये जरा गोंधळ होता.*

* तो क्षण आला त्याने गुलाबाचे फूल हातात घेऊन तू माझ्याशी लग्न करशील का ?असे विचारले.*

* त्यावर तिने रवाखवा लाडूचा डबा त्याच्या हातात देत सदैव मी तुझीच आहे असे उत्तर दिले* 

(समाप्त)

५/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन